सहा ते चौदा वयाची मुले प्राथमिक शाळेत जायची. सातवीतले मुलगे मिसरुड फुटलेले तर काही मुली साड्या नेसलेल्याही असायच्या. प्राथमिक शाळेत येणारी काही मुले तीन-साडेतीन मैलांवरूनही चालत यायची… आमच्या परिसरातली सर्वात जवळची, तालुक्यातील तिसरी इंग्रजी शाळा जैतापूरला होती. मिठगवाणे गावातून एक देसाई कुटुंबातला मुलगा (पुढे जागतिक-आशिया बँकेचा बडा अधिकारी झाला) दररोज जैतापूरला जायचा. अंतर तीन साडेतीन मैलांचे. त्याने अकरावीला मुंबई गाठली. एवढे अंतर चालून प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलेही होती.
—
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ग्रामीण महाराष्ट्रात ‘व्हर्नाक्युलर फायनल’ हा इंग्रजी शब्द मराठीतल्या सातवीपेक्षा अधिक परिचित होता. सात यत्ता पास हे जणू उच्चशिक्षण समजलं जायचं. ग्रामीण भागातल्याच नव्हे तर मुंबई शहरातही प्राथमिक शाळेतले शिक्षक सातवी पास असायचे. रत्नागिरी जिल्हा शिक्षणात पुढारलेला समजला जायचा. गाव क्षेत्रफळाने व वस्तीने मोठा असेल तर चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा त्या गावात असायची. आजूबाजूच्या छोट्या गावातल्या मुलांच्या नशिबी पायपीटच. मध्यम वस्तीच्या गावांना चौथीपर्यंतची शाळा मंजूर झाली की पालकांना हायसे वाटायचे. बंद पडलेल्या घरा-गोठ्यात वा दुकानात शाळा सुरू व्हायची. शाळेला स्वतंत्र इमारत ही अपूर्वाईची गोष्ट होती. पूर्ण प्राथमिक शाळा असा फलक लागायचा तो सातव्या इयत्तेपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या शाळांवर. वर्ग सात असले तरी शिक्षकांची एकूण संख्या चार. क्वचित पाच. आमच्या प्राथमिक शाळेतला एक वर्ग वटवृक्षाखाली तर दुसरा जवळच्या देवीच्या देवळात.
या अशा शाळांचे ‘हेड मास्तर’ हे सर्रास सातवी पासच असायचे. सातवी हेच जणू उच्चशिक्षण समजले जात होते. पोस्टातून येणारी तार इंग्रजीत असायची, दोन-चार गावातूनही ती तार वाचू शकेल अशी व्यक्ती अभावानेच भेटायची.
रत्नागिरीतला राजापूर तालुका हा मागासलेला समजला जायचा. मोठमोठे कातळी सडे, सलगता विभागणार्या गावागावात शिरलेल्या खाड्या, जमिनीची खारटाणं झालेली, अपुरी भातशेती त्यामुळे जेमतेम चार यत्ता झाल्यावर किंवा शाळेचे तोंडही न पाहिलेले झिलगे (मुलगे) मुंबईला पोट भरण्यासाठी जायचे. परिणामी गावची लोकसंख्या कधी वाढायचीच नाही. अशाच एका प्राथमिक शाळाही नसलेल्या जानशी गावातल्या व परिसरातल्या विद्येसाठी पायपीट केलेल्यांची ही हकीकत आहे.
१९५२ साली आमच्या आसपास सातवीपर्यंतच्या तीन शाळा होत्या. जैतापूर, अणसुरे आणि गंगाराम गवाणकरांचे माडबन ही ती तीन गावे. चालण्याशिवाय विद्यार्थ्यांना दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. जानशी ते राजापूर हे अंतर पायवाटेने (मध्ये एक डोंगर, गावची नदी खाडी पार करून) सोळा मैल. कामानिमित्त सकाळी निघून सायंकाळपर्यंत बत्तीस मैल चालून घरी येणार्या मोजक्या व्यक्ती होत्या. जैतापूरला परिसरातली मुख्य टपाल कचेरी. दहा-वीस गावची पत्रे बटवडा करणारा ‘रनर’ अनेक गावच्या टपालपिशव्या एका भल्यामोठ्या थैलीत भरून खांद्या-पाठीवर टाकून जाताना दृष्टीस पडायचा. पोस्टमनसुद्धा पायपीट करतानाच दिसायचा. सहा ते चौदा वयाची मुले प्राथमिक शाळेत जायची. सातवीतले मुलगे मिसरुड फुटलेले तर काही मुली साड्या नेसलेल्याही असायच्या. प्राथमिक शाळेत येणारी काही मुले तीन-साडेतीन मैलांवरूनही चालत यायची… आमच्या परिसरातली सर्वात जवळची, तालुक्यातील तिसरी इंग्रजी शाळा जैतापूरला होती. मिठगवाणे गावातून एक देसाई कुटुंबातला मुलगा (पुढे जागतिक-आशिया बँकेचा बडा अधिकारी झाला) दररोज जैतापूरला जायचा. अंतर तीन साडेतीन मैलांचे. त्याने अकरावीला मुंबई गाठली. एवढे अंतर चालून प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलेही होती. पाचवीसाठी मुंबई गाठणारी मुले जवळ जवळ नव्हती. शेतकरी असलेल्या कुणबी समाजातील बहुसंख्य मुलांचे शिक्षण चौथीनंतर बंदच व्हायचे. कुणबी मुलींपैकी कुणी (१९७०पर्यंत) सातवी झाली होती का, हा संशोधनाचा विषय आहे. मुलांपैकी फार थोडे सातवी गाठायचे. त्यातला एखादा पास झालाच तर गावात हिरो व्हायचा. या पार्श्वभूमीवर मी बाराव्या वर्षी (वर्गात सर्वात लहान) १९५७ साली चक्क सातवी पास झालो (तेरापैकी फक्त दोन जण पास). ब्राह्मण मुलांपैकीही सर्वजण पास होत होतेच असे नाही.
जैतापूरला चालत जाणार्या पहिल्या चार जणांच्या चमूतही मीच सर्वात लहान होतो. दीड तास सकाळी तेवढेच अंतर संध्याकाळी पायपीट करायची. ही होती पायवाटेने केलेली पायपीट. दोन घाट्या चढायच्या, दोन उतरायच्या. अंतर सणसणीत पाच-साडेपाच मैल. निळी हाफ-पँट पांढरा शर्ट. खांद्यावर दप्तर आणि पायात?… काहीच नाही. जैतापूरची आम्ही सर्व शाळकरी मुले अनवाणीच. संपूर्ण ग्रामीण भारत त्यावेळी अनवाणीच चालत होता! जानशी ते जैतापूर चालत जाणार्या आम्हा चौघांचे कौतुक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आम्ही दहीभातखाऊ ब्राह्मण घरातले विद्यार्थी होतो. वाटेत भेटणारी माणसे आमच्याकडे कौतुकाने बघायची. ‘बुका पडतत, शाळा शिकतत,’ असे म्हणत. दोन्ही हातांची बोटे वळवून कानाजवळ दाबून आमची दृष्ट काढीत. ‘न्यू इंग्लिश स्कूल जैतापूर’मध्येही आम्हा चौघांचा खास उल्लेख होई. जवळ राहणारा एखादा विद्यार्थी उशिरा आला तर ‘पाच सहा मैलांवरून जानशीतून मुले चालत आली, तुम्हाला काय धाड भरली,’ असे सुभाषित ऐकावे लागायचे. शाळेचा शेवटचा तास असायचा तो पीटीचा (शारीरिक शिक्षण, कवायतीचा). आम्हाला तो माफ होता. आमचा खास शैक्षणिक अधिकार! आम्हाला पायपीट करून लांबचा पल्ला गाठायचा असायचा म्हणून.
चांभारघाटी (होय. असेच जातीवाचक उल्लेख असायचे) चढून वर आलो की मार्गी तळ्याच्या आसपास जैतापूरचे बापूजी मांजरेकर नावाचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक खूप वेळा भेटायचे. डोक्यावर गांधी टोपी नि अंगात कोट. आम्हाला मिठी मारून आमची पाठ थोपटायचे. ‘शाळेचे नाव मोठे करा’ असा आम्हाला आशिर्वादरूपी संदेश द्यायचे. आणखी एक मैल-दीड मैल थोडं चाल्लं की सूर्य समुद्रात बुडायचा. मग आम्ही चालण्याची गती वाढवायचो. पोस्टाचा रनर सोडला तर कातळावरून चालताना चिटपाखरूही रस्त्यात सहसा भेटायचं नाही. गाईगुरंसुद्धा गोठ्यात गेलेली असायची. बोलता बोलता जोगळेकरांची चिरेबंदी घाटी यायची. ती उतरली की मिठगवाण्यातली हिरवी गार मळेशेती. ‘पोरांनो! जावा रे लौकर, न्हान दिवस (लहान) हत, येव काय पोचवूक? न्हाव्याच्या घाटयेत डबरे (मोठे खड्डे) पडलंत जपून जावा,’ कुणी अनोळखीही आमची काळजीपूर्वक चौकशी करायचा. या प्रेमाने आमचा ऊर भरून यायचा. आमची चाल अजून संपलेली नसायची. आमच्या खरीच्या गडग्याच्या आत आलो की हायसे वाटायचे. आपल्या हक्काच्या मालकीच्या जागेतून जाताना दमछाक झालेली असली तरी जीव भांड्यात पडल्याचे समाधान असायचे. करड गवताची खरी संपली की आमची आड यायची. आम्ही घाटीच्याजवळ आलो की जोरात कुकारा द्यायचो. तो आईला नि आजीला ऐकू जाईल इतक्या जोराने असायचा. आई जेवणाची तयारी करायची तर आजी खोबर्याच्या तेलाची वाटी नि मशेर्यातलं गरम पाणी घेऊन बसायची. आमचे हात-पाय-तोंड धुऊन झाले की आजी तेल लावलेल्या पावलांवर गरम पाण्याची धार धरून शेकायची. वळणारे पाय नि आलेला थकवा कुठल्या कुठे पळायचा. आईने वाढलेली ताटे तयार असायची.
जैतापूरला निघताना आजी हातावर एक आणा द्यायची. ‘दुपारी केळं खायला दिलेला आणा आहे,’ आई बजावायची. आम्ही ‘हो’ म्हणायचो. जेवताना आई केळं खाल्लं का असे विचारायची. आम्ही बरेचवेळा बाजारातली शेव खायचो. पण आईला उत्तर द्यायच्याऐवजी पोळी वाढायला सांगून वेळ मारून न्यायचो. आईला ही चोरी आमचे खिसे तपासताना कळायची. दुसर्या दिवशी आणा हातावर पडला की आई म्हणायची, ‘शेव चिवडा खाऊ नका. केळच खायचं.’ ‘होय’ आम्ही म्हणायचो.
जानशीच्या भटांच्या चार मुलांनी एक विक्रम पूर्ण केला. कुणीही शाळा अर्धवट न सोडता एक वर्ष विद्या पूर्ण केली. आमच्या या जानशी-जैतापूर पदयात्रेची प्रेरणा शेजारच्या गावातून बोलकी झाली. ‘धय भात (दही भात) खाणारी भटांची मुलं शिकतात, तुमका काय झाला?’ सातवी पास नापास हा प्रश्नच नव्हता. सातवीच्या परीक्षेला बसलेला कुणीही आठवीत जाऊ शकतो असा सैल नियम होता. जैतापूरला चालत जाऊनही शिक्षण करता येते हा आमचा आदर्श निर्विवाद होताच. झालेही तसेच. दांडे, पंगेरे, शिरसे, पठार, वाघ्रण, मिठगवाणे या पंचक्रोशीतून खेकड्याचा डेंगा मोडणारे, माशाच्या काट्याला न घाबरणारे, वेळ पडल्यास कोंबडी मारू शकणारे भंडारी, कुणबी, गावडा-मराठा, सोनारही जैतापूरला चालत जाऊ लागले. पाचच नव्हे तर सात आठ मैलही चालू लागले. आम्ही सुरुवात केली ती चौघांनी आता आम्ही एक डझन झालो. शिक्षण सर्व जातीत विस्तारले. ज्यांचे उत्पन्न वर्षाला नऊशे रुपयाच्या आत आहे त्यांना १९५९ साली फी-माफीचा कायदा झाला. कूळ कायदा १९५७ सालीच सुरू झालेला होता. शिक्षणाची दारेही आता सर्वांना खुली झाली, शिक्षण स्वस्त झाले. १९६०-६१ साली दांडे गावातून चक्क मुलींनी जैतापूरला चालत जाण्याचा निश्चय केला. अंतर आठ मैलाचे. या सर्वार्थाने सावित्रीच्या लेकी होत्या. आम्ही दररोज दहा अकरा मैल चालून ब्राँझचे मानकरी तर दररोज सोळा मैल चालून जैतापूरला चालत जाणार्या मुली सुवर्णपदकाच्या मानकरी ठरायला हव्यात. राजकारण्यांच्या डोळ्यात या मुलींनी झणझणीत अंजन घातले. हळुहळू आणखी एक इंग्रजी शाळा मध्यवर्ती ठिकाणी असावी हा विचार प्रभावी झाला. माडबनच्या तात्या चव्हाणांनी मुंबई सोडून राजापूरला राजकीय कार्यासाठी येण्याचा निर्णय घेतलेला होता. शैक्षणिक सोईसुविधा निर्माण करण्याचा त्यांनी निश्चत केला. निवड केली ती आमच्या जानशी गावाची. १९६७-६८ साली ‘साने गुरुजी विद्यामंदिर’ नावाने जानशीची माध्यमिक शाळा सुरू झाली. गोरे नावाच्या मुंबईकर कुटुंबियांच्या एका न वापरलेल्या दुमजली घरात.
मी तात्या चव्हाणांना १९७० साली प्रश्न विचारला, ‘भिकाजीराव, तुम्ही माडबन गावचे. शाळेसाठी तुम्ही आमचे जानशी गाव का निवडले?’ त्यावेळी भिकाजीराव चव्हाण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व एस.टी महामंडळाचे सदस्य झाले होते. ‘१९४२ साली मी रावसाहेब पटवर्धनांच्या बरोबर (अच्युतराव पटवर्धनांचे बंधू-मूळ गाव जानशीच) तुरुंगात होतो. त्यावेळी त्यांनी मला शिक्षणप्रसाराचे कार्य करण्याची सल्लावजा आज्ञा दिली होती. म्हणून रावसाहेबांच्या पूर्वजांच्या जानशी गावाची निवड केली. साने गुरुजी विद्यालय जानशी शाळा सुरू झाली. जैतापूरची आमची पायपीट अशी सर्वांना प्रेरणा देणारी ठरली.
आज राजापूर तालुक्यात सुमारे साठ माध्यमिक शाळा आहेत. दीड मैलावरच्या होळी गावातून जैतापूरला स्कुटी चालवत जाणार्या मुली मी काही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाहिल्या, तेव्हा खात्रीच पटली की विद्येसाठी होणारी जैतापूरची पायपीट आता बंद झाली आहे!
– राजा पटवर्धन
(लेखक कोकणातील प्रकल्पांचे अभ्यासक आहेत.)