आदरणीय गडकरी साहेब…
नमस्कार, मी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ससूनवघर येथील खड्डा क्रमांक एनएच ४८-२५५४.
सोशल मीडियावर तुम्ही करीत असलेल्या कामाचे आणि नवनवीन आयडियांचे तुमच्याच तोंडून गुणगान करणारे व्हीडिओ रोज पाहायला मिळतात, त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन!
नितीनजी, मी काँग्रेसच्या काळातील खड्डा असूनही तुम्ही मागील सात वर्ष मला जीवदान दिलेत याबद्दल मी आपला प्रचंड ऋणी आहे. तुमच्याच कृपाशीर्वादाने आज माझे अनेक बांधव या रोडवर तीन तीन मजली खड्डे बांधून रहात आहेत.
पूर्वी आम्हां खड्ड्या-खड्ड्यामध्ये वैर होतं, त्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर राहत असू. आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही सर्व खड्डे एकत्र येऊन अधिक मोठे आणि अधिक मजबूत झालो आहोत.
रोज व्हॉट्सअपवर आम्ही तुमचे फोटो आणि व्हीडिओ फिरवतो व तुमच्या कहाण्या ऐकवतो. तुमच्याकडे पैशाचा तोटा नाही असं तुम्ही कालपरवा म्हणालात. अमुक टेक्नॉलॉजी वापरली, तमुक इनोव्हेशन केलं, अमुक दिवसात हायवे केला अन तमुक दिवसात पूल बांधला असं तुम्ही म्हणत असता, पण आमचा वर्सोवा ब्रिज पूर्ण करायला अजुन किती वर्षे लागणार आहेत ते काही तुम्ही सांगत नाहीत. अजून किती वर्षे मेंटेनन्ससाठी एक लेन सुरू अन एक लेन बंद करत प्रवाशांना ताटकळत ठेवणार आहात?
तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि आमच्यामुळे इथले पंक्चरवाले, गॅरेजवाले आणि ऑर्थोपेडिक डॉक्टर्स पैसे कमवून मुंबईत फ्लॅट घेऊन राहात आहेत.
वसई विरारचा अत्यवस्थ रुग्ण मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवायचा तर तो दोन दोन तास वर्सोवा ब्रिजच्या ट्रॅफिकमध्ये अडकून आम्हां खड्ड्यांच्या साक्षीने अॅम्ब्युलन्समधेच प्राण सोडतो.
गडकरी साहेब, मला तुमचं काय आवडले, तर आम्हा खड्ड्यांना जिवंत ठेवणारी कार्यपद्धती. सुरुवातीला आम्ही छोटे असतो, तेव्हा माती टाकता.
नंतर आम्ही चौथीला एडमिशन घेतली की, जांभा दगड टाकता व दहावीला गेलो की बाजूला खडी आणून टाकता. नंतर, १५ मेला रस्त्यावर सारवायला सुरू करता व ७ जूनला पाऊस तुम्ही सारवलेले सर्वकाही धुऊन काढतो.
तुमची कार्यपद्धती नोबेल पारितोषिक देऊन गौरवावी अशीच आहे.
तुम्ही रबराचे रस्ते, ट्यूब ट्रान्सपोर्ट, इथेनॉलवर चालणारी वाहने अशा नवनवीन प्रयोगावर बोलत राहा. आमच्या कानाला तेव्हढंच बरं वाटतं.
आपलाच.. खड्डाभिलाषी!!
खड्डा क्रमांक
एनएच४८-२५५४