सचिन दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्याला यंदा तब्बल ३३ वर्षं झाली. तरीही हा सिनेमा आजही ताजा टवटवीत आहे आणि नव्या तरुणाईनेही या सिनेमाला कल्ट स्टेटस दिलं आहे, त्यातल्या प्रसंगांची मीम्स बनत आहेत, त्यातले संवाद आजही अतिशय लोकप्रिय आहेत. या भावनेला वाट करून देणारी ही व्हायरल पोस्ट.
—-
‘हळू बोल नाही तर तो टुकुलु येईल ना रे शुंतुनु!’
‘तेरी माँ, मेरी माँ.. तेरी माँ मेरी माँ दोनो ने टोंग से झाडू कर दिया!’
‘चांगली भक्कम बायको मिळालीये हो तुम्हाला!’
‘सारखं सारखं त्याच झाडावर काय?’
‘याहून छोटं स्टूल नव्हतं!’
अस्सल चाणाक्ष दर्दी फॅन्सच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग उभे राहिले असतीलच! निव्वळ अवीट!
अगदी पहिल्या ‘मनुजा जाग’ गाण्यापासून सुरू झालेला सिनेमा एक क्षण ही फ्रेम सोडत नाही. ‘ठक ठक, धनंजय माने इथेच राहतात का, ठक ठक’ आणि त्यावर ओशाळून ‘ये ये परशुराम’ म्हणणारा धनंजय माने असो किंवा बायकांनी जाताना ‘साधा नमस्कारही केला नाही’ म्हणून फणकारणाऱ्या काकू आणि ‘चला आत, नमस्कार करून घेतायेत’ म्हणून फिस्कारणारे आणि भाडेकरू सोडून जाणार म्हणून ‘आनंदी आनंद गडे’वर धोतर धरून नाचणारे, सत्तर रुपये वारल्यावर ‘हा शुद्ध हलकटपणा आहे माने’ म्हणून भडकणारे घरमालक सरपोतदार, पाषाणला बंगला असलेल्या (बाबो!) चष्म्याच्या एका बाजूची काच पांढरी असलेल्या आणि सतत धुरकट फिक्की निळी साडी नेसून बसलेल्या, निरंजन बाबांच्या अट्टल भक्त असणाऱ्या काळभोर आजी, सतत डोळे बारीक करून इकडे तिकडे लक्ष ठेवणारी आणि प्लॅन लक्षात येताच मान हलवून कन्फर्म करणारी तानी, ‘मिस्टर माने’ म्हणून तोरा दाखवणार्यो आणि लिंबू कलरच्या साडीला जगात फेमस करणार्यान माधुरी मॅडम, मावशीकडे येऊन ‘आश्चर्याचा धक्का’ देऊन महिनो न महिने तळ ठोकणारी आणि पाईप ओढणार्याश तरुणाची ‘मनीषा’ असणारी मनीषा आणि विशेष अशी कोणतीच मनीषा नसणारी पण आयताच बॉयफ्रेंड रंगेहाथ पकडला गेला आहे तर गेला बाजार इतर हिरोईनसारखे बेडरूममध्ये पळत येऊन पलंगावर धाडकन ओणवे झोपून उशीत तोंड खुपसून रडत न बसता जमतील तितके रागीट भाव आणि निर्भर्त्सना चेहर्यारवर दाखवणारी सुषमा, चट्ट्यापट्ट्यांचा टिपिकल टी शर्ट घालून दीड किलोमीटरवरून पण हा मवाली आहे हे ओळखता येईल असा बळी, घरमालकिणीला कुंकू लावताना गांगरलेल्या, ‘जाऊ बाई’ ‘नका बाई जाऊ’ म्हणणार्या, एकजण जड पोट तर एकजण जबरदस्तीचा कॅन्सर डोक्यावर बसवलेल्या पार्वती आणि सुधा हे सगळे अगदी मनात घर करून बसतात! टायटल साँग असो की ‘हृदयी वसंत फुलताना’ किंवा ‘कोणीतरी येणार येणार गं!’ यातली सगळी गाणी पाठ नसतील तरच नवल!
काही सिनेमे हे फक्त सिनेमे नसतात. इट्स अ फीलिंग… अॅन इमोशन!! माझ्यासाठी हा सिनेमा म्हणजे एक थेरपी आहे! फुल्ल स्ट्रेस बस्टर!!
फक्त मजा असं नाही, हा एक धागा आहे जोडून ठेवणारा. एखादा बनवाबनवी फॅन आहे म्हटलं की तो अगदी ‘आपला’ असल्यासारखा वाटतो! बनवाबनवीचा मिम असेल तर टॅग करणं, नसेल तर प्रसंगावरून तयार करणं, त्याचे
डायलॉग मारणं, पुन्हा पुन्हा आठ हजार तीनशे बत्तीस वेळा तेच तेच प्रसंग रंगवून सांगून तितकंच खोखो हसणं, त्याचे प्रिंट असलेले टीशर्ट अक्षरशः मिरवणं… एखाद्या सिनेमाच्या नशिबात राजयोग असावा तो असा!
उद्या मी साठीत असतानाही या सिनेमाची जादू कायम राहील आणि जेव्हा मी माझ्या मुलीकडे जाईन तेव्हा बेल वाजवण्याऐवजी ‘धनंजय माने इथेच राहतात का’ विचारेन आणि ती पण माझीच मुलगी असल्याने ‘ये ये परशुराम’ म्हणून माझं स्वागत करेल इतकं या सिनेमावर माझं प्रेम आहे आणि राहील.