त्या दिवशी सकाळी सकाळी उतारा घेत बसलो असतानाच पेपरवाल्याने पेपर टाकला. डोळ्यावर झापड असतानाही झडप टाकून त्याला पकडला. डोळे तारवटून पहिले पान वाचत असतानाच विदेशी मद्याचे भाव उतरणार ही बातमी वाचताच माझी धुंदी खाडकन उतरली. मी ताबडतोब माझा मानलेला परममित्र पोक्याला मोबाइलवरून ही बातमी दिली. तो म्हणाला, शिळी आहे. मला दोन दिवसापूर्वीच कळली होती. मी म्हटलं, ते काहीही असू दे. आपण न केलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय आहे. मी नेहमी सांगत असतो, वरपासून खालपर्यंत कोणी कितीही अन्याय केला तरी तो सहन करण्याची जिद्द बाळगा. कधी ना कधी अंतिम विजय आपलाच होतो. त्यावर पोक्या वेड्यासारखे बरळत म्हणाला, तू त्या वरच्या नेत्याच्या नादी लागल्यापासून तुझी आतली पॉवर हरवून बसत आहेस. विदेशी दारू स्वस्त होणार हा आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्या दारूचे खंबे, हातभट्टीचे फुगे रिचवून स्वत:च्या तब्बेतीची वाट लावून घेतली त्यांचा विजय आहे. आपल्या तळीराम या आद्य पूर्वजाने केलेल्या मद्यप्राशनाच्या तपश्चर्येमुळे आज ही विदेशी मद्याची शिवास रीगल सर्वसामान्य देशी दारूच्या शौकीनांनाही उपलब्ध होणार आहे. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी काहीतरी संमेलनासारखा कार्यक्रम आपण मोठ्या नव्हे तर छोट्या हॉलमध्ये तरी आखायला पाहिजे. मी तुझ्याकडे माझ्या खटारा चारचाकीमधून येतो. त्यानंतर आपण या विषयावर चर्चा करूया. येताना पुरेसा विदेशी मद्याचा स्टॉक आणतो.
पाच मिनिटातच पोक्या माझ्या घरी आला. अर्ध्या तासात मी माझे आंघोळीसह सर्व विधी आटोपून बाहेरून दोघांसाठी नॉनव्हेज नाश्ता आणि चकना मागवला. खाली बसूनच दोघांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली. मी म्हणालो, पोक्या एक लक्षात ठेव. अहिंसक आंदोलन हे कसलाही मोर्चा, उपोषण, दगडफेक, हिंसाचार, निषेध न करता करता येते हे समस्त देशी दारु पिणार्या कर्तव्यदक्ष आणि देशभक्त नागरिकांनी दाखवून दिले आहे. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅसप्रमाणे देशी दारुचे भाव कमी करा म्हणून आपल्या देशीबाज बांधवांनी कधी आवाज उठवल्याचे तू ऐकले होतेस? कधीच नसणार. रात्री सातच्या आत गुत्त्यात किंवा बारमध्ये हा शिरस्ता त्यांनी कधीच मोडला नाही. इतर कोणाला नसेल, पण सरकारचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याची चिंता फक्त या एकाच घटकाला होती. म्हणून भर उन्हात, पावसात, थंडीत, लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी रांगेत तासन्तास उभे राहून तर कधी चुकीचे मार्ग अनुसरून दारुच्या बाटल्या डबल ट्रिबल पैसे देऊन मिळवल्याच. कोटा शिल्लक राहिला तरी चालेल, पण सरकारी उत्पन्नात भर टाकणे हे आपले पहिले राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेने त्यांनी मार्ग सोडला नाही. प्रसंगी उधार-उसनवारी करून स्वत:च्या बँक बॅलन्सची पर्वा न करता आपल्या नशेची नव्हे तर सरकारी तिजोरीची तहान भागवली. खरेच, त्यांच्या त्यागाचे फळ त्यांना मिळणार आहे.
पोक्यालाही ते पटले, आता ते आपापला ब्रॅण्ड ठरवून दर दिवशी म्हणजे रात्री त्यात बदल करत जातील. म्हणजे त्यांना तिच्यातील नजाकत, मादकता, धुंदी, कैफ आणि उंची कळेल. कधी नव्हे ती ही संधी त्यांच्या पुण्यकर्मामुळे आणि सहनशक्तीमुळे त्यांच्याकडे चालून आली आहे. त्याबद्दल प्रत्येक बारमध्ये विदेशी मद्याच्या बाटल्या आणि आकर्षक काचेचे चषक ठेवलेच पाहिजेत, ही मागणी आपण प्रत्येक बारला भेट देऊन त्यांच्या मालकाकडे करू. त्यासाठी तुझ्याकडे ईडीची धाड पडणार होती तो लपवून ठेवलेल्या काळा पैसा या चांगल्या कामासाठी खर्च करू आणि या मद्यप्रेमी सहबांधवांना कधी नव्हे ती विदेशी मद्याची व्हरायटी प्राशन करण्याचा आनंद देऊ. त्या बिचार्यांना मोसंबी, नारंगी, पायनापल आणि काही फ्लेवर्सशिवाय कोणत्याही विदेशी मद्याची नावे माहीत असण्याची शक्यता नाही. आपण अशा बारमध्ये शिवास रीगल, ब्लू लेबलपर्यंत सर्व विदेशी मद्यांच्या बाटल्या उपलब्ध होतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
अरे पोक्या, यांना एकदा ग्लास तोंडाला लावला की घटाघटा प्यायची सवय असते. त्याला पिणे म्हणत नाहीत, ढोसणे म्हणतात. मद्याचाही आस्वाद घेत ते पिता आले पाहिजे.
यावर पोक्याने शंका व्यक्त केली की आपण असे करून विदेशीचे स्तोम माजवतो असे वाटत नाही का? मी मात्र माझ्या मतावर ठाम होतो. अरे, इथे प्युअर देशी माल फार कमी बनतो. अगदी मोबाईलपासून इतर कोणत्याही वस्तूपर्यंत. त्यात हातभट्टी, विषारी दारू यात कसले कुजलेले, नासलेले पदार्थ वापरतात हे तुला माहित आहे का? त्यापेक्षा त्या बिचार्यांना कधी नव्हे त्या त्यांच्या दृष्टीने अमृततुल्य विदेशी दारुची चव चाखायला मिळणार असेल तर मिळू दे ना. वाटल्यास तिचे दर आणखी कमी करा अशी मागणी आपण केंद्रापासून राज्यापर्यंत सर्व सरकारांना करू. सर्व पियक्कड नेत्यांनाही हा उपक्रम आवडेल. स्वदेशी-विदेशी हा भेदभाव आता संपला पाहिजे. पिणार्यांची जात एकच असते. पिणारा उच्चवर्गातील किंवा खालच्या वर्गातील असला तरी ते प्यायल्यावर एकाच पातळीवर येतात. आज जगाला अशाच ऐक्याची जरुरी आहे.
माझे हे भाषण ऐकताच पोक्या म्हणाला, आज सकाळी सकाळीच तू मोदींसारखी `मन की बात’ करून प्रिय बांधवांना प्रेमाचा संदेश दिलास त्याबद्दल मी तुझे आभार मानतो आणि हा संदेश व्हायरल करून प्रत्येक `देशी’ बांधवांच्या मोबाईलमध्ये कसा पोचेल याची व्यवस्था करतो. चिअर्सऽऽऽ