लालबहादूर शास्त्रीजी म्हणजे भारतमातेच्या हृदयावरची एक भळभळती जखम… त्यांची आठवण आजही सच्च्या भारतीयाला अस्वस्थ करते, व्याकुळ करते… जय जवान, जय किसान ही घोषणा भारताला दिलेले शास्त्रीजी आणखी काही काळ पंतप्रधानपदावर राहिले असते, तर देशाचं काय चित्र दिसलं असतं, असा विचारही अनेकांच्या मनात येतो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर शास्त्रीजींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली, तो काळ किती कठीण होता, हे दाखवणारं आदरणीय बाळासाहेबांचं हे भावोत्कट व्यंगचित्र आहे… व्यंगचित्र म्हणजे निव्वळ हसवणूक या गैरसमजुतीला थेट छेद देणारं. देश चोहोबाजूंनी संकटात सापडलेला असताना या बटुमूर्ती नेत्याला पंतप्रधानपदाच्या कंटकशय्येवर आरूढ व्हायला लागलं, अनेक प्रश्नांशी लढायला लागलं… त्यांच्या अल्पशा कारकीर्दीतही त्यांचं अत्यंत साधं राहणीमान, त्यांची करारी खंबीर वृत्ती यांचा ठसा उमटलाच… शास्त्रीजी पंतप्रधानपदावर विराजमान होत असताना मागे बाळासाहेबांचं ‘विशेष प्रेम’ लाभलेल्या मोरारजी देसाईंच्या चेहर्यावरचे भाव या गंभीर चित्राला मिस्कील छटा देऊन जातात…