महाराष्ट्रात गेला आठवडा केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटकेने गाजला. जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली कोरोना नियम धाब्यावर बसवून लोक गोळा करायचे आणि त्यांच्यासमोर केंद्र सरकारच्या उज्वल कामगिरीचा लेखाजोखा मांडून लोकांचे मतरूपी आशीर्वाद आधीच बुक करून ठेवायचे, असं या यात्रेचं स्वरूप होतं. तिला राणे यांच्या सहभागाने चिखलफेक यात्रेचं स्वरूप आलं आणि ‘मी नव्या युगातील नव्या मनूचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे’ अशा ‘शैली’त त्यांचे अर्वाच्य वाक्ताडन सुरू झाले. त्यांचा तोल इतका घसरत गेला की थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हात उगारण्याची बेमुर्वत भाषा त्यांनी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निव्वळ शिवसेना पक्षप्रमुख नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, याचा पाचपोच त्यांनी बाळगला नाही. साहजिकच शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झाला. राज्यात रस्तोरस्ती शिवसैनिकांनी राणेंविरोधात ऊग्र निदर्शनं करून भाजपला पळता भुई थोडी केली. युवासेनेच्या तरूण शिलेदारांनी थेट राणेंच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करून त्यांना आव्हान दिलं. त्याचवेळी दुसरीकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू करून त्यांना अटकही करण्यात आली. ‘मला अटक करायला मी काय नॉर्मल माणूस आहे का,’ अशी वल्गना करणार्या राणेंना कायद्यासमोर सगळे नॉर्मल हे शिस्तीत दाखवून देण्यात आलं.
या सगळ्या गदारोळात चर्चा झाली शिवसेना आणि राणे यांच्यात कशी जुंपली याचीच. मूळ कळीचा नारद असलेला भाजप नामानिराळा राहिला. आपण चिथावण्या द्यायच्या, इतरांना राडे करायला भाग पाडायचं आणि कुणी आपल्याकडे बोट दाखवलं की कानावर हात ठेवून मोकळं व्हायचं, ही त्यांची जुनी परंपरा आहे. त्यात राणे यांच्या बाबतीत तर या परिवारातल्या सदाशुचिर्भूतांची अवस्था ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी. ज्यांचं अख्खं आयुष्य फक्त कानामागून येऊन तिखट झालेल्या नेत्यांसाठी सतरंज्या घालण्या-उचलण्यात गेलेलं आहे, अशा ‘आजन्म कार्यकर्त्यां’ना परिवाराच्या कथित उच्च संस्कारांचा फार गर्व. खरंतर आपलं कमळ कोणत्या चिखलाच्या खतपाण्यावर फुललेलं आहे, हे तपासण्यासाठी त्यांनी पक्षाच्या दिव्य लोकप्रतिनिधींची गुन्हेगारी पार्श्वभूमी दाखवणारे अहवाल उघड्या डोळ्यांनी पाहावेत. मग ‘राणे यांच्यासारखे नेते आपल्या संस्कारी परिवाराचं नाव खराब करतात,’ हा टेंभा क्षणात गळून पडेल.
नारायण राणे हे काय प्रकरण आहे आणि शिवसेनेत त्यांच्याविषयी काय भावना आहेत, याची पुरेपूर कल्पना भाजपला आहे. म्हणूनच शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी आधी राणे यांना बराच काळ तंगवत ठेवण्यात आलं होतं. युतीची शक्यता दिसेनाशी झाली, तेव्हा आता दाखवतोच तुम्हाला इंगा, अशा ईर्ष्येनेच राणेंना पक्षात घेतलं गेलं आणि एका सूक्ष्मातिसूक्ष्म खात्याच्या केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरून राज्यात शिवसेनेवर, खासकरून मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांवर सोडण्यात आलं. त्यांच्या खात्याचं काम काय आहे याची कोणाला कल्पना नाही, पण भाजपमध्ये त्यांना कशासाठी घेतलं आहे, हे सगळेच जाणतात. राणेंनी दगड मारायचे, अर्वाच्य भाषेत, पातळी सोडून टीका करायची; तिच्यावर उत्तर आले नाही की धार आणखी तीव्र करायची. शिवसैनिकांनी आणि सरकारने हे सूक्ष्म उद्योग संयमाने घेतलं की जितंमया म्हणून आरोळ्या ठोकायच्या, शिवसेनेत जुनी धग आणि रग राहिली नाही, म्हणून खिजवायचे. शिवसैनिकांनी अर्वाच्य बरळण्याचा रोखठोक समाचार घेतला की लगेच राणे यांचा विखार व्यक्तिगत स्वरूपाचा आहे, आम्ही राणेंशी सहमत नाही (पण पाठिशी मात्र आहोत), असं म्हणून ‘पतली गली से कल्टी’ मारायची, ही यांची रणनीती.
साम, दाम, दंड, भेद वापरून राज्यातल्या सर्वोच्च संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून क्षुद्र राजकारण करून घेऊनही महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावता येत नाही, याने भाजप कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पगारी ट्रोलांच्या टोळ्यांनी आणि बिकाऊ प्रसारमाध्यमांनी कितीही सत्यापलाप केला तरी देशात भाजपला उतरती कळा लागलेली आहे, हे झाकता येण्यासारखं नाही. एकीकडे केंद्रात भाजपविरोधी पक्षांची दमदार आघाडी आकाराला येण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये भाजपला आधीसारखा भरभरून कौल मिळण्याची शक्यता कमी आहे. बिहारमध्ये नितीशबाबू आणि तेजस्वी यादव यांच्यातील सौहार्द भाजपच्या धुरीणांचा रक्तदाब वाढवणारे आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातही सर्व काही आलबेल नाही. अशा वेळी २०२४च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रासारखं राज्य हाताशी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दिल्लीसाठी कायम सोन्याची अंडी देणारी कोंबडीच असलेल्या मुंबईवर कब्जा करण्याचीही भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. राणे यांना बेछूट सोडून शिवसेनेला बेजार करू, बॅकफूटवर जायला लावू आणि मुंबईची सत्ता काबीज करू, अशी दिवास्वप्नं भाजपच्या नेत्यांना पडू लागली आहेत. राणे यांना मिळालेल्या खणखणीत उत्तराने त्यांना स्वत:च्या हातांनी खाडकन् स्वत:च्याच मुस्काटात मारून घेतल्याचे लक्षात आले असेल… अजूनही जाग आली नसेल तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी नाळ जुळलेला मुंबईचा मराठी माणूस आणि शिवसेनेवर प्रेम करणारे अन्यप्रांतीय मिळून यांच्या डोक्यावर थंडगार पाणी ओतून जाग आणतीलच.