शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही बर्याच ठिकाणी फिरला असाल. आजवरच्या टेलिव्हिजन प्रवासात एखादा असा अनुभव आलाय का ज्यामुळे तुम्ही अभिनयक्षेत्रात आल्याचं समाधान वाटलंय?
स्पृहा करंबेळकर, कल्याण
– कला क्षेत्रात काम करत असल्याने आजवर प्रवासाचा विपुल असा अनुभव गाठीशी जमा झालेला आहे. एखादाच सांगणं अवघड आहे पण, ठळक सांगायचं झालं तर, अभ्यासादरम्यान मणिपूर इंफाळला चाळीस दिवसांचा मुक्काम आणि ते ही सीमावर्ती भाग ज्वलंत असताना, नाटकांच्या प्रयोगांच्या निमित्ताने रक्तरंजित काळामधला २००२ साली काश्मीरमधल्या कुपवाडा, उरी, श्रीनगरचा प्रवास, पाकिस्तानच्या सीमा डोळ्यांसमोर, एका बाजूला मिलिटन्ट कारवाया सुरु असताना बॉम्ब गोळ्यांच्या आवाजात सैनिकांसाठी केलेले प्रयोग; सौन्दर्य शास्त्राचा अभ्यास म्हणून फतेहपुर सिक्रि, मथुरा, ताज वगैरे उत्तरेतला प्रवास, कामाच्या निमित्ताने अनेकवेळेला इंग्लड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, दुबई, इटली मधील रोम, नेपल्स, व्हेनिस सारखी शहरे, सर्व ठिकाणची सर्व प्रकारची म्युझियम्स, शिल्पकला, चित्रकला, आर्किटेक्चर, निसर्ग, माणूस, आणि त्याच बरोबरीने आपल्या इथल्या अनेक खेडोपाडी जाण्याचा अनुभव.. कलाक्षेत्रामुळे प्रवासाचा अनुभव विलोभनीय त्यामुळेच अनुभव संपन्नता केवळ या कलाक्षेत्रामुळेच शक्य झाली.
हिंदी-मराठी सिनेमांमध्ये गणेशोत्सवाचा वापर अनेक प्रसंगांमध्ये झालेला आहे. लोकप्रिय गणेशगीतंही अनेक आहेत. तुमचा आवडता प्रसंग कोणता आणि गणेशगीत कोणतं?
विभावरी शिंत्रे, काळेवाडी
– गणेश उत्सवावर चित्रित झालेलं कोणतंच गाणं सहसा वाईट झालेलं नाहीये. कारण त्या उत्सवाचं पावित्र्य हेच प्रत्येक गाण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ती प्रत्येक गाणी मला आवडलेली आहेत. अजय-अतुल यांनी रचलेली सर्व प्रकारची गणेशाची गाणी अविस्मरणीय वाटतात. नुकतंच आलेलं महेश मांजरेकरांच्या ‘अंतिम’ नावाच्या हिंदी सिनेमाचं वैभव जोशींनी लिहलेलं गाणंही उत्तम आहे.
अमिताभ बच्चन यांनी एकदा सांगितलं होतं की जुन्या जमान्यातला ‘कागज के फूल’ पुन्हा तयार झाला तर त्यातली गुरुदत्त यांनी साकारलेली दिग्दर्शकाची भूमिका साकारायला त्यांना आवडेल. तुम्हाला मराठीत किंवा हिंदीत अशी कोणत्या सिनेमातली कोणती भूमिका साकारायला आवडेल?
अनिल पांचाळ, नालासोपारा
– भालजी पेंढारकरांच्या ‘राजा शिवाजी’मधील राजा शिवाजी, मा. विनायकांचा ‘ब्रह्मचारी’, ‘अंगूर’मधला संजीव कुमारांचा डबलरोल, अर्ध्या गॉगलने एक डोळा झाकून काम करणारे जुने व्हिलन के. एन. सिंग; ‘गॉडफादर’मधली कोणतीही भूमिका, अशी खूप मोठी यादी देता येईल. वचने कीं दरिद्रता!
जुन्या काळात जाऊन सिनेमासृष्टीतल्या कोणा एका व्यक्तीला (तंत्रज्ञ/ लेखक-दिग्दर्शक/ संगीतकार/ गायक/ कलावंत.. कोणीही) जिवंत करण्याची शक्ती तुम्हाला मिळाली तर तुम्ही कोणाला जिवंत कराल?
किमया शिरगावकर, रत्नागिरी
– एकमेवाद्वितीय बाबुराव पेंटर.
सोशल मीडियावर हजारो मित्र असताना वास्तव आयुष्यात माणसं एकाकीच राहतात, वास्तवातल्या समस्यांशी एकाकीच झुंजावं लागतं, मग काय उपयोग या मैत्रीचा?
नामदेव शिंदे, करमाळा
– पण तुम्हाला कुणी सांगितलं की सोशल मीडियावर फ्रेंड लिस्टमध्ये असतात ते मित्र असतात म्हणून?
‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे,’ हे गाणं म्हणजे सरळसरळ प्रेयसीसमोर लांगुलचालन नाही का?
विघ्नेश कांबळी, चेंबूर
– लांगुलचालन हा शब्दच पूर्णपणे चुकीचा आहे. लोटांगण, किंवा आत्मसमर्पण, किंवा अक्कल गहाण टाकणे यापैकीच एखादा शब्द वापरता येईल..
मुलांना कोणत्या शाळेत घालावं? इंग्रजी माध्यमाच्या की मराठी माध्यमाच्या?
सारिका कुलकर्णी, हडपसर
– किमान सातवीपर्यंत तरी शिक्षण मातृभाषेतच द्यायला हवं.
लहानपणी आईआजीने सांगितलेल्या आणि आपण वाचलेल्या गोष्टींमधून कोणीतरी एक देव आवडीचा होतो. असा लहानपणापासून तुमचा आवडता देव कोणता आहे?
प्रथमेश पाटील, नवापूर
– भगवान श्रीकृष्ण