फक्त वा वा म्हणतात ते वानर आणि जे का का म्हणून प्रश्न विचारतात ते मानव, असं प्रबोधनकारांनी लिहून ठेवलंय. आजूबाजूला घडत असलेल्या अन्यायी रूढीपरंपरांना प्रबोधनकार लहानपणापासूनच प्रश्न विचारत राहिले. त्यातून त्यांच्यातला माणूस घडत होताच, पण त्याचबरोबर एक समाजसुधारकही जन्म घेत होता.
—-
प्रबोधनकार वर्हाडात स्वदेशहितचिंतक नाटक मंडळीत न जाता कोल्हापुरातच छापखाना चालवत राहिले असते, तर कदाचित त्यांना छत्रपती शाहू महाराजांचा स्नेह आणि आधार लवकर मिळाला असता. कदाचित त्यांना अधिक स्थिर आयुष्य जगता आलं असतं आणि कदाचित अधिक महत्त्वाचं सामाजिक प्रबोधनाचं कामही करता आलं असतं. पण या सार्या जर तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात छापखाना सोडून नाटक कंपनीच्या बेभरवशाच्या धावपळीत झोकून दिल्यानंतरही प्रबोधनकारांच्या आयुष्यात एक फारच महत्त्वाची आणि चांगली गोष्ट घडली. नाटक कंपनीचा मुक्काम अचलपूरला असताना प्रबोधनकारांचं लग्न ठरलं.
हे लग्न जमणं ही काही साधी गोष्ट नव्हती. कारण प्रबोधनकारांचे लग्नाच्या विषयीची विचार त्या काळाच्या मानाने खूपच जहाल आणि बंडखोर असेच होते. `माझी जीवनगाथा’मध्ये त्यांनी त्यांची क्रोनोलॉजी अशी नोंदवली आहे, `वैवाहिक बाबतीत सगळा पांढरपेशा समाज भरमसाट वाह्यात असताना माझा जन्म झाला. बालपणात नि त्यानंतर अनेक वैवाहिक अत्याचारांचे देखावे मी प्रत्यक्ष पाहिले. जरठबाला विवाह काय, बालविधवांचे केशवपन काय, पुनर्विवाहाला बंदी काय, कोणी विधवेचा विवाह केला तर त्याला नि त्याच्या नात्यागोत्यांतल्या सगळ्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे थेर काय, सगळे देखावे मी पाहिलेले असल्यामुळे त्यासंबंधीची काही निश्चित मते ठाम ठरून गेलेली होती.’
त्यामुळे लग्नाच्या बाबतीत तीन कठोर पण केलेले होते. तेही त्यांच्याच शब्दांत वाचायला हवेत,
१. श्रीमंताची किंवा साधारण सुखवस्तूची मुलगी आपण करावयाची नाही. गरीबांतल्या गरीबाची, विशेषतः अचानक दुर्दैवाच्या कचाट्यात सापडल्यामुळे हतबल नि निराश अवस्थेतल्या कुटुंबातील करायची, असे मी ठरवूनच ठेवलेले होते. आणि आजी-आईची तशी इच्छाही होती.
२. आपण होऊन मुलगी पहायला कोणाच्या घरी जायचे नाही. मुली पहाण्याच्या पद्धतीतही लोक बरेच पाचकळलेले असायचे. मुलीची तेवढी परीक्षा. प्रश्नांचा भडिमार फक्त तिच्यावरच आणि मुलांविषयी मात्र कोणी चकार शब्द काढायचा नाही. हे असे का? त्याचीही परीक्षा घेण्याचा हक्क मुलीकडच्यांना का नसावा?
३. कन्यादान विधीबद्दल मला असाच तिटकारा आहे. कन्या ही काय एखादी निर्जीव भावनाशून्य वस्तू आहे तर तिचे तुम्ही दान करता? दान होत असलेल्या वस्तूला बरेवाईट, हवे-नको म्हणण्याचा हक्कच नाही. दावे बांधून देईन तिथे मुकाटमोडी गेले पाहिजे, असे अनेक खाटिक बाप मोठ्या दिमाखाने बरळत असत. म्हणूनच मला वाटते पदरी पडले नि पवित्र झाले ही उक्ती विवाहित मुलींच्या तोंडी रूढ झालेली असावी. चालू जमान्यातल्या लव्हाळ्या पोरी आईबापांना धाब्यावर बसवून मन मानेल त्याच्याशी विवाह करतात. पळून जातात. हा साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या कुमारिकांच्या सामाजिक छळाचा एक प्रकारचा सूडच म्हटला तरी चालेल.
याशिवाय प्रबोधनकारांनी प्रत्यक्ष हुंडा घेतलेला नाही. लग्नात डामडौल केलेला नाही. अशा गोष्टी त्या काळात क्रांतिकारकच ठरणार्या होत्या. त्यांची अशी बंडखोर मानसिकता कशी घडली, याच्यावर प्रबोधनकारांनी आत्मचरित्राची तीनेक पानं खर्ची घातली आहेत. ती फारच महत्त्वाची आहेत. सुधारकांनी लिहिलेली पुस्तकं वाचून किंवा व्याख्यानं ऐकून प्रबोधनकार हिंदू धर्मातल्या सामाजिक सुधारणांचा आग्रह धरू लागलेले नव्हते. तर बालपणापासून तारुण्यापर्यंत संताप येण्यासारख्या रूढी-परंपरा ते बघत होते. त्या संतापातून त्यांनी सुधारणेचा आग्रह धरलेला दिसतो.
त्या भयंकर परिस्थितीचं वर्णन प्रबोधनकारांनी ज्या शब्दांत केलंय, ते पाहता त्याचा परिणाम त्यांच्यावर कसा झाला असेल, याचा अंदाज बांधता येतो. ते लिहितात, `तीन बायका खाल्लेल्या साठ वर्षांच्या थेरड्याने खुशाल नऊ दहा वर्षांच्या कुमारिकेशी लग्नाचा सौदा ठरविला तर त्याचा निषेध कोणी करायचे नाहीत. उलट ते लग्न जमविण्यासाठी शब्द टाकायलाही लाजायचे शरमायचे नाहीत. अगदी आठ नऊ ते बारा तेरा वर्षांपर्यंतच्या बालविधवांचे केशवपन घडवून आणायला म्हणजे त्या बालिकेचा आक्रोश चालू असताना, तिचे हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून न्हाव्यापुढे जबरीने बसविण्यात पटाईत अशा धर्ममार्तंड मांगांचीही उणीव पडायची नाही. बालविवाह तर सर्रास चालू होतेच आणि विशेषतः गरीबांच्या पोरी मात्र हटकून पन्नाशी उलटलेल्या विधुरांच्या जाळ्यात बिनशर्त सापडल्या जात असत.’
प्रबोधनकारांना लहानपणापासून प्रश्न पडायचे की हे सगळं चुकीचं असूनही वडीलधारे लोक का सहन करतात? त्याला नाकारत का नाहीत? कालपर्यंत सोबत खेळणारी एखादी मैत्रीण अचानक नवरा मेला म्हणून केस कापून स्वयंपाकघरात अडकून का बसते? सगळे तिला हिडीसफिडीस का करतात? अस्पृश्य मानले गेलेल्यांना का शिवायचं नाही? त्यांची जीवनशैली टापटिपीची असली तरीही त्यांच्या घरी चहादेखील का प्यायचा नाही? बालविधवेला केस कापायला लावणार्यांना सरकारने तुरुंगात खडी फोडायला का पाठवू नये? कोवळ्या मुलींशी लग्नं लावणार्या बिजवर तिजवर म्हातार्यांना गावच्या लोकांनी चिंचेच्या फोकांनी फोडून का काढू नये?
या राक्षसी प्रथापरंपरांविषयी पडणार्या प्रश्नांनी प्रबोधनकारांना कट्टर सुधारक बनवलं. त्यांनी पुढे प्रबोधनमधल्या एका लेखात लिहिलंय की नुसतं वा वा म्हणतो तो वानर आणि का का म्हणून प्रश्न विचारतो तो मानव. प्रबोधनकारांनी माणूस बनण्याच्या दिशेने प्रश्न विचारून लहानपणीच काही पावलं टाकली. त्यासोबत त्यांनी बंडखोर कृतीलाही सुरवात केली. जरठबाला विवाहातल्या ‘संगीत शारदा’ नाटकातलं `म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान’ हे पद श्लोक म्हणून गाणं. महार सुभेदारांच्या घरी चहा प्यायला जाणं. त्यांच्या मंजू नावाच्या दहा-अकरा वयाच्या मैत्रिणीचं लग्न एका पासष्टीच्या म्हातार्याबरोबर लावण्यात येत होतं, तेव्हा त्यांनी त्याचा मंडपही पेटवून देणं. अशा अनेक वयाच्या मनाने खूपच क्रांतिकारक गोष्टी ते करत होते. पनवेलमधल्याच बेहर्यांच्या बारा तेरा वर्षांच्या मुलीचं केशवपन झालं. ती निरागसपणे बालविधवेच्या वेशात आणि टक्कल केलेल्या अवस्थेत सगळीकडे फिरायची. सगळ्यांशी हसून खेळून बोलायची. ते बघून प्रबोधनकारांना या बालविधवांची पुन्हा लग्नं का लावत नाहीत, असा प्रश्न पडायचा.
हा प्रश्न विचारून प्रबोधनकारांनी पुढे जे लिहिलंय, ते त्यांच्या शब्दांतच वाचायला हवं. ते लिहितात, `म्हणे धर्म आडवा येतो! येतो, तर त्या धर्माला छाटला पाहिजे. हिंदू धर्माविषयी एक प्रकारची अढी माझ्या मनात अगदी लहानपणापासून पडत गेली. जो धर्म माणसांना माणुसकीने वागण्याइतपतही सवलत देत नाही. सदानकदा देवाची इच्छा या सबबीखाली अश्रापांचा छळ खुशाल होऊ देतो. तो देव तरी कसला नि तो धर्म तरी काय म्हणून माणसांनी जुमानावा?’
प्रबोधनकारांनी म्हटलंय या धर्मविषयक प्रश्नांनी त्यांच्या मनात एक कायमस्वरूपी पोखरणच घातली. या पोखरणीमुळे प्रबोधनकार विचारांनी खोल खोल जात राहिले. खोट्याला नाकारत राहिले. ढोंगावर आसूड उगारत राहिले. देवाला, देवळाला, पुरोहितांना आणि धर्माला प्रश्न विचारत राहिलो. असे प्रश्न विचारले गेले म्हणून आज आपण समाज म्हणून इतके पुढारलेले आहोत. नाहीतर त्याच घाणेरड्या नीच रूढींमध्ये अडकून बसलो असतो. म्हणून प्रबोधनकारांसारख्या समाजसुधारकांचे आपल्यावर उपकार आहेत.
पुढे नाटक कंपनीत गेल्यानंतर प्रबोधनकार महाराष्ट्रभर फिरू लागले. वेगवेगळ्या समाजांशी त्यांचा संपर्क येत गेला. त्यांना नवे प्रश्न पडू लागले. त्यांची मतं ठाम होऊ लागली. ते सत्यनारायणाच्या पूजेलाही जाणं टाळू लागले. त्यांना सत्यनारायणाची आमंत्रणं आली तर त्याच्या मागचा भाग चिठ्ठ्या लिहिण्यासाठी वापरून ती कचर्याच्या टोपलीत जाऊ लागली. मनात हे सारं वादळ सुरू असताना प्रबोधनकारांना त्यांचे दोन गुरू पुस्तकांतून सापडले. एक लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि दुसरे अर्थातच महात्मा जोतिराव फुले. प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवलंय की देवास मुक्कामी त्यांच्या वडिलांचे मामा राजाराम गडकरी यांनी त्यांची भेट लोकहितवादींच्या शतपत्रांशी घालून दिली. या शतपत्रांच्या अभ्यासाने त्यांना फक्त विचारांचीच नाही तर आचारांचीही नवी दिशा मिळाली. लोकहितवादींविषयी ते लिहितात, `अमानुष रूढींविरुद्ध आणि अनेक सामाजिक आचारांविरुद्ध मी केवळ मनातल्या मनात जळफळणारा एक सामान्य. पण त्याविरुद्ध धिटाईने जाहीर आवाज उठवणारा सत्यशोधक, पुरुषार्थी पुरुषोत्तम या महाराष्ट्रात अवतरला या घटनेचा माझ्या मनावर झालेला परिणाम आजदिनतागायत चढता वाढता जागृत आहे. याच क्षणापासून कै. रावबहाद्दूर गोपाळराव हरी देशमुख, लोकहितवादी या महापुरुषाला माझे परात्पर गुरू म्हणून म्हणून मनोमन पूजित आठवत असतो. `प्रबोधनकारांनी लोकहितवादींविषयीचं ऋण कायम नोंदवून ठेवलंय. `प्रबोधन’पासून ते `साप्ताहिक बातमीदार’पर्यंत त्यांनी लोकहितवादींविषयी लेख लिहिलेत. त्यांचे जुने लेख पुन्हा छापलेत. पुण्यात असताना तर वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांनी `लोकहितवादी’ नावाचं एक साप्ताहिकच चालवलं. त्या मानाने प्रबोधनकारांनी आपल्या दुसर्या गुरूविषयी म्हणजे महात्मा फुलेंविषयी खूप कमी लिहिलं. पण प्रबोधनकारांचं साहित्य वाचताना जोतिबांचा प्रभाव कायम लक्षात येतो. चिपळूणकरांच्या निबंधमालेचा अभ्यास करताना ते कुतूहलाने महात्मा फुलेंच्या कर्तबगारीकडे वळले. त्यांनी त्यांची सगळी पुस्तकं मिळवली. त्यातल्या लिखाणाविषयी ते नोंदवतात, `लोकहितवादींच्या कलमबहाद्दरीची चमक त्यांत नसली, तरी सामाजिक अन्यायाविरुद्ध तळमळणार्या अल्पशिक्षिताच्या हृदयाच्या विवंचनेचे बोबडे बोल त्यात रसरसत होते. वयाच्या आठव्या वर्षी आजीने `माणसाचे माणसाला अस्पृश्य मानणे हे पाप आहे’ असा केलेला सक्रिय उपदेश जोतिबांच्या लेखनात मला भरघोस पुराव्यासारखा लाभला.’ महात्मा फुलेंच्या या साहित्याचा अभ्यास प्रबोधनकारांनी नाटक कंपन्यांच्या बरोबर फिरस्तीवर असताना केला. कंपनीतली बहुसंख्य मंडळी अल्पशिक्षित असत. त्यात लिहिण्यावाचण्यात रस असणारे कमीच असत. त्यामुळे ते गप्पाटप्पांत मन रमवत. पण एकटे प्रबोधनकार रात्रंदिवस जुन्या फाटक्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसलेले असत. त्याचं नाटक कंपनीत येणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत असे. तो कदाचित तेव्हा टिंगळटवाळीचाही विषय बनत असेल. पण या फाटक्या पुस्तकांच्या वाचनातूनच क्रांतिकारक विचारांचा निखारा फुलत होता.
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)