निवडणुका जवळ आल्या की सर्वच सत्ताधारी राजकीय पक्षांना ‘भाकरी फिरवण्या’चे वेध लागतात. मंत्रीपदं उपभोगणार्यांमध्ये काहीसं शैथिल्य आलेलं असतं. काही थेट अकार्यक्षमच असतात, एखाद्या समीकरणाच्या पूर्ततेसाठी पदावर बसवलेले असतात. सरकार कोणाचंही असो, जनतेत आपोआपच त्याच्याविषयी एक रोष तयार झालेला असतो. निवडणुकीत तो राग मतपेटीतून व्यक्त होणे टाळण्यासाठी अचानक मुख्यमंत्रीच बदलले जातात, काही मंत्री बदलले जातात, नवं काहीतरी करतो आहोत, असं दाखवलं जातं. सत्ताकाळात काही जातीय समीकरणं बिघडलेली असतात, ती ठीकठाक केली जातात.
हे अलीकडे दोन राज्यांमध्ये घडलं.
एक होतं गुजरात. दुसरं होतं पंजाब.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं. अमरिंदर यांनी अतिशय खमकेपणाने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं, हे त्यांचं मोठं काम. पण त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू या वाचाळ, उथळ नेत्याची वर्णी लागल्यापासून ते अस्वस्थ होते आणि तो कॅप्टन अमरिंदर यांच्यासाठी एक इशाराच मानला जात होता. त्यांच्यावर दिल्लीत पक्षश्रेष्ठीही नाराज होते आणि ८०पैकी ५० आमदारांनीही अमरिंदर यांच्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली होती, असं सांगितलं जातं. परिणामी ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांना हटवण्यात आलं. कॅप्टन अमरिंदर यांनी काही स्वखुशीने राजीनामा दिलेला नाही. त्यांना जायला सांगण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलनाची हाताळणी, एकंदर सुस्त प्रशासन आणि फार्म हाऊसेसवरून चालणारं राजकारण ही त्यामागची कारणं आहेत असं सांगितलं जातं. शहीदांचं धगधगतं स्मारक असलेल्या जालियानवाला बागेचं रूपांतर ‘मज्जा नी लाइफ’ टाइप पर्यटनस्थळामध्ये करण्याच्या केंद्र सरकारच्या कल्पनेलाही त्यांनी पाठिंबा दिला होता. अमरिंदर यांनी राजीनामा दिल्यानंतर सिद्धू यांच्यावर तोफ डागली आहे आणि सिद्धू यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा यांच्याशी संबंध असल्यामुळे त्यांना देशद्रोहीही संबोधलं आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची घोडदौड सुरू आहे. दिल्लीतल्या सुशासनाचा लाभ शेजारच्या पंजाबमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. या पक्षाला रोखण्यासाठी पंजाबमध्ये नेतृत्त्वबदल आवश्यक होता आणि तो केल्याने काँग्रेसला प्रतिमा सुधारण्यासाठी आता किमान तीन महिन्यांचा काळ मिळेल. त्यात काँग्रेसने पंजाबमध्ये ३२ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित शीख समुदायातील चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून या वर्गाला प्रथमच हे पद दिलं आहे. कॅप्टन अमरिंदर यांच्या गच्छंतिच्या क्षणापासूनच राष्ट्रीय माध्यमांमध्ये काँग्रेसला याचा फायदा मिळेल की ही काँग्रेसची राजकीय आत्महत्या ठरेल, यावर घमासान चर्चा सुरू होती,
टॉक शो चालले होते, मुलाखतीही प्रसृत झाल्या…
…पंजाबच्या आधी गुजरातमध्ये असाच सत्तापालट घडून आला…
…तिथले माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याविरोधात पक्षात नाराजी होती, अशा बातम्या कुठे वाचनात आल्या नव्हत्या. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी किंवा आमदार नाखूष आहेत, अशीही चर्चा नव्हती. त्यांनी कोविड परिस्थितीची हाताळणी फारच वाईट केली म्हणून त्यांना जावे लागले, अशी चर्चा कुजबूज आघाडीकडून पसरवली गेली. कोविड हाताळणीतल्या अपयशाची क्रमवारी लावायची झाली तर एक ते १० क्रमांकांवर खुद्द पंतप्रधान मोदीच विराजमान असतील आणि ११व्या क्रमांकावर असतील उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ… त्यामुळे कोरोना हाताळणीमुळे त्यांना जावं लागलं याइतकं हास्यास्पद स्पष्टीकरण दुसरं नसेल.
गुजरातमध्ये निव्वळ मुख्यमंत्रीच बदलले गेले नाहीत तर अख्खंच्या अख्खं मंत्रिमंडळच बदललं गेलं. उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. त्यांना थेट साध्या आमदारपदापर्यंत मागे जावं लागलं. आता मुख्यमंत्रीही नवखे आणि मंत्रिमंडळातले बहुतेक सहकारीही नवखे. अनेक जण तर पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांना एकदम मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
रूपानी यांची नेमकी काय चूक होती म्हणून त्यांना जावं लागलं? त्यांचं सगळंच्या सगळं मंत्रिमंडळ इतकं अकार्यक्षम होतं का की ते सगळं एकजात एकदम घरी बसवलं गेलं? मग इतके दिवस ते सत्तेत कसे राहिले? नितीन पटेल यांचा नेतृत्त्वासाठी विचार का झाला नाही? कोणालाच माहिती नसलेल्या भूपेंद्र पटेल यांना थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी का आणि कशी लागली? सर्वसामान्य माणसाला हे प्रश्न पडतात. पण देशातल्या प्रमुख प्रसारमाध्यमांना, मुलाखतबाजांना हे प्रश्न पडताना दिसत नाहीत. राजकीय विश्लेषक त्याची चीरफाड करताना दिसत नाहीत, मुलाखती नाहीत, टॉक शो नाहीत, काही नाही. काँग्रेसमध्ये कसं प्रादेशिक नेत्यांचं खच्चीकरण केलं जातं, केंद्रीय नेतृत्त्वाला आव्हान देण्याची क्षमता नसलेल्या दुबळ्या नेत्यांना पुढे आणलं जातं, यावर तासन्तास घसे खरवडणार्यांना गुजरातमधला धक्कादायक बदल खटकत तर नाहीच, तो मास्टरस्ट्रोक वाटतो… मोदींनी गुजरातमध्ये भाकरीच फिरवली नाही तर तवाच फिरवला, वा मोदीजी वा!
अर्थात मोदींच्या वाढदिवसाला अडीच कोटी नागरिकांचं विक्रमी लसीकरण करण्यासाठी आधी कित्येक दिवस जीवनावश्यक लसीकरण बंद पाडून लसी साठवल्या गेल्या, या अश्लाघ्य आणि असंवेदनशील प्रकाराचा ज्यांना जाब विचारावासा वाटत नाही, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार? यांना झुकायला सांगितले की हे थेट रांगायलाच लागतात, हे मोदींमुळे आम जनतेला कळले आहे. त्याबद्दल मनापासून थँक यू मोदीजी!