□ महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्षांचा तमाशा! – आशिष शेलार
■ आणि महाराष्ट्रातला शेलारांचा पक्ष म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहे काय!
□ हिंदू म्हणून राहण्यासाठी भारत अखंड हवा.
■ ते वेळात वेळ काढून पंतप्रधानांना सांगा… देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झालाच तर तो त्यांच्या एककल्ली, हुकूमशाही, केंद्रसत्तावादी कारभाराने होईल.
□ केंद्रीय नेतृत्त्व माझ्यावर नाराज आहे, असं म्हणता येणार नाही. आमची बॉडी लँग्वेज पाहा- चंद्रकांतदादा पाटील
■ केंद्रीय नेतृत्त्वाप्रमाणेच तुम्हीही शिकवणी लावली होती की काय दादा बॉडी लँग्वेज घडवण्याची?
□ सत्तेची नव्हे, लोकांची सेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’
■ ते दोन ‘लोक’ कोण आहेत, ते सर्वांना माहिती आहे. काहीतरी नवीन सांगा.
□ ज्येष्ठांना अडकवणारे ‘हनी ट्रॅप’ सोशल मीडियावर सक्रिय, चॅटिंगच्या बहाण्याने अश्लील कृत्यं करायला लावून व्हिडिओ चित्रिकरण आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकार उघडकीस
■ ज्येष्ठांच्याही शारीरिक गरजा असतात, हे ओळखण्याइतका समाज परिपक्व झाला तर
ब्लॅकमेलिंग करण्यासारखा लाजिरवाणेपणाच राहणार नाही… तोवर चित्तीच नव्हे तर कृतीतही असावे सावधान!
□ देशातील शेतकर्यांनी नरेंद्र मोदींना हरवले– मेधा पाटकर
■ पण, ही हार त्यांनी राजकीय फायद्यासाठी स्वीकारली आहे. ती वेळ साधली ते दुप्पट त्वेषाने शेतकर्यांना भिकेला लावण्याचे प्रयत्न करतीलच. त्यांचा संपूर्ण राजकीय पराभव होईपर्यंत ते हरले असं म्हणणं ही आत्मवंचनाच ठरेल.
□ महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या साबरमती आश्रमाला भेट देऊन सलमान खानने सूतकताई केली…
■ गांधीजी त्याच्या मेंदूत काही ‘केमिकल लोच्या’ करू शकले तर आनंदच आहे की! निब्बर कातडीच्या राजकारण्यांच्या बाबतीत बापूंनीही हात टेकले असतील!
□ अभिरुचीसंपन्न समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करावे- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची साहित्यिक आणि चित्रपटनिर्मात्यांकडून अपेक्षा
■ अभिरुची म्हणजे तुम्ही आणि तुमचे तथाकथित संस्कृतिरक्षक ठरवतील ती का? आधी केले, मग सांगितले या पद्धतीने ज्याने त्याने आपल्या पदाची कामं सचोटीने, वेळेवर केली तरी अभिरुचीसंपन्न समाज आपोआप घडेल.
□ केंद्र सरकार चर्चेला घाबरते– राहुल गांधी
■ अब की बार, घाबरट सरकार
□ लग्नपत्रिका छपाईमुळे मुद्रण व्यवसायाला दिलासा; गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के वाढ
■ बघा, लोक जिवावर उदार होऊन अर्थव्यवस्थेला कसा हातभार लावतात…
□ स्वतंत्र विदर्भावर सहमती नाही, केंद्राची भूमिका, विदर्भवाद्यांना धक्का
■ महाराष्ट्रात दुधाने तोंड पोळलं आहे, आता ताक फुंकून पितायत इतकंच…
□ पायधुनी येथे शब्बीर कुरेशी याने घरातच छापल्या बनावट नोटा
■ बनावट नोटा छापणं इतकं सोपं असेल तर मग नोटांची ‘बनावट’ काय दर्जाची आहे म्हणायची!
□ पाच वर्षांत पाच लाखांहून अधिक हिंदुस्तानींनी देश सोडला
■ हे सगळे धनवान आहेत, हा योगायोग नाही… मोदी सरकारने केलेल्या विकासाने त्यांचे डोळे दीपून गेले असणार आणि आपल्या योग्यतेप्रमाणे जरा मागास भागातच राहू या, असं त्यांनी ठरवलं असणार…
□ भारतीय विद्वत्तेचा अमेरिकेला प्रचंड मोठा फायदा, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करताना एलॉन मस्क यांची कबुली
■ भारतातले लोक देश सोडून अमेरिकेला जाण्यासाठी विद्वान बनण्याइतके कष्टही घ्यायला तयार होतात, असा याचा अर्थ आहे, तो काही फार कौतुकाचा नाही.
□ बँकांमधील २६ हजार कोटींहून अधिक रकमेला मालक नाही- अर्थमंत्री निर्मला सीतारामन
■ मग एक नोटीस देऊन महिना दोन महिने वाट पाहा आणि नाहीच आले तर द्या वाटून सगळ्या देशवासीयांमध्ये… १५ लाख यायचे तेव्हा येतील, सध्या यात काम भागवू.