श्रीसंत चोखोबा महाराजांच्या एका अभंगाच्या, कालौघात प्रक्षिप्त झालेल्या ओळी अशा आहेत… ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ इथे गुंडा याचा अर्थ पराक्रमी आणि कर्तबगार असा आहे. पण काही स्वघोषित प्रदेशभाग्यविधात्यांच्या मुलांकडे पाहिलं की ‘गुंडा’ या शब्दाचा प्रचलित अर्थच आठवतो आणि धास्तीच वाटते.
गेला आठवडा दोन ‘पराक्रमी’ पुत्रांनी गाजवला… त्यांच्या नावावर प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियामध्ये चर्चिले गेलेले पराक्रम त्यांनी खरोखरच केलेले आहेत की नाही हे अजून ‘पुराव्याने सिद्ध व्हायचं’ आहे. पण त्याआधी त्यांची घमासान चर्चा मात्र सुरूच आहे…
यातला एक पुत्र आहे आर्यन खान.
शाहरूख खानचा हा मुलगा मुंबईनजीक एका क्रूझवर पकडला गेला. तिथे रेव्ह पार्टी सुरू होती, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचं म्हणणं आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेली आहेत का, त्याने त्या पदार्थांचं सेवन केलं होतं का, याबद्दल अजूनही संदिग्धता आहे. पण, कोर्टाने त्याला सध्या जामीन नाकारला आहे. त्याच्या तपासातून ड्रग्जच्या विक्रीचं एक मोठं रॅकेट उजेडात येईल, असा एनसीबीचा दावा आहे. अंमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे आणि विक्री करणे यापैकी ज्या कोणत्या आरोपात आर्यन खान दोषी ठरेल, त्याबद्दलची कायद्यात जी असेल ती शिक्षा त्याला मिळायलाच हवी. मात्र हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. या छाप्यामध्ये दोन पंच भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते, असा आरोप त्यांनी फोटोंसह केला आहे. एनसीबीने क्रूझवरच्या ज्यांना चौकशीविना सोडून दिलं, त्यातही भाजप पदाधिकार्यांचे निकटवर्तीय आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे. पंच तटस्थ असतात, आमच्या माहितीचे नसतात, असं एनसीबी म्हणते. पण ते भाजपसंबंधित आहेत आणि पार्टीतून सोडून दिले गेलेले लोकही भाजपशी संबंधित आहेत, हे दोन्ही योगायोग फारच विलक्षण आहेत.
या क्रूझवर जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं वजन काही ग्रॅम्समध्ये आहे आणि एनसीबीच्या परिभाषेतच ते मध्यम ते किरकोळ प्रमाण आहे. गेल्या पंधरवड्यात मुंध्रा येथील अडाणींच्या खासगी बंदरात तीन हजार किलो ड्रग्ज सापडली होती. आर्यन खानच्या संदर्भात मिनिटामिनिटांची खबर देणार्या वाहिन्यांवर किंवा वर्तमानपत्रांमध्ये मुंध्रामधल्या अंमली पदार्थांची बातमी पाहायला, वाचायला मिळाली का?
या आठवड्यात चर्चेत असलेला दुसरा पुत्र आहे चार शेतकर्यांना वाहनाखाली चिरडण्याचा आरोप असलेला, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र. लखीमपूर खेरी येथे शांततेत निदर्शनं करत असलेल्या शेतकर्यांच्या जथ्यावर त्याने गाडी घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला आणि त्यात आणखी चारजण मारले गेले.
या घटनेनंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह कोणताही विरोधी पक्षनेता लखीमपूरला पोहोचू नये यासाठी तिथल्या सरकारने आणि पोलिसांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आशिष मिश्रला पकडण्याच्या बाबतीत मात्र ते इतके उदासीन होते की अखेर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून उत्तर प्रदेश सरकारचे कान उपटावे लागले. तोवर रोज मिश्र साहेबांच्या निवासस्थानी नोटिसा लावून परत येणार्या आज्ञाधारक पोलिसांसमोर अखेर हे चिरंजीव हजर झाले आणि त्यांची चौकशी सुरू झाली. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. तो तपासात सहकार्य करत नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
एरवी एखाद्या नटाच्या, क्रिकेटपटूच्या दुखण्याची कनवाळूपणे चौकशी करणार्या आणि लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याच्या निधनाबद्दल तत्परतेने शोक व्यक्त करणार्या पंतप्रधानांनी चार शेतकरी चिरडले गेल्याबद्दल एका शब्दाने दु:ख व्यक्त केलेलं नाही. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रात्रंदिन विधवाविलाप करणारे भाजपचे नेते, वाचाळ प्रवक्ते या विषयावर मूग गिळून गप्प आहेत. मारले गेले ते शेतकरीच नव्हते इथपासून ते शेतकर्यांनी चीनच्या सीमेकडे निघालेल्या जवानांचा मार्ग अडवून धरलेला आहे इथपर्यंतचे ‘शोध’ आयटी सेल सोशल मीडियावर पसरवत आहे.
आशिष मिश्रच्या चौकशीतून सत्य समोर येईल, याची खात्री कोणालाही नाही. कारण उत्तर प्रदेशात सरकार भाजपचं, आशिषचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री. एनआयए, सीबीआय यांच्यासह आयपीएस पोलिस अधिकारी त्यांना रिपोर्ट करतात. त्यांच्याकडून तटस्थतेची आणि निर्भीडतेची अपेक्षा कशी करणार? अशा प्रकरणाचा तपास दबावाविना व्हावा, यासाठी सत्तापदावरच्या नेत्याने राजीनामा द्यायचा असतो, असा संकेत होता. पण ‘नया भारत’मध्ये हे सगळेच संकेत धुळीला मिळवले गेले आहेत.
दुसरीकडे आर्यन खानकडे अंमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने आधीच नोंदवलेलं आहे. त्यामुळे कालांतराने निर्दोष मुक्तता होऊन त्याने करण जोहर अंकलच्या सिनेमातून दणदणीत पदार्पण केलं तर आश्चर्य वाटायला नको.
अशी आहे ही दोन पुत्रांची कहाणी.
एकाने काही ग्रॅम ड्रग्जचं सेवन केल्याचा वहीम आहे, दुसर्याने चार माणसांना गाडीखाली चिरडल्याचा…
बटीक प्रसारमाध्यमांनी यातला कोणता गुन्हा गंभीर मानला आहे, कशाची चर्चा चालवून काय झाकण्याचा प्रयत्न केला आहे, हे उघड दिसत आहे… अशा कणाहीन माध्यमांमध्ये काम करणार्या ‘पुत्रां’चे आईवडीलही त्यांच्या ‘पराक्रमा’ने धन्य झाले असतील.