तिरकिट भूमय्या यांनी आत्तापर्यंत केलेल्या रेकॉर्डब्रेक कागदी बॉम्बस्फोटांमुळे अनेकजण घायाळ झाले असून ते दिवसाला एक असे सतराशे साठ कागदी बॉम्बस्फोट करून नंतरच चाळीस पोत्यांमध्ये कोंबून भरलेली पुराव्यांची झेरॉक्स कागदपत्रे कडक बंदोबस्तात वाजतगाजत आपल्या कार्यालयात घेऊन जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात विधीवत होम करण्यात येऊन तिथे स्वत: तिरकीट भूमैय्या पक्षकुटुंबासह आपल्या सुस्वर बोबड्या आवाजात मंत्रपठण करून पेटलेल्या होमात समिधा म्हणून ही कागदपत्रे एकामागून एक टाकत दुसर्या हाताने घंटानाद करतील. या अनौपचारिक कार्यक्रमाला दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे पक्षाचे मूळ नेते तसेच बाहेरून आत घेतलेले नेते होमाला पंचारती ओवाळत पक्षारती करतील. नंतर तिरकिट भूमैय्या तारस्वरात नेहमीप्रमाणे अडखळत आपल्या बोबड्या आवाजात आता तरी आपल्या कामगिरीची दखल घ्या, असे गार्हाणे पक्षनेतृत्त्वाला घालतील, असा मजकूर असलेले पत्रक मी ईडीच्या कार्यालयाजवळ घुटमळत असताना कोणीतरी माझ्या हातात कोंबले. ते वाचूनच मला त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक वाटले. या मजकुराच्या वर हेडिंगही छान होते. ‘तिरकिट भूमय्या यांच्या शुभकार्याचा इतिश्री होम. आमंत्रण.’
मी ताबडतोब माझा मानलेला परममित्र पोक्या याला मोबाईलवरून ही बातमी सांगितली, तेव्हा तो व्हिडिओ कॉलवर पोट धरून हसताना दिसला. तो म्हणाला, तू तिथे कशाला गेला होतास स्पायगिरी करायला? मी म्हणालो, तिरकिट भूमय्या ही त्यांच्या पार्टीतली किती मोठी असामी आहे हे तुला माहीत आहे का? अरे, देशाच्या मुख्यप्रधानांपेक्षा त्यांची झेड प्लस सुरक्षा किती मोठी आहे हे माहीत आहे का तुला? चक्क चाळीस सुरक्षा रक्षकांचा गराडा त्यांच्या भोवती असतो. सर्वांच्या हातात दंडुके नाहीतर मोठमोठ्या गन असतात. तिरकिट भूमय्या सकाळी उठल्यापासून शोधकार्याला लागतात आणि त्यांचे बॉडीगार्ड त्यांच्या मागून पुढून टेहळणी करत दुर्बिणीतून शत्रूचा अतिसूक्ष्म पद्धतीने शोध घेत असतात.. खरे तर तू त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मुलाखत घ्यायला हवीस.
घेतोच, असे म्हणत पोक्याने फोन ठेवला आणि पोक्या कामाला लागला. पोक्याने दुसर्याच दिवशी पहाटे चार वाजता त्यांना व्हिडीओ कॉल लावला. त्यावेळीही ते घरी त्यांच्या आतल्या गुप्त रूममध्ये कागदपत्रांच्या ढिगाची दोन भिंगांतून सूक्ष्म पाहणी करत होते. पोक्याबरोबर त्यांची जुनी जानपहचान आहे. अगदी आमच्या जुन्या धंद्यापासून. मी मात्र त्यांना सामोरे जायचे नेहमी टाळत आलो. पोक्याने त्यांच्या मुलाखतीची वेळ मागितल्यावर त्यांनी थोडे आढेवेढे घेत अखेर वेळ दिली. एका फाईव्ह स्टार हॉटेलात ही ऐतिहासिक मुलाखत झाली. तिचा गुप्त व्हिडिओ काढण्याची व्यवस्था पोक्याने केली होती. त्यामुळे मला त्यांनी ती मुलाखत सेंड केली. त्यातील हा काही भाग..
– नमो नम:. आपल्यावर ही शोधकार्याची जबाबदारी कोणी सोपवली?
– अर्थातच आमच्या दोन मोठ्या केंद्रीय नेत्यांनी. कोण ते तुम्हाला माहीत आहेत. कारण माझ्याशिवाय कोणीही ही कामगिरी नेट लावून, कष्टाने आणि अगदी खोलात शिरून करील याची खात्री त्यांना नाही.
– त्याची खात्री मला पण आहे. मागे तुम्ही खासदार असताना मेजर टेप लावून प्लॅटफॉर्मची उंची मोजताना मी पाहिले आहे.
– पण आताची गोष्ट वेगळी आहे. आता डिटेक्टिव्ह बनून फिरावे लागते. वेषांतर करावे लागते. कधी केळीवाला, रबडीवाला, चणे-कुरमुरेवाला, फुगेवाला, भांडीवाला, साडीवाला, खेळणीवाला, रद्दीवाला बनून नेत्यांच्या दारात जावे लागते. त्याशिवाय त्या नेत्यांच्या घराजवळ असलेल्या रद्दीवाल्याच्या दुकानात जाऊन, त्याला पटवून रद्दीत काही पुरावे मिळतात का हे शोधावे लागते. रस्त्यावर फिरून कचरा कुंड्यांतील कागद उचकटावे लागतात. आजपर्यंत मी चाळीस पोती भरतील इतके पुरावे गोळा केले. दिल्लीत फोन करून त्या प्रमुख दोन नेत्यांना सांगितले. त्यांनी ताबडतोब इडीकाडीवाल्यांना फोन करून या माणसाचा उपयोग करून घ्या असा सल्ला दिला. भली मोठी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था दिली. आता सगळे इडीकाडीवाले माझे मित्र झाले आहेत. मला तिथे मुक्तद्वार आहे.
– ते पुरावे खरेच खरे असतात काय? तसं नाही. मागे त्या दोन तीन प्रकरणांत तुम्ही दिलेले पुरावे बोगस निघाले होते आणि तुमची अवस्था दम-दमा-दम झाली होती. म्हणून म्हणतो.
– ते विसरा आता. आता पुरावे कसे तयार करायचे याचे तंत्र आणि मंत्र मला समजले आहे. म्हणून तर मी उद्या इडीकाडी कोणाला चौकशीला बोलावणार आहे हे आज सांगू शकतो. मी कुणाचा माणूस आहे त्यांना कळल्यावर कोणाला कसे घाबरवून सोडायचे हे मला माहीत आहे. तिरकिट भूमय्या बोले, इडीकाडी डोले ही सध्या स्थिती आहे.
– बरेच काय, चिक्कार लोक म्हणतात की, दुसर्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी हा सामूहिक ब्लॅकमेकिंगचा प्रकार सुरू आहे. तुमच्या पक्षात घाबरून ज्यांनी प्रवेश केला तो त्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणूनच ना?
– तसे मुळीच नाही. शेवटी आम्हाला पक्ष चारी बाजूंनी वाढवून गोलमटोल करायचा आहे.
– तरीही तुमच्या पक्षातील गडगंज मालमत्ता आणि संपत्ती असलेल्या एकाही नेत्याविरुद्ध तुम्ही इडीकाडीकडे तक्रार केली नाहीत, इतके तुमचे काही नेते आणि तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का? लोक म्हणतात, तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोठे नेते तुमचा वापर करून घेतील आणि नंतर तुमच्या हातात होमविधीला वाजवण्यासाठी घंटा देतील. मग बसा वाजवत.
– नाही हो. काहीतरीच काय बोलता. उलट मला हल्ली देशाचा सर्वोच्च नेता बनलो असल्याची स्वप्नं पडतात आणि मी जागा होतो. सार्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष मी पत्रकार परिषदेत उद्या कोणाकडे कागदी बॉम्बस्फोट होणार आहे ते नाव जाहीर करतो याकडे लागलेले असते. याला कसे कळते बुवा, असा प्रश्न सर्वांना पडतो. अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यानेही मला निमंत्रित केले आहे. चला निघतो मी. रद्दी गोळा करायची वेळ झाली.