नुकताच लॉकडाऊन शिथील झालाय, पुढे गणेश चतुर्थीपण येतेय. याचा लाभ उठवत `नभ उतरू आलं, अंग झिम्माड झालं’चा अनुभव घ्यायचा असेल तर ही घाट-तळकोकण यात्रा नक्की करा! तळकोकणातील वैभववाडीतून आपण भुईबावडा घाटामार्गे पुन्हा गगनबावड्यात येऊन कोल्हापूरकडे परतू शकतो किंवा फोंड्यामार्गे फोंडा घाटातून राधानगरीमार्गे कोल्हापूरला पोहोचू शकतो.
—-
‘श्रावणात घन निळा बरसला’चा आनंद घ्यायचा असेल तर घाटातून तळकोकणात जाणारा कोणताही घाट जवळ करा.
अनलॉकचा अडसर थोडा दूर झाला आहे. घरात कोंडलेला जीव मोकळा श्वास घ्यायला आणि निसर्गाच्या कुशीत शिरायला आतुर झाला आहे. अशा वेळी ही श्रावणयात्रा नक्की करा.
सह्याद्री हा महाराष्ट्राचा मानदंड. सह्याद्रीतून घाट आणि कोकणाला जोडणारे बरेच घाट रस्ते आहेत. उदाहरणार्थ, खंडाळा घाट, ताम्हणी घाट, वरंध घाट, पोलादपूरचा घाट, कुंभार्ली घाट, अणुस्करा घाट, आंबा घाट, गगनबावडा घाट, फोंडा घाट, अंबोली घाट, तिलारी घाट… कुठल्याही घाटाने तळकोकणात उतरा… ‘श्रावणमासी हर्ष मानसी’चा ‘हिरवळ दाटे चोहीकडे’ हा नजारा सर्वत्र दृष्टीस पडेल.
आज आपण श्रावणसरी झेलत गगनबावडा घाटाची यात्रा करू या. ही यात्रा सुरू होते कोल्हापूरहून. सकाळी कोल्हापूर सोडायचे, रंकाळा तलावावरून गगनबावड्याच्या दिशेने निघायचे. जसजसे गगनबावडा जवळ येऊ लागते, तसतशा नागरी खुणा कमी होऊ लागतात आणि अस्सल गावरान खेडी, रांगडा निसर्ग डोळ्यासमोर येऊ लागतो. गगनबावडा वसला आहे सह्याद्रीच्या ऐन कण्यावर. गगनबावडा येण्याआधी डावीकडील एक फाटा रामलिंग क्षेत्राकडे जातो. इथे आपण काही काळ विसावू शकतो. इतिहासाची आवड असेल तर ताराराणींचा पक्ष घेणार्या अमात्य बावडेकरांचा वाडा बावड्याआधी आहे. तिथे आपण डोकावू शकतो. गगनबावड्याहून दोन घाट तळकोकणात उतरतात. एक करूळ घाट, दुसरा भुईबावडा घाट. आपण कुठलाही घाट तळकोकणात उतरण्यासाठी निवडू शकता. या यात्रेसाठी आपण करूळ घाट निवडू या.
आपण जसजसे घाटाच्या माथ्यावर येऊ तसतसे दाट धुक्याने वेढले जाऊ लागतो. धुक्याचा पडदा दूर झाला की क्षणात खालच्या तळकोकणाचे दर्शन होते. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे…’ असा खेळ दिसायला लागतो… करूळ घाटातील एक गिरीशिखरावर आहे गगनबावडा घाटाचा राखणदार गगनगड. इथे प.पू. गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. घाटातील एक रस्ता आश्रमाकडे जातो. सूर्यप्रकाश आणि धुक्याच्या पाठशिवणीचा खेळ आणि घाटाच्या अंगाखांद्यावरून वाहणारे निर्झर पाहात आपण वैभववाडीला कधी पोहोचतो हे कळतच नाही.
तळकोकणातील वैभववाडीतून आपण भुईबावडा घाटामार्गे पुन्हा गगनबावड्यात येऊन कोल्हापूरकडे परतू शकतो किंवा फोंड्यामार्गे फोंडा घाटातून राधानगरीमार्गे कोल्हापूरला पोहोचू शकतो. आपण परतीच्या प्रवासासाठी फोंडा घाट निवडू या. फोंडा गाव म्हणजे तळकोकणातील छोटीशी बाजारपेठ. ही ओलांडून आपण फोंडाघाटाच्या रस्त्याला लागतो. नागमोडी वळणे घेत घाटात कोसळणार्या श्रावणसरी झेलत, कड्यावरून कोसळणार्या धबधब्यांचा आनंद घेत आपण घाटाच्यावर असलेल्या दाजीपूरला पोहोचतो. दाजीपूर हे गव्यांसाठी राखीव असलेला अभयारण्य. दाजीपूर ते कोल्हापूर हा रस्ता गर्द जंगलांनी आणि राधानगरी धरणाच्या पाण्याने वेढलेला आहे. वाटेत लागणार्या राधानगरी गावात राधानगरी धरण आहे. जसजसे कोल्हापूर जवळ येऊ लागते तसतसे उसाचे मळे कमी होऊ लागतात आणि नागरीकरणाच्या खुणा स्पष्ट होऊ लागतात. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन ही एक दिवसाची निसर्गयात्रा आपण संपवू शकतो.
डोंगर घाटातील हिरवी झाडी…
पिकात पायवाट गुंतली नागमोडी…
निर्मळ निर्झरांचे वाहते निळे पाणी…
रानात उगवले सोन्याचे दाणे कोणी…
कविवर्य ना. धों. महानोर यांची ही कविता जगायची असेल तर ही निसर्गयात्रा नक्की करा. नुकताच लॉकडाऊन शिथील झालाय, पुढे गणेश चतुर्थीपण येतेय. याचा लाभ उठवत `नभ उतरू आलं, अंग झिम्माड झालं’चा अनुभव घ्यायचा असेल तर ही घाट-तळकोकण यात्रा नक्की करा!
– संदीप शशिकांत विचारे
(लेखक मराठी नाट्यनिर्माते आहेत.)