महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटवे ऑफ इंडियावरचा, समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला, २१ फूट उंच चबुतर्यावर असलेला १८ फूट उंच, ब्रॉन्झमध्ये घडवलेला अश्वारूढ पुतळा आपण अनेकदा पाहिला असेल. त्या वेळचा सर्वात उंच असलेला हा शिवपुतळा, दिनांक २६ जानेवारी १९६१ या दिवशी, म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षात इथे उभारला गेला. या पुतळ्याचे शिल्पकार होते नुकतेच दिवंगत झालेले कल्याणचे शिल्पमहर्षी आणि शिल्पतपस्वी सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे. या पुतळ्याच्या निर्मितीच्या नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या रोमांचक हकीकतीतील हा निवडक भाग म्हणजे त्यांना ‘मार्मिक’ची मानवंदना.
—-
कोणताही पुतळा पाहताना आपण तो फक्त बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्याने आपली तोपर्यंतची सर्वोत्तम कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपण फारसा लक्षात घेत नाही. एवढंच कशाला, त्या पुतळ्यांचं नीट निरीक्षणही करत नाही. शिल्पकाराचं नावही कित्येकदा आपल्याला माहित नसतं. इथे मी हे गेट वे ऑफ इंडियानजीकच्या अश्वारूढ शिवपुतळ्याबद्दल म्हणत असलो तरी, इतर प्रत्येक कलाकृतीबद्दल ते खरं आहे, हा माझा अनुभव आहे. हा पुतळा काय किंवा दादरच्या शिवतीर्थावरचा छत्रपतींचा पुतळा काय, त्या पुतळ्याच्या एका हातात घोड्याचा लगाम असेल, तर दुसर्या हातात काय आहे, याचं बरोबर उत्तर त्या पुतळ्यांचं नित्य दर्शन घेणार्यांनाही देता येईल की नाही, याची मला शंका आहे. तिथे त्या पुतळ्याबद्दल अधिकची काही माहिती कुणाला असेल याची शक्यताच उरत नाही!
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची जन्मकथा मोठी रोमांचक आहे. हा पुतळा घडवणारे शिल्पकार श्री. भाऊ साठे यांना या पुतळ्याचं काम मिळण्यापासून ते, तो पुतळा गेट वे ऑफ इंडियाच्या समोर २१ फूट उंच चबुतर्यावर स्थानापन्न होईपर्यंतच्या दीड-दोन वर्षांच्या काळातल्या सार्याच घटना स्पर्धेतून येणार्या राजकारणाने, ईर्षेने आणि हेवेदाव्यांनी, त्याचबरोबर रोमांचक क्षणांनी भरलेल्या आणि कृतार्थतेने भारलेल्याही आहेत. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे.
त्या काळातल्या मुंबईतलं हे तोवरचं सर्वात उंच आणि सर्वात दिमाखदार शिल्प. या शिल्पाच्या प्रसववेदना सर्वांना ठाऊक असाव्यात आणि पुढच्यावेळी तुम्ही हा पुतळा पाहायला जाल, तेव्हा त्या पुतळ्याकडे पाहण्याची दृष्टी सर्वांना यावी यासाठी या लेखाचं प्रयोजन!
(पूर्वपीठिका : गेटवे ऑफ इंडिया येथील प्रस्तावित शिवपुतळ्याच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण झालं. या कामाकडे निव्वळ ‘कंत्राट’ म्हणून पाहणारे तेव्हा कमी नव्हते. तेव्हाही अनेक लॉबी होत्या. भाऊ साठेंच्या खात्यात फक्त अफाट गुणवत्ता होती. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ती हेरली आणि अनेक शह-काटशह झाल्यानंतर या पुतळ्याचं काम साठेंकडे आलं… आता त्यांच्यापुढे आव्हान होतं इतिहासातले छत्रपती शिवराय समूर्त स्वरूपात साकारण्याचं…)
…आता कसोटीची घडी सुरू झाली. साठेंना परिपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज शिल्पातून समोर उभे करायचे होते आणि त्यासाठी प्रत्यक्ष महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, शिवकालीन इतिहासाचा आणि एकूणच त्या काळाचा अभ्यास आवश्यक होता. भाऊंनी अभ्यासाची सुरुवात केली, ती बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शिवचरित्रा’च्या वाचनाने. या पुस्तकाचं त्यांनी सखोल वाचन केलं. बाबासाहेबांनी सुचवलेली आणखीही काही पुस्तकं वाचली. बाबासाहेब आणि शिवचरित्राच्या इतर अभ्यासकांशी भरपूर चर्चाही केली. मनात उपस्थित झालेल्या बारीकसारीक शंकांचं त्यांच्याकडून निरसन करुन घेतलं. महाराज कसे चालत असावेत, कसे बोलत असावेत, प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात त्यांची मन:स्थिती कशी असेल इथपासून ते महाराजांचा घोडा होता की घोडी, महाराज कोणत्या पद्धतीचा पोशाख वापरात असतील, त्यांची दाढी, मिशी आणि कल्ले कसे असावेत इथपर्यंतचे सारे तपशील त्यांच्या चर्चेत येत गेले आणि त्या चर्चेतून महाराजांची आत्मविश्वासाने भरलेला शूर योद्धा, स्वराज्यनिर्माता धीरगंभीर राजा शिवछत्रपती अशी प्रतिमा भाऊंच्या मनात आकार घेऊ लागली.
शिवपुतळ्यात गतिमान घोड्यावर आरूढ, हाती तलवार धारण केलेले लढवय्ये शिवछत्रपती महाराज दाखवायचे असल्याने महाराजांच्या अंगावर नाटक-सिनेमात दाखवतात तश्या सोन्या-रूप्याच्या अलंकारांना फाटा दिला गेला. नाटक सिनेमात ठीक आहे, पण रणांगणात लढायला जाताना कुणी दाग-दागिने घालून जात नसतात. त्यात ज्या महाराजांचं निम्म्याहून अधिक आयुष्य रणांगणात शत्रूशी लढण्यात गेलंय, अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर ती शक्यताही फार उरतही नाही, असा विचार त्यामागे होता. लढवय्या महाराजांच्या हातातली तलवार कशी असावी, देशी धाटणीची की परदेशी, पोर्तुगीज पद्धतीची, यावरही भरपूर संशोधन, चर्चा केली गेली. त्यासाठी महाराजांचे वंशज असलेल्या सातारकर भोसल्यांच्या देवपूजेत असलेल्या तलवारीचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात आला. लंडनला असलेल्या भवानी तलवारीच्या उपलब्ध फोटोंचाही अभ्यास करण्यात आला. शेवटी महाराज वापरात असत तशी पुतळ्याची तलवारही पोर्तुगीज धाटणीची सरळ पात्याची आणि दुहेरी धारेची असावी, असं निश्चित करण्यात आलं.
महाराजांचा पोशाख हा त्याकाळच्या प्रचलित मोगली पद्धतीनुसार नक्की करण्यात आला. उदा. सलवार चोळीच्या खणाच्या कापडाची, चोळण्याप्रमाणे थोडीशी सैलसरशी दाखवण्याचं निश्चित करण्यात आलं. इतकंच नव्हे, तर महाराजांच्या पायातील जोडे, तुमान, शेला, दुपट्टा कसे असावेत यासाठी इतिहासातील आधार, म्युझियममध्ये असलेली महाराजांची अस्सल चित्रं आणि त्यावरील तज्ज्ञांची मतं, त्यांच्या सूचना विचारात घेऊन पुतळ्यात दाखवायचं भाऊंनी ठरवलं.
आता घोडा कसा दाखवायचा, यावर विचार सुरू झाला. पुतळा अश्वारूढ- त्यासाठी भाऊ साठेंनी, ग्वाल्हेरला महादजी शिंद्यांच्या अश्वशाळेत जाऊन तिथले अश्वतज्ञ सरदार अण्णासाहेब आपटे ह्यांचं मार्गदर्शन घेतलं. तिथल्या अनेक उत्तमोत्तम घोड्याचं, त्यांच्यातल्या प्रत्येक वैशिष्ट्यांचं, लकबींचं बारकाईने निरीक्षण केलं. मुद्दाम मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन तिथल्याही घोड्यांची बारकाईने पाहणी केली. पुतळ्यात घोड्याची गतिमानता, चपळाई आणि घोड्यात असलेला अंगभूत नैसर्गिक डौल उतरण्यासाठी असा अभ्यास आवश्यक होता. परिपूर्ण अभ्यासानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मविश्वासाने भरलेलं, विजयी वीराचा डौल असलेलं, गतिमान घोड्याच्या माध्यमातून परिस्थितीवर घट्ट पकड असलेलं, एका सार्वभौम राजाचं अश्वारूढ स्वरूप भाऊ साठेंच्या मनात तयार झालं.
कोणतीही कलाकृती ही ती जन्माला घालणार्या कलावंताच्या मनात तयार व्हावी लागते आणि त्यासाठी कितीही कालावधी लागू शकतो. एकदा त्या कलाकृतीची प्रतिमा कलावंताच्या मनात साकार झाली की मगच ती त्या त्या कलाकाराच्या माध्यमातून चित्र-लेखन अथवा शिल्पाच्या माध्यमातून साकार होत जाते. मनात जोपर्यंत एक आकृतिबंध तयार होत नाही, तोवर त्या कलेला दृश्यस्वरूप येत नाही. इथंही तेच झालं. महाराजांची भाऊंच्या मनात उमटलेली प्रतिमा, त्यांनी पहिल्यांदा घडवलेल्या मातीच्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी होती. अधिक आकर्षक होती. म्हणून पुन्हा नवीन मॉडेल तयार करून त्याला संबंधितांची पुन्हा मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. ही नवी प्रतिमा मातीच्या मॉडेलमधून साकार होऊ लागली. पहिल्या मॉडेलपेक्षा हे मॉडेल अनेक अर्थांनी वेगळं असणार होतं. या मॉडेलचं विस्तारित स्वरूप म्हणजे पूर्णाकृती पुतळा असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना अगदी बारीक सारीक तपशील त्यात यावेत यासाठी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या वेशात, महाराजांच्याच अंगकाठीच्या माणसाला स्टुडिओत समोर बसवण्यात आलं. एक उमदा घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात आला आणि महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मातीचं मॉडेल करण्यास सुरुवात केली गेली.
पुढच्या काही दिवसांतच मातीचं नवीन अडीच फुटी मॉडेल तयार झालं. हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ज्ञांना, जाणकारांना दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही किरकोळ बदल केले गेले. या मॉडेलला संबंधितांची मंजुरी आवश्यक होती. म्हणून ते घेऊन भाऊ पुन्हा मुंबईला आले. मुंबईच्या कौन्सिल
हॉलमध्ये, म्हणजे जुन्या विधानभवनाच्या आणि आताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत, मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी ते मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता, म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं आणि त्यांनी त्यात चुका काढण्यास सुरुवात केली, नाकं मुरडायला सुरुवात केली. हे सारं असूयेपोटी होतं, हे भाऊंना समजत होतं. म्हणून भाऊंनी त्यांच्या शेर्यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या साठेंनी काही प्रतिक्रिया देणं संभवही नव्हतं.
एवढ्यात यशवंतराव आले. हॉलमध्ये शिरताच समोरच्या अश्वारुढ शिवप्रतिमेला पहाताच, ‘वा, क्या बात है!’ अशी त्यांची उत्स्फूर्त दाद गेली आणि पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं. आता पुतळा समितीच्या सदस्यांना तक्रार करायला वावच नव्हता. त्या मॉडेलबरहुकूम पुतळा तयार करण्याची विनंती यशवंतरावांनी तिथल्या तिथे केली. भाऊ साठे जिंकले; किंबहुना त्यांचा अभ्यास जिंकला, त्यांचा आत्मविश्वास जिंकला, त्यांची कला जिंकली..!
अशा रीतीने सर्व शिवकथा घडून आता मातीचाच, पण पूर्णाकृती १८ फुटी अश्वारूढ पुतळा घडवण्याचं काम सुरू झालं…
– नितीन साळुंखे
(लेखक मुंबईच्या वारशाचे अभ्यासक आणि ब्लॉगर आहेत.)