अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवी-मंगळ-बुध कन्येत, शुक्र तुळेत, केतू-गुरु-शनी-प्लूटो (वक्री) मकरेत, चंद्र सप्ताहाच्या सुरुवातीस बुध, त्यानंतर मकर, मीन आणि सप्ताहाच्या अखेरीस वृषभेत, बुध सप्ताहाच्या अखेरीस तुळेमध्ये.
दिनविशेष – १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी. २४ संकष्टी चतुर्थी.
—-
मेष – येत्या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राशीस्वामी मंगळाचे षष्ठातले भ्रमण आरोग्याच्या तक्रारी वाढवणार आहे. खासकरून अग्नीपासून सावधानता बाळगावी लागेल. डोकेदुखीची समस्या राहील, ज्या मंडळींना अर्धशिशीचा त्रास आहे, त्यांनी काळजी घ्यावी. दशमातले वक्री गुरू-शनी, प्लूटोचे भ्रमण यामुळे व्यवसायासंदर्भात काही समस्या निर्माण होतील, पण त्यामधून मार्ग निघेल. सप्तमातील स्वराशीचा शुक्र त्यामुळे वैवाहिक सौख्य आणि आनंद मिळेल.
वृषभ – तुमच्यासाठी हा आठवडा आनंदाची पर्वणी घेऊन येणार आहे. राशीस्वामी शुक्राचे तुळेतील भ्रमण शुभदायक राहणार आहे. योगकारक शनीबरोबर मकरेतले गुरुभ्रमणामुळे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. रवी-मंगळ-बुध गुरू-शनि यांचे होणारे नवपंचम योग तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहेत. इंजिनियर, बांधकाम व्यवसायिक यांना हा आठवडा विशेष लाभदायी राहणार आहे. शिक्षणक्षेत्राशी संबधित व्यक्तींना शुभकाळ आहे. विद्यार्थीवर्गास हा आठवडा अतिशय अनुकूल काळ राहणार आहे.
मिथुन – कुटुंबात काही कुरबुरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. सुखस्थानातल्या मंगळाचे राश्यांतर, त्यातच १७ सप्टेंबरपासून राश्यांतर करून आलेला रवी यांच्या भ्रमणामुळे हा त्रास ओढवणार आहे. वडील, बंधू-भगिनी यांच्याबरोबर वादविवाद, वैवाहिक संबंधांमध्ये मतभेद होणार नाहीत याची काटेकोरपणे काळजी घ्या. पंचमातील स्वराशीचा शुक्र हितसंबंध जपण्यासाठी धावून येईल, यामध्ये शंका नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क – काही करून दाखवायचे असेल तर त्यासाठी हा चांगला काळ आहे. ग्रहांची चांगली साथ मिळणार आहे. त्यामुळे काही शुभयोग जमून येतील, त्यामुळे हा आठवडा संस्मरणीय राहणार आहे. सुखस्थानातील मालव्य योगातील शुक्र नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी अतिशुभ आहे. पराक्रमस्थानातले मंगळ-रवी साहस करायला लावणार आहे. काहीही विचार न करता निर्णय घेण्याचा हा काळ आहे.
सिंह – राशीस्वामी रवीचे कन्येतील राश्यांतर, सोबत मंगळ आणि बुध त्यामुळे शब्द वापरताना जरा जपून. रवी-मंगळ हे दोन ग्रह वाचास्थानात आहेत, त्यामुळे बोलताना नुकसान होऊ शकते. सुखस्थानातले केतू आणि दशमातील राहू यामुळे हमखास वाईटपणा आणण्याचे प्रसंग ओढवू शकतात. महिलांना ओटीपोटाचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नवीन कामाच्या संधी मिळू शकतात. नोकरदारांना थोडा त्रास होईल.
कन्या – येत्या आठवड्यात काही मनाविरुद्ध घटना होईल, त्यामुळे डोके गरम राहणार आहे. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. परिस्थती कशामुळे निर्माण झाली आहे त्याचा विचार करा आणि प्रकरण फार न ताणता लवकर सोडवण्याचा निर्णय घ्या. स्वादिष्ट आणि मिष्टान्ने मिळण्याचा योग्य आहे. शनी-मंगळाची सप्तमावरील दृष्टी यामुळे वैवाहिक जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. षष्ठातल्या चंद्रामुळे सर्दी-पडसे-कफ याचा त्रास होऊ शकतो.
तूळ – या आठवड्यात खर्च वाढणार आहे. शनी-मंगळाची षष्ठस्थानावरील दृष्टी त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. औषधोपचारवर पैसे खर्च होतील. सुखस्थानात गुरु-शनी-प्लूटो यामुळे आनंदावर विरजण पडणार आहे. व्यवसायात नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन निर्णय घ्या. कामगारांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्वराशीतील शुक्र उच्चीचा असल्यामुळे एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा योग आहे.
वृश्चिक – राशीस्वामी मंगळाचे लाभातील भ्रमण अनपेक्षित लाभ मिळवून देणारे. नोकरी करणार्या मंडळींना पगारवाढ, बढती मिळण्याचे योग आहेत. काहीजणांची घरापासून दूर बदली होऊ शकते. राजकीय व्यक्तींना हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. व्ययस्थानातील स्वराशीचा शुक्र अडचण असताना एखादी महागडी वस्तू खरेदी करायला लागू शकते. शुक्र-चंद्र नवपंचम योगामुळे आठवड्याच्या सुरवातीस आनंद देणारा राहणार आहे.
मकर – गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारी घुसमट आता हळूहळू कमी होणार आहे. योगकारक शुक्राचे योगातले भ्रमण कौटुंबिक स्वास्थ्य आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक घटना घडवणारे ठरणार आहे. भाग्यस्थानातले रवी-मंगळ-बुधाचे भ्रमण, शनी-गुरू बरोबर होणारे नवपंचम योग यामुळे जुने एखादे रेंगाळलेले काम मार्गी लागेल.
धनू – या आठवड्यात चांगले आर्थिक लाभ होतील. त्यामुळे हा काळ खूपच शुभ राहणार आहे. दशमात राश्यांतर करून आलेल्या रवी-मंगळामुळे प्रतिष्ठा वाढणार आहे. ब्युटी पार्लर, कापड व्यवसाय करणार्यांना मोठा फायदा मिळू शकतो. शुक्र-चंद्र नवपंचम योग्य, रवी-मंगळ-बुध-गुरु-शनी यांचा नवपंचम योग यामुळे समय होत बलवान, मनुष्य न होत बलवान याचा अनुभव तुम्हाला येणार आहे.
कुंभ – देवकार्य करण्यासाठी अनुकूल काळ आहे. कामासाठी बाहेर पडत असताना काळजी घ्या, नाहीतर चुकून एखाद्या आजाराला निमंत्रण मिळेल. रक्तदाब असणार्य्ाा मंडळींनी दगदग होईल असे काम करणे टाळावे. आर्थिक आवक चांगली राहील. एखादी नवी गुंतवणूक करण्याचा विचार सुरू असेल तर पुढे जा. त्यामधून भविष्यात चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग.
मीन – राशीस्वामी गुरूचे वक्री लाभातील भ्रमण सोबत वक्री शनी आणि प्लूटो. आर्थिक आवक चांगली राहील. सप्तमातील रवी-मंगळ-बुध जनसंपर्क वाढवण्यासाठी अनुकूल. राजकीय व्यक्तींना शुभ काळ. अग्नी तत्वाचे दोन ग्रह उन्माद वाढवतील. त्यामुळे मीपणाचा अहंकार टाळा. अन्यथा त्रास होईल. विद्यार्थीवर्गासाठी शैक्षणिकदृष्टया मनासारखा काळ आहे.