चीन आपल्या देशातली गाढवं पळवतो आहे, अशी बातमी वाचली… आता काय उपाय करायचा?
श्रीरंग टेंभुर्णे, भोकरदन
आपली गाढवं कमी झाली, तर आपल्या लोकशाहीच कसं होणार?
तुमच्या कलाजीवनातला टर्निंग पॉइंट कोणता?
मेघना नेने, पंढरपूर
फु बाई फु
जुन्या नाटकांपैकी कोणतं नाटक पुनरुज्जीवित करून त्यातली कोणती भूमिका करावीशी वाटते तुम्हाला?
दिवाकर कदम, भायंदर
घाशीराम कोतवालमधला घाशीराम.
नाटक, सिनेमा की मालिका… तुम्हाला अभिनेता म्हणून सगळ्यात जास्त समाधान कुठे मिळतं?
रसिका पेडणेकर, चेंबूर
नाटकात.
‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता,’ हे प्रेयसी दुरावल्यानंतरचं प्रणयगीत आहे, अशी बराच काळ समजूत असते अनेकांची… तुमची तशी झाली होती का?
सुनंदन सुर्वे, टिळकनगर
ती आई होती म्हणुनि घनव्याकुळ मीही रडलो, अशी गाण्यात ओळ असताना का असा समज होईल?
तुम्हाला ‘टाइमपास’ करताना अधिक समाधान मिळतं की ‘वाडा चिरेबंदी’ करताना?
अभिनंदन बोरसे, धुळे
दोन्ही
आतापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला सगळ्यात क्यूट काँप्लिमेंट कोणती मिळाली?
सायली दिवाडकर, तळेगाव
अनेक आया असं म्हणाल्यात ‘अलबत्या गलबत्या’ पहिल्यावर की या चेटकिणीला पर्समध्ये घालून घरी घेऊन जावंस वाटतं!!
कोरोनाफिरोना काही नाही, हे एक कारस्थान आहे, सगळं खोटं आहे, असं काही लोक फार प्रभावीपणे सांगतात… तुम्हाला काय वाटतं?
रेश्मा गिरमे, सांताक्रूझ
भयावह होता है अज्ञानीओं का आत्मविश्वास.
एका टप्प्यानंतर बहुतेक अभिनेत्यांना दिग्दर्शनाकडे वळावं असं वाटायला लागतं, तुम्हाला वाटतं का तसं?
स्नेहल डिकोस्टा, विरार
नाही, माझं बरं चाललंय… आणि मला जे येत नाही ते मी करू शकतो असा विश्वासही देता नाही लोकांना.
आजवरच्या अभिनयप्रवासातली तुमच्या मते तुमची सगळ्या श्रेष्ठ भूमिका कोणती?
शीतल गायकर, कणकवली
कुठलीच नाही.
जब्बार पटेलांचा ‘सिंहासन’ हा सिनेमा पुन्हा तयार करण्यात आला (जसाच्या तसा), तर त्यात तुम्हाला कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल?
शुभदा घोसाळकर, महाड
मी नाही पाहिलाय… पाहून कळवतो.
लग्नासाठी मी तीन मुली पाहिल्या. मला तिन्ही आवडल्या आहेत. आता होकार कुणाला कळवू?
रोहित वारंग, नागोठणे
आधी त्यांनी नको का होकार कळवायला?
मी बायकोवर रागावलो होतो. पण मी तिच्यावर रागावूच कसा शकतो म्हणून आता बायको माझ्यावर रागावली आहे. आता मी काय करू?
प्रकाश शिंदे, सानपाडा
उठाबशा काढायची प्रॅक्टिस करा…
भारतात शिकून मोठी झालेली माणसं परदेशात मोठमोठया कंपन्यांच्या उच्चपदांवर विराजमान होतात, याचा अभिमान बाळगायचा की आपल्या देशात त्यांच्या गुणवत्तेचं चीज होत नाही, याची खंत बाळगायची?
अशोक पांगे, हडपसर
खरं सांगा, आपल्या देशाचं काय होतंय याकडे कुणाचं लक्ष आहे?
विश्वसुंदरी, जगतसुंदरी स्पर्धेत सगळ्या भारतीय स्पर्धक गरीबांसाठी काम करायचं आहे, असं सांगतात आणि इथे आल्यावर हिंदी सिनेमात नायिका बनतात… असं का?
सुवर्णा बेणारे, सातारा
सगळेच काहीतरी मिळवण्यासाठी खोटं बोलतात…
मिसळ कुठची फक्कड… पुण्याची, नाशिकची की कोल्हापूरची?
पैगंबर खान, कोल्हापूर
कोल्हापूरची.
नववर्षानिमित्त राष्ट्राला उद्देशून काय संदेश द्याल?
वैभव टेमघिरे, नाशिक
गप्प बसा… आणि स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी आता रस्त्यावर उतरा. पेटून उठा.