ही घटना अहम् आणि त्वम् यांच्या काळात घडली, असं म्हटलं जातं. त्याच्याआधीही घडली असेल पण ते कळायला मार्ग नाही. गुहातील चित्रात काही माणसांच्या डोक्यामागं प्रभावळ दाखवतात. कदाचित त्या लोकांना देवाचा साक्षात्कार झाल्याचं त्यांना सांगायचं असेल पण वर संकेत करायला सुरुवात केली आणि त्यामुळे देवाच्या जन्माची गोष्ट आपल्याला कळली. वनस्पतींचा रस दगडानं घासून गुळगुळीत केलेल्या कातड्यावर लिहायला उपयोगी पडतं हे अहम्न सुरू केलं तिथून या गोष्टींचा आरंभ होतो.
अहम् आणि त्वमच्या टोळीत एक `फ्फृ’ पण होता. याचं डोकं औरच चालायचं. तो कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर ओठ मिटून एकदम हवा तोंडातून बाहेर सोडायचा. त्याचा `फ्फृ’ असा आवाज व्हायचा म्हणून त्याला हे नाव पडलं होतं. अहम्नं ओल्या जमिनीवर काठीनं त्याचे संकेत कोरावेत ही सूचना ह्या `फ्फृ’चीच होती. त्याआधी तो म्हणजे अहम् सपाट फरशीवर धूळ पसरून प्रत्येक नव्यानं उच्चारासाठी काही खुणा करायचा. ती धूळ जपून ठेवणं हे सोपं काम नव्हतं. कितीही काळजी घेतली तरी ती धूळपाटी फार दिवस टिकत नसे. अहम् आणि त्वम् हे एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करीत. ती अडचण का येते हे शोधून तिच्या मुळाशी जात. आणि त्यावर तोडगा शोधून काढीत असत. त्यात वेळ जात असे पण निघालेला तोडगा खात्रीशीर असे. फुरफूरचं तसं नव्हतं. `फ्फृ’चं नाव टोळीतल्या छोट्यांनी `फुरफूर’ असं केलं होतं. आता तेच त्याला कायमचं चिकटलं होतं.
फुरफूर विचार करतोय असं वरकरणी वाटत नसे. तो काय अडचण आहे तेही विचारत नसे काय चाललंय हे बघितल्यासारखं करायचा आणि त्याला नेमून दिलेलं काम करायला लागायचा. अचानक त्याच्या डोळ्यासमोर त्या परिस्थितीचं दृश्य आणि त्यावर उतारा उभा राहात असे. यावेळी तसंच झालं. त्यानं एका चपट्या दगडावर चिखलाचा थर दिला तो मग त्यानं अहम्च्या पुढं ती चिखलपाटी धरली. मग त्याचे ते संकेत त्या चिखलात कोरायला सांगितले. अहम्नं त्वम्च्या मदतीनं तशा आणखी पाट्या करून घेतल्या. त्यांनी पहिल्या पाटीवर संकेत कोरले. मग ते दुसर्या पाटीकडं वळले. आता अक्षरं पुसली जाणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. हे इतकं सोपं उत्तर आपल्याला कसं सुचलं नाही याचं त्यांना आश्चर्य वाटत होतंच पण फुरफूरनं कसलाही विचार, कुठलीrही धडपड न करता हे उत्तर सहज शोधलं. याचं त्यांना जास्त आश्चर्य वाटत होतं. यावेळी तर फुरफूरने कमालच केली. त्यानं चिखलात संकेत कोरलेली एक परी पाटी तशीच वाळू दिली तर दुसरी पाटी एकाबाजूला ठेवून त्यावर आणि खाली वाळलेलं गवत, पान, काटक्या पसरल्या. मग त्या पेटवून दिल्या. हा असं का करतोय, हे त्याला विचारून फारसा उपयोग नव्हता. त्यानं ओळ हलवून त्याचा आवडता `फ्फृऽऽ’ असा आवाज काढण्याचीच शक्यता जास्त होती. थोड्याच वेळात त्याचा वागण्यामागचं कारण उलगडलं. फुरफूर असं का वागला याचं कोडं लवकरच सर्वांना उलगडलं. चिखल वाळल्यावर नुसत्या चिखलाच्या पाटीवर भेगा पडल्या. संकेत ओळखणं अवघड होऊन बसलं. तर जाळ पेटवलेल्या पाटीचं खापर बनलं होतं. त्याच्यावरचे संकेत स्पष्ट टिकून होते. हे त्याला कसं जमलं? या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नसतं. साधारणपणे असं म्हणता येईल की त्यानं पेटलेल्या वणव्यात भाजली गेलेली माती बघितली असू शकेल, किंवा टोळीतले लोक रात्री शेकोटी पेटवून बसत, त्या विझलेल्या शेकोटीखालची माती कशी घट्ट, चकचकीत होते, ते त्याच्या लक्षात आलं असेल. ते त्याच्या स्मरणात कुठेतरी साठून राहिलं असेल. आपण कसं सांगणार?
त्याला विचारलं, तर फुरफूर म्हणे, `मला कुणीतरी दाखवतं. हे सांगताना शब्दांची अडचण भासू लागली की तो हातवार्यांची मदत घ्यायचा. त्यामुळे इतरांना वाटायचं की वरून त्याला कुणीतरी हे सांगतं. मग हे सांगणारं कोण? याची चर्चा केली जात असे. एखादी व्यक्ती अचानक वेगळी वागायची, खूप दंगा करू लागायची अशावेळी ती स्त्री असो किंवा पुरुष त्या व्यक्तीला आवरायला चार चार माणसं कमी पडत असत. ती व्यक्ती जेव्हा भानावर येत असे. त्यावेळी मधल्या काळात काय घडलं, हे त्या व्यक्तीला अजिबात आठवत नसे. असं का घडत असेल याचा अहम् आणि त्वम् मागोवा घ्यायचा प्रयत्न करीत होते. अशा तर्हेनं वागणार्या प्रत्येक व्यक्तीला ती व्यक्ती नेहमीसारखी वागू लागली की भेटत तिला अनेक प्रश्न विचारीत. काही वैतागून यांना `आता पुरे!’ असं म्हणत आणि नंतर काही दिवस यांना टाळत असत. त्या मर्यादित वस्तीत हे जमणं तसं अवघडच होतं; पण त्या व्यक्ती शक्यतो यांच्यापासून दूरच राहात.
या सर्व प्रश्नोत्तरांमधून या दोघांना जी काही माहिती मिळाली. त्यानुसार या सर्वजणांच्या वागण्याचा आणि त्यांच्या डोक्याचा काहीतरी संबंध आहे हे अहम् आणि त्वम्ला कळलं. काही जणांना हे घडण्यापूर्वी कधीतरी कधी ना कधी डोक्याला मार लागला होता हे त्यांच्या हळूहळू लक्षात येत होतं. कुणी फळं तोडायला झाडावर चढायचा आणि फांदी मोडून पडायचा. कुणा वणव्यातून सुटण्यासाठी पळतांना डोक्याला फांदीचा मार खायचा. नदी-नाल्यात मासे, खेकडे पकडणारा शेवाळावरून घसरून डोक्यावर पडायचा. क्वचित एखादा तालासुरात बोलू लागे. ते सोडलं तर त्या व्यक्तीलाही आकाशात नजर लावून भान विसरायची सवय लागे. एरवी तोसुद्धा वरच्या लोकांप्रमाणे वागत असे. थोडक्यात काय अशा वेगळ्या वागण्याचा आणि डोक्याचा संबंध होता. एक दिवस आक्रीत घडलं.
एक मुलगी एकदम अंगाला झटके देत जमिनीवर कोसळली आणि हातपाय झाडू लागली. मग बेशुध्द पडली. तिचे हातपाय ताठ झाले. तोंडातून फेस येऊ लागला. अहम्नं त्वम्ला खूण केली. त्वम् झटकन् झोपडीत शिरला. उग्रवासाचा एक कंद घेऊन तो त्या मुलीजवळ आला. बुक्कीनं तो कंद फोडून त्वम्नं तो त्या मुलीच्या नाकाशी धरला. काही मुलं अहम्च्या सांगण्यानुसार फळांच्या खंट्यामधून पाणी घेऊन आली. त्यांनी त्या मुलीच्या तोंडावर ते पाणी मारलं. त्या मुलीनं डोळे उघडले. ती घटाघट दोनतीन करवंट्या भरून पाणी प्यायली. काही काळानंतर जेव्हा त्यांना दुसरीकडची शिकार घेऊन त्या बदल्यात धान्य घ्यायला आलेली माणसं भेटली, तेव्हा झालेल्या गप्पात अहम् आणि त्वम्ने मिळून त्यांच्याकडे असं काही घडतं का याची विचारपूस केली. तेव्हा असं कळलं की हे बर्याच वस्त्यात आणि भटक्यामध्येही घडतं. असं घडण्याचा आणि डोक्याचा काहीतरी संबंध आहे. त्याचप्रमाणे त्या मुलीनं यांना एकदम झगमगीत उजेड पडतो असं सांगितलं होतं. तसाच उजेड हातपाय झाडत पडण्याआधी इतरही काही जणांना आलेला होता. बोलतानाचे हातवारे पाहता तो उजेड वरून कुठून तरी आला असा आडाखा बांधला गेला. त्यात वावगं असं काहीच नव्हतं.
अहम् आणि त्वम् हे तर संधी मिळेल तेव्हा फुरफूर असे झटका येऊन पडलेले लोक देवाणघेवाण करताना भेटलेले इतर वस्त्यांमधले तसंच भटकं जीवन जगणारे लोक यांना प्रश्न विचारून माहिती काढायचा प्रयत्न करीत होते. असाच उजेड वरून पडत असताना बघत होते. फक्त परिस्थिती आणि परिणाम यात थोडा फरक होता. आकाशात काळे ढग जमत. जोराचा गडगडाट होई. एकदम मोठा प्रकाशाचा लोळ दिसत असे, तो खाली येत असे. झाडावर उतरला तर झाड जळून जायचं. त्याखाली माणसं असली तर बहुतेक वेळ तीही खाक होत; पण काही वाचतही असत. तेही त्यांचे अनुभव सांगायचे. वरून खूप उजेड आला मग काही आठवत नाही. काहींच्या अंगावर भाजल्याच्या खुणा दिसत. काहींच्या डोक्याचे केस पांढरे होत किंवा डोकं गुळगुळीत होई अशा काही लोकांच्या तळपायावर भाजल्याच्या खुणा दिसत. एक मात्र नक्की, उजेड दिसलेल्या सर्वच माणसांचा स्वभाव खूप बदलत असे. काही अपवादात्मक व्यक्ती खूप आक्रमक बनत. एरवी बहुतेक अगदी शांत बनत. दुसर्यांच्या अडचणी समजून घेत. लोकांना मदत करण्यात पुढाकार घेत.
अहम् आणि त्वम् यांनी ही माहिती गोळा केली. त्यावर चर्चा केली. त्यातून त्यांनी एक म्हणजे कुठली तरी अज्ञात शक्ती हे सर्व घडवून आणते कदाचित त्या दोन शक्तीही असू शकतील असा आडाखा त्यांनी बांधला. त्यातली एक शक्ती माणसाला चांगलं बनवते आणि दुसरी वाईट असंही त्यांनी ठरवलं. या शक्ती अशा अचानक का प्रकट होतात, त्यांना काय हवं असतं. चांगली शक्ती आपल्या बाजूनं वळवता येईल का? दुष्टशक्तीला कसं दूर ठेवता येईल असे अनेक विचार त्यांना सतावू लागले.
दरम्यान आणखी एक विचित्र घटना घडली. एक दिवस फुरफूर जागा झाला. त्याला प्रचंड घाम आला होता. खूप लघवी झाली. अंग गार पडलं होतं. त्यानं अहम् आणि त्वम्कडे धाव घेतली. `माझ्या अंगावर चक्रीवादळ फिरलं गेलं’, थरथर कापत त्यानं त्या दोघांना सांगितलं. त्यांनी फुरफूरला शांत केलं. पाणी प्यायला दिलं. मग तो काय म्हणतोय ते ऐकून घेतलं. हे नक्की काय असावं याचा ते विचार करू लागले. तेवढ्यात वस्तीत ओरडा सुरू झाला. वस्तीतील एका ज्येष्ठ नागरिकानं अखेरचा श्वास घेतला होता. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? या विषयी हे तिघं विचार करू लागले फुरफुरची तशी खात्रीच होती. यांनाही तसंच वाटत होतं पण ते यावर फुरफूर इतके ठाम.
एक दिवस फुरफूर डोंगरातून आला. तो एकटाच असा कुठेतरी गायब होत असे. त्या दिवशी तो खूपच उत्तेजित झालेला दिसत होता. तो इतका भरभर चालत होता की वाटेतले अडथळेसुद्धा त्याला कळत नव्हते. बरेचदा तो ठेचकाळला, पण स्वत:ला सावरत वस्तीच्या दिशेने झपाट्यानं पुढे झाला. कुणीतरी ते बघितलं वस्तीत. ती बातमी पसरायला वेळ लागला नव्हता. अहम् आणि त्वम् ती वार्ता कळताच धावले अशा तर्हेनं या आधी फुरफूर कधीच आला नव्हता. नेहमी तो शांतपणे येई. डोंगरातून वाहणार्या झर्यात, नाल्यात सोन्याचे कण मिळतात, रंगीत दगड मिळतात किंवा एखाद्या अनोख्या झाडाची फळं खायला चांगली लागतात अशी काहीबाही बातमी सांगे. फळं मुलांना खायला देई, सोन्याचे कण, रंगीत दगड, वस्तीप्रमुखाच्या हवाली करीत होता, पण आज काहीतरी वेगळं घडलेलं असावं. या पद्धतीनं तो कधीच आला नव्हता.
आल्या आल्या त्याला अहम् आणि त्वम् यांनी ताब्यात घेतलं. तो नुसताच बोलावलं, उजेड, असं काहीबाही बोलत होता. त्या दोघांनी त्याला शांत केलं. आंबवलेल्या फळांचा गाळलेला रस त्यांनी फुरफूरला पाजला. फुरफूर थोडा शांत झाल्यावर बोलू लागला. `सकाळपासून मला डोंगर बोलवत होता, मी गेलो, नेहमीच्या गुहेत बसलो खूप उजेड झाला. देहभान हरपलं. आवाज आला. `भांडू नका, एकमेकांशी प्रेमानं वागा. दुसर्याला गरज असेल तर आपल्यातला अर्धा घास त्याला द्या. माझ्याशी एकरुप व्हा. मी तुमचाच आहे’, असं म्हणाला. मी भानावर आलो तिथं कुणीच नव्हतं; पण ते शब्द माझ्या डोक्यात घुमत होते. बाहेर आलो. पळत सुटलो. अरे पण तू जाऊन फार वेळ झालेला नाही ही सावली तीन बोटं तर सरकलीय, `त्वम् म्हणाला. ते मला ठाऊक नाही. आपण सगळे त्याची मुलं आहोत त्यानं सांगितलंय ते सर्वांना कळवायला हवं!’
हळूहळू फुरफूर हे सांगण्यासाठी वस्त्यावस्त्यात हिंडू लागला. `मला देव म्हणाला’, अशी सुरुवात करून सर्वांना देवाचं म्हणणं समजावून देऊ लागला. त्या अद्भुत शक्तीचं वर्णन तो `सृष्टीची नियंत्रक’ असं करू लागला. माणसानं देव निर्माण केला होता. माणसाला अतर्क्य गोष्टींना आधार मिळाला होता.