शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी काही तांत्रिक-प्रोसिजरल गोष्टींची आवश्यकता असते. तीन गोष्टी आवश्यक आहेत : ट्रेडिंग अकाऊंट, डिमॅट अकाऊंट व बँकेतील सेव्हिंग किंवा करंट अकाऊंट व हे तिन्ही एकमेकांशी लिंक्ड म्हणजे संलग्न हवेत. आपण ट्रेडिंग किंवा डिमॅट अकाऊंट उघडायचे ठरवतो तेव्हा थ्री इन वन म्हणजे हे तिन्ही संलग्न अकाऊंट एकत्रितपणेच आपल्याला मिळू शकतात. डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर्स जमा असतात, पण शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी ट्रेडिंग अकाऊंट आवश्यक आहे.
—-
आयपीओ आणताना त्या कंपन्यांना त्यांच्या शेअरच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होण्यासाठी त्याची स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी झाल्यावर त्या शेअरची खरेदी-विक्री सुरू होते. याला सेकंडरी मार्वेâटमधून व्यवहार होणे म्हणतात. काही अपवाद वगळता स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झालेल्या सर्व कंपन्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार या सेकंडरी मार्केटमध्ये होत असतात. बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) या दोन स्टॉक एक्स्चेंजवर हे व्यवहार होतात. बीएसईची सुरुवात १८७५ साली झाली. १४५ वर्षांच्या काळात नवनवीन कंपन्यांची नोंदणी होत होत आजमितीस बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सुमारे ७४०० कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात १९९२ साली झाली. २९ वर्षांच्या काळात एनएसईवर सुमारे १७९० कंपन्यांची नोंदणी झालेली आहे, त्यापैकी अनेक कंपन्या १९९२पूर्वी अस्तित्वात होत्या, पण त्यांचीही नोंदणी एनएसईवर झालेली आहे. अनेक कंपन्यांची दोन्ही एक्स्चेंजवर नोंदणी झालेली आहे. शेअर आपण कोणत्याही एक्स्चेंजमधून घेतले तरी कोणत्याही एक्स्चेंजवर विकू शकतो. आपण कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेतले व कालांतराने आपल्याला पैशाची गरज आहे तर हे शेअर सेकंडरी मार्केटमध्ये विकणे हाच मार्ग त्यासाठी आहे. ते तारण ठेवून कर्ज मिळू शकते, पण तो जोखमीचा व्यवहार आहे.
शेअर्सची खरेदी-विक्री ज्या स्टॉक एक्स्चेंजवर त्याची नोंदणी झालेली आहे त्या एक्स्चेंजवर होते, जर बीएसई व एनएसई दोन्ही एक्सचेंजेसवर नोंदणी झालेली आहे, तर दोन्हीवर खरेदी-विक्री करू शकतो. आपल्याला त्यासाठी थेट तिथे जावे लागत नाही किंवा थेट त्या एक्सचेंजेसच्या साईटवर जाऊन ती केली जात नाही तर ब्रोकर हाऊसमार्फत हे व्यवहार होतात. तपशीलात बघू.
शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी काही तांत्रिक-प्रोसिजरल गोष्टींची आवश्यकता असते. तीन गोष्टी आवश्यक आहेत : ट्रेडिंग अकाऊंट, डिमॅट अकाऊंट व बँकेतील सेव्हिंग किंवा करंट अकाऊंट हे तिन्ही एकमेकांशी लिंक्ड म्हणजे संलग्न हवेत. आपण ट्रेडिंग किंवा डिमॅट अकाऊंट उघडायचे ठरवतो तेव्हा थ्री ईन वन म्हणजे हे तिन्ही संलग्न अकाऊंट एकत्रितपणेच आपल्याला मिळू शकतात. तशा ऑफर उपलब्ध असतातच. या ट्रेडिंग, डिमॅट व बँक अकाऊंटपैकी बँकेतील सेव्हिंग किंवा करंट अकाऊंट म्हणजे काय ते स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. आपण आपले पैसे त्यात ठेवतो व लागतील तसे त्यातून काढतो, रोख रक्कम काढतो किंवा दुसर्या कोणाला चेक दिल्यावर आपला अकाऊंट डेबिट होतो. तसेच वेळोवेळी आपण अकाऊंटमध्ये रोख रक्कमेद्वारे किंवा चेक, एनईएफटी इत्यादीद्वारे पैसे जमासुद्धा करत असतो. डिमॅट अकाऊंटसुद्धा हेच काम करते, फक्त पैशाच्याऐवजी त्यात आपण शेअर्स ठेवतो. नंतर त्यात आणखी शेअर्सची भर घालतो किंवा आपण शेअर्स विकले तर ते आपल्या डिमॅट अकाऊंटमधून कमी होतात.
डिमॅट म्हणजे डिमटेरिअलायझेशनचे संक्षिप्त रूप. पूर्वी आपण शेअर्स घ्यायचो म्हणजे कागदी शेअर सर्टिफिकेट मिळायचे, ते ज्या कंपनीचे शेअर घेतले आहेत, त्यांच्याकडे पाठवले जायचे, तिथे त्या सर्टीफिकेटवर आपल्या नावाची नोंद व्हायची. आता डिमॅटमुळे या कशाचीच गरज राहिलेली नाही. काम खूप सोपे झालेले आहे. बहुतेक सर्व बँका, काही वित्तसंस्था व स्टॉक ब्रोकिंग हाऊसेस यांच्याकडे डिमॅट अकाऊंट ओपन करण्याची सोय असते. आपण यापैकी कुठेही तो ओपन करू शकतो. तसेच बँक अकाऊंट जसे आपण एकापेक्षा जास्त व निरनिराळ्या किंवा एकाच बँकेत उघडू शकतो तसेच डिमॅट अकाऊंटही एकापेक्षा जास्त सुरू करू शकतो. बँका, स्टॉक ब्रोकिंग हाऊसेस इत्यादी ज्यांच्याकडे डिमॅट अकाऊंट उघडलेला असतो, ते त्यासाठी वार्षिक फी आकारतात. तसेच इतरही काही आकार असतात. तेव्हा डिमॅट अकाऊंट उघडण्यापूर्वी त्याची चौकशी करावी.
(एक खुलासा आधी करतो, सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा असा साधा अर्थ आहे, परंतु अर्थक्षेत्रात सिक्युरिटी किंवा सिक्युरिटीज म्हणजे शेअर किंवा कर्जरोखे इत्यादी.)
डिमॅट अकाऊंटमध्ये आपले शेअर्स जमा असतात, पण शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाऊंट आवश्यक आहे. हा आपण स्टॉक ब्रोकिंग हाऊसेसकडे ओपन करू शकतो, तसेच बहुतेक बँकांच्याही वेगळ्या सिक्युरिटी हाऊसेस कंपन्या असतात तिथेही ओपन करू शकतो. याबाबत उदाहरण बघू : अॅक्सिस बँक व त्याच ग्रुपची अॅक्सिस सिक्युरिटीज, स्टेट बँक व त्याच ग्रूपची एसबीआय सिक्युरिटीज, तसेच कोटक बँक व कोटक सिक्युरिटीज इत्यादी सिक्युरिटी हाऊसेस आहेत जिथे आपण ट्रेडिंग अकाऊंट ओपन करू शकतो. याशिवाय अनेक खाजगी स्टॉक ब्रोकिंग हाऊसेस ट्रेडिंग अकाऊंटची सुविधा देतात. उदा : शेरखान, जिओजीत, एसएमसी ग्लोबल इत्यादी. तसेच काही बँकाचा एखाद्या स्टॉक ब्रोकिंग हाऊसबरोबर टाय-अप असतो. आपण बँकेत डिमॅट अकाऊंट उघडतो, तेव्हा ते आपल्याला त्याच्याशी संलग्न असा त्या स्टॉक ब्रोकिंग हाऊसचा ट्रेडिंग अकाऊंट ओपन करून देतात. ट्रेडिंग अकाऊंटमध्ये शेअर्स किंवा आपली रक्कम केवळ व्यवहार अगदी पूर्णपणे पूर्ण होईपर्यंत असतात. म्हणजे आपण शेअर्स खरेदी केले व तो व्यवहार पूर्ण झाला की ते डिमॅट अकाऊंटमध्ये जमा होतात. तसेच डिमॅट अकाऊंटमध्ये असलेले आपले शेअर्स ट्रेडिंग अकाऊंटद्वारे विकले की त्याचे पैसे संलग्न बँक अकाऊंटमध्ये जमा होतात. काही ठिकाणी मात्र ते आपण बँक अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करेपर्यंत ट्रेडिंग अकाऊंटमध्येच राहतात.
डिमॅट, ट्रेडिंग व बँक अकाऊंट यांची संलग्नताही समजून घेऊ : आपण शेअर्सच्या खरेदी-विक्रीची ऑर्डर देतो ते ट्रेडिंग अकाऊंटद्वारे. समजा आपण शेअर्स विक्रीची ऑर्डर दिली तर आधी डिमॅट अकाऊंटमध्ये ते शेअर्स आहेत की नाहीत याची सिस्टम खात्री करेल व असतील तरच ऑर्डर अंमलात आणली जाईल. तसेच समजा रिलायन्स इंडस्ट्रीजचे १०० शेअर्स विकायची ऑर्डर दिली व आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये फक्त ८० शेअर्स असतील तर ते चालणार नाही. जितके शेअर्स विकायची ऑर्डर दिली आहे कमीत कमी तितके शेअर्स आपल्याकडे हवेतच. अर्थातच २०० शेअर्स असूनही फक्त १०० शेअर्स विकण्याला मात्र काहीच हरकत नसते. हा विकण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते शेअर्स डिमॅट अकाऊंटमधून कमी होतात आणि या शेअर्सच्या विक्रीतून आलेले पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा होतात. म्हणजेच एक विक्रीचा व्यवहार इनिशिएट केला की या पुढच्या गोष्टींसाठी वेगळी काही कृती करण्याची गरज नसते. तिन्ही अकाऊंट संलग्न असल्याने हे सुलभपणे होते. (डिमॅट अकाऊंटमध्ये एखाद्या कंपनीचे काहीही शेअर्स नसतानाही ते आपण विकू शकतो, त्याला शॉर्ट करणे म्हणतात, पण बेसिक गोष्टी समजून घेऊ.)
शेअर्स विकण्यासंबधी काय होते ते बघितले, आता समजा शेअर्स खरेदी करायचे आहेत. कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर सर्वप्रथम हवेत पैसे! ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पैसे हवेत, पण ट्रेडिंग अकाऊंट कुठे आहे त्याप्रमाणे थोडा फरक असतो. विशेषत: काही खाजगी ब्रोकिंग हाऊसेसकडे ट्रेडिंग अकाऊंट असेल तर खरेदीची ऑर्डर देण्यापूर्वी आपण ट्रेडिंग अकाऊंटमध्ये रक्कम ट्रान्स्फर करणे आवश्यक असते. ते चेक देऊन करू शकतो किंवा ऑनलाइन करू शकतो. उलट समजा एचडीएफसी सिक्युरिटीज इत्यादी काही ठिकाणी ट्रेडिंग अकाऊंट असेल व आपण खरेदीची ऑर्डर ऑनलाइन देत असू तर ही ऑर्डर इनिशिएट करतो तेव्हा त्या व्यवहाराचाच एक भाग म्हणून बँक अकाऊंटमधून आधी रक्कम डेबिट होते, ट्रेडिंग अकाऊंटमध्ये येते व खरेदीचा व्यवहार होतो. व्यवहार काही कारणाने पूर्ण झाला नाही तर रक्कम काही काळाने (बहुधा दुसर्या दिवशी) खात्यात पुन्हा जमा होते.
हे शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार आपण स्वत: ऑनलाइन करू शकतो किंवा ब्रोकरना फोनवर त्याकरता ऑर्डर देऊ शकतो. स्वत: ऑनलाइन व्यवहार करणे अधिक चांगले; कारण बर्याच गोष्टींवर आपला कंट्रोल राहतो. मात्र वेळ नसेल किंवा नेट कनेक्शन नसेल तर फोनचा पर्याय आहेच.
आता महत्वाची बाब सांगतो, जी वाचल्यावर कोणी म्हणेल ही आधीच का नाही सांगितली! वर नावे दिलेले ब्रोकर हाऊसेस किंवा ब्रोकरेज फर्म जुन्या आहेत त्यांचे चार्जेस-दलाली जास्त आहे. २०१०मध्ये झिरोधा (Zerodha) ही ब्रोकरेज फर्म सुरू झाली व त्यांनी अगदी कमी दलाली आकारून फार मोठा बदल केला. जुने ब्रोकर इक्विटी डिलिव्हरी व्यवहारासाठी तुमच्या व्यवहाराचे जे मूल्य आहे त्याच्या ०.५ टक्के इतकी दलाली आकारतात म्हणजे विकलेल्या शेअरची किंमत १ लाख रुपये असेल तर ५०० रुपये दलाली. झिरोधा मात्र इक्विटी डिलिव्हरी व्यवहारासाठी शून्य दलाली तर काही प्रकारात एका व्यवहाराला फक्त २० रुपये इतकी कमी दलाली लावते. आता अपस्टॉक्स (Upstox), फाइव्ह पैसा (5Paisa), ग्रो (Groww), सॅमको (Samco) अशा इतरही काही याच प्रकारच्या फर्म आलेल्या आहेत. यांना डिस्काऊंट किंवा नो फ्रिल ब्रोकर म्हणतात. ग्राहकांनी सगळे व्यवहार ऑनलाइन करावेत अशी अपेक्षा असते. तरुणवर्ग संगणक व मोबाईलवरून पटापट व्यवहार करू शकतो, तो वर्ग मोठ्या प्रमाणात याच फर्मचा ग्राहक आहे. झिरोधाचे सुमारे ३६ लाख ग्राहक आहेत तर जुन्या फर्मचे १०-१५ लाखच आहेत. ह्या नव्या डिस्काऊंट ब्रोकरेज फर्ममुळे व कोरानामुळे काय बदल झाला ते पुढील लेखात बघू.
(टिप : ‘शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव’ हे प्रस्तुत लेखकाचे पुस्तक २०१५मध्ये प्रकाशित झालेले असून त्याचा उपयोग इथे केलेला आहे.)
क्रमश: