परवा मी एका लग्नाला गेले होते. आमसुली रंगाची साडी नेसले होते. तर तिथे माझ्या ओळखीच्या एक आजी भेटल्या. त्या अत्यंत खुषीत लग्न एन्जॉय करत होत्या. मला त्यांनी आग्रहाने बाजूला बसवून घेतलं. म्हणाल्या, ‘हेका म्हणतंत लगीन. परवा माझ्या नातवाचा लगीन ए.सी. हॉलमधी मुंबयत झाला. कोणच माझ्याबरोबर बोलूक तयार नाय. मी झिलाक म्हटलंय पण… ह्या लगीन आसा की कॅसेट लावन ठेवलंस लग्नाची? आठशे रुपयाचा एक ताट होता. माका चार घास पण धड जावक नाय. शी… कसला ता लगीन! थंडगार निस्ता. हयसर बघ कसो गोंधळ गडबड… कोणोचो पायपोस कोणाच्या पायात नाय… मोठ्यानं हसतंत, बोलतंत… हेका म्हणतंत लगीन! मगाशी मानपानावरून याक मस्तपैकी भांडाण पण झाला. मजा इली.’
—-
शेवटी एकदाच्या कतरिनाच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि या वर्षातली एक महत्वाची घटना वर्ष सरता सरता पार पडली. सलमानचं बाशिंगबळ कमी पडलं बहुतेक! (एक हीरो तिसर्या लग्नाच्या तयारीत आहे आणि एकाचं अजून एकही नाही. मुलींनी काय ग्रह करून घेतलाय त्याच्याबाबत कोण जाणे!) बरं कैतूच्या लग्नात अक्षता तांदळाच्या असतील की सोन्याच्या असतील कोण जाणे! सोन्याच्या असल्या तर चांदीच्या सुपात कोणीतरी त्या भरून ठेवल्या असतील. (टाकल्या नसतील… म्हणजे… नसाव्यात… नसाव्यातच)
लग्नसोहळा राजस्थानात किल्ल्यावर मोठ्या महालात पार पडला म्हणे. आता लगेचच मी, केवढी ही पैशाची उधळपट्टी, एवढ्या पैशात गरिबांची दहा लग्नं (खरं म्हणजे शंभर लग्नं) सहज पार पडली असती, असं म्हणणार नाही. (कारण हे याआधी खूप वेळा म्हणून झालंय. त्यामुळे कुणाला काहीच फरक पडत नाही.) गरिबांची लग्नं खूप काटकसरीत झाली तरी ती अधिक मौल्यवान असतात असं मला वाटतं! झकास सारवलेल्या अंगणात हिरव्यागार झावळ्यांच्या रंगीत पताकांनी सजलेल्या मंडपात ती मोठ्या हौसेने साजरी होतात.
हाँगकाँगमध्ये जन्मलेली ब्रिटनमध्ये वाढलेली ही मुलगी. आजवर मुक्तपणे जगलेली ही अडतीस वर्षांची मुलगी. हिला लग्नाची ओढ किंवा जुनाट बुरसटलेलं बंधन का हवंसं वाटतं, हेच मला मोठं कोडं वाटतंय. कदाचित आपल्या ग्रेट बॉलिवुडचा हा प्रभाव असावा! शादी, रिवाज, परंपरा, रस्म, कस्म, मेहंदी, मंगळसूत्र, चुडियां, पवित्र रिश्ते, सुहाग की रात हे सगळं ऐकून, बघून, त्याचा अभिनय करून तिला आपली पण शादी धामधुमीत व्हावी, असं वाटलं असेल. यात गैर काहीच नाही. ही चांगलीच गोष्ट आहे. आमचे तुला शुभ आणि मंगल असे आशीर्वाद आहेत.
तिला काय लग्न झाल्यावर लगेच किचन हातात घेऊन पोळीभाजीचा डबा तयार करावा लागणार नाही. जास्तीत जास्त कोणीतरी केलेला डबा नाचत नाचत, गाणी म्हणत, लाडे लाडे नेवून नवर्याच्या हातात द्यावा लागेल. कैतू, डबा आधी उघडून बघ. म्हणजे नवर्याने आज काय आहे डब्यात, असं अचानक उत्स्फूर्तपणे विचारलं तर धाडकन उत्तर देता आलं पाहिजे. हे डायलॉग कोण लिहून देणार नाही.
आणखी एक, सुरुवातीच्या दिवसात कोणी चहापाण्याला, जेवायला घरी बोलावलं, तर सगळे दागिने- मोठं मंगळसूत्र, शालू वगैरे घालून जायचं. येताना मोठ्यांच्या पाया पडायचं. शेवटी आशीर्वादच महत्त्वाचे!
परवा मी एका लग्नाला गेले होते. आमसुली रंगाची साडी नेसले होते (आपली सहज माहिती पुरवली). तर तिथे माझ्या ओळखीच्या एक आजी भेटल्या. त्या अत्यंत खुषीत लग्न एन्जॉय करत होत्या. मला त्यांनी आग्रहाने बाजूला बसवून घेतलं. म्हणाल्या, ‘हेका म्हणतंत लगीन. परवा माझ्या नातवाचा लगीन ए.सी. हॉलमधी मुंबयत झाला. कोणच माझ्याबरोबर बोलूक तयार नाय. मी झिलाक म्हटलंय पण… ह्या लगीन आसा की कॅसेट लावन ठेवलंस लग्नाची? आठशे रुपयाचा एक ताट होता. माका चार घास पण धड जावक नाय. शी… कसला ता लगीन! थंडगार निस्ता. हयसर बघ कसो गोंधळ गडबड… कोणोचो पायपोस कोणाच्या पायात नाय… मोठ्यानं हसतंत, बोलतंत… हेका म्हणतंत लगीन! मगाशी मानपानावरून याक मस्तपैकी भांडाण पण झाला. मजा इली.’
हे ऐकून मी हसले.
‘ओ खरा सांगतय मी… ती माझी नातसुन रडाक पण नाय घसघशीत… पाठवणीच्या टायमाक! मग समजूत काढुचो काय प्रश्नच नाय. माझोच गळो आपलो दाटून येयत होतो.’
‘तुमका तुमची पाठवणी आठवली असतली,’ मी म्हटलं. तेव्हा आजी फक्त हसली.
बाय द वे… कैतूच्या लग्नात ७५ प्रकारच्या भारतीय भाज्या आणि पन्नास प्रकारच्या परदेशी भाज्या आहेत असं कळलं! ही एकमेव बातमी कशीबशी माझ्या हाती लागली (आपल्या मराठी साहित्य संमेलनाचा मेन्यू मला अजूनही कळला नाही. हे दुःख माझ्या मनाच्या तळाशी आहेच. बाकीही विशेष काही कळलं नाही). ७५ भाज्यांमध्ये वांगं नक्की असणार. वांग्याचा कुठला प्रकार आहे तो कळला नाही. सुरण पण असेल बहुतेक. ती औषधी भाजी आहे आणि विकी मेथीच्याच भाजीवरून नाव घेणार… म्हणजे मेथी असणारच!
पन्नास परदेशी भाज्या मी काय समजून घेतल्या नाहीत. आम्हाला टायम नाय!
पाठवणीच्या टायमाला कैतू काय रडली असेल असं वाटत नाही. मुळात नवर्याकडे जाताना का रडायचं हेच तिला कळणार नाही. स्क्रिप्टमध्ये असेल तरच रडायचं एवढंच तिला माहिती. त्यामुळे मी कैतुला चांगलं संभाळेन, तिला कसलं दुःख होवू देणार नाही, असं जावयाला पण आश्वस्त करावं लागलं नसेल… असो!
मोठ्या लोकांची लग्नं… त्यांच्यात कसला खर्च कोणी करायचा किंवा निम्मा निम्मा खर्च करू या का हा प्रश्नच नसेल किंवा तुमची किती माणसं येणार हे पण नसेल. दोन्ही पार्टी पैसा ओतायला आतुर असतील. पैसा खर्च करायला काहीतरी कारण मिळालं हेच मोठं हो…! तर काय…! तरीपण आपल्या वैâतुने खर्चाचा बराचसा भार उचललाय एवढं आतल्या गोटातून कळलंय..!
आणखी एक- पूर्वी हिंदी सिनेमात, हिंदी सिरीअलमध्ये आणि आता मराठी सिरिअलमध्येही चाव्यांच्या जुडग्याने प्रवेश केलाय. खूप वेळा चांगलं वागून दाखवलं की चाव्यांचा जुडगा सासुबाई सुनेच्या हातात देतात आणि तिचा चेहरा पण मोठा खजिना मिळाल्यासारखा उजळून निघतो. त्याच वेळी इतर दोघीतिघींचे चेहरे धडाधड पडतात. चाव्यांचा जुडगा एवढा मोठा असतो की हिर्यामोत्यांपासून, कांदेगुळापासून ते पाट्या-वरवंट्यापर्यंत सगळं काही मोठ्या मोठ्या कुलुपांमध्ये ठेवलय असं वाटतं.
आता मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात एवढ्या कसल्या चाव्या असणार? जास्तीत जास्त एका गोदरेजच्या कपाटाची चावी (आणि दागिने कुठेतरी तांदळाच्या डब्यात असणार, जे तिला स्वत:ला मिळणार नाहीत. ते चोर कसा काय शोधून काढणार?) त्यासाठी जुडगा कशाला हवा? पण नाही. सासू जुन्यापान्या सगळ्या गंजक्या चाव्या शोधून काढून जुडगा करणार म्हणजे करणार! मग कुलपं असूदेत की नसूदेत!
आपल्या कैतूला असा चाव्यांचा जुडगा मिळालाय की नाही आणि त्यावर तिची काय रिअॅक्शन होती, हे लवकरच आपल्याला कुठून तरी कळेल. तवसर आपण धीर धरायला हवा.