मात्र हे नव्याण्णव कंदील बनविण्यासाठी लाकडाच्या वखारीतून पंधरा-वीस बांबू आणणे, ते चाळीच्या सिमेंटच्या टाकीतील पाण्यात नरम होण्यासाठी एक दिवस भिजत ठेवणे, नंतर ते कोयत्याने ठरलेल्या आकाराप्रमाणे उभे कापून त्याच्या बारीक काठ्या सुरीने तासणे, त्या काड्यांचे कंदीलाच्या आकाराचे एकसारखे सांगाडे तयार करणे, प्रत्येक कंदीलाला ठरलेल्या रंगाचे रंगीत कागद आणि तळाला नक्षीदार झिरमिळ्या लावणे, कंदीलाच्या कोनांना चंदेरी किंवा सोनेरी पट्ट्या चिकटवणे हे काम गच्चीवर चाळीतील लहान-मोठी-तरुण-वृद्ध मंडळी रात्री जागरण करून हौसेने करत.
—-
दसरा संपला की चाळीला दिवाळीचे वेध लागत. पोराटोरांना शाळेची एकवीस दिवसांची सुट्टी असे. दिवाळीच्या अभ्यासाला गोळी मारून हुंदडण्यात आणि मौजमजा करण्यातच मुलांचा वेळ जाई. ज्या वर्षीपासून चाळीत सर्वांचे कंदील एकाच तर्हेचे असावे आणि ती जबाबदारी चाळकमिटीने घ्यावी, असे सर्वसाधारण सभेत एकमताने ठरले तेव्हापासून आजतागायत ती प्रथा सुरळीत सुरू आहे. प्रत्येकाने कंदील आपल्या खोलीच्या खिडकीबाहेर लावायचा असेही एकमताने नक्की झाले. सगळे कंदील एकाच साइजचे, एकाच रंगाचे आणि रात्री ते एकाच वेळी प्रकाशमान झाल्यावरचे दृश्य तर चाळीकडे बाहेरून पाहणार्याला विलोभनीय वाटायचे.
तेव्हा आतासारखे झटपट कंदील बनवण्याचे प्रकार नव्हते. पारंपरिक पद्धतीच्या बांबूच्या काठ्यांना आकार देऊन त्याला रंगीत कागद आणि कागदी शेपट्या लावून बनवलेला कंदील चाळीत प्रत्येकाच्या खिडकीबाहेर रात्री प्रज्वलित झाला की ती तिन्ही मजल्यावरची रोषणाई चाळीखालून किंवा समोरच्या चाळींमधून पाहण्यात एक आगळीच मजा वाटायची. मात्र हे नव्याण्णव कंदील बनविण्यासाठी लाकडाच्या वखारीतून पंधरा-वीस बांबू आणणे, ते चाळीच्या सिमेंटच्या टाकीतील पाण्यात नरम होण्यासाठी एक दिवस भिजत ठेवणे, नंतर ते कोयत्याने ठरलेल्या आकाराप्रमाणे उभे कापून त्याच्या बारीक काठ्या सुरीने तासणे, त्या काड्यांचे कंदीलाच्या आकाराचे एकसारखे सांगाडे तयार करणे, प्रत्येक कंदीलाला ठरलेल्या रंगाचे रंगीत कागद आणि तळाला नक्षीदार झिरमिळ्या लावणे, कंदीलाच्या कोनांना चंदेरी किंवा सोनेरी पट्ट्या चिकटवणे हे काम गच्चीवर चाळीतील लहान-मोठी-तरुण-वृद्ध मंडळी रात्री जागरण करून हौसेने करत. मध्यंतराला वडा-पाव-केळी-चहा मागवला जाई. पण गप्पा मारतही मन एकाग्र करून प्रत्येक कंदील आकर्षक कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष असे. सर्व कंदील प्रकाशमान झाले की मुलांचा एकच जल्लोश होई. दिवाळीच्या पहाटे फटाक्यांची पहिली माळ कोण लावतो याची मुलांमध्ये स्पर्धाच असे. एकदा का चारच्या सुमारास फटाक्यांचा दणदणाट सुरू झाला की त्याला सकाळी आठ वाजेपर्यंत अंत नसे. त्याशिवाय मुलांंनी आपल्या दारासमोर लावण्यासाठी घरात वेगळे कंदील केलेले असत. `तुम्ही सगळे एकसारखे कंदील बाहेर लावता, मग आमच्या मुलांना आपल्या अंगातील कला कधी दाखवता येणार, असा प्रश्न मिटींगमध्ये काही चाळकर्यांनी उपस्थित करताच सेक्रेटरींनी ताबडतोब दारात हवे तसे कंदील बनवून लावण्याची परवानगी दिली होती. त्याशिवाय दाराच्या दोन्ही बाजूला वरच्या कडेला वात पेटलेली काचेची ग्लासेही त्यात पाणी मिश्रित तेल भरून प्रज्वलित करण्यात येत. प्रकाशाच्या या झगमटात चाळ उजळून जाई. पहिल्या दिवशी पहाटे प्रत्येक मजल्यावरील सार्वजनिक नळावर झिलग्यांच्या खोलीतील झिलगे आंघोळ केल्यावर नरकासुराचा वध म्हणून कारेटी किंवा चिरोटी डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडून तोंडाने गोयंदा गोयंदाऽऽऽ अशी आरोळी ठोकत. ती मजा पाहण्यासारखी असे. मग घराघरात उटणे लावून नव्या सुगंधी साबणाने स्नान आणि नरकासुराचा वध करून झाल्यावर लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळे, कडबोळी, अनारसे, चिवडा इत्यादी खमंग पदार्थांचे वाटप चाळीत घराघरातून शेजार्या-पाजार्यांकडे केले जाई. त्या देण्याघेण्यात एक प्रकारचा जिव्हाळा, आपुलकी आणि शेजारधर्माचे पालन असे. कुणाकडचा कुठला पदार्थ चांगला झाला आहे, यावर नंतरच्या चार दिवसात चर्चा रंगे.
दिवाळीच्या आधी घराघरात दिवाळीच्या पदार्थांची पूर्वतयारी करताना सारी चाळ त्या भाजणीच्या घमघमाटाने भारुन जाई. आळीपाळीने हे पदार्थ बनविण्यासाठी एकमेकांच्या घरी जेवणकाम आटोपल्यावर महिलांच्या फौजा जात. लाडू वळणे, चकल्या गाळणे, करंज्यांची तयारी करणे यासाठी जणू वेळापत्रकानुसार कुणाचे काम अडणार नाही याची काळजी घेत दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत ही धावपळ सुरू असे. दिवाळीत घरोघरी फराळ वाटप झाले तरी आमच्याकडे फराळाला या असे गोड आमंत्रण असे. मोठ्यांनी ते फारसे मनावर घेतले नाही तरी मुलांची गँग हा चान्स सोडत नसे. यांना कंटाळा कसा येत नाही इतक्या जणांकडे खाऊन, असा प्रश्न मोठ्यांना पडे.
एकदा तर पाटलांच्या बंडूने कमाल केली. त्यांने गच्चीवर बोलावून सर्व मुलांना सल्ला दिला की आपण प्रत्येकाच्या घरी जाताना एकच कापडी पिशवी घेऊन जायची. फराळ खाण्याचे नाटक करायचे आणि बशीतील पदार्थ गुपचूप त्या पिशवीत टाकायचे. सगळ्या खोल्यांना भेट देऊन झाली की ती पिशवी आपल्यातल्या कुणीतरी आपल्या घरात लपवून ठेवायची आणि दिवाळी संपल्यावर पंधरा दिवस गच्चीवर त्या खाद्यपदार्थांचा फडशा पाडायचा. बंड्याच्या या सल्ल्याची अंमलबजावणी त्यावेळेपासून बरीच वर्षे होत होती. नंतर हीच मुले-मुली कॉलेजात जाऊ लागली. आपल्यापुरते आपण ही भावना समाजात वाढीस लागली. तिची थोडीफार लागण चाळीतल्या पूर्वीच्या संस्कृतीलाही झाली. तरी आपले खासगीपण जपताना इतरांच्या सोयी-गैरसोयीची काळजीही आजच्या सणावाराला अगत्याने घेतली जाते. आता नोकरदार बायका रात्री जेवणखाण आटोपून दिवाळीचे पदार्थ बनवतात तेव्हा त्यांच्या मदतीलाही चार घरातल्या बायका जातातच. काहीजणींना ते जमत नाही त्या दुकानातून आयते खाद्यपदार्थ आणून सण साजरा करतात. पण सणाची परंपरा खंडीत करत नाहीत. त्यावेळच्या दिवाळीतील एक आठवण सर्वच चाळकर्यांच्या लक्षात राहण्यासाठी होती. चाळीत पहिल्या मजल्यावर एक भिकाजीमामा नावाचे तापट गृहस्थ एकटेच राहात होते. त्यांचे बिर्हाड गावाला होते. हे मामा बाजूच्या गिरणीत कामाला होते. दोन वेळा खानावळीत जेवायचे. घरी आल्यावर गॅलरीत खेळणार्या मुलांना दम देणे, मोठे डोळे करून त्याच्या अंगावर धावून जाणे आणि हातात छडी घेऊन गॅलरीत फिरणे हा त्यांचा फावल्या वेळेतला उद्योग असे. दिवाळीच्या कंदीलाच्या वर्गणीचे पैसेही त्यांनी बरीच हुज्जत घातल्यानंतर दिले. त्याच वर्षी दिवाळीच्या आदल्या रात्री चाळ कमिटीतर्फे बनवलेले कंदील घरोघरी लावण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्याच दिवशी सकाळी वादळवार्यासह जोरदार पाऊस पडला आणि चाळीतील सर्वांच्या खिडक्यातील कंदील भिजून फाटून फक्त त्यांचे सांगाडे लोंबत राहिले. सकाळी हे भिकाजीमामा जोरदार आवाज करत बाहेर आले आणि बडबडू लागले, तरी मी सांगत होतो, उगीच चाळीच्या एकीची नाटकं करू नका. आता भोगा आपल्या कर्माची फळं. माझे दोन रुपये फुकट गेले असे बोलून ते नाटकातल्या राक्षसासारखे गॅलरीत उभे राहून हसत होते. सगळी मुले, माणसे निराश झाली होती. मामा घरात गेल्यावर चाळकमिटीचे तरूण सेक्रेटरी मनोहर लचके यांनी सर्व मुलांना गच्चीवर बोलावले. म्हणाले, आता पाऊस थांबला आहे. पुन्हा तो येण्याची चिन्हे दिसत नाहीत. सर्वांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन खिडकीवरील कंदीलाचे सांगाडे घेऊन गच्चीवर या. मी कंदीलाचे कागद आणायला दुकानात आपली आपली माणसे पाठवली आहेत. ती आवश्यक ते सर्व सामान आणतील. संध्याकाळच्या आत आपण सर्वांनी पूर्वीसारखे कंदील तयार करून ते सर्वांच्या खिडकीबाहेर लावू. जणू काही घडलेच नाही, असेच सार्यांना वाटले पाहिजे. मुलांच्या अंगात वीरश्री संचारली. मोठी माणसेही मदतीला आली आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या खिडकीबाहेर पूर्वीसारखे कंदील लागलेसुद्धा. शेवटचा कंदील भिकाजीमामांच्या खिडकीबाहेर लावला आणि बल्ब चालू केला तेव्हा ते हादरलेच. आमचा छोटा लीडर बनेंचा गोपी म्हणाला, मामा आता बघा आमची करामत खाली जाऊन. चाळीतले सगळे कंदील कसे झळकताहेत ते! तेवढ्यात मुलांना कोणत्याही सामाजिक कार्यात सर्व तर्हेची मदत करणारे बजाबा मास्तर बॉक्समधून आणलेले पेढे मुलांना वाटत म्हणाले, राहू आम्ही एकजुटी। तर येईल बळकटी। नाहीतर गुंडाळावी लागेल। एक दिवस वळकटी।.
भिकाजी मामा तोंड लपवून आत पळाले ते दोन दिवस कुठेच दिसले नाहीत.
– श्रीकांत आंब्रे
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)