तुमचा आवडता खेळ कोणता? फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलिबॉल की आणखी कुठला खेळ?
रवींद्र बोले, भंडारा
ज्यात फिक्सिंग होत नाही असा कुठलाही
चाफा बोलेना, चाफा चालेना… मग आता आपण करायचं तरी काय?
सुमेधा रिसबूड, सांताक्रूझ
चाफा मेलाय हे लक्षात नाही आलंय का तुमच्या?
दादा कोंडके यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? का?
विहंग सोनार, येवला
कुठलाच नाही
स्त्रियांचं सौंदर्य कोणत्या साडीत खुलून दिसतं? नऊवारी की पाचवारी?
अविनाश कारखानीस, रहिमतपूर
जातीच्या सुंदराला काहीही शोभतं
क्रिकेटचं मला काही शास्त्र कळत नाही. इतका चांगला चकचकीत बॉल देतात खेळाच्या सुरुवातीला खेळाडूंच्या हातात. ते त्यावर थुंकतात काय, माती काय लावतात, सतत घासत काय असतात? काय हे अचकट वागणं?
मनवेल फर्नांडिस, नालासोपारा
मग नका बघू. एवढी घाण वाटतेय तर.
सकाळी जाग आल्यानंतर पुन्हा ताणून द्यावी, असं तुम्हाला कधी वाटतं का? अशावेळी काय करता?
संदेश किराड, नाना पेठ, पुणे
मोह टाळतो
तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोण यावं असं वाटतं?
विराज गोळे, चुनाभट्टी
कुणीही चालतं, पण ते नंतर आठवलं पाहिजे बस..
लहान मुलांना मोठ्या माणसांची गाणी गायला लावणं, त्यांना मादक नृत्यं करायला लावणं ही ग्लॅमरस बालमजुरी आहे, असं नाही वाटत तुम्हाला?
रेणुका हिंगे, वानवडी, पुणे
आईबापाला झोडपले पाहिजे आधी!
तुम्हाला कोणत्या प्रकारचा विनोद अधिक आवडतो? चावट, निरागस, शाकाहारी, मांसाहारी, आंबट, तिखट, सोज्वळ की वाह्यात?
अशोक बहिरट, पुरंदर
या प्रश्नावरून तुम्ही खूप आंबट शौकीन आहेत हे कळलं.
आजकाल शाळेत जे विषय शिकवले जातात, त्यापेक्षा वेगळे कोणते विषय असावेत असं तुम्हाला वाटतं?
आयेशा शेख, कोल्हापूर
सामाजिक जाणीव, विवेक म्हणजे काय हे विषय अनिवार्य करावेत.
नाकावरच्या रागाला औषध काय?
चित्रा देशमुख, दादर
दुर्लक्ष!
टवाळा आवडे विनोद हे वचन तुम्हाला पटतं का?
गंगाधर सुतार, रत्नागिरी
मग जगात ९९ टक्के लोक टवाळ आहेत समजा.
बायकोने नोकरी करणं चांगलं की पूर्णवेळ गृहिणी असणं चांगलं?
शिवानी साखरदांडे, महाड
तुमचा फायदा कशात आहे त्यावर अवलंबून आहे.
तुमच्यावर तरूण वयात कोणाची मोहिनी अधिक पडली? माधुरी की श्रीदेवी?
विनायक साने, डोंबिवली
माधुरीचे सौंदर्य आणि श्रीदेवीच्या अभिनयाची.
कॅन यू टॉक इंग्लिश अँड
वॉक इंग्लिश?
गजा परब, मालाड
ये कैसा भाषा है रे बाबा
तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालात तर?
विभा कुलकर्णी, सातारा
मी उद्घाटनाला तर नक्कीच जाईन.
‘दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा’ हे तत्त्वज्ञान तुम्हाला आवडतं की ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ यावर तुमचा विश्वास आहे?
नयना रहाटगावकर, परभणी
दुसरं म्हणणं मला आवडतं.
तुमचा आवडता गायक कोण? मोहम्मद रफी की किशोरकुमार? अलीकडच्या पिढीत कोणत्या गायकाची गाणी आवडतात?
किरण जोशी, कोल्हापूर
किशोरकुमार, सोनू निगम, श्रेया घोषाल
साजुक तुपातल्या पोळीला म्हावर्याचा नाद लागला तर काय करावं?
सुनील कांबळे, बदलापूर
तुपात तळलेले मासे छान लागतात.
वैभव मांगले, दिसायला चांगले, नाटकात रंगले, सिनेमात गुंगले, याच्या पुढे काही सुचत नाही… तुम्ही पूर्ण कराल काय?
रेवती दिघे, पालघर
दिसायला चांगले, नाटकात दंगले, सिनेमात गुंगले, चित्रात रंगले तरी म्हणतात रंग माझा वेगळा.