• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंगा आणि दुर्गा!

(संपादकीय २५ डिसेंबर २१)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 23, 2021
in संपादकीय
0
गंगा आणि दुर्गा!

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी वेगवेगळ्या वेळी वार्ताहरांशी बोलताना कपडे बदलले होते. देशावर दहशतवादी हल्ला झालेला असताना गृहमंत्र्यांना कपडे बदलायला वेळ कसा मिळतो, या विषयावरून हंगामा झाला आणि त्यांना त्या पदावरून पायउतार व्हायला लागलं… गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत एका दिवसात पाच वेळा डिझायनर ड्रेस बदलले, त्याची चर्चा अशा प्रकारे झाली नाही… साहजिक आहे, देशावर काही दहशतवादी हल्ला वगैरे झालेला नव्हता आणि तसा झाला असता तरी प्रधानमंत्री प्रत्येक वेषातून शत्रूचा थरकाप उडवणारा संदेश देत आहेत, याबद्दल त्यांच्या भक्तगणांना खात्री असली असती. देशाच्या सगळ्याच पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, राजकीय पुढार्‍यांना दिवसाचे १६-१८ तास काम करावं लागतं. पण, त्या कामाचा गाजावाजा होण्याचं भाग्य एकट्या मोदीजींच्या नशिबी आहे आणि दिवसात पाच कपडे बदलून दिवसभर गंगापूजन करणं हे त्यांच्या पदाच्या कामाचाच भाग आहे, असं त्यांच्या भक्तगणांनी गृहीत धरलेलं आहे… गेल्या वर्षी या काळात इथे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कोरोनाच्या हाताळणीत केलेल्या अक्षम्य हलगर्जीमुळे लोकांवर कोविडबळींचे मृतदेह गंगेत वाहवण्याची वेळ आली होती, सामुदायिक चिता धडधडल्या होत्या आणि तेव्हा मोदीजी आले नव्हते, याची जराही खंत कुणाला वाटत नव्हती… तसं विचारण्याची हिंमत करण्याएवढा कणा या प्रसारमाध्यमांना उरलेलाही नाही.
काशीमधील कॉरिडॉरचे लोकार्पण हा मोठा सोहळा होता. तो दिवसभर चालला. त्यासाठी मोदीचरणी लीन असलेल्या वृत्तवाहिन्यांचे शेकडो कॅमेरे अहोरात्र कार्यरत होते. या सोहळ्याची पार्श्वभूमी काय होती? मोदींच्या प्रत्येक मोठ्या सोहळ्याचा एकच उद्देश असतो… लोकांचे लक्ष भरकटवणे. या सोहळ्याच्या काही दिवस आधी देशातल्या सर्वोच्च लष्करी अधिकार्‍याचा धक्कादायक मृत्यू झाला होता. सगळा देश त्या धक्क्यात होता. जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. लष्कराने राजकारणात पडू नये, हा संकेत धुडकावून त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. पण, एक सैनिक म्हणून त्यांची कर्तबगारी मोठी होती आणि त्यांना आदरांजली म्हणून एक दिवस गोड खाऊ नका, वगैरे आवाहनं भावव्याकुळ नवस्वतंत्र देशभक्तांनी चालवली होती… त्यांच्या त्या शोकाकुलतेवर बोळा फिरवत मोदींनी पुन्हा एकदा स्वत:कडे लक्ष वेधून घेणारा महासोहळा साजरा करून घेतला… ते किती काळ मथळ्यांबाहेर राहणार?
जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू ही साधीसुधी घटना नाही. तो अपघात होता की घातपात हे चौकशीअंती स्पष्ट होईलच. पण यातील काहीही असलं तरी इतक्या सर्वोच्च पदावरची व्यक्तीही सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य माणूस किती सुरक्षित असेल, असा अस्वस्थ करणारा प्रश्न उमटू लागला होता. चीनच्या कुरापती, काश्मीरमधील दहशतवाद्यांनी डोकं वर काढणे या सगळ्या पार्श्वभूमीवर जनमानसात अस्वस्थता होती. तिच्यावरून लक्ष उडवण्याचं काम या सोहळ्याने केलं. त्यात १२ वर्षांतली सर्वोच्च पातळीवरची महागाई हा विषयही आपोआप झाकोळून गेला. मात्र, इव्हेंटबाजीने प्रधानमंत्र्यांनी कितीही काळ कोंबडी झाकली तरी कधी ना कधी वास्तवाचं जळजळीत दर्शन घडवणारा सूर्य उगवल्याशिवाय राहील का?
दुर्गेचा विसर की आत्मप्रेमाचा असर
आपण अवतारी पुरुष आहोत आणि या देशाच्या उद्धारासाठीच आपला जन्म झालेला आहे, अशी खात्री झाली की आपल्यापेक्षा मोठा कोणीच कसा नाही, हे दाखवण्यात वेळ वाया जातो आणि अवतारकार्य करायला वेळ उरत नाही. पंतप्रधानांची निम्मी कारकीर्द पंडित नेहरूंनी देशासाठी काहीच कसं केलं नाही, हे दाखवण्यात व्यतीत झाली आहे आणि आता त्यांनी दुर्गावतार धारण करून पाकिस्तानचे तुकडे करणार्‍या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे दुर्लक्ष वळवले आहे. बांगलादेश निर्मितीच्या सोनेरी स्मृती जागवताना इंदिरा गांधी यांचे विस्मरण होणे म्हणजे नोटबंदीचा वर्धापनदिन साजरा करताना मोदी यांचा विसर पडण्यासारखे आहे. दुर्दैवाने मोदींच्या नावावर नोटबंदी हाच सर्वात महान विक्रम आहे, त्यामुळे त्या आठवणी जनतेला आणि त्यांनाही नकोनकोशा आहेत.
धर्माच्या आधारावर भारतापासून वेगळ्या झालेल्या पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानात संस्कृतीच्या, भाषेच्या मुद्द्यावरून विसंवाद निर्माण झाला तिथेच धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीमधला फोलपणा उघड झाला होता. या दोन भागांमधल्या विसंवादाला खतपाणी घालत भारतीय लष्कराने मुक्तिबाहिनीला बळ दिले आणि वंगबंधू मुजीबुर रहमान यांच्या स्वातंत्र्यलढ्यात इंधन ओतून थेट लष्करी कारवाई करत पूर्व पाकिस्तानचे रूपांतर बांगला देशात केले. या सगळ्यामागे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्त्वाची प्रेरणा होती, म्हणूनच अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोधी पक्षात असतानाही इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा दिली होती. तो मनाचा मोठेपणा मोदी यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना इंदिरा गांधींचा नामोल्लेखही करावासा वाटला नाही.
कधी नेहरूंची हेटाळणी, कधी स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवातून महात्मा गांधींनाच गायब करणे किंवा बांगलादेश निर्मितीमागील इंदिरा गांधींची प्रेरणा नाकारणे, यातून इतिहास पुसला जाणार नाही, तर जनतेचे एवढे अलोट प्रेम लाभल्यानंतरही मोदींच्या मनातली असुरक्षितता गेली नाही, आपली रेष मोठी करण्यासाठी त्यांना सतत इतरांच्या रेषा पुसत राहावे लागते, हेच लक्षात राहील आणि इतिहासात नमूद होईल.

Previous Post

नया है वह…

Next Post

जनमन की बात

Next Post

जनमन की बात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.