झी टीव्ही वाहिनीवर सध्या ‘सा रे ग म प 2021’ हा संगीतविषयक रिअलिटी शो जोमात सुरू आहे. आता आज शनिवारच्या भागात प्रेक्षकांना एक पर्वणी पाहायला मिळणार असून नामवंत निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई हे विशेष अतिथी म्हणून यात सहभागी होणार आहेत. या भागात अंतिम 10 स्पर्धकांनी आपल्या अप्रतिम आवाजात बहारदार गाणी सादर केली असली तरी सुभाष घई यांनी या भागात केलेल्या टिप्पणीमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्पर्धेतील गुणी आणि तरूण स्पर्धकांना उत्कृष्टपणे गाताना पाहून घई यांनी किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांच्याशी त्यांची तुलना केली. त्यापैकी एकाला तर घई यांनी कोरा चेक दिला. घई स्पर्धक नीलांजनाला म्हणाले, “तू फारच सुरेख गायलीस. तुझा आवाज इतका सुंदर होता की क्षणभर लताजीच हे गाणं गात आहेत, असं मला वाटलं. तू आमच्या ऑफिसमध्ये ये. तिथे एक कॉन्ट्रॅक्ट तुझी वाट पाहात असेल!” स्निग्धजितने ‘खलनायक’ हे गाणे सुंदरपणे गायल्यावर घई यांनी एका कोर्या चेकवर स्वाक्षरी केली आणि तो स्निग्धजितला देऊन सांगितले, “स्निग्धजित, तुला माझे आशीर्वाद आहेत. कोणत्याही गायकासाठी प्रारंभाचा संघर्षाचा काळ महत्त्वाचा असतो हे मला ठाऊक आहे आणि आज या ठिकाणी पोहोचण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने असाच संघर्ष केला आहे, हेही मी जाणतो. तुझं गाणं ऐकून मी खूप प्रभावित झालो असून मला तुला एक चेक द्यायचा आहे. मी त्यावर कोणतीही रक्कम घातलेली नाही. तू तुला हवी ती रक्कम त्यावर लिही.”