हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे असंख्य आहेत, पण कराड तालुक्यातील विरवडे गावचे शिवसैनिक महेश पाटील यांची बातच और आहे. साधारणपणे आपण वृत्तपत्र वाचले की बाजूला टाकतो. महिनाभराने सर्व वृत्तपत्रे रद्दीत देऊन टाकतो. पण महेश यांचे दै. सामना आणि बाळासाहेब यांच्यावर इतके नितांत प्रेम आहे की त्यांनी गेल्या २५ वर्षातील दै. ‘सामना’चे सर्व अंक जिवापाड जपले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांच्या सभा असोत की शिवतीर्थावर होणारा प्रत्येक दसरा मेळावा, शिवसेना वर्धापन दिन- यासाठी आवर्जून आणि सातत्याने उपस्थित राहणारा शिवसैनिक म्हणजे महेश पाटील. कराडच्या विरवडे तालुक्यात १९९१ साली शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली. तेव्हापासून या शाखेचे शिवसैनिक म्हणून महेश आजही अविरतपणे झटून काम करत आहेत. १९९७ साली पुण्यातील सारसबाग येथे शिवसेनाप्रमुखांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महेश पाटील पहिल्यांदाच उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या २० सभा जवळून पाहिल्या. यात कोल्हापूर, कराड, कोरेगाव, फलटण, पाटण, मालवण, पुणे येथील सर्वच सभांचा समावेश आहे. आजही शिवतीर्थावरील दसरा मेळावा, शिवसेना वर्धापन दिन, शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी याला ते न चुकता उपस्थित राहतात.
दै. ‘सामना’ सुरू झाल्यापासून महेश पाटील ‘सामना’चे वाचक आहेत. सुरुवातीपासूनच दै. ‘सामना’चे अंक जतन करण्याचा त्यांना छंद लागला. प्रारंभीच्या पंधरा वर्षातील अंकही त्यांनी जपून ठेवले होते, पण योग्य ती देखभाल न झाल्यामुळे ते अंक खराब झाले. पण आता त्यांनी अंकांची निगा राखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या महेश पाटील यांच्याकडे ४ जुलै २००५पासून ते २०२०पर्यंतचे दै. ‘सामना’चे अंक आहेत. ‘नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी ते शिवसेनेची सत्ता’ असे अंक जपून ठेवायचे असे महेश पाटील यांनी ठरवले होते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा माझी इच्छा पूर्ण झाली असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा २००६ सालचा वाढदिवस महेश कधीच विसरू शकणार नाहीत. कारण या दिवशी त्यांनी कराडहून सरळ ‘मातोश्री’ला फोन करून बाळासाहेबांना वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळचे टेलिफोन खात्याकडून एसटीडी कॉलचे आलेले बिल त्यांनी अजूनही जपून ठेवले आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी स्वत: फोन उचलून आपल्या शुभेच्छा स्वीकारल्याची आठवण ते आजही अभिमानाने सांगतात.
२३ जानेवारी २०१२ बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची रुद्राक्ष तुला करण्यात आली होती. सर्व मिळून ६२ किलो वजनाचे रुद्राक्षांची संख्या २२ हजार २३४ होती. त्यानंतर हे रुद्राक्ष शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद म्हणून महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वितरित करण्यात आले होते. महेश पाटील यांनी मुंबई येथे जाऊन दोन रुद्राक्ष घेतले होते. हे दोन रुद्राक्ष त्यांनी आजही जिवाप्रमाणे जपून ठेवले आहेत. त्यांनी ते गळ्यामध्ये परिधान केले आहेत. महेश पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांच्या दसरा मेळावा व सभांमध्ये झालेल्या भाषणांचे १९९४ ते २०१०पर्यंतच्या कॅसेट्सही जपून ठेवल्या आहेत. याशिवाय महेश यांनी बाळासाहेबांच्या आणि उद्धवजींच्या पुस्तकांचाही संग्रह केला आहे. यात ‘अंगार’, ‘एक धगधगता विचार’, ‘हिंदुत्वाचा यज्ञकुंड’, ‘साहेब’, ‘फटकारे’, ‘महाराष्ट्र देशा’, ‘पाहावा विठ्ठल’ इत्यादीचा संग्रह केला आहे.