‘युवर ऑनर, पहाटे पाचच्या सुमाराला आम्हाला वॉचमन शिंदेचा फोन आला, की ९ नंबर बंगल्यातल्या श्रीमती कौल त्यांच्या बंगल्याच्या आवारात रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. मी आणि माझी टीम तातडीने घटनास्थळी पोहोचलो. श्रीमती कौल कधीच मेल्या असाव्यात. त्यांचे शरीर गार पडायला लागले होते. बंगल्याचा हॉलमध्ये अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या; बहुदा त्यांची कोणाशी तरी झटापट झाली असावी. त्या पसार्यातच एक आयडी कार्ड, जे की आरोपीचे आहे, ते आम्हाला सापडले. आम्ही अधिक चौकशीसाठी आरोपीला ताब्यात घेतले आणि संपूर्ण गुन्हा उघडकीला आला.’
—–
गंजलेल्या, जीर्ण झालेल्या त्या मरतुकड्या फॅनची कुरकूर सोडली तर कोर्टात एक विलक्षण शांतता पसरली होती. कोर्टात हजर असलेल्या प्रत्येकाची नजर आरोपी म्हणून उभ्या असलेल्या त्या १८ वर्षाच्या कोवळ्या पोरावर खिळलेली होती. आताशी कुठे त्याला मिसरूड फुटायला लागले होते; पण ज्या गुन्ह्याखाली त्याला कोर्टात उभे केले होते तो इतका भयानक होता की साधे पेपरात त्या गुन्ह्याबद्दल वाचताना देखील अनेकांच्या अंगावर शहारे उमटले होते, तर काहींच्या ब्लडप्रेशरने खाली-वर धाव घेतली होती. एका चाळीस वर्षीय विधवेवर बलात्काराचा प्रयत्न आणि तो असफल होत असल्याचे लक्षात आल्यावर अत्यंत निर्घृणपणे डोक्यात बत्ता घालून तिचा केलेला खून….
जज फणसळकर मॅडम येत असल्याची वर्दी झाली आणि प्रत्येक जण जागेवर उभा राहिला. कोर्टावर शांतपणे एक नजर फिरवत फणसळकर मॅडमनी आपली जागा घेतली. काहीशा नाराजीनेच त्यांनी एकदा वरच्या फॅनकडे पाहिले. मात्र आज कोर्टात गर्दीचा उच्चांक पाहता असे दहा फॅन देखील वारा घालायला कमी पडले असते हे त्यांच्या लक्षात आले. अर्थात काही गर्दी जशी या भयानक गुन्ह्याच्या खटल्याची उत्सुकता म्हणून आली होती, त्यापेक्षा अधिक गर्दी ही त्यांच्या लाडक्या हीरोला बॅरिस्टर धवल राजहंसला पाहायला, ऐकायला आणि तो आरोपीविरुद्ध सादर झालेल्या प्रत्येक पुराव्याच्या चिंध्या कशा उडवतो आणि एका फालतू वाटणार्या साक्षीत देखील केस कशी बघता बघता उलटी सुलटी करतो हे अनुभवायला जमलेली होती.
‘ऑर्डर ऑर्डर… आजची गर्दी पाहता ही सूचना करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून खटल्याचे कामकाज सुरू होण्याआधी सूचना करते आहे. कृपया प्रत्येकाने केसचे कामकाज चालू असताना पूर्ण शांतता राखावी. कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स करणे, कुजबुज करणे टाळावे. वार्ताहरांनी देखील कामकाज सुरू असताना फोटो काढणे टाळावे. धन्यवाद.’ सूचना संपवून फणसळकर मॅडमनी सहेतुक बॅ. नाथांकडे पाहिले आणि ते गडबडीने कोर्टाला अभिवादन करत उभे राहिले.
‘कृपया सरकारी वकिलांनी खटल्याची प्रस्तावना मांडावी.’
कोर्टात हजर असलेल्या सर्वांचे अगदी आरोपीचे वकीलपत्र घेतलेल्या धवल राजहंसचे देखील कान बॅ. नाथ यांचा शब्द न् शब्द टिपण्यासाठी टवकारलेले होते. ही फार दुर्मिळ केस होती, जी घेतल्याचा धवलाला पश्चात्ताप होणार आहे याबद्दल त्याच्या मित्रमंडळींची पूर्ण खात्री होती. धवल देखील अजूनही तळ्यात मळ्यात अशाच उड्या मारत होता.
बॅ. नाथ शांतपणे चालत आरोपीच्या पिंजर्यापाशी आले आणि त्यांनी त्याच्याकडे एक करूण कटाक्ष टाकला आणि खेदाने मान हलवली. त्यांच्या या कृतीने कोर्टात उपस्थित असलेल्या अनेकांच्या पोटात गलबलून आले. वातावरणनिर्मिती व्यवस्थित झाल्याची खात्री करत नाथांनी घसा खाकरला आणि ते बोलायला लागले, ‘खरे सांगायचे तर आता कुठे आयुष्याची सुरुवात होत असलेल्या या कोवळ्या तरुणाला फाशीच्या दोराकडे नेण्याचे कार्य मला पार पाडावे लागत आहे; याबद्दल माझ्याइतके दु:ख कोणाला होत नसेल. पण शेवटी कायद्यापुढे नाती, भावना सगळे खुजे असते. आज या कोर्टात अत्यंत भोळा चेहरा करून, रडून लाल झालेले डोळे घेऊन उभा राहिलेला हा तरूण प्रत्यक्षात मात्र एक हैवान, बलात्कारी आणि खुनी आहे हे समोर येते, तेव्हा माणसाच्या चांगुलपणावरचा, माणुसकीवरचा विश्वास उडून जातो. एक सालस, पापभीरू आणि एकटी पडलेली विधवा आयुष्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होती. वर्षभरापूर्वीच पती गेल्याचे दु:ख विसरून जगाच्या रहाटगाडग्यात स्वत:ला अॅडजस्ट करत होती. एक पावसाळी रात्री कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे तिला देखील स्वयंपाकाचा कंटाळा येतो, काही चमचमीत बसल्याजागी हवेसे वाटते. म्हणून ती बाहेरून एक पिझ्झा मागवते. तिच्या दुर्दैवाने पिझ्झा डिलिव्हरीसाठी अंजन राणे या तरुणाची ड्यूटी लागते. या अंजनच्या भूतकाळाबद्दल मी कोर्टापुढे सविस्तर माहिती आणेनच, पण अत्यंत अकाली वयात वाया गेलेला तरूण यापेक्षा याच्याविषयी जास्ती काय सांगावे? तर असा हा अंजन त्या रात्री पिझ्झा घेऊन श्रीमती राधा कौल यांच्या घरी पोचला. नुकत्याच गच्चीवर पावसाचा आनंद घेऊन आलेल्या श्रीमती कौल यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांचे ओले सौंदर्य पाहून अंजन चाळवला. श्रीमती कौल यांनी माणुसकी दाखवत भर पावसात आलेल्या अंजनला घरात बोलावले आणि पाणी विचारले. अंजनसाठी पाणी आणायला म्हणून श्रीमती कौल आत गेल्या आणि त्याच संधीचा फायदा घेत अंजनने दरवाज्याला कडी घातली. त्याच्यातला हैवान आता जागा झाला होता. त्याने थेट श्रीमती कौल यांच्यावर स्वत:ला झोकून दिले. त्याचा इरादा लक्षात यायला श्रीमती कौल यांना वेळ लागला नाही; त्यांनी पूर्ण ताकदीने त्याचा प्रतिकार केला. शेवटी ही अत्याचार-प्रतिकाराची लढाई आपण जिंकत नाही, हे लक्षात येताच संतापाने पिसाटलेल्या अंजनने या धुमश्चक्रीत शोकेस मध्ये ठेवलेला, शो-पीस असलेला पण वजनाने जड असलेला बत्ता घेतला आणि सरळ श्रीमती कौल यांच्या डोक्यात घातला. कौल जागीच कोसळल्या आणि त्यांचे श्वास थांबले. आपल्या हातून काय घडले आहे, हे लक्षात येताच अंजनने तिथून तात्काळ पळ काढला. पण तो अनेक पुरावे मागे सोडून गेला होता; जे कोर्टासमोर येतीलच.’ ओपन अँड शट प्रकारच्या या केसमध्ये फारसे काही बोलावे असे नाही. माननीय कोर्टाला माझी नम्र विनंती आहे की, फक्त वय कमी आहे, म्हणून इतक्या नृशंसपणे एका स्त्रीची हत्या करणार्या, तिच्यावर बलात्कार करू पाहणार्या या नराधमाला शिक्षा कमी करू नये. याला फक्त आणि फक्त फाशीच व्हायला हवी!’
कोर्टात टाळ्यांचा गजर झाला आणि कौतुकाने कोर्टातल्या गर्दीकडे बघत बॅ. नाथ खाली बसले. आता जनतेचा लाडका बॅ. धवल राजहंस उभा राहणार होता. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडेच होते. धवल शांतपणे कोर्टाला अभिवादन करत उभा राहिला आणि त्याने कोर्टात सर्वदूर नजर फिरवली.
‘माझ्या अशीलाचे जे काही चित्र आता रंगवण्यात आले, ते पाहता मला देखील मी वकीलपत्र घेऊन चूक केली का काय असे वाटायला लागले आहे. पण रंगवलेले चित्र आणि मूळ वस्तू यात फरक असतो. माझा अशील पूर्णपणे निर्दोष आहे, हे मी सिद्ध करेनच; पण त्याआधी मी बॅ. नाथ यांच्याशी सहवेदना व्यक्त करतो. हत्या झालेल्या श्रीमती कौल या बॅ.नाथ यांच्या शेजारी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या अत्यंत जवळची मैत्रीण होत्या,’ धवलने बॅ. नाथांकडे पाहून हात जोडले आणि तो आपल्या जागेवर पोचला. मात्र, तो जागेवर पोहोचण्यापूर्वीच कोर्टात कुजबूज सुरू झाली होती.
‘नाथाच्या शेजारी राहायची का ती? आता तर हा नाथ्या पेटून केस लढणार! कोर्टाचे रणांगण होते बघ!’ एक प्रेक्षक शेजारच्या मित्राच्या कानात अशा आवाजात पुटपुटला की ते संपूर्ण कोर्टाला ऐकायला गेले. कोर्टात एकच हशा पिकला…
‘श्रीकांत शिंदे हाजीर हो!!’
शपथेचे सोपस्कार पार पडले आणि बॅ. नाथांनी प्रश्नोत्तराला सुरुवात केली.
‘मिस्टर शिंदे तुम्ही काय करता आणि खून घडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात हे कोर्टाला सविस्तर सांगा.’
‘साहेब, मी आकाशगंगा बंगलो सोसायटीचा वॉचमन आहे. खून झाला तेव्हा मी कौल मॅडमच्या लेनमध्येच ड्यूटीला होतो.’
’समोरच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या तरुणाला याआधी कुठे बघितल्याचे आठवते आहे का?’
‘खून झाला त्या रात्री म्हणजे शनिवारी तुफान पाऊस चालू होता. मी पण दोन नंबरच्या केबिनमध्ये शिरलो होतो. हा पोरगा त्यावेळी पिझ्झ्याचे पार्सल घेऊन आला होता. याने कौल मॅडमच्या बंगल्याचा अॅड्रेस देखील विचारला.’
‘हा नक्की तोच होता?’
‘शंभर टक्के साहेब. केबिनच्या आत आणि बाहेर देखील येवढा उजेड असतो की चार हातावरचा माणूस देखील पावसात ओळखता येईल.’
बॅ. नाथांनी सहेतुक नजरेने धवलकडे पाहिले.
‘नो क्वेश्चन्स… फक्त माझी बॅ.नाथ यांना येवढीच विनंती आहे की, माझा अशील श्रीमती कौल यांच्या घरी गेला होता, त्याने काही क्षण तिथे घालवले हे आम्हाला मान्य आहे. त्यामुळे त्यांनी ’तो तिथे गेला का नाही’ अशा साक्षीत वेळ न घालवता मुद्द्याला हात घालावा!’
ऑब्जेक्शन नाही का काही नाही, पण एका क्षणात धवलने बॅ. नाथांना शॉक दिला होता. त्यांना वाटले होते की आरोपी तिथे गेलाच नाही, तो तिसरीकडेच होता हे सिद्ध करण्यासाठी धवल धडपड करेल; पण हे फासे काही उलटेच पडत होते. चक्क आरोपीचा वकील मान्य करतोय, की गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपी हजर होता… अतर्क्य आहे हे! डोक्यात विचारांची चक्रं फिरवत त्यांनी फोरेन्सिकला कॉल दिला.
‘डॉ. राघव मृत्यूचे कारण?’
‘डोक्यात जड वस्तूचा प्रहार नाजुक जागी बसल्याने जागीच मृत्यू आलेला आहे. घटनास्थळावरून जप्त केलेला बत्ता, त्यावर लागलेले रक्त, केस आणि डीएनएची तपासणी यावरून हा बत्ताच डोक्यात घालून खून करण्यात आलेला आहे असा निष्कर्ष काढता येईल.’
‘आता महत्त्वाचा प्रश्न, मृत्यूची वेळ?’
‘अचूक सांगता येणार नाही, पण रात्री १०.४० ते ११.१० याच्यामध्ये.’
‘युवर कॉल…’
‘नो क्वेश्चन,’ धवलने शांतपणे उत्तर दिले आणि कोर्टातल्या बर्याच जणांनी डोक्याला हात लावला. धवल फोरेन्सिकवर केस फिरवणार म्हणून पैजा लावून बसले होते ना ते!
– – –
‘इन्स्पेक्टर काळे, या केसचा तुम्ही केलेला तपास, तुमच्याकडचे पुरावे ज्यावरून तुम्हाला आरोपीचा संशय आला, आरोपीची धरपकड याबद्दल कोर्टाला सविस्तर सांगा.’
‘युवर ऑनर, पहाटे पाचच्या सुमाराला आम्हाला वॉचमन शिंदेचा फोन आला, की ९ नंबर बंगल्यातल्या श्रीमती कौल त्यांच्या बंगल्याच्या आवारात रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. मी आणि माझी टीम तातडीने घटनास्थळी पोहोचलो. श्रीमती कौल कधीच मेल्या असाव्यात. त्यांचे शरीर गार पडायला लागले होते. बंगल्याचा हॉलमध्ये अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या; बहुदा त्यांची कोणाशी तरी झटापट झाली असावी. त्या पसार्यातच एक आयडी कार्ड, जे की आरोपीचे आहे, ते आम्हाला सापडले. आम्ही अधिक चौकशीसाठी आरोपीला ताब्यात घेतले आणि संपूर्ण गुन्हा उघडकीला आला.’
‘बॅ. धवल, युवर विटनेस….’
‘नो क्वेश्चन्स,’ धवल शांतपणे म्हणाला आणि जज फणसळकर देखील चमकल्या. आज या धवलच्या मनात आहे तरी काय?
– – –
‘प्रोफेसर दिघे, तुमच्याविषयी कोर्टाला सांगा.’
‘युवर ऑनर, मी फिंगरप्रिंट एक्स्पर्ट म्हणून इन्स्पेक्टर काळेंच्या टीममध्ये काम करतो.’
‘दिघे मला सांगा, तुम्हाला आरोपीच्या बोटांचे ठसे कुठे कुठे सापडले?’
‘सर, आरोपीच्या हाताचे ठसे एका रक्त लागलेल्या बत्त्यावर, खुर्चीच्या एका हातावर आणि दरवाजाच्या आतल्या लॅचवर आढळले.’ दिघेंचे वाक्य संपले आणि धवलने देखील चमकून अंजनकडे पाहिले.
बॅ. नाथांची विचारपूस पूर्ण होताच धवल उभा राहिला. ’अब आयेगा मजा..’ कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात हाच विचार आला.
‘दिघे आरोपीच्या बोटांबरोबरच आणि कोणते ठसे सापडले आरोपीचे?’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर! हा काय प्रश्न आहे?’
‘त्यांचा प्रश्न योग्य आहे,’ परस्पर दिघेंनीच उत्तर दिले आणि बॅ. नाथ चिडचिड करत खाली बसले.
‘आम्हाला आरोपीच्या बुटाचे ठसे
हॉलमध्ये आत आलेले, बाहेर पडलेले आणि हो रक्त लागलेल्या बत्त्यावर देखील सापडले.’
‘बुटाचे ठसे एकाच दाबाचे होते?’
‘अगदी एका प्रमाणात आणि एका दाबात होते.’
धवलने खाडकन जज मॅडमकडे पाहिले, ‘याची नोंद करून घ्यावी युवर ऑनर!’ त्याने शांत आवाजात सांगितले.
‘आता यात नोंद करण्यासारखे काय आहे?’ हा विचार करत नाथांनी उगाच ब्लडप्रेशर वाढवून घ्यायला सुरुवात केली; मात्र धवलने काय केले आहे ते प्रोफेसर दिघेंच्या बरोबर लक्षात आले होते. ’साला आहे खरा डोकेबाज.’ त्यांनी मनातल्या मनात धवलचे कौतुक केले.
दिघे बाहेर पडत असतानाच कोर्टाच्या घड्याळाने हाळी दिली आणि कोर्टाचे कामकाज दोन दिवसासाठी स्थगित करत कोर्ट उठले.
– – –
‘राघव, मला आकाशगंगाचा पूर्ण नकाशा हवा आहे. एकही डिटेल सुटायला नको. आपल्या शहरातला सगळ्यात मोठा इंटेरियर डिझायनर आहेस तू, तुझ्यासाठी हे अशक्य नाही!’ पलीकडून होकार आला आणि धवलने शांतपणे फोन खाली ठेवला आणि लगेच दुसरा फोन उचलला, ‘सारंग मी धवल बोलतोय. माझे एक अर्जंट काम आहे आणि ते तुझ्याशिवाय कोणीही पार पाडू शकणार नाही.’
‘पिझ्झा बॉय खटला ना?’
‘येस! हे बघ अंजनचे म्हणणे असे आहे की तो जेव्हा त्या बंगल्यात शिरला तेव्हा आतमध्ये अंधार होता आणि दार उघडे होते. तो आत गेल्यावर कोणीतरी बाहेर पळाल्यासारखे त्याला वाटले अन् त्या माणसाने पळताना दरवाजा ओढून बंद केला. शेवटी अंजन किचनच्या खिडकीतून पळाला.’
‘धवल, तुझा क्लायंट तुला गाढवाचे कान लावतोय. अरे, जर तुझा अशील बंगल्यात होता, कोणीतरी बाहेरून दरवाजा बंद केला होता, तर मग त्या कौल बाईचे प्रेत बंगल्याच्या आवारात आले कसे?’ खाडकन सागरने विचारले आणि धवलच्या डोक्यात ४४० चा झटका बसला.
‘सागर्या, मी सांगतो तेवढे तू आता कर. बाकीचे मी शोधतो.’
‘नेहमीसारखी तुला सगळी माहिती २४ तासात हवी असेल ना?’
‘मी सांगतोय त्यावर फक्त लक्ष केंद्रित कर. तू योग्य माहिती पोचवलीस ना सागर, तर मी परवाच या केसचा निकाल लावतो बघ!’ धवल शांतपणे म्हणाला आणि सागर फोनचा रिसीव्हर डोक्यात आपटत बसला.
– – –
‘सरकारी वकिलांची हरकत नसेल, तर मला एक साक्षीदार बोलवायचा आहे,’ धवलने कोर्टाला विनंती केली आणि बॅ. नाथांच्या संमतीने साक्षीदाराने स्टँड घेतला.
‘तुमचे नाव आणि काम?’
‘सर मी रामनाथ जोंधळे, मी आकाशगंगाला वॉचमन आहे.’
‘खून झाला त्या रात्री तुझी ड्यूटी कुठे होती? त्या रात्री तुला काही वेगळे जाणवले?’
‘साहेब, मी सात नंबर लेनला होतो. पाऊस चालू झाला आणि मी केबिनमध्ये गेलो. बिडी प्यायची जाम इच्छा झाली होती पण नेमकी बिडी संपलेली, म्हणून मी श्रीकांतला शोधत त्याच्या केबिनकडे निघालो. त्याचवेळी एक पल्सर गाडी जोरात माझ्या अंगावर पाणी उडवत तीन नंबर गेटने बाहेर पडली.’
‘गाडीवाल्याचा चेहरा पाहिला?’
‘हो साहेब, लाइट सगळे चालू होते तेव्हा. हा समोर उभा आहे तोच पोरगा होता अन त्याच्या अंगावर तो डिलिव्हरीवाल्याचा
युनिफॉर्म देखील होता.’
‘आता मला एक सांग रामनाथ, सात नंबर लेनमधून पाऊस जोरात चालू झाल्या झाल्या तू बाहेर पडलास, बरोबर?’
‘हो साहेब..’
‘केबिनकडे जाताना तुला कोणी दिसले?’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर.
सजेस्टिव क्वेश्चन!’ नाथ गरजले.
‘सस्टेन्ड’
‘रामनाथ, तुला तुझ्या दोन लेनच्या प्रवासात काय काय दिसले?’ धवलने हसत हसत प्रश्न विचारला.
‘सात आणि नऊ नंबरच्या लेन मधून राजासाहेब त्यांच्या घराकडे निघाले होते. घाईघाईने बाहेर पडत होते. त्यांच्या हातात कोट होता.’
‘तुमचे काही बोलणे झाले?’
‘नाही साहेब. पण थोड्या वेळाने ते किल्ली शोधत आले; तेव्हा मात्र आमच्या गप्पा झाल्या.’
‘काय गप्पा झाल्या तुमच्या?’
‘विशेष काही नाही, राजासाहेब म्हणाले की, मगाशी जाता जाता कोटाच्या खिशातून किल्ली पडली, तीच शोधायला आले होते.’
‘सापडली का मग?’
‘हो… ती किल्ली हातात घेऊनच ते घराकडे निघाले होते.’
‘रामनाथ, या कोर्टात तुला तुझे राजासाहेब कुठे दिसत आहेत का?’ धवलने थंडगार आवाजात प्रश्न केला आणि रामनाथने शांतपणे बॅ. नाथांच्याकडे बोट दाखवले.
कोर्टातली खळबळ शांत करायला न्यायमूर्तींची तब्बल पंधरा मिनिटे खर्च झाली. धवल पुन्हा बोलायला उभा राहिला तरी कोर्टात कुजबूज सुरूच होती.
‘कोर्टात माजलेली खळबळ मी ओळखू शकतो मिलॉर्ड पण असा एकदम बॉम्ब टाकण्याशिवाय माझ्याकडे देखील पर्याय नव्हता!’
‘बॅ. धवल त्यांना जे सिद्ध करायचे आहे, ते पुराव्यासह करतील का?’ कोर्टाने विचारले, पण दोन्ही हातात डोके गच्च धरून बसलेल्या बॅ. नाथांना पाहून कोर्टातील प्रत्येकालाच खरे काय ते कळून चुकले होते.
‘युवर ऑनर, मला पोलिसांना दोष द्यायचा नाही, पण खून हा अंजननेच केला आहे असा एकच दृष्टिकोन ठेवून तपास झाल्याने, त्याला एक मर्यादा आल्या. मला मात्र का कोणास ठाऊक कसा, पण, अंजनवर पहिल्यापासून विश्वास होता. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट दिघेंनी तो विश्वास अजून घट्ट केला! अंजनचे ठसे घराच्या लॅचवर आतील बाजूने सापडले, पण दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला एकही ठसा नव्हता. महत्त्वाचे म्हणजे ज्या बत्त्याने खून झाला, त्याच्यावर अंजनच्या बुटाचे ठसे सापडले. याचा अर्थ, अंजन जेव्हा कौल यांच्या बंगल्यात शिरला, तेव्हा चुकून त्याचा पाय तिथे पडलेल्या बत्त्यावर पडला, जो त्याने उचलला. मात्र त्यानंतर चमकलेल्या विजेच्या प्रकाशात त्याला जे काही दिसले ते पाहून तो घाबरला आणि गडबडीने तिथून पळाला. धावपळीत त्याचे आयकार्ड तिथेच पडले.
हॉलमध्ये पसरलेल्या एकाही वस्तूवर त्याचे ठसे नाहीत. मुख्य म्हणजे खून केल्यावर हॉलमधले प्रेत तो बाहेर व्हरांड्यात फरफटत का आणून टाकेल? आणि जर त्याने प्रेत ओढत बाहेर आणले असेल, तर बाहेरच्या बाजूने त्याचे बुटांचे ठसे घासलेले किंवा जास्ती ठळक यायला पाहिजेत, कारण तो जड प्रेत ओढत आणत होता. मात्र घटनास्थळी असे काही दिसून आले नाही. मुख्य म्हणजे जे पिझ्झाचे पार्सल अंजन घेऊन आला होता, ते कुठे गेले? मी माझ्या तपासात श्रीमती शुक्लांच्या भूतकाळात देखील डोकावण्याचा प्रयत्न केला आणि बिंगो… माझ्या हाताला खुनाचे कारणच लागले! युवर ऑनर, खुनाच्या आदल्या दिवशी श्रीमती शुक्ला डॉक्टर तपस्वींकडे गेल्या होत्या. कारण… कारण त्यांना आपण प्रेग्नंट आहोत अशी शंका आली होती,’ धवलने शांतपणे आपले वाक्य संपवले आणि बॅ. नाथांकडे बघितले.
‘आय कन्फेस!’ शांतपणे उठत बॅ. नाथ म्हणाले आणि पुन्हा एकदा कोर्ट प्रचंड कोलाहलात बुडून गेले, ‘माझे आणि राधाचे अनैतिक संबंध होते. पण गेल्या काही दिवसापासून ती या नात्याला नाव हवे म्हणून मागे लागली होती. त्यातच ती डॉ. तपस्वींकडे गेल्याचे कळले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. राधा की माझी प्रतिष्ठा, माझा सुखी संसार? या प्रश्नाला माझ्या मनाने उत्तर दिले आणि मी राधाला संपवायचे नक्की केले. त्या रात्री मी माझ्या घराच्याबाहेर गाडी पार्क करून हळूच राधाच्या बंगल्यात शिरलो. तिने दार उघडून मला आत घेतले आणि ती पाठमोरी किचनकडे निघाली, मी तोच क्षण निवडला आणि शोकेस मधला बत्ता…’ बोलता बोलताच बॅ.नाथ खाली बसले आणि कोर्ट फोटोग्राफर्सच्या फ्लॅशमध्ये न्हाऊन गेले.