• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कुल्या : रघुवीर कुल

- पुरुषोत्तम बेर्डे (ब्रेक के बाद)

पुरुषोत्तम बेर्डे by पुरुषोत्तम बेर्डे
December 30, 2021
in ब्रेक के बाद
0
कुल्या : रघुवीर कुल

नाटक, कविता करीत करीत आमचे सिनेमा बघणे चालूच होते, त्यात रघुवीरने आम्हा सर्वांना फिल्म सोसायटीचे मेंबर करून घेतले आणि आम्ही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटही पाहू लागलो. मी दूरदर्शनमध्ये ग्राफिक डिझायनर होतो आणि रघुवीर ‘फेमिना’मध्ये इलस्ट्रेटर म्हणून नोकरी करीत होता. १९७८ साली आम्ही नोकर्‍या सोडून ‘बेसिक पब्लिसिटी’ ही जाहिरातसंस्था काढली, त्यात सुधीर कोसके हा आमच्या ग्रूपमधला चित्रकारही आम्हाला जोडला गेला. सुधीर हा अत्यंत सफाईदार असा फिनिशिंग आर्टिस्ट होता, रघुवीर इलस्ट्रेटर आणि मी कॉपी रायटर- तसे आम्ही तिघेही अष्टपैलू असे एकत्र आलो होतो.
—–

मित्राची व्याख्या काय? रोज सकाळी फोन करतो तो? घरच्या कार्याला नवीन कपडे घालून येतो तो? उठता बसता काही बरं वाईट घडलं की, पार्ट्या मागणारा? की ‘चल दु:ख कशात तरी बुडवूया’ म्हणणारा? वेळप्रसंगी हातउसने पैसे देणारा? की उठसूट चार पैसे उधार मागणारा?… मित्राच्या अनेक व्याख्या करता येतील, पण अमुक म्हणजेच मित्र असं मात्र सांगता येणं कठीण आहे. ‘रघुवीर कुल’ म्हणजे रघुवीर कुलकर्णी, म्हणजे, रघ्या किंवा लालू किंवा रघु, म्हणजेच आमचा ‘कुल्या’… हा यापैकी कुठच्याही शिस्तीत न बसणारा बेशिस्त, पण मित्र म्हणून यादीतल्या अगदी वरच्या रकान्यात असणारा एक सुहृद… पहिली १८ वर्षे ‘कुल्या’ आणि त्यानंतर आजपर्यंत ‘रघ्या.’
सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅप्लाइड आर्टमध्ये या मित्राची ओळख होऊन आज ४८ वर्षे झाली आणि केवळ रघुच नव्हे, तर कमाल म्हणजे आम्ही जे मित्र म्हणून त्यावेळी जवळ आलो, ते सगळे आजही, इतक्या वर्षांनी मित्रच आहोत. ‘या मंडळी सादर करू या’ या नावाच्या एका बंद झालेल्या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या नावाखाली आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या बंधनात अडकून आजही मैत्रीचा जागर सुरू आहे. त्यातली नावे ऐकून चक्रावून जाल.. ‘कुल्या, नल्या, पावट्या, बेरड्या, गोट्या, ताड्या, खान्या, सूर्या, तात्या, हेम्या, काळ्या… वगैरे. अर्थात ही नावं कधी नावावरून तर कधी आडनावावरून प्रचलित झाली. त्यातल्या हेमंत शिंदे (हेम्या) विजय तडफळे (ताड्या) रमेश खानविलकर (खान्या) यांच्याबरोबर तर माझ्या मैत्रीची ‘गोल्डन ज्युबिली’ सुरू आहे. अशा विचित्र नावांची मुलं, चार वर्षे एकत्र शिक्षण घेऊन कॉलेजच्या बाहेर पडून पुढे अनेक वर्षे ‘या मंडळी…’च्या नावाखाली आजही एकत्र आहोत.

पहिला ब्रेक

१९७३च्या अ‍ॅडव्हान्सच्या तिसर्‍या वर्षाला आम्ही सर्व जण जेजेमध्ये एकत्र आलो, तेव्हा आमच्यात जवळ जवळ दोन ग्रूप पडले होते. एका बाजूला अशोक वंजारी, अरुण आंबेरकर, नलेश पाटील, राकेश शर्मा, रघुवीर कुलकर्णी आणि इतर आणि दुसर्‍या बाजूला मी, हेमंत शिंदे, अशोक साळगावकर, विजय तडफळे वगैरे. अगदी ‘मेरे अपने’ची परिस्थिती. कसे कुणास ठाऊक, पण नलेशची आणि माझी टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर गाठ पडली आणि आम्ही बराच वेळ अतिशय छान गप्पा मारल्यावर लक्षात आले की दोन्ही ग्रूपमध्ये कोणीतरी काहीतरी गैरसमज पसरवून, एकत्र येण्यापासून वंचित केले जात होते आणि लांबून मजा बघितली जात होती. त्याच रात्री जेजेमधल्या निवडणुकांच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो ते अगदी आजपर्यंत. नलेशनंतर माझी भेट झाली ती एका गोर्‍यागोमट्या मुलाबरोबर. उंच शिडशिडीत, हसमुख आणि बोलायला स्मार्ट. पहिल्याच भेटीत वेगवेगळ्या पुस्तकांवरून, सिनेमावरून गप्पा रंगल्या आणि मित्रत्वावर शिक्कामोर्तब झालं. त्या मुलाचं नाव रघुवीर कुलकर्णी, पण त्याला कुल्या या विचित्र नावाने इतर मुलं हाक मारीत, म्हणून मग आम्ही पण त्याच नावाने हाक मारू लागलो. त्या जनरल सेक्रेटरीच्या निवडणुकीच्या धामधुमीत आमच्यातर्पेâ रघुवीर कुलकर्णी, विजा रायकर आणि राणी सबनीस उभे राहिले आणि धमाल प्रचार करून आम्ही त्यांना निवडूनही आणले.
जेजेमध्ये मित्रमंडळींच्या रूपाने एक वेगळाच असा बुद्धी आणि विचारांचा खजिना सापडला. वेळोवेळी नावीन्यपूर्ण काहीतरी विचार मांडायचा आणि तो पूर्णत्वाला न्यायचा, हे आम्हाला व्यसनच लागले. त्यात ‘षांताराम पवार’ यांच्यासारखे गुरू लाभले आणि एक वेगळाच दृष्टिकोन आमच्यातल्या चित्रकारितेला लाभला. सृजनशीलतेला वाव मिळू लागला. साहित्य, कविता, नाटक, सिनेमा यांच्याकडे बघण्याची नवी दृष्टी सापडली. मी, कुल्या, नलेश, राकेश वगैरे आम्ही कॉपीरायटिंग करू लागलो. वर्गातल्याच मुलांसाठी, त्यांच्या प्रोजेक्टसाठी कॉपी लिहिण्याची कामे पवार सरांनी आम्हाला दिली. तशात कॉलेजमधल्या प्राध्यापक यंदेसरांनी कॉलेजच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना साहित्यप्रतिभा दखवण्याची संधी दिली. अनेक जण त्या भिंतीवर लेख, कविता वगैरे देऊ लागले. नलेश आणि रघुवीरने कविता करायला सुरुवात केली. त्यावर आमच्यातली द्वाड मुलं, म्हणजे हेमंत शिंदे, अशोक साळगांवकर यांच्यासारखे त्या दोघांना ‘कसल्या रे कविता करता? ही सगळी रेल्वे स्टेशनवर भीक मागण्याची लक्षणे आहेत…’ म्हणून हिणवायचे. पुढे ते दोघेही त्यांच्या कवितांचे चाहते झाले. नलेश पाटील तेव्हा निसर्गकवितांपर्यंत पोहोचला नव्हता. पण रघुवीरच्या कवितांनी मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले. विशेषत: षांताराम पवार, दामू केंकरे त्याच्या कवितांचे चाहते झाले. मी त्यावेळी त्या भिंतीवर नाटक-सिनेमाची परीक्षणे लिहायचो, ती सुद्धा टोपणनावाने. ‘समाचारी बेरड’ या नावाने, ते सर्व लिखाण मी ‘कुल्या’ला उद्देशून लिहायचो. एक मित्र दुसर्‍या मित्राला जणू काय नाटक सिनेमाचा रिपोर्ट देतोय… आणि त्यात भरपूर चेष्टामस्कर्‍या असायच्या, अर्थात नाटक किंवा सिनेमा वाईट असेल तरच.
तसं बघायला गेलं तर ‘या मंडळी सादर करू या’ या आमच्या ग्रूपमध्ये एकापेक्षा एक नग होते. त्यातल्या त्यात सहजसुलभ व्यक्तिमत्व होतं ते माझं आणि रघुवीरचं. रघु मूळचा सोलापूरचा. सोलापुरात शिक्षण घेऊन १८ वर्षांनी मुंबईत आला. त्यामुळे त्याच्या तोंडात एक गावरान रांगडी भाषा आणि अस्सल सोलापुरी चादरीइतक्याच शिव्याही असायच्या. वडील अनंत कुलकर्णी हे रेल्वेत मोटरमन, अत्यंत कडक स्वभाव. पण तो कुटुंबापुरताच. आम्ही मित्रमंडळी घरी गेलो की ते अत्यंत नम्रपणे आमच्याशी वागत. त्यांच्या कडक स्वभावाच्या कहाण्या रघु सांगे. पण आम्हाला कधी प्रत्यक्ष दिसल्याच नाहीत. सावरकरांचे प्रचंड चाहते. त्यांच्या घरात दोनच फोटो होते. एक सावरकरांचा आणि दुसरा… दुसरा चक्क हेमामालिनीचा. ती त्यांची आवडती नटी. भायखळयाच्या नाक्यावरच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये या कुटुंबाचा मुक्काम. त्यामुळे दर रविवारी सकाळी आम्ही चाळीत राहाणारे चार पाच मित्र त्याच्या फ्लॅटमध्ये जमत असू. मी, अशोक वंजारी, नलेश, हेम्या, अरूण वगैरे. रघुवीरची आई हसतमुखाने आमचे स्वागत करी. वडील जेवढे मितभाषी तेवढेच आईला बोलणं आवडत असे. शिवाय ती इतकी निर्मळ स्वभावाची की आम्ही एकापेक्षा एक थापा मारून तिला अक्षरश: भावनात्मक करून नवे नवे पदार्थ करायला लावायचो. रघुवीरचा लहान भाऊ अशोक आणि बहीण संध्या यांना आमची ही चापलुसी कळायची. पण नंतर आम्ही त्यांनाही आमच्यात सामील करून घ्यायचो. त्यावेळी दोन तीन वर्षे आम्ही दर रविवारी रघ्याच्या घरी सकाळचे भेटत असू आणि टीव्हीवरचा ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा कार्यक्रम रघ्याच्या आईच्या हातचा गरमागरम चहा आणि कांदेपोहे हाणत असू.
रघ्याच्या चित्रकलेचे उपद्व्याप कधी कधी त्याच्या वडिलांना महाग पडत… एके वर्षी रघ्याच्या हातची शिल्पकला जागी झाली आणि त्याने घरात बसल्या बसल्या शाडूच्या मातीची गणेशमूर्ती तयार केली आणि आई नको नको म्हणत असताना त्याची स्थापना करून पूजा केली आणि आरतीसुद्धा केली. संध्याकाळी वडील घरी आले, त्यांनी हा प्रकार बघितला आणि ते प्रचंड संतापले. तोपर्यंत रघ्या घरी नव्हता, दुसर्‍या दिवशी त्यांनी गणपती एका पिशवीत भरला आणि एकटेच चौपाटीला गेले, जाताना मध्येच पिशवी उघडून ‘गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणून त्याचे विसर्जन करून आले. आपल्या कडक शिस्तीचा या कलाकार मुलावर फारसा फरक पडत नाही हे त्यांनी वेळीच ओळखले आणि शिस्त लावणे सोडून दिले.
आमच्या संस्थेत लेखक-दिग्दर्शक म्हणून मी आणि रघु कार्यरत होतो. रघ्याने लेखक-दिग्दर्शक म्हणून नंतर ‘सांताक्लोज’, ‘इंपीको’, ‘आकडेमोड’, ‘इजा बीजा तिजा’ या एकांकिका लिहिल्या. त्यानंतर माझे ‘अलवारा डाकू’ नाटक आम्ही सादर केले. पुढच्याच वर्षी रघुवीरने ‘देवस्की’ हे नाटक लिहिले आणि ते मी दिग्दर्शित केले. आमच्या संस्थेने छबिलदासमध्ये नुसती नाटके केली नाहीत, तर नाट्यविषयक प्रदर्शनेही केली. एकांकिकांबरोबर रघुवीर कविताही करीत असे. त्याच्या कवितासंग्रहाचे ‘तेरावा महिना’ हे पुस्तक छापून ते आम्ही ‘या मंडळी…’तर्फे छबिलदासमध्ये प्रकाशित केले. त्यातली एक अप्रतिम कविता,
येणार कसा सूर्य हा
त्या छोट्याशा खिडकीतून,
तारेवर वाळत घालावे
तशी लोंबत आहेत तिची कवाडं..
काखेतून उसवलेली,
विस्कटलेल्या केसांसारख्या
त्या माळाही घातलेल्या,
कशाला कोंडलंस एका ओळीत या देवांना,
तेही बिचारे वाकलेले
एका ओळीत हारांच्या भाराने,
या २५ वॅटच्या प्रकाशांत
अधू होईल त्यांची दृष्टी,
पण येणार कसा हा सूर्य
एवढ्याशा खिडकीतून,
मघाशी एक काजवा येऊन गेला, त्या मोठ्या दारातून या कवितासंग्रहाचे डिझाइन अगदी वेगळे होते, आमच्यातल्याच अशोक वंजारीने पंचांगच्या फॉर्ममध्ये ते केले होते.
नाटक, कविता करीत करीत आमचे सिनेमा बघणे चालूच होते, त्यात रघुवीरने आम्हा सर्वांना फिल्म सोसायटीचे मेंबर करून घेतले आणि आम्ही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटही पाहू लागलो. मी दूरदर्शनमध्ये ग्राफिक डिझायनर होतो आणि रघुवीर ‘फेमिना’मध्ये इलस्ट्रेटर म्हणून नोकरी करीत होता. १९७८ साली आम्ही नोकर्‍या सोडून ‘बेसिक पब्लिसिटी’ ही जाहिरातसंस्था काढली, त्यात सुधीर कोसके हा आमच्या ग्रूपमधला चित्रकारही आम्हाला जोडला गेला. सुधीर हा अत्यंत सफाईदार असा फिनिशिंग आर्टिस्ट होता, रघुवीर इलस्ट्रेटर आणि मी कॉपी रायटर- तसे आम्ही तिघेही अष्टपैलू असे एकत्र आलो होतो. आठ वर्षे बेसिक पब्लिसिटीमध्ये आम्ही तिघे पार्टनर होतो. शिवाजी पार्कला आमचा स्टुडिओ होता. नंतर तिघेही आपापल्या वाटेने निघून गेलो. मला ‘टुरटुर’मध्ये व्यावसायिक यश मिळालं, मग मी आधी नाटकात नंतर सिनेमात रमलो. रघुवीरने ‘मोहरे’ हा हिंदी चित्रपट केला आणि सुधीरने बेसिक पब्लिसिटी आजतागायत सांभाळली.

दुसरा ब्रेक

‘या मंडळी…’ नाट्यसंस्थेचे एक शुभेच्छुक अप्पा दांडेकर यांनी रघुवीरची सिनेमाची तडफड आणि धडपड बघून त्याला सिनेमा करायची ऑफर दिली. निर्माते ते स्वत: असणार होते. रघुवीरने ‘कोळिष्टक’ नावाचे एक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत आमच्या संस्थेतर्पेâ केले होते. त्यावरूनच त्याने हिंदी चित्रपटाची पटकथा तयार केली आणि चित्रपटनिर्मितीच्या कामाला लागला. त्यात सर्वप्रथम नाना पाटेकर काम करायला तयार झाला. त्यावेळी नानाचे ‘अंकुश’, ‘प्रतिघात’ वगैरे सिनेमे येऊन हिट झाले होते. रघुवीरने नानासमोर स्क्रिप्ट ठेवले आणि ‘तू यातली कोणतीही भूमिका निवड’ असं सांगितलं. नानाने त्यातली अब्दुल ही भूमिका निवडली आणि रघुवीरला ‘तू देशील ते पैसे मी घेईन,’ असे म्हटले. त्याचवेळी सविता प्रभुणे नुकतीच दिल्लीहून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून शिक्षण घेऊन आली होती. ती आम्हाला भेटायला स्टुडिओत आली होती. नाटकात एखादी भूमिका मिळावी, म्हणून ती अनेक ठिकाणी प्रयत्न करीत होती. रघुवीर सिनेमा करतोय म्हणून कळताच तिने त्यात काम करायची इच्छा प्रकट केली. परंतु नायिकेच्या ज्या काही दिसण्याच्या गरजा होत्या, त्यात सविता बसत नव्हती. त्यावेळी सवितानेच मोठेपणा दाखवून रघुवीरला सांगितले की मी सध्या राजश्री प्रॉडक्शनच्या एका हिंदी सिनेमात काम करतेय. त्यात एक सुंदर मुलगी आहे, मराठीच आहे, माधुरी दीक्षित तिचे नाव, तू तिला विचार. ती या भूमिकेसाठी फिट आहे. रघुवीरने फोन करून माधुरीला शिवाजी पार्कच्या ‘जिप्सी’मध्ये भेटायला बोलावले, ती तिच्या आईबरोबर आली. ‘जिप्सी’मध्ये ज्या डौलात तिने प्रवेश केला, ते बघून रघुवीरने तिला त्याचक्षणी पक्के करून टाकले. माधुरीत एक वेगळाच आत्मविश्वास होता, तिने ‘हिंदी सिनेमा असेल तरच मी काम करेन’ असे ठामपणे सांगितले. हा आत्मविश्वास तिला पुढे मोठी नायिका करणार, याचे प्रत्यंतर रघुवीरला तिथल्या तिथेच आले. त्यातल्या एका भूमिकेसाठी रघुवीर अमरीश पुरी यांच्याकडे गेला. त्याला अमरीशजी म्हणाले, ‘मैने आपको कहीं देखा है.’ रघुवीरने सांगितलं, ‘छबिलदास में देखा होगा, ऑडियन्स मे, आपके किये सारे नाटक मैने वहीपर देखे है, वो भी आगे बैठके,’ त्यानंतर अमरीशजींनी जे मानधन सांगितले ते रघुवीरच्या आवाक्यातले नव्हते, पण त्यांनी धीर दिला आणि म्हणाले, दिल्ली से एक लडका आया है, अनुपम खेर, बढिया है, उसे कास्ट करो.’ अशा प्रकारे, अनुपम खेर रघुवीरच्या सिनेमात आला. अनुपम खेरला रघुवीर भेटला तेव्हा त्याच्याकडे दोनतीनच सिनेमे होते, पण पुढे शूटिंग सुरू होईपर्यंत त्याची डायरी ८० हिंदी सिनेमांच्या सायनिंगने भरली होती. पण अनुपमने रघुवीरचं शूटिंग कुठे अडू दिलं नाही. अशा एकापेक्षा एक कलाकारानी भरलेला चित्रपट रघुवीरने पूर्ण केला. त्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागले. एम. बी. सामंत या प्रख्यात वितरकांनी त्याचे सर्व हक्क प्रकाशनपूर्व विकले. सिनेमा प्रदर्शित झाला शुक्रवारी आणि नेमकी दुर्दैवाने शनिवारी त्याची पायरेटेड व्हिडिओ कॅसेट बाजारात आली आणि प्रेक्षकांची गर्दी कॅसेटकडे वळली. मात्र अप्पा दांडेकरांना त्यांचे पैसे आधीच मिळाले होते. पण त्यांनी रघुवीरला घेऊन दुसरा सिनेमा करायच्या ऐवजी ‘सिनेमाची माझी हौस फिटली, आता तू आणि तुझा सिनेमा, तूच बघून घे’, म्हणून निर्वाणीचा सल्ला दिला. आपला सिनेमा दहा ठिकाणी दाखवून नवीन चित्रपट उकळणे रघुवीरच्या स्वभावात नव्हते. त्याने सरळ आपला मोर्चा पुनः जाहिराती, माहितीपट आणि लेखनाकडे वळवला.

ब्रेक के बाद

‘मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही’, असा पण केलेले आमच्या ग्रूपमधले एकेक जण उशिरा का होईना, लग्न करून मोकळे झाले. रघुवीर तर म्हणायचा ‘श्या! आपण लग्नाबिग्नाच्या भानगडीत पडणार नाही, तुझ्यासारख्या मित्रांच्या आणि बहीण-भावंडांच्या मुलांवर जीव लावायला मी असाच मोकळा राहीन’. पण अखेर त्यानेसुद्धा उशिरा लग्न केले. मेघा आली त्याच्या आयुष्यात आणि रघुवीरच्या ब्रह्मचारी जीवनाच्या महत्वाकांक्षेला तडा गेला, सडाफटिंग आयुष्याच्या कल्पनांची धूळधाण झाली. मात्र मेघाने त्याचे बेशिस्त आयुष्य सुंदर फुलवले, आणि त्या संसारवृक्षाला यशदा नावांचे फूल उमलले. आज ते फूल लग्न करून ऑस्ट्रेलियामध्ये एक सायंटिस्ट म्हणून सेटल झाले आहे.
लग्नानंतर रघुवीरसमोर अचानक कुठे राहायचं, हा प्रश्न उभा राहिला होता. कारण वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी डोंबिवलीत जागा घेऊन ठेवली होती तिथे बंगला बांधला आणि राहायला गेले. त्यांनी रघ्याला सपत्नीक राहायला बोलावलं, पण डोंबिवलीत राहून नाटक-सिनेमे करणं कठीण जाईल म्हणून रघुवीर आणि मेघाने मुंबईतच जागा शोधली. एमएसईबीमध्ये मेघा नोकरी करीत असल्यामुळे शिवडीच्या एका अत्यंत गजबजाटाच्या मुस्लिम वस्तीत त्यांनी स्टाफ क्वार्टरमध्ये राहायचं ठरवलं. ती संपूर्ण बिल्डिंग रिकामी होती, कारण त्या वस्तीत एक दादा इतर अनेक अवैध धंद्याबरोबर दारूचा धंदा करत होता. त्यामुळे तिकडे कोणी राहायला जात नव्हते आणि तो राहायला येणार्‍यांना धमकावतही असे. रघुवीरने आमचा मित्र, खासदार मोहन रावले यांना ही चिंता सांगितली. त्यांनी त्या धंदेवाईकाचा बंदोबस्त केला आणि रघु आणि मेघा तिकडे राहायला गेले. पुढे महिन्याभरात भीड चेपलेले अनेक स्टाफ मेंबर्स तिथे राहायला आले. त्यानंतर आठ वर्षांनी त्या लोकवस्तीचा आपल्या मुलीवर काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून यशदाच्या काळजीपोटी रघुवीर अंधेरीला राहायला आला. शरद पवार मुख्यमंत्री असताना विनय नेवाळकरच्या मदतीने १० टक्के कलाकार कोट्यातला फ्लॅट मिळाला आणि त्यानंतर आजपर्यंत रघुवीर वर्सोवा अंधेरीचा १०० टक्के रहिवासी झाला. तिथला नानानानी पार्क चित्रकलेने सजवून त्यात त्याने सध्या चांगलीच रंगत भरलीय.
अलीकडे रघुवीरचा तो ‘मुंहफट’ स्वभाव जरा कमी झालाय. बिनदिक्कत स्पष्ट बोलताना रघुवीर काही लपवत नाही. समोरचा कधी कधी दुखावतोही, पण हा त्यासाठी खोटी स्तुती करत नाही. सोशल मिडियावर आहे आणि नाहीही. समोरच्याचे उगाचच कौतुक करीत बसत नाही. त्यामुळे आपण काही लिहिलेल्या गोष्टी वाचून हा काहीच बोलत नाही असे वाटत राहते. मी ‘क्लोज एन्काऊंटर्स’ या माझ्या पुस्तकाच्या अनेक कथा सोशल मिडियावर टाकत असे, मटामध्ये माझे अनेक लेख आले, पण रघुवीरने कधी त्याची ‘चांगले-वाईट’ म्हणून दखल घेतली नाही. मला आश्चर्य वाटले आणि रागही आला. पण एकदा चक्क रघुवीरने मला फोन करून सांगितले, तुझे लेख खूप छान असतात, त्यात कादंबरी मटेरियल आहे, मोठं काहीतरी लिही. मी न राहावून विचारले, अरे मग तसं लिहून कळवत का नाहीस? तर म्हणाला, छे रे, कोण लिहीत बसणार? तू भेटलास की सांगेन असं ठरवलं होतं.
तोच रघुवीर पुस्तक प्रकाशनाला, माझ्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला, सिनेमाला कुठूनही हजर राहतो. बरंवाईट खरं बोलतो आणि निघून जातो. तेव्हा वाटतं, रघुवीर कुल म्हणजे अगदी सोलपुरी चादरीसारखा आहे, घट्ट वीण असलेला, नक्षीदार, रंगीबेरंगी, रुबाबदार आणि तितकाच ऊबदारही.

Previous Post

वात्रटायन

Next Post

दिल्लीचा लाकूडतोड्या आणि पायावर मारून घेतलेली कु-हाड

Next Post

दिल्लीचा लाकूडतोड्या आणि पायावर मारून घेतलेली कु-हाड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.