• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

…आणि लग्न ठरलं

सचिन परब (प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
December 9, 2021
in प्रबोधन १००
0

गेलं वर्षभर `प्रबोधन-१००’ हे सदर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या कर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याचं काम करतंय. प्रबोधन नियतकालिकाच्या शताब्दीच्या निमित्ताने सुरू झालेलं हे सदर आता नव्या वर्षात प्रबोधनकारांच्या आयुष्याचा नवा टप्पा मांडत आहे.
—-

प्रबोधन. कधी पाक्षिक होतं, तर कधी मासिक. पहिल्या अंकाची तारीख आणि शेवटच्या अंकाची तारीख यातली वर्षं मोजली तर ती साडेआठ एवढीच होतात. प्रत्यक्ष प्रकाशन वर्षं मोजली तर साडेपाचच. या दरम्यान अधूनमधून खंड पडत फक्त ९५ अंक निघाले. तरीही प्रबोधन हे महाराष्ट्राच्या समाजप्रबोधनाच्या इतिहासातलं वादळी पर्व ठरलं. या नियतकालिकाने महाराष्ट्रातल्या पत्रकारितेत इतिहास घडवला. केशव सीताराम ठाकरेंना प्रबोधनकार ही ओळख दिली. ‘प्रबोधन’ची सुरुवात झाल्याला या १६ ऑक्टोबर २०२१ला बरोबर १०० वर्षं झाली. ही शताब्दी साजरी करणं हे महाराष्ट्राचं कर्तव्यच होतं.
ही शताब्दी साजरी का करायला हवी आणि त्यानिमित्त काय करायला हवं ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी `साप्ताहिक नवयुग’च्या १६ सप्टेंबर १९४५ च्या अंकात सांगून ठेवलं आहे. `बंडखोर ब्राह्मणेतर’ या प्रबोधनकारांच्या साठीनिमित्त लिहिलेल्या लेखात त्यांनी सांगितलंय, `मराठी बहुजन समाजाला आपल्या निधड्या लेखनाने आणि वक्तृत्वाने जागृत करण्याचे जे थोर सामाजिक कार्य केशव सीताराम ठाकरे यांनी केलेले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे महाराष्ट्रवासीयांचे कर्तव्य आहे. आजपर्यंत ठाकरे यांनी लिहिलेले सर्व प्रबोधक आणि तेजस्वी वाङ्मय एकत्रित करून ग्रंथरूपाने जर प्रकाशात आले, तर महाराष्ट्राची सामाजिक क्रांती घडवून आणण्याच्या कामी या बंडखोर ब्राह्मणेतराने एका कालखंडात केवढी तेजस्वी कामगिरी करून ठेवलेली आहे, हे महाराष्ट्राला कळून आल्यावाचून राहणार नाही. अशा मान्यतेचा आणि गौरवाचा मुजरा महाराष्ट्र या कलमप्रभूला मोठ्या आनंदाने करेल!’
प्रबोधनकारांचं अप्रकाशित साहित्य पुन्हा प्रसिद्ध करण्याची आचार्य अत्रे यांनी सांगितलेली जबाबदारी सध्याच्या महाराष्ट्र सरकारने ताकदीने निभावली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे शताब्दी वर्ष साजरं करण्यावर मर्यादा आल्या होत्या, तरी त्याचा समारोप मात्र दिमाखात पार पडला. प्रबोधनमधली प्रबोधनकारांची विचारसंपदा शंभर वर्षांच्या काळात दुर्मिळ झाल्यामुळे ती वाचकांसाठी उपलब्ध नव्हती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १०० वर्षांपूर्वीच्या प्रबोधनमधील प्रबोधनकारांचे लेख ग्रंथरूपाने तीन खंडांमध्ये प्रकाशित केले. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांची ही संकल्पना होती. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात १६ ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या तिन्ही खंडांचं प्रकाशन झालं. त्याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगलप्रभात लोढा, महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. `प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या नावाच्या तिन्ही खंडांमध्ये मिळून रॉयल आकाराच्या १५३४ पानांमध्ये प्रबोधनकारांचे २४८ लेख वाचता येतात. त्यातून महाराष्ट्राचा शंभर वर्षांपूर्वीचा `आंखो देखा हाल’ अनुभवता येतो.
याच कार्यक्रमातल्या भाषणात सुभाष देसाई यांनी `साप्ताहिक मार्मिक’मध्ये गेले वर्षभर सुरू असणार्‍या `प्रबोधन-१००’ या सदराचा आवर्जून उल्लेख केला. प्रबोधन शताब्दीच्या वर्षात झालेल्या विविध उपक्रमांमधलं हे सदर प्रबोधनकारांना एक आगळीवेगळी आदरांजली ठरतंय. प्रबोधनकारांच्या कर्तृत्वाच्या स्मृती जागवत या सदराने त्यांची ओळख नव्या पिढीला करून दिली. गेल्या वर्षभरात या सदरामध्ये ४४ लेख प्रसिद्ध झाले. त्यात प्रामुख्याने प्रबोधनकारांची जडणघडण मांडली आहे. त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आयुष्यातल्या पहिल्या २५ वर्षांच्या आठवणी आजवर आल्यात. त्यांच्यावरचे त्यांच्या आजीआजोबांचे, आईवडिलांचे प्रभाव, शिक्षणासाठीची वणवण आणि नंतर उदरनिर्वाहासाठी केलेली धावपळ आपण यात पाहिली. त्यात एक लेखक, पत्रकार, नाटककार, समाजसेवक आणि वक्ता म्हणून ते कसे घडत गेले याचा सविस्तर आढावा होता. प्रबोधनकारांचं आत्मचरित्र `माझी जीवनगाथा’ आणि इतर लिखाणाच्या आधारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो काळ समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. त्यातून प्रबोधनकारांचे विचार आणि कर्तृत्व उलगडत जाताना आपण पाहिलं. अजूनही प्रबोधनकारांची कहाणी बरीच बाकी आहे.
आपल्या सदरातली प्रबोधनकारांची कहाणी त्यांच्या स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीत येऊन पोचलीय. कंपनीचे एक प्रमुख जनुभाऊ निंबकर प्रबोधनकारांना कोल्हापुरातून कंपनीत घेऊन आल्याचं आपल्याला माहीत आहे. कंपनी वर्‍हाडाच्या दौर्‍यावर आहे. तेव्हा वैभवसंपन्न असणारं वर्‍हाड नाटक कंपन्यांच्या आगतस्वागतासाठी कायम तत्पर असायचं. खामगाव, यवतमाळ, अकोला, अमरावती या शहरांमध्ये मुक्काम करत कंपनी एलिचपूरला पोहोचली. ब्रिटिश अमलात एलिचपूर म्हणून ओळखलं जाणारं शहर आता अचलपूर म्हणून ओळखलं जातं. विसाव्या शतकात ते अमरावती जिल्ह्याचा भाग बनलं. पण त्याआधी दीर्घकाळ ते वर्‍हाडाची राजधानी होतं. अचलपूरला लागूनच परतवाडा हे जोडशहर आहे. तिथे जनुभाऊंचे भाचे गोविंदराव काळे राहत. ते एका वकिलाच्या कचेरीत कारकून होते. मामाची नाटक कंपनी शहरात आल्यामुळे त्यांनी मुक्कामाची व्यवस्था लावून दिली होती. परतवाड्याहून अचलपूरला व्यवस्था बघायला ते रोज सकाळ संध्याकाळी येत. कंपनीत ते सगळ्यांची स्वतःहून विचारपूस करत. त्यांच्या आतिथ्यशीलतेमुळे त्यांची प्रबोधनकारांशीही मैत्री झाली होती.
एक दिवस कंपनीत घोषणा झाली की सगळ्यांनी गोविंदराव काळे यांच्या परतवाड्यातल्या घरी मेजवानीला जायचं आहे. आपल्या गावात नाटक कंपनी आली की त्यांना घरी बोलावून जेवण किंवा फराळ देण्याची त्या काळात पद्धत होती. त्यानुसार गोविंदरावांच्या घरी सगळी कंपनी पोहोचली. जेवण झालं. पान खात सगळे बसले होते. तेवढ्यात अचानक एक तरूण मुलगी समोर येऊन उभी राहिली. प्रबोधनकारांचं लक्ष नव्हतं. कंपनीतले प्रख्यात गायक नट कृष्णराव गोरे आणि राजारामपंत सोहोनी प्रबोधनकारांना म्हणाले, `अहो कविराज, समोर पाहा.’ प्रबोधनकारांचं लग्न जुळवण्यासाठी हा नाटक कंपनीतल्या मोठ्या माणसांनी ही एक चाल रचली होती. त्यात प्रबोधनकार अलगद फसले.
याआधी अमरावतीच्या मुक्कामात असाच एक प्रयत्न प्रबोधनकारांनी हाणून पाडला होता. कारण त्यांना मुलगी बघायला जाणं हा प्रकारच मान्य नव्हता. कारण त्यात तिच्या भावभावनांचा विचारच होत नाही, असं त्यांचं मत होतं. शिवाय त्यांना मुलगी श्रीमंत किंवा सुखवस्तू घरातलीही नको होती. त्यांना गरीब आणि संकटांनी हतबल झालेल्या घरातली मुलगी हवी होती. ते हुंडाही घेणार नव्हते आणि कन्यादान हा लग्नातला विधीही त्यांना नको होता. मुलगी बघायला जाणार नाही, पण योगायोगाने एखादी मुलगी नजरेला आली किंवा आणली तर मात्र ते नकार देणार नव्हते. त्यामुळे त्यांनी श्रीमंत मामलेदाराच्या घरजावई बनवण्याची योजना हाणून पाडली होती. त्यामुळे सावध झालेल्या कंपनीतल्या जाणत्यांनी यावेळेस कोणतीही चूक केली नाही. त्यांच्या अटींमध्ये बसणार्‍या एका मुलीला अचानक त्यांच्यासमोर उभं केलं होतं.
त्यानंतर गोविंदराव काळेंनी या मुलीचं केलेलं वर्णन आणि त्यानंतर घडलेला प्रसंग प्रबोधनकारांच्या शब्दांतच वाचायला हवा म्हणजे त्यातली गंमत तर कळेलच, पण प्रबोधनकारांची सुधारकी विचारांवरची निष्ठाही अनुभवता येईल. प्रबोधनकारांच्या आत्मचरित्रात वर्णन केलेला त्यांचं लग्न जुळवण्याचा प्रसंग असा–
गोविंदराव काळे म्हणाले, `ही मुलगी आणलीय दाखवायला तुम्हाला. तुमच्या जातीचे गुप्ते घराणे. हिचा बाप ही लहान असताना यवतमाळ येथे वारला. नाझर होते ते तेथे कोर्टात. यांच्या मातोश्रीला येथील दामले मास्तरांनी– हे पहा ते येथे बसले आहेत– शिकवून येथल्या शाळेत मास्तरणीची नोकरी दिलेली आहे. हिला एक थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ आहे. हे चौघांचे कुटुंब आमच्या शेजाराला आज बरीच वर्षे रहात आहे. त्यांचे कल्याण व्हावे, मुले मार्गाला लागावीत, ही आमची सगळ्यांची इच्छा. तेव्हा बोला.’
कसलाही विचार न करता मी सांगितले, `पसंत आहे.’ गोरे सोहोनी म्हणाले, `अहो, काही प्रश्न विचारा मुलीला.’ मी म्हणालो, `ही जुनी रूढी मला नापसंत आहे. मी होय म्हटले ते वज्रलेप. मात्र माझ्या एका धाकट्या बहिणीचे लग्न जमायचे आहे. ते जमताच विवाह सिद्धी करता येईल. तोवर यांना थांबावे लागेल. तेवढाही धीर नसेल तर दुसरे स्थळ पहायला ते मोकळे आहेत. माझा शब्द मात्र कायम.’
प्रबोधनकार विचारांशी पक्के होते. मुलगी बघण्याचा रिवाज त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलीला साधे प्रश्नही विचारले नाहीत. ते आपल्या मतांवर ठाम राहिले. पुरोगामीपणाच्या नुसत्या गप्पा मारणार्‍यांना जे आजही जमत नाही, ते प्रबोधनकारांनी शंभर वर्षांपूर्वी करून दाखवलं होतं. लेख आणि भाषणांत सांगायचे विचार त्यांनी जीवनात उतरवले होते. म्हणूनच त्या शब्दांना तपस्येची जोड मिळाली आणि ते शब्द परिवर्तन घडवू शकले.

Previous Post

जनमन की बात

Next Post

डरो ना, पण बेबंदपणे फिरो भी ना!

Next Post

डरो ना, पण बेबंदपणे फिरो भी ना!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.