जयंत पवार यांना गुरू, बापमाणूस वगैरे म्हटलं की ते त्याला नम्र नकार देतात. मी त्यांना ‘कॅटलिस्ट’ म्हणतो, कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणजे आपल्यातील बदलाला साहाय्य करणारा मोलाचा घटक. जयंत पवार असे कॅटलिस्ट आहेत, बदल आपल्यालाच करावा लागतो आणि काय बदल होतो? आपला सांस्कृतिक, वैचारिक विकास होतो, स्वभावात बदल होतो.
—
१९९८च्या काळात मराठी समाजावर गरिबीच्या गौरवीकरणाचे संस्कार होते, गरिबी चांगली आणि श्रीमंती वाईट, पैसा वाईट, श्रीमंती फक्त पापी मार्गानेच मिळवता येते, असं साहित्यातून, कलाकृतीतून आणि विचारवंतांच्या लेखांमधून वगैरे निर्देशित केलं जायचं. कॉर्पोरेट लाइफ म्हणजे गळेकापू स्पर्धा, बढती मिळवण्यासाठी गैरप्रकार करावे लागतात, असंही लिहून यायचं. आपल्याकडे लिहिले जाणारे चुकीचे विचार बदलायला हवेत, त्यांचा प्रतिवाद व्हायला हवा, ते समाजाकरता आवश्यक आहे अशी माझी धारणा झाली होती. १९९८मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं एक नवीन नाटक मी बघितलं. त्यातल्या कथानकाच्या एका भागावर माझा आक्षेप होता. तो त्यात कॉर्पोरेट लाइफचे वाईट चित्रण आहे, पापी मार्गानेच बढती मिळते असा त्यात सूर आहे इत्यादी. त्यावर आक्षेप घेणारा एक लेख किंवा टिपण मी लिहिलं. महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्रात त्यांच्या ऑफिसचे नंबर दिलेले असतात, त्या बोर्ड लाइनवर फोन करून मी जयंत पवार यांच्याबरोबर संपर्क साधला व त्यांच्याबरोबर बोललो. कोणत्याही प्रसिद्ध माणसांशी (सेलिब्रिटीशी) बोलण्याची माझी ही पहिलीच वेळ होती, त्यातून (माझ्या अतिशय आवडत्या) ‘अधांतर’च्या नाटककाराबरोबर म्हणून अगदी चाचरत बोललो. मी सांगितलं, ह्या अशा एका नाटकाविषयी मी काही लिहिलेलं आहे, तुम्हाला दाखवायला आणू का? त्यांचं तात्काळ उत्तर आलं त्या नाटकाविषयी ते स्वतः लिहिणार आहेत. मी म्हणालो, मी परीक्षण लिहिलेलं नाही, त्यातील एका वेगळ्या मुद्द्यावर लिहिलेलं आहे. ते म्हणाले, या घेऊन मग. लगेच ते लिहिलेलं घेऊन मी मटाच्या ऑफिसात हजर. कॉलेज सुटल्यानंतर पहिल्यांदाच मी मराठीत असं काही मोठं लिहिलेलं होतं, अक्षर फार गचाळ होतं, पण ते त्यांनी शांतपणे पूर्ण वाचून काढलं, मग मान वर करून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, कुलकर्णी, तुम्ही नाटक बघता का? त्या म्हणण्याचा खरा अर्थ होता नाटक-बिटक काही बघता का की कधीतरी एखादं बघितलं आणि घेऊन आलात ते? परंतु त्यांचा स्वर सौम्य, आणि सुदैवाने बिटवीन द लाइन्स किंवा सूचक बोललेलं मला कळत नसल्याने मी आपला साधा अर्थ घेतला आणि म्हणालो हो, बघतो ना. मग त्यांनी मला समजावून सांगितलं, ‘नाटककार पात्रांच्या तोंडून नाटकात जे बोलत असतो ते त्याचे विचार नसतात’. बघा, म्हणजे पहिल्या भेटीतच माझ्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली होती. त्यांनी जे सांगितलं ती खरंतर मूलभूत गोष्ट आहे. उदाहरणार्थ एखादा नाटककार नाटकात सनातनी पात्र आणून त्याद्वारे सनातन्यांचे विचार सांगेल, त्याकरवी अन्याय्य जुनाट रूढींचं समर्थन करेल, याचा अर्थ तो नाटककार सनातनी असेलच असं नाही, तो अंधश्रद्धाविरोधीसुद्धा असू शकतो आणि दुसरी बाजू दाखवून त्याचा प्रतिवाद करण्यासाठी त्याने हे पात्र निर्माण केलेलं असतं. गंमत अशी की नाटककार नाटकात पात्रांकरवी जे सांगतो ते त्याचे विचार नसतात हा मुद्दा नंतर मी लेखात लिहिला तेव्हा त्याला मान्यवर लोकांकडून दाद मिळाली. म्हणजे हा मूलभूत मुद्दासुद्धा अजून सगळीकडे पोहोचलेला नाही.
मी जे लिहिलेलं घेऊन गेलो होतो ते त्यांनी प्रसिद्ध केलं नाही तरीही बोलणं चांगलं झालं, त्यात काय चुकीचं आहे त्यांनी समजावून सांगितलं, मला एकदमच उडवून लावलं नाही त्यामुळे माझा हुरूप वाढला. तेव्हा मी एकदम भिडस्त, बुजरा, पण जयंत पवारही एकदम साधे. माझी भीड मग चेपली. त्याच सुमारास इंग्लिश येत नसल्यामुळे आपली मुलं मागे पडतात, त्यावर उपाय हवा असा एकाचा तळमळीने लिहिलेला लेख मटात प्रसिद्ध झाला. त्याच्या समर्थनार्थ मी ‘उत्तम इंग्रजी येणे हे काळाचीच गरज’ असा अठरा पानी लेख लिहिला आणि तो घेऊन पुन्हा जयंत पवार यांच्याकडे गेले. हा काही त्यांचा विभाग नव्हता आणि मी त्यांना एकदाच भेटलो होतो, तरीही त्यांनी आस्थेने इतका मोठा लेख पूर्ण वाचला. यात काही नवीन मुद्दे आहेत, म्हणाले आणि तिथे एकाकडे द्यायला सांगितला. एका माणसाने नवीन लिहायला सुरवात केली आहे जाणून त्याला हे त्यांचे प्रोत्साहन देणे नाही तर काय आहे? एका लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलेली अठरा पानं लेख म्हणून प्रसिद्ध होणं शक्य नव्हतं आणि पत्र म्हणूनही हे फार मोठं; पण बरीच काटछाट करून ते पत्र म्हणून २१ मार्च १९९८ला प्रसिद्ध झालं. तीच माझ्या लेखनाची सुरुवात. वाचकाचे पत्र म्हणून प्रसिद्ध झालं तरीही त्याला चांगली दाद मिळाली. इंग्लिश, उद्योजकता, आर्थिक संपन्नता असे काही (नेहमीचेच!) मुद्दे घेऊन मी काहीतरी सामाजिक काम करावं असं ठरवून प्रयत्न केले, त्यालाही जयंत पवार यांनी जोरदार पाठिंबा दिला. मराठी माणसाला उत्तम इंग्लिश आले पाहिजे याचा प्रचार करत होतो तेव्हा एका नावाजलेल्या वकिलांना भेटलो तर ते म्हणाले, हे कामकाजासाठी वगैरे आम्हाला इंग्लिश वापरावं लागतं, परंतु संस्कृत राष्ट्रभाषा झाली पाहिजे. मी हबकून जाऊन जयंत पवार यांना भेटलो तर ते शांतपणे म्हणाले, असे काही लोक असणारच. त्यातून मला कळलं आपल्याला कितीही चुकीचं वाटलं तरी विरोधी मत असणारे लोक असतात, पण त्यामुळे एकदम बावचळून जाण्याचं कारण नाही.
शोभा डे ह्या इंग्लिशमधून लिहिणार्या मूळ मराठी. त्यांच्या लिखाणाविषयी मराठी समाजात बरे मत नाही, त्याला दर्जा नाही असे ऐकू येते. मराठी समाजात त्यांचे लिखाण गांभीर्याने घेतले जात नाही, कधी चेष्टाही केली जाते. मीही तशीच काही कॉमेंट केली, तेव्हा ते म्हणाले त्या लेखनक्षेत्रात आहेत मीही लेखन करतो पण आमचं लिहिणं आणि विषय वेगळे आहेत इतकंच. यातून मला कळलं, उथळ शेरेबाजी करू नये, कोणाला कमी लेखू नये. अगदी सुरवातीच्या काळात नकळत हे लक्षात आणून दिल्यामुळे सवंगपणे कॉमेंट करण्याची सवय लागली नाही.
जयंत पवार यांच्याबरोबर ओळख झाल्यानंतर मी त्यांची समीक्षा अधिक बारकाईने वाचायला लागलो. आधी बहुधा घाईघाईने वाचणं व्हायचं, अर्थाकडे इतकं लक्ष नसायचं, त्याऐवजी वाचून त्यावर विचार करायचा, पुन्हा वाचून काढायचं हे सुरू केलं. त्यातून खूप शिकायला मिळालं. त्यांच्या समीक्षेत अनेक गोष्टी बारकाईने लिहिलेल्या असायच्या, चांगलं आहे ते का आहे, वाईट आहे ते का दिलेलं असायचं, कथानकातून नाट्य कसं घडवलेलं आहे, नाटक कसं उभं केलेलं आहे, ते दिलेलं असायचं, आपली कलेची जाणीव वाढण्यासाठी ते खूप उपयोगी असायचं. अनेकदा जयंत पवार यांची समीक्षा वाचून मी त्यांना फोन करायचो, त्यातून आणखी मुद्दे कळायचे. ‘त्या एका वळणावर’ व ‘जाता नाही जात’ या दोन नाटकांची त्यांची समीक्षा वाचल्यावर तर मला इतका आनंद झाला होता, त्यांना मी फोन करून सकाळ प्रसन्न केली सांगितलं होतं, असं आठवतं. मी नाटक बघितले, चांगले पुस्तक वाचले की त्यांना फोन करायचो, त्या बोलण्यातूनही माझी समज वाढायची. माहीमला आविष्कारची प्रयोगिक नाटकं बघायचो तेव्हा आमची गाठ पडायची. मग जाताना लोकलमध्ये एकत्र जाणं व्हायचं, त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचा पास असायचा, पण माझ्यासाठी सेकंड क्लासमध्ये ते येत. तेव्हाही लोकलच्या गर्दीत आहे माझी अखंड बडबड सुरू असायची आणि ते काही त्याविषयी सांगत असायचे. कधी त्यांना घरी जाऊन भेटायचो. असं त्यांच्या समीक्षा वाचत, त्यांच्याशी बोलत बोलत माझी कलाविषयक जाणीव वाढली, समृद्धता मिळाली, वैचारिक विकास झाला आणि ओघानेच माणूस म्हणूनही समज वाढली. अनेक वर्षे आमच्या बोलण्यात कला-साहित्य हेच विषय असायचे, वैयक्तिक नाहीच, कारण त्यांच्याकडून ज्ञान मिळत आहे तर इतर गोष्टींवर बोलण्यात तो वेळ का खर्च करायचा असं वाटायचं.
नंतर एकदा भांडवलशाही व समाजवाद-मार्क्सवाद दोन्ही अर्थव्यवस्था योग्य नाहीत असं जयंत पवार यांच्याबरोबर बोलणं झालं, तेव्हा त्यांनी लेख द्या सांगितलं, त्यातून ‘हवा अर्थव्यवस्थेत तिसरा पर्याय’ हा माझा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये जानेवारी २०१३ला प्रकाशित झाला. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या जीवनावर आधारित ‘द आयर्न लेडी’ सिनेमा आला, त्याबाबत जयंत यांच्याबरोबर बोलताना मी म्हणालो, थॅचर यांनी तोटा होत आहे म्हणून वीस कोळसा खाणी बंद करण्याचा निर्णय १९८४ साली घेतला आणि त्यामुळे वीस हजार कामगारांच्या नोकर्या जाणार म्हणून कामगारांनी संप केला, हिंसक निदर्शने केली. मी कुठे जाणार हे ओळखून जयंत म्हणाले, आपल्याकडे गिरणी कामगारांचा संप सुरू झाल्यावर तो बराच काळ चालणार हे दत्ता सामंत यांना माहीत होतं, त्यांनी कामगारांना गावी जायला सांगितले, त्यामुळे आपल्याकडे हिंसा झाली नाही.
बरेच लेख लिहिल्यानंतर आणि आर्थिक विषयांवर लिहिल्यानंतर एकदा मला कथाकल्पना सुचली. त्यावेळेस माझ्या डोक्यात अशी रम्य कल्पना असायची की आपण काही कन्सेप्ट सांगितला की लेखक त्यावर कथा लिहू शकेल- त्यांच्याच नावाने अर्थात- तर कन्सेप्ट मी जयंत पवार यांना सांगायला महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथल्या गेस्ट रूमच्या गर्दीत तिथेच त्यांना कन्सेप्ट सांगितला. ते म्हणाले, चांगला आहे, कथा होऊ शकेल, तुम्हीच लिहा. तेव्हापर्यंत कथा वगैरे काही लिहिण्याचा विचार कधी केला नव्हता, जमेल असेही वाटले नव्हते. कथा लिहिण्याचा प्रयत्न करून ते (ज्येष्ठ लेखक) वसंत नरहर फेणे आणि जयंत पवार या दोघांनाही पाठवलं. जयंत म्हणाले, हा नुसताच आराखडा वाटतोय. मग पुन्हा दुरुस्त करून पाठवलं तेव्हा ते म्हणाले आता थोडं बरं झालं आहे, पण अजूनही आराखडाच वाटतोय, त्यात भावना ओता आणि असं करून ‘द एचएनआय’ ही माझी पहिली कथा २००६ साली तयार झाली. ती काही लोकांना आवडलीसुद्धा आणि पुढे मी आणखी सहा कथा लिहिल्या. त्यातली ‘सभ्य असभ्य’ ही कथासुद्धा त्यांनी दोनदा वाचून त्यात दुरुस्ती सुचवली. एक दीर्घांक लिहिला होता, त्यात काही बदल सुचवले आणि एक दोन अंकी नाटक लिहिलं, ते स्क्रॅप करा असं सांगितलं! आर्थर मिलर हा नाटककार हेही माझे दैवत. आर्थर मिलर व दिग्दर्शक इलिया कझान यांच्यावर एक मोठा लेख मी लिहिला तो जयंत यांच्या प्रोत्साहनांनतर व त्यांना तो खूप आवडला.
त्यांच्याविषयी मला आदर आहे, मी त्यांचा चाहता आहे त्यांना माहीत होतं, पण मी कधी प्रत्यक्ष बोलून सांगितलं नव्हतं. एकदम २०१३मध्ये मी ‘टाकसाळ निर्माण’ हे माझे पुस्तक त्यांना देताना त्यावर गुरुवर्य जयंत पवार यांना असे लिहीले, ते वाचून तेव्हाच ते मी गुरू नाही म्हणाले, मेलनेही कळवलं. कोणी त्यांना गुरू, बापमाणूस वगैरे म्हटलं तर ते फारं संकोचून जात. प्रयोग मालाड या संस्थेतर्पेâ एकाच लेखकाच्या एकांकिकांचा दोन दिवस महोत्सव असतो, त्यात २०१८मध्ये जयंत पवार यांच्या एकांकिकांचा महोत्सव झाला. तिथे त्यांच्या सत्कारप्रसंगी दोन मिनिटं बोलायची संधी मी साधली, तेव्हा म्हटलं जयंत पवार यांना गुरू, बापमाणूस वगैरे म्हटलं की ते त्याला नम्र नकार देतात. मी त्यांना
‘कॅटलिस्ट’ म्हणतो, कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणजे आपल्यातील बदलाला साहाय्य करणारा मोलाचा घटक. जयंत पवार असे कॅटलिस्ट आहेत, बदल आपल्यालाचा करावा लागतो आणि काय बदल होतो? आपला सांस्कृतिक, वैचारिक विकास होतो, स्वभावात बदल होतो.
२८ जुलै २०२०ला जयंत यांच्यासोबतचा माझा फोटो मी डीपी (डिसप्ले प्रोफाइल) म्हणून फेसबुकवर ठेवला, तेव्हा एकच वाक्य लिहीलं होतं, ‘माझ्यात जे चांगलं आहे, ते जयंत पवार यांचं आहे’. त्यावर त्यांनी म्हटलं, ‘हा तुमचा चांगुलपणा. तुमच्यात बरेच चांगले गुण आधीपासूनच होते जे माझ्यात नाहीत’. काही अंशी हे मान्य करूनही एक गोष्ट नक्कीच, जयंत पवार यांच्याबरोबर भेट झाली नसती तर माझ्यातील ते गुण सुप्तावस्थेतच राहिले असते.
(लेखक व्यक्तिगत अर्थव्यवस्थापनाचे मार्गदर्शक आणि मर्मज्ञ रसिक आहेत.)
(‘अधांतर’ नाटकाविषयीच्या आगामी पुस्तकातून)