अमृतस्वर अर्थात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर… गेली पाच दशकं उलटूनही त्यांचं प्रत्येक गाणं प्रेमाने ऐकलं जातं, गुणगुणलं जातं. त्यांच्या गाण्यातील गोडव्याचा अस्सल सुवास दरवळवत ठेवण्याचं श्रेय त्या काळातील संगीतकारांनाही जातं. आजवर अनेक संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली संगीतशैली आपल्या आवाजानं खुलवणार्या लताबाईंची गाणी आणि संगीतकारांची महती उलगडून दाखवणारा ‘सारे सुरों का यह है मिलन’ हा अनोखा कार्यक्रम प्रेक्षकांकरिता ऑनलाईन सादर होत आहे.
—-
जगभरातील संगीत रसिकांना आपल्या आवाजाची भुरळ घालणार्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आहेत. १९५०च्या दशकापासून त्यांनी गुलाम मोहमद, अनिल विश्वास, श्याम सुंदर, शंकर जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसैन, रोशन मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, दत्ता कोरगावकर, वसंत देसाई, हंसराज बहल आणि उषा खन्ना अशा बर्याच संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायली. प्रत्येक संगीतकाराची शैली, संगीतकाराचे स्वरविचार, वेगवेगळ्या कवींचे शब्द लताबाईंनी आपल्या गळ्यातून विलक्षण सुमधुर आवाजात अभिव्यक्त केले आहेत.
संगीतकार आणि लता मंगेशकर यांचा सांगितिक प्रवास रसिकांपुढे सादर करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे उद्गाते आहेत माणिक एन्टरटेन्मेंटचे निर्माते अतुल अरुण दाते. या संकल्पनेविषयी ते म्हणाले, गेली अनेक वर्षे दिवसातून एक वेळा तरी लताबाईंचं गाणं ऐकणं होतं. कधीतरी एकापेक्षा जास्त गाणीही ऐकली जातात. गाण्यातून लताबाईंच्या गायकीचे वेगवेगळे पैलू कोणते, कोणकोणत्या प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. यावर विचार सुरू झाला आणि त्यातूनच ज्या विषयावर कोणताही कार्यक्रम अद्याप झाला नाही अशी संकल्पना सुचली त्यानुसार संगीतकार आणि लताबाईंची गाणी या विषयाचा अभ्यास करून कार्यक्रमाचं सादरीकरण करायचं ठरवलं. १९५० ते १९८० हा संगीताचा सुवर्णकाळ होता. त्या काळात लताबाईंना उत्कृष्ट गायक, संगीतकार आणि कवींची साथ लाभली. त्यामुळे ३५ पेक्षा जास्त संगीतकारांनी त्या काळात लताबाईंबरोबर काम केलं आहे. सप्टेंबरमध्ये त्यांना ९२ वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्याचा आमचा मानस आहे. ज्येष्ठ संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचाच दुसरा भाग म्हणून आम्ही लता मंगेशकरांनी गायलेल्या नॉन फिल्मी गाण्यांवर कार्यक्रम सादर करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे ती गाणीही प्रसिद्ध आहेत. यानिमित्ताने क्वचितच ऐकली गेलेली त्यांची गाणी रसिकांना या कार्यक्रमानिमित्त ऐकायला मिळतील. या कार्यक्रमाची सादरकर्ती गायिका पल्लवी पारगावकर असून त्यांनी त्यांच्या वडिलांना हा कार्यक्रम अर्पण केला आहे. त्यांच्या युट्युब चॅनलवरून प्रेक्षकांना तो पाहता येईल.
कार्यक्रमाच्या सादरकर्त्या गायिका आणि निवेदिका पल्लवी पारगावकर म्हणाल्या, सगळ्याच संगीतकारांबरोबर लता मंगेशकरांनी काम केलंय. आम्ही आधी २५ संगीतकारांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम करायचं असं ठरवलं होतं. आता ही संख्या वाढत जाऊन ४५ पेक्षाही जास्त संगीतकारांपर्यंत पोहोचली आहे. दररोज आम्हाला अभ्यासातून नवनवीन संगीतकारांची माहिती मिळते. ते संगीतकार किती गाजलेले आहेत किंवा त्यांची गाणी किती गाजली आहेत हा महत्त्वाचा भाग नाही, तर त्यांची संगीतरचना ऐकायला मिळणं, गायला मिळणं आणि त्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. प्रत्येक संगीतकाराची खास गुणवैशिष्ट्ये आहेत. सलीलदांची हार्मनी खूप वेगळी आहे. शंकर जयकिशन यांचं ऑर्वेâस्ट्रेशन सगळ्यात वेगळं आहे. मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताचेही वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणाचं मेलेडीमध्ये, कोणाचं रिदममध्ये, कोणाचं शास्त्रीय संगीतावर आधारित जे काम आहे ते जाणून घेण्याकरिता या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीत रसिकांना निश्चितच मदत होईल.
पल्लवी पारगावकर म्हणतात, लताबाईंच्या प्रत्येक गाण्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक गाणं १०० वेळा ऐकलं तर १०० नवीन जागा सापडतात. त्यांनी गाताना कधी श्वास घेतला हे कळतही नाही. गाताना श्वासाचा आवाज ऐकू न येऊ देण्याचं हे तंत्र आत्मसात करणं अत्यंत कठीण आहे.
त्यांची गाणी हॅपी मूड, सॅड मूड, रोमान्स मूडची असतील त्यामध्ये त्या एक वेगळी बात निर्माण करतात. एक स्टेटमेंट करतात. ते खूपच कमी लोकांना आजपर्यंत जमलंय. ही जागा माझी आहे किंवा हे माझं गाणं आहे, असा शिक्का ठामपणे त्यांनी प्रत्येक गाण्यामध्ये मारून ठेवला आहे. शिवाय प्रत्येक गायकाला त्यांच्या गायकीतून वेगवेगळे पैलू शिकायला मिळतात. तसेच त्यांची गाणी गाताना भीतीही वाटते. कारण त्यांनी जे करून ठेवलंय त्यासाठी आपल्याला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही, मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती गायला मिळत आहेत. रसिकांनाही या गाण्यांची ओळख होत आहे.
गायिका पल्लवी पारगावकर यांचे वडील दिलीप चक्रवर्ती आणि आई श्यामली चक्रवर्ती दोघेही संगीत क्षेत्रात होते. लताबाई आणि मोहम्मद रफी यांच्याबरोबर त्यांनी कोरसमध्ये गाणी म्हटली आहेत.
यावर्षी माझ्या वडिलांना जाऊन ३० वर्षे झाली. त्यांनीच मला लताबाईंच्या गाण्यातील अनेक पैलूबाबत सांगितले होते. जे ज्ञान आजही गाताना मला उपयोगी पडते. आज जर माझ्या गाण्यात जो काही कमी जास्त भाव जाणवत असेल तर त्याचं श्रेय वडिलांना आहे, असे त्या म्हणतात.
रसिकांना आवाहन
सध्याच्या काळात आवाजावर गाणी चालतात. आवाजापेक्षा कविता, संगीत याचाही विचार रसिकांनी करायला हवा, असं वाटतं. या मुद्द्याला धरून गाण्याच्या बाबतीतलं सर्वोत्कृष्ट काम हे फक्त १९८० पर्यंतच होतं. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकारांच्या यादीत आर. डी. बर्मन, दत्ता डावजेकर, दत्ता कोरगावकर, दत्ता नेरुरकर, वसंत देसाई, सी रामचंद्र अशी बरीच मंडळी आहेत. ज्या संगीतकारांनी आपल्याला उत्तमोत्तम गाणी, संगीत दिलंय. त्यांचं काम फेसबुक आणि युट्यूबच्या सशक्त माध्यमातून सध्याच्या
लॉकडाऊन काळात रसिकासमोर मांडलं जातंय. आम्ही काय वेगळं करू शकतो याबाबत अभिप्राय कळवण्याचं आवाहनही कार्यक्रमाचे निर्माते अतुल दाते यांनी रसिकांना केलं आहे.
‘होम सिरिज’चा अभिनव प्रयोग
नेहमीच्या कार्यक्रमात कलाकार रंगभूषा करून माईक लावून कार्यक्रमाची सर्व तयारी करून गातात. त्याऐवजी एक वेगळा प्रयोग म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण प्रोफेशनल कॅमेर्याऐवजी मोबाईलवर केलं आहे तसेच लताबाईंची सर्व गाणी तानपुर्यावर सादर केली जात आहेत. या वेगळ्या प्रयोगाबाबत गायिका पल्लवी पारगावकरांचं म्हणणं आहे की, संपूर्णत: तानपुर्याशिवाय इतर कोणत्याही संगीत वाद्यांचा आधार न घेता गाणं आणि कार्यक्रमाचं मोबाईलवर चित्रीकरण करणं हा प्रयोग म्हणजे माझ्यासाठी एक वेगळं आव्हान आहे. गाण्यातल्या बारीक जागा तानपुर्यावर स्पष्ट ऐकू येतात. कुठे फॉल्ट लाईन्स असतील तर त्याही लगेच कळतात, रिदम किंवा वाद्याचा आधार न घेता गायलेलं गाणं कुठे सुरात कमी-जास्त होतंय हे ज्यांचे कान तयार आहेत त्यांच्या पटकन लक्षात येतं. आम्ही माईकचा वापरही केलेला नाही. जास्त तांत्रिक गोष्टींचा वापर न करता ‘होम सिरिज’ म्हणून या कार्यक्रमाचं सादरीकरण केलं आहे. घरात तुम्हाला जर गाणं ऐकवलं, तर ते कसं वाटेल ऐकायला? हा उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– नमिता वारणकर
(लेखिका पत्रकार आहेत)