नाना प्रयत्न करून थकलेला दिल्लीतील लाकूडतोड्या थकून भागून एका आडाच्या काठावर येऊन बसला आणि चिंताग्रस्त मुद्रेने `थकलो रे देवा’ असे पुटपुटला. आर्त स्वर ऐकून देवदूत विहिरीतून बाहेर पडला आणि प्रेमाने `काय झाले गुजरातच्या बाळा?’ अशी विचारणा केली. `फार वर्षांपूर्वी एक लाकूडतोड्या असाच निराश होऊन बसला होता, त्यानंतर तूच दिसलास बा?’ असे देवदूताने म्हणताच लाकूडतोड्या हमसून हमसून रडू लागला.
`वत्सा, काय झालं! सांग मला?’
`देवदूता, मी अमित. सेम स्टोरी आहे माझी आणि त्या लाकूडतोड्याची.’
`म्हणजे कसे वत्सा!’
`देवा, खूप प्रयत्न केले महाराष्ट्रात सत्ता मिळवायचे, पण फोल ठरले…’
`काय काय केलंस, नीट सांग.’
`मित्रपक्षाला अंधारात ठेवून, पहाटेच्या शपथा घेतल्या, पण हाय रे कर्मा…’
`अजून काय काय प्रयत्न केलेस?’
`दोन कुर्हाडी पण पाण्यात पडल्या, ज्याच्या जिवावर आम्ही पुन्हा खूप प्रयत्न केले.’
`कुठल्या वत्सा?’
`ईडी आणि एनसीबी. खूप प्रयत्न केले यांना बदनाम करण्याचे. पण अखेरीस फेल ठरलो देवा.’
`मित्रांना अशी वागणूक?’
`राजकारण यालाच म्हणतात देवा.’
`आता इथे का आलास? प्रयत्न तर करून झाले ना. आता काय मिळवणार आहेस?’
`देवा, अंगातील खोडसाळपणा जात नाही, काड्या करायची सवय लागली आहे. मुंबई महापालिका तरी मिळवावी म्हणतो म्हणून आलो.’
`केवळ एका राज्याचा मुख्यमंत्रीपदासाठी एवढा आटापिटा?’
`देवा, सत्तेची भूक तुला रे काय कळणार?’
`त्यासाठी मित्रत्व आणि हिंदुत्व पणाला लावलं? रामायण, महाभारतातलं बंधुप्रेम, मित्रप्रेम ठावूक नाही तुला?’
`पण देवा, खुर्ची…?’
`त्या काश्मिरात अभद्र युती करून खुर्ची देऊ केलीसच ना मेहबूबाला? मग इथे काय झालं होतं समविचारी पक्षाला खुर्ची द्यायला?’
`देवा, त्या लाकूडतोड्याप्रमाणे तू मला माझ्या कुर्हाडींना धार करून देणार आहेस की माझीच झाडाझडती घेणार आहेस?’
`माफ कर, तुला मदत? छे छे. मुळीच नाही. कदापि नाही. स्वच्छ आणि निर्मळ मनाचा लोकांनाच मी मदत करतो. असले कटकारस्थान करून पूर्वाश्रमीच्या मित्रांना त्रास देणार्यांना देव पण माफ करणार नाही. जा तू,’ असे म्हणून देवदूत अंतर्धान पावला.
देवदूताचे वचन ऐकून गुजरातचा लाकूडतोड्या खजील झाला आणि दिल्लीला जाणार्या फ्लाइटमध्ये रिकाम्या हाताने जाऊन बसला.