मालवणची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात मिलिंद पेडणेकर यांनी जाणीवपूर्वक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बहुतांश कलाकार घेतले आहेत. पेडणेकर वगळता सगळी नवीन मुले आहेत. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांचीच आहे. ते म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी डोक्यात ही कल्पना आली होती. नाटक करायचं ठरवलं होतं, पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर विशाल परब आणि राहुल भंडारी हे निर्माते भेटल्यावर हीच योग्य वेळ आहे असा विचार करून मी हे नाटक करायला घेतलं.
—-
मराठी माणूस आणि नाटक यांचं घट्ट नातं आहे. मालवणी नाटकांचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. म्हणूनच तर मालवणीमधील ‘वस्त्रहरण’ने सुरू केलेल्या परंपरेतील ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘घास रे रामा’, ‘येवा कोकण आपलाच आसा’, ‘माझा पती छत्रपती’, ‘धुमशान’, ‘केला तुका नि झाला माका’, ‘वय वर्षे ५५’ अशी मच्छिंद्र कांबळी यांची विनोदी नाटके धमाल गाजली. त्यांनी मालवणी नाटके थेट परदेशातही नेण्याचा पराक्रम केला. त्यांच्यानंतरही ‘मालवणी सौभद्र’, ‘करून गेलो गाव’, ‘देवाक काळजी’ वगैरे मालवणी नाटकांनीही हा खास प्रेक्षकवर्ग राखून ठेवला. पण मधल्या काळात मालवणी नाटके म्हणावी तशी आली नाहीत. कोरोना संकटात थिएटर्स बंद असण्याचा हा फटका होता. आता अनलॉकच्या काळात ‘वन्स मोअर तात्या’ हे एक धमाल विनोदी मालवणी नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे.
या नाटकात इरसाल तात्यांच्या भूमिकेत मिलिंद पेडणेकर दिसणार आहेत. अनेक वर्षे रंगभूमीवर कार्यरत असणारे आणि ‘आमची ब-टाटाची चाळ’, ‘आनंदयात्री’, ‘गोलपिठा’, ‘लव यू बाबा’ यासारखी नाटके देणारे लेखक, दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर या नाटकात प्रथमच अभिनय करत आहेत. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांचीच आहे.
एका गावात एक तात्या आहे, जो वर्षानुवर्षे गावातल्या लोकांना घेऊन एक नाटक बसवण्याच्या प्रयत्नात आहे. त्या गावात दोन वाडे असतात. त्या दोन वाड्यांत मोठा वाद सुरू असतो. त्याच परिस्थितीत तात्या नाटक बसवायला जातो. पण या वादांमुळेच गाववाले एकत्र यायला तयार होत नाहीत… त्यातून तात्या कसा मार्ग काढतात ते या नाटकात पाहायला मिळतं. मालवणची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात पेडणेकर यांनी जाणीवपूर्वक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बहुतांश कलाकार घेतले आहेत. पेडणेकर वगळता सगळी नवीन मुले आहेत. ते म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी डोक्यात ही कल्पना आली होती. नाटक करायचं ठरवलं होतं, पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर विशाल परब आणि राहुल भंडारी हे निर्माते भेटल्यावर हीच योग्य वेळ आहे असा विचार करून मी हे नाटक करायला घेतलं.
मालवणी नाटके आणि मच्छिंद्र कांबळी हे जणू एकच समीकरण बनले होते. कांबळींची अनेक नाटके सुपरहिट झाली. त्यांच्या ‘वस्त्रहरण’शी असलेल्या कथावस्तूच्या साम्याबद्दल पेडणेकर म्हणाले, मालवणात जत्रा असते त्यावेळी आम्ही नाटक बसवतो. त्या वेळच्या गमतीजमतींवरच हे नाटक आहे. राजे, अर्जुन, भीम ही ठरलेली कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे साम्य भासतं. पण, ही कथा वेगळी आहे. तात्या हा मालवणात जवळपास प्रत्येक घराघरात असतोच. आमच्याकडे तात्या आणि अण्णा ही दोन नावं फेमसच आहेत. शिवाय मी बाबुजींशी (मच्छिंद्र कांबळी) तुलना होऊ शकेल एवढा मोठा नाहीये.
‘तात्या’मध्ये भूमिका का करावीशी का वाटली, यावर बोलताना ते म्हणाले, माझी तशी खूप इच्छा होती. मालवणी हे माझे
पॅशन आहे. गावात मी सहावी-सातवीपर्यंत राहिलोय. तिकडे मी घरात टॉवेल बांधून राजा, महाराजा बनायचो. मालवणी कॅरेक्टर कधीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं. माझ्या आवशीची भाषा आहे ती… आमच्या लालबागमध्ये ९९ टक्के लोक मालवणीच बोलतात. त्याप्रमाणेच मीही बोलतो. म्हणून मी ही भूमिका स्वत:च करतोय.
एकूण १५ व्यक्तिरेखा असलेल्या या नाटकात हिरॉईन अशी कुणीही नाही. एक मुलगी आहे. ती दुसर्या गावातून एक डान्स करण्यापुरतीच येते. गावातल्या भांडणाचा मुद्दा हाच नाटकाचा विषय आहे आणि तोच प्रेक्षकांना हसवून पुरेवाट करेल याची खात्री असल्याचे पेडणेकर म्हणाले. नाटक मालवणी असले तरी या नाटकाचे प्रयोग केवळ कोकणातच होणार नाहीत, तर महाराष्ट्रभर जशी मागणी होईल तसे प्रयोग आपण लावणार असल्याचे पेडणेकर म्हणाले.
निर्माते राहुल भंडारे म्हणाले की यापूर्वी ‘करून गेलो गाव’ हे मालवणी नाटक मी केलं आहे. त्यात भाऊ कदम आणि वैभव मांगले होते. पण रिजनल लँग्वेजलाही एवढं डोक्यावर घेतलं जातं हे मला तेव्हा माहीत नव्हतं. केवळ मालवणीच नाही तर आगरी कोळी भाषेतल्या नाटकांनाही लोकांचा भन्नाट प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मालवणी नाटकांत एक गॅप पडला. ‘करून गेलो गाव’ नाटकानंतर बराच काळ एकही मालवणी नाटक आलेलं नाही. त्यात मग मिलिंदजींनी या नाटकाबद्दल विचारलं. त्यांना मी आजवर लेखक, दिग्दर्शक म्हणून पाहिलंय. पण नट म्हणून मला ते माहीत नाहीत. त्यांनी सांगितलं तेव्हाच वाटलं की हे नाटक तुफान जाणार हे नक्की. आपण करूया. विशाल परब हे मिलिंदजींचे शिष्य आहेत. ते म्हणाले राहुल, आपण हे नाटक एकत्र करूया. मराठी रंगभूमीवर नवीन निर्माता येतोय, त्याला आपण साथ दिली तर एक नवा निर्माता उभा राहील. भविष्यात तोही काहीतरी नवीन निर्माण करू शकेल. नाटक सुरूही झाले नव्हते, तेव्हाच मला कोकणातून दहा ते बारा प्रयोग आलेत. मालवणी नाटकाच्या यशाची ही पोचपावती आहे. मराठी रंगभूमीवर असलेले लेखक, दिग्दर्शक, नट किंवा निर्माते हे ७५ टक्के कोकणातलेच आहेत. सगळे चाकरमाने आहेत. मुंबई हे आमचे बिझनेसचे मुख्य केंद्र आहे. मुंबईमध्ये ६० ते ७० टक्के लोक कोकणातले आहेत. या प्रेक्षकांना हे विनोदी मालवणी नाटक नक्की आवडेल यात शंका नाही.
ज्यांका प्युअर मालवणी बोलाक येता तेंच व्हयेत
नाटक मालवणीच असल्यामुळे ज्यांना चांगले मालवणी बोलता येतेय त्याच कलाकारांना पेडणेकर यांनी नाटकात घेतले आहे. सगळे कलाकार मुंबईतलेच आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात, ऑडिशन घेतानाच मी तसा क्रायटेरिया ठेवला होता की, ज्यांका प्युअर मालवणी बोलाक येता तेंनीच नाटकात काम करायचा. नाहीतर इतर कलाकारांना मालवणी बोलायला शिकवावं लागतं. तसला प्रकार मी ठेवला नाही. सिंधुदुर्गमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये राहणार्यार लोकांमध्ये बोलण्याचे हेल बदलत जातात. आमच्या कणकवली तालुक्यातला जो हेल आहे तो साधारणपणे मुंबईतल्या लोकांशी मिळताजुळता आहे.
कृपया बाबुजींशी तुलना नको!
मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाशी प्रेक्षक तुलना करणार हे नक्की. पण अशी तुलना कृपया करू नका असे मिलिंद पेडणेकर प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितात. ते म्हणतात, कोकणात हा पेहराव असाच आहे. माणूस थोडासा मोठा झाला, आपलं म्हातारपण जवळ आलेय असं त्याला कळायला लागलं की त्याच्या अंगावर हा ड्रेस येतो. हा ड्रेस घातलेला किंवा हा वेश घेतलेला आमच्याकडे तात्या किंवा अण्णाच असतो. आता त्याचं नाव आले आहे आबा… तसाच पेहराव आल्यावर तसे हावभाव येणारच ना… बाबुजींसोबत मी एक नाटक केलं होतं. ‘मागणी तसो पुरवठो’. मी दिग्दर्शित केलं होतं. बाबुजींनी काम केलं होतं. आम्ही दिवसाचे १२ तास बोलत असलो तर त्यात १० तास मालवणी बोलतो आणि दोन तास इतर मराठी बोलतो. मी जसा आहे तसाच रोल करायची माझी इच्छा होतीच. म्हणून म्हटलं मीच कपडे करून बसतो. असं झालंय.