अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू-बुध-रवी वृश्चिकेत, शुक्र धनुमध्ये, शनी मकरेत, गुरू कुंभेत, चंद्र सिंहेत, त्यानंतर कन्या राशीत, आठवड्याच्या अखेरीस तुळेत, मंगळ तुळेत. दिनविशेष – ३० नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी, ३ डिसेंबर रोजी कार्तिक अमावस्या दुपारी ४.५६ मिनिटांनी सुरु होणार असून ४ डिसेंबर रोजी दुपारी १३ वाजून १३ मिनिटांनी संपणार आहे. खग्रास सूर्यग्रहण (भारतात दिसणार नसल्यामुळे वेधादी नियम पाळू नयेत.)
मेष – येत्या आठवड्यात काही ना काही कारणामुळे वादाचे प्रसंग घडतील. मंगळाच्या सप्तमातील तुळेतील भ्रमणामुळे जोडीदाराबरोबर वादविवाद वाढवणारे प्रसंग होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसमोर नमती भूमिका घ्या, विनाकारण शब्दाने शब्द वाढवू नका, उगाच नसती समस्या निर्माण करून ठेवाल. गुरूच्या लाभातील कुंभ राशीतील राश्यांतरामुळे आर्थिक स्रोत वाढतील, त्यामुळे कर्ज काढले असेल तर ते फिटेल. दशमस्थानातील शनीमुळे व्यवसायाची घडी पूर्वपदावर येईल, त्यामधून चांगले लाभ मिळतील. आरोग्याची काळजी घ्या, खासकरून मायग्रेनसारख्या समस्या डोके वर काढू शकतात. संततीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. महिलांसाठी चांगला काळ आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर मिळतेजुळते घ्या.
वृषभ – समृद्धी मिळवण्यासाठी हा आठवडा अतिशय शुभ राहणार आहे. शनीची सुधारलेली परिस्थिती, राजयोगातील शुक्र-मंगळ आणि दशम स्थानात स्थिरावलेला गुरू, यामुळे चांगले अनुभव येतील. नवीन व्यवसायाची संधी चालून येईल, नोकरीच्या ठिकाणी नवीन जबादारी मिळेल. रवी-केतूचा ग्रहणयोग मात्र व्यावसायिक आणि अर्धांगिनीच्या बाबतीत त्रास देणारा राहील, त्यामुळे थोडे जपून राहा. सरकारी कार्यालयात काम अडकून पडले असेल तर त्याबाबत १५ डिसेंबरनंतर निर्णय घ्या. सरकारी टेंडर आदी कामास विलंब होईल. षष्ठातल्या तुळेची मंगळावर आणि शनीची दशम स्थानावर दृष्टी असल्यामुळे आरोग्याच्या कुरबुरी वाढतील. पण गुरूकृपेमुळे त्यामधून सहीसलामत बाहेर पडाल. विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात एखाद्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
मिथुन – काही ना काही कारणामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड दयावे लागणार आहे, त्यामुळे कामाचा हिरमोड होईल. बुध अस्त षष्ठात आणि केतू रवीबरोबर त्यामुळे कोणत्याही कामात उत्साह जाणवणार नाही, थोडे निराश राहाल. मात्र, अन्य ग्रहांची स्थिती शुभ असल्यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक घोडदौड जोरात सुरू राहील. गुरूचे भाग्यातील राश्यांतर धार्मिक कार्यात चांगली गोडी निर्माण करेल. शुक्र-मंगळाच्या लाभयोगामुळे प्रेमप्रकरणात रंग भरतील. परदेशात व्यवसायिक काम सुरू असल्यास त्यातून सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. अन्नदानासारख्या उपक्रमात सहभागी व्हाल.
कर्क – आगामी आठवड्यात चांगले लाभ मिळणार आहेत. राशिस्वामी चंद्राच्या गुरूबरोबरच्या समसप्तक योगामुळे येणारा काळ फलदायी ठरणार आहे. रवी-बुध-केतू यांची युती आणि लाभातील राहूचे भ्रमण यामुळे शुभ घटनांचा अनुभव येईल. शेअर, लॉटरीमधून अनपेक्षित लाभ मिळतील. चतुर्थातील मंगळ आणि सप्तमातल्या शनीच्या केंद्रयोगामुळे कुटुंबाबरोबर वादाचे प्रसंग घडतील. क्षुल्लक गोष्टीचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत जुन्या गोष्टींना फोडणी देऊ नका. शेअर बाजारात जोखीम घ्या, काही प्रमाणात लाभ पदरात पडतील.
सिंह – डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे तत्त्व पाळून या काळात वागावे लागणार आहे. रवीचे सुखस्थानातले भ्रमण आणि त्यासोबत ठाण मांडून बसलेला केतू यामुळे कौटुंबिक वाद वाढण्याची भीती आहे. खास करून महिलांनी पतीबरोबर एखाद्या विषयाचा कीस काढत बसू नये. एका कानाने ऐका आणि दुसर्या कानाने सोडून द्या. विषय पुढे वाढवू नका. महिलांना ओटीपोटाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे धावपळ करू नका. विद्यार्थीवर्गास शिक्षणक्षेत्रात चांगले यश मिळेल. क्रीडाक्षेत्रात घवघवीत यश मिळेल. संगीतक्षेत्रात करियरच्या संधी चालून येतील. व्यावसायिक क्षेत्रातील मीटिंग यशस्वीरित्या पार पडतील.
कन्या – कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागणार आहे. पत्रकार, लेखकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. वेगळ्या विषयावर लिखाण होईल, त्याची चर्चा होईल. एखाद्या चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये फलदायी काळ राहणार आहे, मनासारखे लाभ मिळतील. त्यामुळे मन आनंदी राहील. आवडीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यामुळे मानसन्मानाचे योग जुळून येतील. या ना त्या कारणामुळे आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये पैसे खर्च होतील, पण त्यामुळे चिडचिड होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी आळस झटकून काम करावे, म्हणजे चांगले यश मिळेल.
तूळ – मनात काही रोमँटिक विचार सुरू असतील तर तूर्तास ते बाजूला ठेवा आणि कामाकडे लक्ष द्या. आगामी काळात त्याचा चांगला फायदा मिळेल आणि मनासारखी अर्थप्राप्ती होईल. त्यामुळे चेहर्यावर ख़ुशी दिसेल. कार्यक्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार आहात. पंचमातील गुरूचे राश्यांतर तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरेल. शनीचे सुखस्थानातील भ्रमण शुभ असले तरी शनी-मंगळ केंद्रयोगामुळे कामात थोडेफार अडथळे येतील. मात्र, त्यामधून तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढाल. भविष्यात चांगले यश मिळणार असले तरी थोडे सबुरीने घ्या.
वृश्चिक – आनंददायी घटना आणि गृहसौख्य यांचा लाभ या आठवड्यात मिळणार आहे. खर्च आटोक्यात येणार आहे. आर्थिक उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करत असाल तर त्याला हमखास यश येणार आहे. सुखस्थानातील गुरूचे भ्रमण तुमच्यासाठी खूपच फायद्याचे राहणार आहे. रवी-राहू युतीमुळे स्वभाव काही प्रमाणात चिडचिडा झालेला दिसेल, त्यामधून काही उलटसुलट घडणार नाही याची खबरदारी घ्या.
धनू – राशिस्वामी गुरूचे मकर राशीतील भ्रमण संपुष्टात आले असून कुंभेतील राश्यांतर शुभसंकेत देणारे ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आता चुटकीसरशी मार्गी लागतील. हातून एखादे धार्मिक काम पार पडेल. देवदर्शनाच्या निमित्ताने प्रवास घडतील. शिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी हा कालावधी फायद्याचा राहणार आहे. कोणतेही निर्णय घेताना घाईगडबड करू नका. रवी-केतू ग्रहयोगामुळे कामाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे थोडा संयम पाळा.
मकर – शुभ कालखंडाची सुरुवात आता झालेली आहे. शनीची स्थिती, गुरूचे कुंभेतील राश्यांतर लाभातील रवी-बुध-केतू यांचे भ्रमण यामुळे आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. नोकरी-व्यवसायात भरपूर आणि मनासारखे लाभ मिळतील. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येत आहेत. नवीन वाहन खरेदी कराल, नव्या घराचा प्रश्न मार्गी लागू शकतो. आठवड्याअखेरीस अनपेक्षित लाभ मिळतील. एखादे नवीन काम मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. पैसे मिळाले म्हणून कसेही वापरू नका. पैसे उधार देण्याचं टाळा.
कुंभ – कोणत्याही कामात जोखीम घेऊन काम करा, हमखास यश मिळेल. काही कारणामुळे विस्कळीत झालेली गाडी आता पुन्हा रुळावर येईल. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारात वाढ झालेली दिसेल. राजकीय व्यक्तींना या ना त्या कारणामुळे प्रतिष्ठा मिळेल. सहलीचे बेत आखाल. नवीन गुंतवणूक करताना मात्र विचार करून निर्णय घ्या, अन्यथा उगाचच फसल्यासारखे होईल. आरोग्याची काळजी घ्या, छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. घरासाठी वेळ द्याल, त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील.
मीन – राशिस्वामी गुरूचे राश्यांतर व्यय भावातून होणार आहे. त्यामुळे गंगास्नान, धार्मिक कार्य यासाठी शुभकाळ राहणार आहे. कुटुंबासाठी वेळ द्याल. कामाच्या निमित्ताने परदेशवारी होण्याचा योग आहे. व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल. भाऊबंदकीत वादविवादाचे प्रसंग टाळावेत. लाभातल्या शनीमुळे अपेक्षापूर्ती होऊ शकेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. पैसे जरा जपून वापरा. महागडी वस्तू घेण्याचा मोह टाळा.