अखेरीस दीड वर्षांपूर्वी मला सेंद्रिय खताच्या मार्केटिंगचा मार्ग सापडला. माझे मित्र, सहकारी, प्रेरणास्थान असणार्या अझीझ सय्यद, रोशन सोनावणे, नवनाथ हांडे यांच्यामुळे हा व्यवसाय उभा राहून तो आकार घेऊ लागला. शिक्षण बीए, खासगी वित्तीय संस्थांमध्ये विविध पदांवर नोकर्या आणि आता व्यवसाय कोणता तर तो सेंद्रिय खताच्या मार्केटिंगचा! हा सगळा क्रम हटके वाटणारा आहे. पण नोकरीपेक्षा इथे मिळणारा आनंद फारच वेगळा असल्यामुळेच मी हा अनोखा मार्ग निवडला आहे.
—-
तो काळ असेल १९९७-९८चा.
कॉलेजातून कलाशाखेची पदवी घेतली तेव्हा आपण सरकारी नोकरीमध्ये जावे, महाराष्ट्र लोकसेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी बनावे असे विचार मनात यायचे. कधी लहर आली कि त्याची तयारी करण्याचा निश्चय मनात करायचो खरा, पण एक दोन दिवस झाले की तो विचार मागे पडायचा…
आपण आता पदवीधर झालो असल्यामुळे कुठेतरी झटकन कामाची घडी बसवायला हवी, म्हणून नोकरीचा शोध सुरू केला. माझे अक्षर चांगले होते. एका सहकारी बँकेत कलेक्शनसाठी जागा होती, तिथे अर्ज केला, ती नोकरी मला मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. पहिली नोकरी सुरू झाली, तेव्हाच एखादा व्यवसाय सुरू करावा, असे विचार मनात यायचे. पण दुसरे मन म्हणायचे, नोकरी कशी सुखाची असते, महिना पूर्ण झाला की पगाराची रक्कम बँकेत जमा होते. व्यवसाय सुरू केला तर तसे होईलच याची काय खात्री? अशातूनच मनात घर करून बसलेला व्यवसायाचा तो विचार काही क्षणापुरता का होईना मागे पडायचा.
कलाशाखेचा पदवीधर असणारा मी विविध प्रकारच्या वित्तीय संस्थांमध्ये नोकर्या करत करत करियरला आकार देण्याचा प्रयत्न करत होतो. वडील पोलिसात होते. घरात व्यवसायाशी जवळीक असणारे कुणीच नाही. पण त्या परिस्थितीतही माझ्या डोक्यात बिझनेसचे खूळ बसायला लागले होते. आर्थिक स्थिरता राहावी म्हणून नोकरी सुरू होती. आज ना उद्या कधीतरी आपण एखादा व्यवसाय करून पाहायचा, या १९९८पासून डोक्यात सुरू असणार्या विचाराला आकार घ्यायला २२ वर्षाचा कालावधी लागला.
आपण जो व्यवसाय करू तो जरा वेगळा असेल, या विचाराने मला सुरुवातीपासूनच पुरते झपाटले होते. त्यामुळे नोकरीत असताना मी कायम तशा प्रकारच्या संधीच्या शोधात असायचो. अखेरीस दीड वर्षांपूर्वी मला सेंद्रिय खताच्या मार्वेâटिंगचा मार्ग सापडला. माझे मित्र, सहकारी, प्रेरणास्थान असणार्या अझीझ सय्यद, रोशन सोनावणे, नवनाथ हांडे यांच्यामुळे हा व्यवसाय उभा राहून तो आकार घेऊ लागला. शिक्षण बीए, खासगी वित्तीय संस्थांमध्ये विविध पदांवर नोकर्या आणि आता व्यवसाय कोणता तर तो सेंद्रिय खताच्या मार्वेâटिंगचा! हा सगळा क्रम हटके वाटणारा आहे. पण नोकरीपेक्षा इथे मिळणारा आनंद फारच वेगळा असल्यामुळेच मी हा अनोखा मार्ग निवडला आहे.
हे झालं कसं?
१९९८मध्ये पहिल्या नोकरीत दर महिन्याला हातात पगार पडायचा १२०० रुपयांपर्यंत. लगेचच दुसर्या वर्षी एका पतसंस्थेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. तिथे शिकायला देखील भरपूर मिळणार होते, त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता ती ऑफर मी घेतली आणि काम सुरू केले. १९९९ ते २००५ या काळात तिथे भरपूर शिकायला मिळाले. त्यामुळे वित्तीय क्षेत्रातला अनुभव वाढीस लागत होता. अनुभवाच्या जोरावर मला २००७ मध्ये आणखी एका नामांकित वित्तीय संस्थेमध्ये नोकरीची संधी चालून आली होती. तिथे माझ्यावर मार्केटिंगची जबाबदारी राहणार होती आणि पगार देखील चांगला होता. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे पुरायचे आणि थोडे बहुत उरायचे, त्यामुळे थोडी फार बचत व्हायची. नोकरी सुरू असताना बर्याचदा एखादी संकल्पना दिसायची आणि मनात पुन्हा व्यवसायाचा विचार जागा व्हायचा. पण पुढे काही होण्याच्या आतच तो मागे पडायचा आणि पुन्हा एकदा नोकरीचे पहिले पाढे पंचावन्न सुरू व्हायचे. २०१८मध्ये एका खासगी बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली, त्यामुळे सर्वकाही अगदी सुखासुखी सुरू असतानाच पुन्हा एकदा २० वर्षांपासून डोक्यात घुमणार्या त्या व्यवसायाच्या विचाराने उचल खाल्ली… मी क्षणाचा विचार न करता नोकरीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला… मग काय, सुरू झाला व्यवसायाचा शोध…. खूप शोधाशोध झाली पण मनात बसेल असा व्यवसाय सापडेना. मग पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता, पण व्यवसायाची दिशा सापडणार असा संकेत मन देत होते.
दरम्यान, माझ्या मेव्हण्याने पुण्यापासून जवळ असणार्या नारायणगावात सेंद्रिय खताचा उत्पादन प्रकल्प सुरू केला होता. तेव्हा याचे मार्केटिंग केले तर हा व्यवसाय म्हणून देखील चांगला होईल, असा विचार मनात आला. अझीझ सय्यद, रोशन सोनावणे, नवनाथ हांडे या सहकार्यांच्या सहाय्याने व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय उभा राहतो ना राहतो तोच कोरोनाच्या साथीने डोके वर काढले आणि सारे ठप्प झाले. कोरोनाकाळात शेतीसंदर्भातील उत्पादने, खते यांचा पुरवठा करणार्यांना सूट देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही मंडळी सेंद्रिय खताचा वापर करणे पिकासाठी कसे चांगले आहे, त्याचा उत्पादनावर कसा परिणाम होऊ शकतो, याची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागातील गावांचा दौरा करायचो. कोरोनाकाळात गावात पोहोचणे आमच्यासाठी अवघड होते. पण नाना मार्ग वापरून आम्ही थेट शेतकर्यांच्या शिवारापर्यंत पोहचून त्यांना या सेंद्रिय खताचे महत्व पटवून देत होतो. शेतकर्यांनी देखील कापूस, कांदा, आंबा या पिकासाठी त्याचा वापर केला आणि विशेष म्हणजे त्याचे चांगले रिझल्ट त्यांना मिळाले. बळीराजाच्या चेहर्यावरचा आनंद पाहून माझे मन सुखावले. आणि तिथेच व्यवसायासाठी जोमाने काम करण्याचा इरादा पक्का झाला.
वित्तीय संस्थांमध्ये माझ्याकडे मार्केटिंगची जबाबदारी देखील असायची. तो अनुभव कामी आला. खताच्या बाबतीत शेतकर्यांसोबत संवाद साधताना कधी अडचण जाणवली नाही. बरेच शेतकरी झटपट पिके घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यांना सेंद्रिय खताचा वापर करण्याकडे वळवणे हे तसे अवघड काम. पण भविष्यात या व्यवसायात घवघवीत यश मिळवायचे असेल, तर इथे कौशल्य वापरून शेतकर्यांना त्याकडे वळवायला हवे, या ध्येयाने झपाटून काम करत राहिलो आणि त्यात चांगले यश मिळते आहे, त्यामुळे वेगळा मार्ग निवडला त्याचे समाधान आहे. काही दिवसांपूर्वीची गोष्ट असेल. दिवाळीच्या काळात राज्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. तेव्हा पुणे जिल्यातल्या एका शेतकर्याचा मला फोन आला. त्याने दोन एकरात कांद्याचे पीक लावले होते. अवकाळी पाऊस झाल्यामुळे काही भागातील कांदा मृत झालेला होता. मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्यामुळे तो शेतकरी हवालदिल झाला होता. तुम्हाला असेही आणि तसेही नुकसान होणार याची चिंता सतावते आहे ना, त्यावर एक पर्याय म्हणून तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करून बघा, असा सल्ला मी त्यांना दिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तो मान्य केला. शेतात सेंद्रिय खताचा वापर केला. त्याचा चांगला परिणाम त्याना दिसून आला आणि कांद्याच्या उत्पादनामधून चांगले पैसे त्याच्या हातात पडले. त्याचे नुकसान टाळण्याच्या कामात आपली मदत झाली यामुळे आपली व्यवसायाची निवड अगदी राइट असल्याचे या अनुभवाने मला पटवून दिले.
व्यवसाय म्हटला की त्यात जोखीम आलीच. ती पेलत असताना तो व्यवसाय व्यवस्थितपणे उभा करणे हे देखील तितकेच कौशल्याचे काम असते. त्याचा नेमका प्लॅन आपल्याकडे तयार असायला हवा. तो पुढे नेताना शिस्त असायला हवी. त्या व्यवसायातून अपेक्षित फायदा मिळण्यास थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आपण तयार करत असणारी उत्पादने ही कशी उपयुक्त आणि सरस आहेत, हे पटवून देण्यात यशस्वी व्हायला हवे. त्यासाठी आपल्या कौशल्याचा योग्य प्रकारे वापर केला तर व्यवसायात यश मिळायला वेळ लागत नाही. भविष्यात शेतकर्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेच, याखेरीज कचर्यापासून सेंद्रिय खताचा प्रयोग राबवण्याचे नियोजन आहे.