शरद पवार यांच्याकडून प्रेरणा घ्यावी तेवढी कमीच
२०१३पूर्वी अभ्यास नव्हता. त्यामुळे ऐकलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज डोक्यात होते पण नंतर प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्रात आल्यावर, अभ्यास केल्यावर त्यांच्याबद्दल खूप आदर वाटू लागला.
महिलांसाठीचे कायदे, साधी राहणी उच्च विचारसरणी, अभ्यास करून व्यक्त होणे, रसिक असणे… या मला त्यांच्याबद्दल आवडलेल्या अनेक गोष्टींपैकी प्रमुख गोष्टी. अनेक राजकारणी बघितले की गळ्यात, हातात कसल्या खड्यांच्या अंगठ्या, गंडे दोरे आणि वेगवेगळे पेहराव असे पहायला मिळते, पण त्यांच्यात असे कधीही काही दिसून आले नाही. त्यांनी कधी कुठल्या देवाची त्यांच्यावर कृपा झाल्याचे किंवा नवस वगैरे पावल्याचेही म्हटले नाही.
एका मुलीनंतर स्वत: नसबंदी केली आणि मुलींचेही लग्न अगदी साध्या पद्धतीने करून आदर्श निर्माण केला, त्यांनी ठरवले असते तर ते मोठा लवाजमा ठेवून तसे आलिशान लग्न करू शकले असते पण त्यांनी ते टाळले. लग्नात उपस्थित सर्वांना फक्त एक पेढा दिला जात होता.
अजून एक घटना आठवते ती शनी मंदिराच्या वेळेची. तिथे महिलांना प्रवेश नाकारला जात होता. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की जिथे सर्वांना प्रवेश नाही त्याला मी देव मानत नाही.
एखाद्या राजकारणाने तोही ज्याचा एवढा मोठा जनाधार आहे त्याने अशी भूमिका घेणे खूप अवघड असते. अनेक नेते लोकप्रियता कमी होऊ नये म्हणून याबद्दल बोलतच नाहीत पण साहेबांनी मात्र ती भूमिका घेतली.
एका कार्यक्रमात मुख्याध्यापकांनी ‘गांधीजींचा वध झाला’ असा उल्लेख केला तर त्यांनी ऐन कार्यक्रमात उभे राहून त्यांना अडवून वध नाही हत्या असे दुरुस्त करण्यास सांगितले.
अर्थात मी काही त्यांचा भक्त नाही त्यांच्या काही गोष्टी मला पटत नाहीत अश्याही आहेत, पण त्यावर पुन्हा कधीतरी लिहू..
या ८० वर्षांच्या वयातही त्यांच्यात जी ऊर्जा आहे त्यापासून प्रेरणा घ्यावी तेवढी कमी आहे.
– संकेत मुनोत
मिस युनिव्हर्स आणि मोदीजी
१) फोटोशूट, वर्ल्ड टूर, मीडिया कव्हरेज, मेकअप, कपडे…
हे आहे मिस युनिव्हर्स आणि मोदीजींचे आयुष्य…
पण त्या दोघात एकच महत्त्वाचा फरक आहे,तो म्हणजे मिस युनिव्हर्स पत्रकारांच्या प्रश्नांना धाडसाने सामोरी जाते आणि उत्तरे देते…
२) उन्नाव, हाथरससारख्या बलात्कार पीडितांच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसणारे मोदी विश्वसुंदरीच्या अभिनंदनाचे लगेच ट्विट करतात. यावरून रोम जळत असताना फिडेल वाजवणार्या निरोची आठवण होतेय.
३) ऑक्सिजन अभावी झालेल्या करोना बळींच्या, गंगेतून वाहणार्या प्रेतांच्या आणि कृषी आंदोलनाच्या दरम्यान सुमारे ७०० शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी नरेंद्र मोदींनी गंगेत डुबकी मारून पापे धुतली आणि नवीन पापे करण्यासाठी शुचिर्भूत झाले! नमो, नमो!!
– जेट जगदीश
यांना ‘बोकील पदक’ द्या!
लोकसंख्या वाढीवर खात्रीलायक उपाय म्हणजे पुरुषांचे लग्नाचे वय ७५ तर स्त्रियांचे ७० करणे! कोण म्हणतो कायदे करून प्रश्न सुटत नाहीत?
इतका सोपा आणि प्रभावी उपाय सुचविल्याबद्दल मला ‘अनिल बोकील पदक’ जाहीर करण्यात यावे अध्यक्ष महोदय!
ह्याचे इतरही फायदे होतील. लग्नाला आई वडिलांचा विरोध होण्याची शक्यता अगदीच कमी आहे, त्यामुळे पळून जाऊन वगैरे लग्न करायला लागणार नाही. आई वडील हयात नसल्यामुळे त्यांना लग्नाचा खर्च करायला लागणार नाही. मुलीला सासुरवास सुद्धा बहुतेक होणार नाही. मुलांचा खर्च नसल्यामुळे वर आणि वधू यांना वेगळी बचत वगैरे करणे, मुलांना शाळेत नेणे, आणणे, त्यांची आजारपणं, शिक्षण वगैरे, सगळेच खर्च वाचतील आणि जनता सुखात राहील. सरकारलासुद्धा शाळा वगैरे गोष्टींवर खर्च करावा लागणार नाही. तीर्थक्षेत्रांना जोडून हनीमून पॅकेज पण देता येतील, ज्यातून तीर्थक्षेत्रांचा आपोआपच विकास होईल. फक्त पुरेशी देवळे बांधली म्हणजे झालं. आणि तो तर आपल्या सरकारचा आवडता उद्योग आहे.
– नीरज हातेकर, मुंबई विद्यापीठाचे माजी प्राध्यापक