कोविडची समस्या भयावह आकार घेत असतानाच संजय कृष्णाजी पाटील यांनी चित्रनगरीची सूत्रं हातात घेऊन फारसं कुणाला शक्य झालं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. सूसुत्र व्यवस्थापन आणि सरकारी नियमांचं काटेकोर पालन हेच याला कारणीभूत ठरलं होतं. या काळात तेथे मराठी मालिका आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी योग्य असे बांधकाम सुरळीत सुरू होतं. कोल्हापूर ही कलानगरी आहे. हे शहर अनेक लेखक, कलावंत, तंत्रज्ञ यांची खाणच आहे. या सर्व लोकांनाही या चित्रनगरीमुळे रोजगार प्राप्त झाला असून त्यांनाही आपापली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळालेली आहे.
—-
गेल्या काही महिन्यांत कोरोनाने महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात हाहाकार माजवला होता. त्यावेळी एकही ठिकाण असे नव्हते, जेथे लोकांना कोरोना झाला नाही आणि तिथली कामे बिनबोभाट सुरू होती… पण नेमक्या याच कठीण काळात कोल्हापूर चित्रनगरीत मात्र वेगळंच चित्र होतं. तेथे मराठी मालिका आणि दाक्षिणात्य चित्रपटांचं चित्रीकरण सुरळीत सुरू होतं… हे कसं शक्य झालं…? अर्थातच सूसुत्र व्यवस्थापन आणि सरकारी नियमांचं काटेकोर पालन हेच याला कारणीभूत ठरलं होतं. कोविडची समस्या भयावह आकार घेत असतानाच संजय कृष्णाजी पाटील यांनी चित्रनगरीची सूत्रं हातात घेतली आणि फारसं कुणाला शक्य झालं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. या काळात तेथे मराठी मालिका आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी योग्य असे बांधकाम सुरळीत सुरू होतं.
याबाबत माहिती मिळवली, अभ्यास केला तेव्हा व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि त्यांच्या कामाचा धडाका लक्षात आला. याबाबत बोलताना ते म्हणाले, हो, हे खरंय… कोविडच्या समस्येत मालिकांच्या चित्रीकरणासाठी हव्या असलेल्या बांधकामावर बर्याच मर्यादा आल्या होत्या. मात्र कोल्हापूर चित्रनगरीवर ही वेळ आली नाही. कारण ही फिल्मसिटी अत्यंत बंदिस्त अवस्थेत आहे. तिला एक संरक्षण भिंत आहे. येथे प्रवेश करायचा तर एकच प्रवेशद्वार आहे. कलाकारांची राहण्या-जेवण्याची व्यवस्थाही आम्ही आतच केली होती. त्यामुळे कोविडच्या काळातसुद्धा आम्ही येथे बांधकामाचे काम अत्यंत यशस्वीपणे पार पाडू शकलो, असं त्यांनी स्पष्ट केलं. ही खरोखरच एक कमालच म्हटली पाहिजे.
सध्या याच चित्रनगरीत अनेक दाक्षिणात्य चित्रपटांची शूटिंग्स सुरू आहेत. त्यातच विशेष म्हणजे दक्षिणेतील सर्वात मोठी मनोरंजन वाहिनी अशी ख्याती असलेल्या सन टीव्ही या वाहिनीने मराठी विश्वात पदार्पण करताना सुरू केलेल्या पहिल्याच ‘गजानन महाराज’ या भव्य मालिकेचे चित्रीकरणही अलीकडेच म्हणजे १६ सप्टेंबरपासून कोल्हापूर चित्रनगरीत सुरू झाले आहे. त्याआधी अवघ्या १३-१४ दिवसांपूर्वी त्यांनी या मालिकेसाठी येथे सेट लावायला सुरुवात केली होती. यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा, सन टीव्हीच्या लोकांशी संपर्क साधणं, निरनिराळ्या निर्मिती संस्थांना येथे चित्रीकरणासाठी आवाहन करणं, सातत्याने प्रयत्न करणं हे सगळं चालू होतं, असंही पाटील यांनी बोलता बोलता सांगितलं. याबाबत उत्साहाने बोलत ते म्हणाले, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी महामालिकाही आमच्याकडे सुरू झाली होती. दुर्दैवाने ती काही अन्य कारणांमुळे अर्ध्यावर बंद पडली. या उद्योगात अशा गोष्टी चालूच राहतात. पण त्याचवेळी स्टार प्लस या आशिया खंडातल्या सर्वात बलाढ्य असलेल्या वाहिनीवरील ‘मेहंदी रचनेवाली’ या मालिकेचे आमच्या नव्या स्टुडिओमध्ये म्हणजे पाटील वाड्यात दिवसरात्र शूटिंग सुरू आहे. त्याचे शेकडो एपिसोड झालेले आहेत आणि आणखीही हजारो एपिसोड होतील असं म्हटलं जातंय. त्यामुळे आधी एक बलाढ्य हिंदी वाहिनी आणि आता दाक्षिणात्य भाषेमधली सन टीव्हीसारखी मराठीत पदार्पण करणारी मोठी वाहिनी आमच्याकडे आली आहे, असं ते अभिमानाने सांगतात. यामुळे काय झालंय की, लोकांमध्ये कोल्हापूर चित्रनगरीविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्यात एक चांगला संदेश गेला आहे की कोल्हापूर चित्रनगरीत कितीही मोठ्या प्रकारचं चित्रीकरण करता येऊ शकतं आणि ते सुरळीत पार पडू शकतं.
कोल्हापूर ही मुळातच कलाकारांची नगरी आहे. ती कलानगरी आहे. हे शहर अनेक लेखक, कलावंत, तंत्रज्ञ यांची खाणच आहे. याला फार मोठा इतिहास आहे. त्याला मोठी पार्श्वभूमी आहे. या सर्व लोकांनाही कोल्हापूर चित्रनगरीमुळे रोजगार प्राप्त झाला असून त्यांनाही आपापली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळालेली आहे. केवळ कलाकार, तंत्रज्ञच नव्हे तर कॅटरींगवाले असो, राहण्याची व्यवस्था करणारे लॉज असतील, कपडे इस्त्री करणारा असेल, नेपथ्य करणारे लोक असतील, सेटींगवाले, कारपेन्टर्स, रिक्षाने डबे पोहोचविणारा माणूस असेल अशा असंख्य लोकांना या चित्रनगरीमुळे रोजगार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा रोजगाराची निर्मिती झाली आहे. येथील कलावंतांना, तंत्रज्ञांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील किंवा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरव विजय सर या स्ार्वांचा या चित्रनगरीबाबत सकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यांचं कायम प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं असं पाटील सांगतात. वेगवेगळ्या निर्मिती संस्थांना तुम्ही आमंत्रित करा, वेगवेगळ्या वाहिन्यांना आमंत्रित करा, काय लागेल ती व्यवस्था आम्ही पुरवू, अशा त्यांच्या प्रोत्साहनामुळे आमचे काम सोपे होते असा विश्वास ते व्यक्त करतात. यामुळेच प्रत्येक मालिकेच्या निर्मात्यांना हवा असलेला एक मोठा वाडा बांधायची चित्रनगरीची योजना आहे. एक मंदिर बांधायचे आहे. एक मोठी चाळ बांधायची आहे… एक रेल्वेस्थानकही बांधायचे आहे. याशिवाय २० खोल्या असतील असं एक वसतिगृह चित्रनगरीतच बांधायचे आहे. येथेच लोकांची राहण्याची व्यवस्था झाली की लोकांची कार्यक्षमता वाढेल, त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल, यामुळे ते आपला हा वेळ अधिकाधिक कामावर केंद्रीत करू शकतील, असं ते सांगतात.
एकूणच मालिकांच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना संजय पाटील म्हणतात, काही काळापूर्वी सोबो फिल्म्स म्हणजे कृतीताई शिंदे यांची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका खूपच गाजली होती. हजारोंच्या वर त्याचे एपिसोड झाले होते. त्यांच्याच ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मेगा मालिकेपासून कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणाची ही वहिवाट सुरू झाली. नंतर ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका आली आणि त्यानंतर ‘मेहंदी रचनेवाली’ ही हिंदी मालिका आमच्याकडे आली. मग सन टीव्ही ही दाक्षिणात्य प्रसिद्ध वाहिनीही आली. त्यांनी मराठीत पदार्पण करताना येथेच चित्रीकरण सुरू केले. यापेक्षाही अजून हिंदी व मराठीतील अनेक निर्माते येथे शूटिंग करायला उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चित्रनगरीच्या आणखी प्रगतीसाठी मोठमोठ्या योजनाही आखण्यात आल्या आहेत. या आगामी योजनांबाबत बोलताना संजय पाटील म्हणाले, वेगवेगळ्या मालिकांचे चित्रीकरण राज्यात कुठे कुठे सुरू आहे. त्यातल्या अधिकांश मालिका आपल्याकडे याव्यात यावर आमचा मोठा कटाक्ष आहे. केवळ मालिकाच नाही, तर गेल्या दोन वर्षांत जवळजवळ २७ चित्रपटांची चित्रीकरणे येथे पार पडली आहेत. म्हणजे कधी चार दिवसांचं तर कधी आठ दिवसांचं, कधी दहा दिवसांचं चित्रीकरण येथे झालंय. कधी दोन दिवसांत एखाद्या गाण्याचं शूटिंगही येथे पार पडलं आहे. म्हणजे मराठी चित्रपटांनासुद्धा आता कोल्हापूर चित्रनगरीचं आकर्षण आहे हे लोकांनी पाहिलंच आहे. येथे अधिकाधिक चांगली चित्रीकरण स्थळं, अधिकाधिक चांगल्या सुविधा देऊन आणि भविष्यात येथेच आणखी दोन मोठे स्टुडिओ आम्ही बांधणार आहोत. कारण भविष्यात तंत्रज्ञानही बदलणार आहे. यासाठी लोकांना कुठेही बाहेरच्या देशांत किंवा नयनरम्य ठिकाणी जाण्याची आता गरज उरलेली नाही. हे सगळं आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथेच होऊ शकणार आहे. त्याला सहाय्यभूत होईल असे दोन मोठे स्टुडिओ बांधण्याच्या तयारीत आम्ही आहोत. याचा परिणाम असा होईल की बिग बजेट हिंदी चित्रपटही आपल्याकडेच तळ ठोकून राहतील. भारतातली एक अग्रगण्य बॉलीवूड संस्था लवकरच चित्रीकरणासाठी येथे येणार आहे. त्यासाठी आम्ही बोलणी करत असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यांची एक दैनंदिन मालिका, वेबसीरिज आणि त्यांचा एक फार मोठा चित्रपट आमच्या चित्रनगरीत येणार आहे. पण त्यांनी त्याबाबतचा करार अजून केलेला नाही. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. यामुळे कोल्हापूरची शान वाढेल, कलानगरीचा मान वाढेल याची आम्हाला खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले.
– नितीन फणसे
एकाच स्टुडिओत ३२ लोकेशन्स
कोरोना काळातही कोल्हापूर चित्रनगरीने आपले रुप आता बदलले आहे. आधीच्या दोन इमारतींचा कायापालट करण्यात आला असून चित्रनगरीतील परिसरही आता बदलला आहे. चित्रीकरणासाठी आता मोठे हॉल आणि बाहेर पाटलाचा वाडा, बंगला, पोलीस ठाणे, न्यायालय, फार्म हाऊस, दवाखाना, महाविद्यालय अशी तब्बल ३२ लोकेशन्स येथे आहेत. याशिवाय मालिका आणि चित्रपटांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा येथे उपलब्ध असल्यामुळे निर्मात्यांना कुठलीच अडचण होणार नाही, असा ठाम विश्वास संजय पाटील यांनी यावेळी ‘मार्मिक’शी बोलताना व्यक्त केला.