मराठी व्यावसायिक नाटकं, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा करीत करीत वाड्या सर्वत्र संचार करीतच राहिला.
लॉकडाऊनच्या काळात नाटके बंद असली तरी ओटीटीवरच्या सिरीजनी अनेक रंगकर्मींना ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्यस्त ठेवले. त्यातही वाड्या होता आणि आहे. लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या अनेक बॅकस्टेजवाल्यांच्या मदतीसाठी वाड्या धावून गेला. जयवंत वाडकर हा कितीही परोपकारी असला, कितीही सामाजिक भान ठेवणारा असला तरी त्याच्यातल्या अभिनेत्यामुळे तो सतत कार्यरत असतो. कधी स्वस्थ बसत नाही. त्याचा संपर्क दांडगा आहे…
—-
‘ए…ऽऽऽ कोनाय बेऽऽऽ…
खाचाखच भरलेले साहित्य संघ मंदिर नाट्यगृह .. उन्मेष आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, १९७८ वगैरे साल असावे. कोणत्यातरी एकांकिकेला, कोणत्यातरी कॉलेजची मुलं हुटआउट करीत होती.
आणि त्या काळोखात तो आवाज घुमला… ‘ए…ऽऽऽ कोनाय बेऽऽऽ… त्या भारदस्त आवाजाचा मुलगा… चांगला हट्टाकट्टा… स्थूलसा, रंग काळा सावळा, कानात भिकबाळी, खांद्यावर झोळी, आणि ‘इन’ केलेला कॉलरवाला टी शर्ट. एकटा त्या गोंधळ घालणार्या मुलांमध्ये घुसला, त्यातल्या एकाला त्याने खेचून बाहेर काढले आणि ओढत ओढत बाहेर नेले आणि धू धू धुतला…
त्यानंतरच्या प्रत्येक एकांकिकेला हुटआउट होणं बंदच झालं होतं.
त्या भिकबाळीवाल्या भारदस्त आवाजाच्या मुलाचं नाव होतं… जयवंत वाडकर… ‘त्या पहिल्याच दणदणीत यशानंतर जयवंतच्या अंगात जो एक स्वयंसेवक घुसला तो आजतागायत कायम आहे. आज जयवंत वाडकरचा संचार नाट्य-चित्रपटसृष्टीत एक हवाहवासा वाटणारा मित्र किंवा जगन्मित्र म्हणून सर्वत्र असतो… जणू ‘वाड्या सर्वत्र पूज्यते…’
गिरगावच्या चिराबाजार लेनमध्ये वाडकर कुटुंबात जन्मलेला जयवंत आज सर्वत्र ‘वाड्या’ या नावाने ओळखला जातो. वडील नेव्हल डॉकमध्ये मोठ्या पदावर होते. आणि आईची चिराबाजार मार्केटमध्ये माशांची पाटी लागायची. रोज सकळी सात वाजता ताजी समुद्रातली मासळी सरळ त्यांच्या पाटीवर यायची आणि सकाळी साडेनऊपर्यंत ती संपवून आई १० वाजेपर्यंत घरीसुद्धा यायची.
गिरगावात वाढलेल्या मुलांच्या पायात एक वेगळाच चळ असतो आणि अंगात एक वेगळीच रग असते. या दोन्ही गोष्टी वाड्याच्या अंगात पुरेपूर भरल्या होत्या. लहानपणापासून काहीतरी वेगळे उद्योग करणे त्याला चांगलेच जमत होते. वाडीतल्या नवरात्री उत्सवात जयवंत कुठून तरी हाताने फिरवायचा प्रोजेक्टर घेऊन यायचा आणि मित्रमंडळी गोळा करून त्यावर ८ एमएममधले सिनेमे दाखवायचा. गणपतीत छोट्यामोठ्यांच्या नाटुकल्यांमध्ये भाग घेऊन त्यातला मेन रोल आपल्याला कसा मिळेल याची व्यवस्था करायचा. शिवाय आवाज, आक्रमकता आणि सुदृढ शरीरयष्टीमुळे कोणाचे त्याच्यासमोर काही चालायचे नाही. गल्लीत क्रिकेट खेळता खेळता तो हिंदू जिमखान्यात क्रिकेट शिकायला जाऊ लागला. तिथे त्याचे कोच होते ज्येष्ठ भारतीय खेळाडू विनू मांकड. मांकड सरांचा तो आवडता बोलर होता. अंडर-१४च्या टीममध्ये त्याचे सिलेक्शनही झाले होते. मुंबईतर्फे तो खेळलाही. नंतर पुढच्या काळात सिद्धार्थ
कॉलेज आणि बँक ऑफ इंडियाच्या टीममध्येही होता. हिंदू जिमखान्यात नेट प्रॅक्टिस चालायची, तिथे सुनील गावस्कर, मिलिंद रेगे वगैरे यायचे. मग विनू मांकड सर आपल्या क्लासमधल्या वाड्याला सांगायचे, ‘ए, जयवंत, जिमखान्यावर जा, तिकडे सुनील आलाय नेटमध्ये, त्याला बोलिंग टाकायला जा…’ मग जयवंत धावत पळत तिकडे जाऊन गावसकरला नेटमध्ये बोलिंग करीत असे. पुढे काही वर्षांनी एका समारंभात मिलिंद रेगे आणि सुनील गावस्कर यांनी जयवंतला अगदी चटकन ओळखले, याचा वाड्याला आजही खूप आनंद होतो.
खेतवाडीतल्या युनियन हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण करून सिद्धार्थ कॉलेजमध्ये गेल्यावर वाड्याच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले… क्रिकेट आणि बाकी सर्व गोष्टी बाजूला पडून नाटकात रस घेऊ लागला, कारण तिकडे त्याला भेटले हर्ष शिवशरण, प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, विजय पाटकर… आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिग्दर्शक सतीश पुळेकर. पुळेकरांनी सिद्धार्थतर्फे एकामागोमाग एक अशा जबरदस्त एकांकिका बसवल्या आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या मुलांना घेऊन अक्षरश: धमाल उडवली. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, वसंत सबनीस यांच्यासारख्या साहित्यिकांच्या विनोदी कथा रूपांतरित करून वेगवान दिग्दर्शनाच्या आधारे या मुलांकडून इलेक्ट्रिफाइंग प्रयोग करून घेतले. त्याची गोडी सर्वांच लागली. पुढे राज्य नाट्य स्पर्धेत ‘माझी पहिली चोरी’ हे दोन अंकी नाटक केले आणि या सर्व मुलांना पुढे खूप लोकांच्या नजरेत भरायला वाव मिळाला. सतीश पुळेकर हे या सर्वांच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे ‘गुरू’ ठरले.
पुढे ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये जयवंत वाडकर नोकरीला लागला. तोही एक कलाकार म्हणून. आणि तिथे त्याच्यासारखे ‘बरेच’ आधी पासून होते. अगदी अमोल पालेकर, अशोक सराफपासून ते राजन ताम्हाणे यांच्यापर्यंत. अर्थात वाड्या तिकडेही स्वस्थ बसला नाही. बँकेत वर्गणी काढून तो आणि राजन ताम्हाणे एकेकाचे वाढदिवस साजरे करू लागले. प्रत्येकी दहा दहा रुपयात मोठी पार्टी व्हायची. कारण वाढदिवस दोघातिघांचे असले तरी वर्गणी अख्खा स्टाफ देत असे आणि पार्टीसाठी तेवढे बक्कळ होते.
एकांकिका करता करता हर्ष शिवशरण लिखित ‘लपून छापून’ एकांकिकेतून वाड्याला जयंत सावरकर साहित्य संघाच्या नाटकात घेऊन गेले. त्या नाटकाचे नाव ‘बेबंदशाही’. हे वाड्याचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर साहित्य संघाच्या ‘टिळक आणि आगरकर’ या विश्राम बेडेकर दिग्दर्शित नाटकात त्याला एक छान भूमिका मिळाली आणि त्यांतर तो व्यावसायिक नाटकात कामे करू लागला.
‘संगीत उचलबांगडी’ या दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित नाटकात लक्ष्या, रवींद्र बेर्डे, दीपक शिर्के वगैरे होते… एका प्रयोगात ‘यमराज’ झालेला दीपक उशिरा पोचला म्हणून आयत्या वेळी त्याच नाटकातल्या यमदूताची भूमिका करणार्या वाड्याला दीपकच्या जागी ‘यमराज’ म्हणून उभे करण्यात आले. पहिल्या प्रवेशानंतर बाप्पा पोचला, त्यामुळे पुढचा प्रवेश बाप्पा शिर्केने ‘यमराज’ म्हणून केला.. पण चालू प्रयोगात बाप्पाच्या, म्हणजे यमराजाच्या हातातली गदा वरून तुटली आणि खाली पडली.. प्रसंगावधान राखून विंगेत असलेल्या वाड्याने दुसरी गदा घेतली आणि स्टेजवर नेऊन दिली आणि पटकन बोलून गेला… ही घ्या दुसरी… ‘रिपेअर’ करून आणली आहे. प्रेक्षकांत पुन्हा हंशा पिकला. स्वर्गात इंग्रजी बोलणारा पहिला यमदूत म्हणून वाड्याची इतिहासात नोंद झाली. वाड्याचे असे अनेक किस्से नाटक सिनेमात घडले आहेत. वाड्याने त्याचा हा स्ट्रगलिंग पीरियडही आनंदात घालवला, कारण हाताशी बँक ऑफ इंडियातली नोकरी होती.
पहिला ब्रेक
१९८६ साली मी विजय पाटकरला घेऊन ‘मुंबई मुंबई’ हे नाटक केले, त्यात वाड्याला एक धमाल भूमिका होती… पांढरे शुभ्र कपडे आणि सफेद चपलाधारी असा एक अत्यंत सुखवस्तू माणूस, संध्याकाळनंतर उंची विलायती दारू पिऊन झिंगणारा. अत्यंत निर्मळ आणि दयाळू मनाचा बेहोष मद्यपी, ‘आत्माराम’… अशी ती भूमिका होती. वाड्याने ती भूमिका अप्रतिम केली. त्याच्या रिहर्सलपासून ते प्रयोग, दौरे वगैरेमध्ये वाड्याने प्रचंड रस घेतला. विशेष म्हणजे, वाड्या ज्या नाटकात किंवा सिनेमात असतो ते प्रॉडक्शन हाउस वाड्याने जवळ जवळ स्वत:च्या नावावर केलेले असते. अगदी मालकी हक्क असल्यासारखा तो तिथे वावरत असतो. मग तिथले प्रॉब्लेम्स, तिथल्या अडचणी या त्याच्या स्वत:च्या असतात. आपल्या त्याच बुलंद आवाजात तो वेळोवेळी व्यवस्थापक असल्यासारखा सर्वांची काळजी घेत फिरत असतो. रिहर्सलला येताना रोज सकाळी न चुकता बनपाव, चहा, बटर बिस्किटं, किंवा खारी बिस्किटं त्याने आणलेली असतात, तीसुद्धा सर्वांसाठी. दौर्यावरसुद्धा कुठे काय मिळते त्या गावातले खास काय याची इत्थंभूत माहिती वाड्याला असते.
‘मुंबई मुंबई’ नाटकातली त्याची भूमिका आणि प्रयोग, त्याने जेवढे एन्जॉय केले, तेवढेच दौरेही. हे नाटक पाच सहा वर्षे चालले. ‘मुंबई मुंबई’ हे नाटक आजही वाड्या त्याच्या नाट्यकारकीर्दीतला पहिला व्यावसायिक ब्रेक समजतो.
वाड्या म्हणजे साबण, त्याच्या संपर्कात एकदा माणूस आला की स्वच्छ धुवून निघतो. अनेक गोष्टी त्याला नव्याने कळतात. साबणासारखाच एकदा हातातून सटकला की सटकला. सर्वत्र संचार असल्यामुळे एकाच ठिकाणी जास्त काळ राहता येत नाही. मात्र जिथे जातो तिथे तो सर्वांना आपलंसं करून घेतो. ‘मुंबई मुंबई’नंतर वाड्याने अनेक नाटके केली, पण त्याने ‘कुणीतरी आहे तिथे’ या नाटकात एका ‘कुबड’ असलेल्या नोकराची भूमिका केली, तीसुद्धा अफलातून होती. कुमार सोहोनीचे दिग्दर्शन असलेलं सुरेश खरे लिखित हे नाटक रहस्यमय असूनसुद्धा पुन्हापुन्हा पाहणारे खूप लोक होते. त्याचे एक कारण वाड्याचा तो म्हातारा नोकर हेही होते. त्यात त्याने जे बेअरिंग घेतले होते ते बघून नाटक संपताना अनेकांना स्वत:लाही कुबड असल्याचा भास होत असे. असा कुबड्या वाड्याने उभा केला होता. त्यानंतर त्याने आणि प्रदीप पटवर्धनने केलेलं ‘बायको असून शेजारी’ या नाटकाने त्याला भरपूर पुरस्कार मिळवून दिले.
पहिला ब्रेक मराठी सिनेमातला…
सर दामू केंकरे यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकात त्याला मिळालेल्या भूमिकेत त्याने सरांचे मन जिंकले, परिणामी केंकरेसरांनी त्याला त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात घेतले आणि वाड्याचाही तो पहिला चित्रपटप्रवेश ठरला. त्यानंतर नाटक आणि चित्रपट अशी कसरत तो करीत राहिला.
ब्रेक हिंदी सिनेमातला
वाड्याच्या एकूणच परोपकारी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्याच्यातल्या कलागुणांकडे खरे तर दुर्लक्षच झाले आहे. वरवर बघता वाटते की त्याच्यातल्या जनसंपर्काचा परिणाम म्हणून की काय त्याला भूमिका मिळतात. पण तसे नाही. अनेक वेळा वाड्याने चांगल्या भूमिका त्यागलेल्या पण आहेत. ‘मंतरलेल्या बेटावर’ या चित्रपटासाठी पुण्याला शूटिंग होते आणि त्यावेळी वाड्याचे रूम पार्टनर होते, आशुतोष गोवारीकर आणि मकरंद देशपांडे. शूटिंग संपल्यावर आशुतोष आणि मकरंद वाड्याला अनेक कथा ऐकवायचे. त्यावेळी आशुने ‘स्वदेस’ आणि ‘लगान’च्या कथा त्याला ऐकवल्या होत्या. वाड्या ‘स्वदेस’साठी आशुला घेऊन एका मराठी निर्मात्याकडे पण गेला होता. पण तो सिनेमा झाला नाही. नंतर काही वर्षांनी लगान’मधल्या एका भूमिकेसाठी आशुतोषने वाड्याला बोलावले. परंतु ‘भूज’ येथे ८५ दिवस जावे लागणार म्हणून त्याने नको म्हटले. कारण त्यावेळी त्याच्या नाटकांचे प्रयोग थांबले असते. पण आशुतोषने त्याला विचारले हे महत्वाचे. ‘हो’ म्हटले असते, तर वाड्या पण ‘ऑस्कर’पर्यंत पोचला असता. नुसता पोचला नसता, तर त्याने ऐन फंक्शन मध्ये कोणालाही न जुमानता पहिल्या रांगेत जाऊन स्टीवन स्पीलबर्गबरोबर फोटो काढून मुंबईला मित्रांना व्हॉट्सअप केले असते. यातला महत्वाचा भाग म्हणजे नाटकांच्या प्रयोगांसाठी त्याने एवढी मोठी संधी सोडली. वाड्या तिथे पोचला नाही याचे दु:ख हॉलिवुडकरांना कधीतरी कळेलच…
त्यानंतर अशीच एक संधी… जॉन मॅथ्यू मथान या अॅड फिल्ममेकरचा पाहिला चित्रपट ‘सरफरोश’… आमीर खान हिरो… त्याच्याबरोबरच्या एका इन्स्पेक्टरची भूमिका.. पण जैसलमेरला जावे लागणार होते महिन्याभरासाठी… आणि त्याचदरम्यान ‘मुंबई मुंबई’ नाटकाचा दौरा होता… आणि दुसर्या दोन नाटकांचे प्रयोग होते. वाड्याने त्यालाही नकार दिला.. तरी पण ‘मॅथ्यू’ने त्याला त्यातल्या एका छोट्या भूमिकेसाठी बोलावलेच… वाड्याने छोटा रोल म्हणून नाराजी दाखवली, तर जॉन मॅथ्यू मथानने त्याला घरी बोलावले आणि म्हटले, ‘ही भूमिका छोटी असली तरी तू कर, तुला ती खूप मोठ्ठं करेल, तू क्लिक नाही झालास तर नंतर तू म्हणशील तेवढे पैसे नुकसानभरपाई म्हणून देईन… ‘वाड्याने ती भूमिका स्वीकारली… आमीर खान भर ट्रॅफिकमध्ये रस्त्यावर पाठलाग करून त्याला पकडतो आणि सिग्नलला पोलीस व्हॅन उभी असताना मकरंद देशपांडे त्याच्यावर वार करून त्याला मारून पळून जातो… एवढाच सीन… पण तो सीन अशा ठिकाणी येतो की आमीर या घटनेमुळे एसीपी म्हणून प्रकट होतो आणि प्रेक्षक आणि नायिका दोघेही त्याच्या प्रेमात पडतात. या सीनमुळे वाड्या हिंदी चित्रपटात अनेक दिग्दर्शकांच्या लक्षात आला आणि पुढे त्याला एकेक करून हिंदी सिनेमे मिळत गेले. वाड्याने नाटकाच्या प्रयोगांसाठी हिंदी सिनेमे सोडले, तरी त्याची भरपाई म्हणून असेल, त्याला हिंदीत भूमिका मिळण्यापासून कोणीही अडवू शकला नाही. याला त्याचा आक्रमक स्वभाव आणि झोकून देण्याची वृत्तीही कारणीभूत आहे असे म्हटले पाहिजे.
त्या छोट्या भूमिकेमुळे वाड्या ‘राजकुमार संतोषी’च्या ‘लज्जा’ या चित्रपटात कास्ट झाला. त्याला तिकडे मिलिंद वाघ हा आपला मराठी अभिनेता घेऊन गेला.. संतोषीने वाड्याला बघताच ओळखले आणि ‘सरफरोश’मधल्या त्याच्या छोट्याशा भूमिकेचे कौतुक केले. तीच गोष्ट विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’मध्ये घडली. वाड्या चक्क पंकज कपूर आणि इरफान खानच्या बरोबरीने भूमिकेत जाऊन बसला. त्या दोघांच्याही कर्तृत्वाने वाड्या भारावून तर गेलाच, पण इरफान खानचा खास दोस्त झाला. ‘मकबूल’मधल्या पंकज कपूर यांच्यबरोबर त्यांनी पान भरवण्याचा दृश्यात वाड्याने अभिनयातला सराईतपणा दाखवून दिला आहे. आणि पंकज कपूर, इरफान खान आणि नसिरुद्दीन शहा यांच्या बरोबर कुठेही कमी पडला नाही हे महत्वाचे. या सर्व मोठ्या दिग्दर्शकांनी वाड्याला आपल्या पुढच्या सिनेमातसुद्धा बोलावले याचा अर्थ वाड्याने अभिनयासोबत सेटवरच्या वागणुकीने जिंकून घेतले असावे, असाही एक एक्स्ट्रा अर्थ त्यातून काढायला हरकत नाही.
‘वाड्या’ म्हणजे विविध प्रकारचे किस्से आणि त्याच्यातल्या अतिउत्साही धडपड्या वल्लीच्या अनेक कहाण्या. पण एखादी अडचण आल्यास तत्परतेने मदतीसाठी बिनधास्त पुढे येणे हे त्याच्या स्वभावातच होते. ‘हमाल दे धमाल’मध्ये विजय पाटकर हा त्याचा खास मित्र आणि वाड्या, दोघेही होते, त्यात मला त्यावेळचा सुपरस्टार अनिल कपूर हा त्याच्याच भूमिकेत हवा होता. पण त्याच्याकडे पोचायचे कसे हा प्रश्न होता. त्याचवेळी वाड्या आणि पाट्या (विजय पाटकर) ‘तेजाब’ या एन चंद्रा यांच्या हिंदी सिनेमात काम करीत होते. त्यात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित नायक नायिका होते.. पाट्या आणि वाड्याने पुढाकार घेऊन अनिल कपूरशी बोलणी केली आणि त्याच्याशी माझी भेट घडवून आणली. त्याआधी दोघांनी माझ्याविषयी खूप काही चांगले सांगून ठेवले होते त्यामुळे पहिल्याच मीटिंगमध्ये अनिल कपूर सिनेमात काम करायला तयार झाला.
त्यावेळी ‘जयवंत वाडकर माझ्यासारखा दिसतो’ असे म्हटले जायचे. आणि ते खरेही होते. अर्थात रंगाचा फरक होता, पण… असो. मी ‘शेम टू शेम’ या चित्रपटाच्या कास्टिंगच्या वेळी त्यातल्या जमीनदाराच्या दोन जुळ्या मुलांच्या भूमिकेसाठी मी आणि वाड्या एकमेकांसारखे दिसण्याचा फायदा घेऊन तसा मेकप आणि वेशभूषा केली आणि हवा तो इम्पॅक्ट साधला.
वाड्या शूटिंगला असला की तो सेटचा ताबा घेतोच घेतो. आणि मग त्यात तो अनेक नवीन किस्से निर्माण करून ठेवतो. त्यावेळी सेटवर आधीचा सेट काढल्यामुळे प्रचंड कचरा झाला होता आणि त्यात खिळेही होते. साफसफाई सुरू होती. वाड्या सगळ्यांना मोठ्या आवाजात सूचना देत होता, ‘अरे ए.. सर्वांनी नीट काळजी घ्या, पायाखाली बघा, खिळे पडलेत सगळीकडे, पायाला लागतील…’ सगळे काळजीपूर्वक वावरत होते… पण तेवढ्यात ‘आं’ असा आवाज आला… पाहतो तर काय? प्रत्यक्ष वाड्याच्याच पायात खिळा घुसला होता…
ब्रेक के बाद
मराठी व्यावसायिक नाटकं, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा करीत करीत वाड्या सर्वत्र संचार करीतच राहिला. लॉकडाऊनच्या काळात नाटके बंद असली तरी ओटीटीवरच्या सिरीजनी अनेक रंगकर्मींना Dाोटीटी
प्लॅटफॉर्मवर व्यस्त ठेवले. त्यातही वाड्या होता आणि आहे. लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या अनेक
बॅकस्टेजवाल्यांच्या मदतीसाठी वाड्या धावून गेला. जयवंत वाडकर हा कितीही परोपकारी असला, कितीही सामाजिक भान ठेवणारा असला तरी त्याच्यातल्या अभिनेत्यामुळे तो सतत कार्यरत असतो. कधी स्वस्थ बसत नाही. त्याचा संपर्क दांडगा आहे… मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर हिंदीतही त्याचा संपर्क दांडगा आहे. या चंदेरी दुनियेत कुठेही कसलेही फंक्शन अथवा इव्हेंट असो, वाड्या तिथे पोचला नाही असे क्वचितच घडते. आमंत्रण असो नसो, वाड्या तिथे जाणार, मोबाईलवर तिथले फोटो काढणार, दुसर्या दिवशी त्यातल्या माहितीसकट ते सोशल मीडियावर टाकणार, हे ठरलेलेच असते. त्यामुळे अलीकडे त्याला त्याच्या या फोटोग्राफिक प्रसारणावर जाहिरातीही मिळू लागल्या आहेत. ही खरे तर अघटित घटना आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला दिलेली पावती आहेत.
वाड्याने बँकेत असताना सुरू केलेला वाढदिवसाचा खेळ आता अगदी रंगात आला आहे. गेली अनेक वर्षे वाड्या रोज नित्यनेमाने सोशल मीडियावर नाट्य चित्रपट रंगकर्मींचे वाढदिवस त्या त्या तारखेला टाकत असतो. शिवाय आपला वाढदिवस असेल तर त्या दिवशी दिवसभरात त्याचा हमखास फोन येतो. ‘पुरू, वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझी दोन मिनिटे घेतो,’ असे म्हणून वाड्या चक्क आपले औक्षण करतो. आपल्यालाही हे सर्व झाल्यावर आपला वाढदिवस साजरा झाल्याचा आनंद मिळतो.
या नाट्यचित्रपटसृष्टीत अभिनय एके अभिनय करणारे बरेच आहेत. पण याबरोबर आजूबाजूचे भान ठेवणारा, आपुलकी जपणारा, मदतीसाठी प्रेमाने मागे उभा राहणारा वाड्याच आहे. वाड्याने घेतलेलं हे ‘व्रत’ साधे नाही. त्यासाठी एक यंत्रणाही राबवावी लागते. मनातला ओलावा कायम ठेवावा लागतो. एक हात खिशात असावा लागतो. तो खिसाही भरलेला असावा लागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे सहधर्मचारिणीची साथ असावी लागते. आणि ती वाड्याची पत्नी एकेकाळची पत्रकार विद्या वाडकर ही विठ्ठलाच्या रुक्मिणीसारखी शेजारी उभी असते. मधूनच तिची तुकारामाची आवडाबाई होत असेलच, कारण वाड्याचा मोकळा ढाकळा स्वभाव आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागत असतील. त्याची मुलगी ‘स्वामिनी’ हीसुद्धा उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट नर्तिका आहे, ‘बेली डान्स’मध्ये मास्टरी मिळवली आहे तिने. मुलगा आणि सून यांच्यासोबत आता नातीमुळे आजोबा झालेला वाड्या, आजोबा वाटतच नाही. अजूनही सतीश पुळेकरच्या एकांकिकेतला, साहित्य संघातला उत्साही कार्यकर्ता असल्या सारखाच वावरत असतो.
अभिनेता होणं, एकवेळ सोप्पं, पण ‘जयवंत वाडकर’ होणं कठीण… त्यासाठी असावं लागतं ओबडधोबड काळीज, जे आत्मभान राखून चहुबाजूंनी मनोरंजनविश्वाकडे पाहाणारं. त्याला आपलं मानणारं. अगदी ‘ऑक्टोपस’प्रमाणे कुठेही हातपाय पसरवून पोहोचणारं… थोडक्यात ‘जयवंत वाडकर’सारखं… म्हणूनच प्रेमाने म्हणावेसे वाटते…’ वाड्या सर्वत्र पूज्यते…’
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)