अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवी-मंगळ सिंहेत, बुध-शुक्र कन्येत, केतू वृश्चिकेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू-नेपच्यून (वक्री) कुंभेत, चंद्र मेषेत, त्यानंतर वृषभेत, आठवड्याच्या अखेरीस मिथुनेत.
दिनविशेष : ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती, ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला.
मेष – हा आठवडा सुखाची पर्वणी घेऊन येणार आहे. नवपंचम, समसप्तक आणि लाभ योगाची शुभ फळे तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी वर्ग, व्यावसायिक, नोकरदार वर्ग आदी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना हा आठवडा सुवर्णकाळ ठरणार आहे, चांगले आर्थिक लाभ होतील. म्हणाल ती पूर्व दिशा याचा अनुभव नक्की येईल. मोठ्या पदांवर काम करणार्या व्यक्तींना विशेष लाभदायक काळ आहे.
वृषभ – येत्या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. राशिस्वामी शुक्राचे मित्र बुधाबरोबरचे भ्रमण काहीसे शुभ असले तरी त्याचा फारसा लाभ मिळणार नाही. बुध स्वराशीत पंचम स्थानात असल्यामुळे आर्थिक आवक वाढेल. सल्लामसलतीने व्यवसाय करणार्या मंडळींना चांगले पैसे मिळतील. शेअर मार्केट, विमा क्षेत्रात काम करणार्यांचे ध्येय साध्य होईल. पाच ग्रहांचे केंद्रयोग आणि चतुर्थ स्थानातले रवि-मंगळाचे भ्रमण यामुळे कौटुंबिक सलोखा घटेल. विद्यार्थीवर्गास प्रवेशासाठी शुभकाळ.
मिथुन – या आठवड्यात एखादी लक्षात राहणारी घटना घडेल. अनेक दिवसांपासून घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते प्रत्यक्षात येईल. मनासारखे घर मिळण्याचे योग जमून येत आहेत. जुनी उधारउसनवारी २७ आणि २८ ऑगस्ट रोजी वसूल होईल. वडील बंधूंसोबत काही ना काही कारणामुळे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद करताना खबरदारी घ्या. गुरूमहाराज त्यातून वाट दाखवतील. नोकरदारांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
कर्क – आठवड्याची सुरुवात चांगली होणार असली तरी २७ आणि २८ तारखेचे राहूबरोबरचे चंद्राचे ग्रहण मानसिक चिंतेत भर घालेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. अॅसिडिटी, गॅसचा त्रास असणार्या मंडळींनी काळजी घ्यावी. अन्यथा पोटाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. शब्द जपून वापरा. देशापरदेशात कामाच्या हालचाली सुरू असतील तर त्यात लक्ष घाला, नक्की यश मिळेल. लाभातील आणि पंचमातील राहू-केतू अनपेक्षित लाभ दर्शवतात.
सिंह – येत्या आठवड्यात स्वभाव थोडा गरम राहणार आहे, त्यामुळे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम साध्य करा. आर्थिक आवक मनासारखी राहिल्याने हात ओला राहील. अनपेक्षित धनलाभ होतील. सुखस्थानातल्या केतूमुळे घरात कौटुंबिक वाद वाढतील. आरोग्यासंदर्भातील तक्रारी वाढतील. सरकारी कामं करणार्या ठेकेदारांना हा आठवडा फायद्याचा जाईल. चांगले लाभ पदरात पडतील.
कन्या – बुधाचे कन्या राशीत होत असणारे भ्रमण कवी, पत्रकार आणि गायकांसाठी शुभ राहील. नव्या कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात येतील. लांबचा प्रवास होईल. स्वयंपाक करताना काळजी घ्या, भाजणे, कापणे, यातून दुखापत होईल. विद्यार्थीवर्गास नवीन प्रवेश मिळवताना कष्ट पडतील. कौटुंबिक वाद असतील आपसात मिटवा. दाम्पत्यांनी एकमेकांविषयी आदर ठेवा, अन्यथा एखादा विषय नको त्या टोकापर्यंत जाईल.
तूळ – या आठवड्यात सट्टाबाजारातून चांगले लाभ मिळतील, त्याचा नक्की फायदा घ्या. खर्चात वाढ होऊ शकते. खाण्यापिण्याचे ताळतंत्र सांभाळा. सुखस्थानातील वक्री शनि-प्लूटो यामुळे आईबरोबर वादविवाद होऊ शकतात. आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, त्याकडे दुर्लक्ष करू नका. खासकरून कान, फुप्फुस, किडनी यांच्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, त्यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – एखादे अडकलेले सरकारी काम या आठवड्यात पूर्ण होईल. राजकीय व्यक्तीची पतप्रतिष्ठा वाढवणारा काळ आहे. कुंडलीत बरेच केंद्रयोग होत आहेत. त्यामुळे कोणतेही कार्य सहजपणे पार पडणार नाही. ते पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. लाभातल्या बुध-शुक्रामुळे काम तडीस जाईल. पराक्रमस्थानातील वक्री शनीमुळे चिकाटी टिकून राहील.
धनु – बर्याच दिवसांपासून गवसत नसणारा सूर आता सापडणार आहे. गुरु-चंद्र लाभ योग, चंद्र-रवी-मंगळ नवपंचम योग, दशमातील उच्च बुध, लाभेश शुक्र दशमात यामुळे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते. घरातील प्रश्न मार्गी लागू शकतील. दुसरीकडे खर्चात भर पडू शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठीचे विद्यार्थ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. एखादी शिष्यवृत्ती मिळू शकते.
मकर – या आठवड्यात मनासारख्या गोष्टी झाल्यामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळणार आहे. राशिस्वामी शनि वक्री लाभात, धनस्थानात वक्री गुरू हे आर्थिक आणि कौटुंबिक बाजू साभाळतील. कलाकारांसाठी उत्तम काळ. परदेशगमन होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. कामे झाल्यामुळे तुम्ही समाधानी राहाल.
कुंभ – राशिस्वामी शनि वक्री व्ययात, धनेश गुरु वक्री लग्नात, तुम्ही नवीन व्यवसायाच्या विचारात असाल तर लगेच कोणतेही पाऊल उचलू नका. आत्ता घाईत जर काही करायला गेलात तर पैसे खर्च होतील. त्यामुळे नियोजन करून पाऊल टाकले, तर भविष्यात नक्की यश मिळेल. ध्यानधारणेसाठी भरपूर वेळ द्याल. धार्मिक कार्यात रमाल. राजकीय क्षेत्रात, सरकारी ठिकाणी काम करणार्या मंडळींना मोठे अधिकार मिळतील.
मीन – व्यवसायिकांना हा आठवडा उत्तम जाणार आहे. मोठे कर्ज मंजूर होईल. रवी-बुध-शुक्र शुभ नवपंचम योग अनेक बाबतीत फायद्याचे ठरतील. षष्ठ स्थानातील रवी मंगळामुळे शारीरिक व्याधीत मोठी भर पडेल. अग्नीपासून दोन हात दूर राहा. प्रवासात नव्या ओळखी होतील, पण काळजी घ्या. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. २७ आणि २८ तारखेला मानसिक चिंता जाणवेल. पण, मन शांत ठेवा.