अनेक नट संघर्षाच्या काळापासूनच मोठमोठी स्वप्ने पाहतात… पण शिवाजीने कसलीच स्वप्ने पहिली नाहीत, फार मोठी महत्वाकांक्षा ठेवली नाही, जीव कंठाशी येईपर्यंत धावाधाव करून, कामं मिळवण्यासाठी याला त्याला भेटण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. आधीचे काम बघूनच त्याच्या प्रकृतीला साजेशा भूमिका त्याला मिळत गेल्या आणि विशेष म्हणजे बँकेत नोकरी करून त्याने त्या केल्या. प्रत्येक वेळी त्या त्या कामाचा आनंद घेतला.
—-
धाडऽऽऽऽ दयाने दरवाजावर लाथ मारली आणि दरवाजा उघडला… आत धुळीचे साम्राज्य असेल, कोळ्याची जाळी असतील, अंधार असेल असे वाटून… एसीपी प्रद्युम्न आणि दया सावधपणे आत शिरले… पण आत अत्यंत स्वच्छ आणि टापटीप असे एक स्टोअररूम त्यांना दिसले. दोघेही आत गेले. एका उघड्या स्टँडवर अनेक फायली व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या. विविध प्रकारचे फोटो, प्रâेम करून भिंतीला लावलेले होते. त्यातला एक फोटो बघून दया अचंबित झाला. अगदी डिट्टो एसीपी साहेबांसारखा फोटो आणि शेजारी ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित वसंतराव देशपांडे उभे. फोटो बघून एसीपी प्रद्युम्न जागच्या जागी थिजले… दया तोपर्यंत एका दरवाजाजवळ पोहोचला होता. दरवाजा बघितला की दयाचे पाय शिवशिवतात, लाथ मारून तोही दरवाजा तोडणार एवढ्यात आवाज आला. ‘शेट्टी वेट… वेट दयानंद…’ दयाने वळून पाहिले… एसीपी प्रद्युम्नच्या जागी आता शिवाजी उभा होता… त्याच्या भूमिकेचा मुखवटा अनेक वर्षांनी गळून पडला… दयाच्या समोर आता उभा होता अभिनेता शिवाजी साटम.
‘दया… हा फोटो नीट बघ…’
‘देख रहा हूं… ये तो आप है!’…
‘ओळखलंस?’
‘का नाही?… तुम्ही जराही बदललेले नाहीत… आजही तसेच दिसताय…’ दया शेट्टी असला तरी मुंबईत राहिल्यामुळे बर्यापैकी मराठी बोलत होता. अलीकडे बरेच शेट्टी केवळ हॉटेलच्या गल्ल्यावर न बसता, विविध उद्योगात दिसत होते… त्यातलाच ‘दया’…
‘चाळीस वर्षांपूर्वीचा फोटो आहे तो… हे कोण आहेत माहिती आहे? वसंतराव देशपांडे… ग्रेट गायक आणि अभिनेते’… शिवाजीला सगळं पटापट आठवलं…
हौशी रंगभूमीवर एकांकिका, नाटके, कॉलनीतून किंवा कॉलेजमध्ये आणि नंतर बँकेतून नाटके करीत असताना ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांनी शिवाजीला पाहिले. त्यावेळी सुरू असलेल्या त्यांच्या ‘संगीत वरदान’ या नाटकात ऐन वेळी एक कलाकार नाटक सोडून गेला होता. त्यामुळे ती भूमिका कोण करणार, हा प्रश्न बाळ धुरींना पडला होता, त्यांनी सरळ शिवाजीला ती ऑफर दिली… त्या नाटकात पंडित वसंतराव देशपांडे (बुवा) प्रमुख भूमिका करीत होते. शिवाजीची भूमिका छोटी असली तरी महत्वाची होती. त्यामुळे भरपूर रिहर्सल करून बाळ धुरींनी शिवाजीवर मेहनत घेतली. दोनेक महिने तालमी होऊनसुद्धा इंदूरच्या पहिल्या प्रयोगाला शिवाजी एकदम ब्लँक झाला… काहीच आठवेना… बुवा (वसंतराव) अस्वस्थ झाले, पण त्यांनी धीर सोडला नाही. शिवाजीचे सर्व संवाद त्यांनीच म्हटले आणि वेळ मारून नेली.
‘दया, तुला सांगतो, अरे असा दरदरून घाम फुटला मला स्टेजवर… एक तर समोर वसंतराव, बाळ धुरी यांच्यासारखे कलावंत, इंदूरचा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे बघतोय या कल्पनेनेच मी घाबरून गेलो… काही सुचेना… पण बुवांनी सावरून घेतलं… पहिल्या अंकानंतर सर्वांनी मला चीअरप केलं आणि प्रयोग पार पडला… दुसर्या दिवशी रात्री पुन्हा प्रयोग होता. संध्याकाळी बुवा मला त्यांच्याबरोबर फेरफटका मारायला घेऊन गेले… मला म्हणाले, ‘सावंत… हो सावंतच… अरे बुवांनी मला शेवटापर्यंत ‘सावं…त’ म्हणूनच हाक मारली… ‘साटम’ म्हणून कधी हाकच मारली नाही… म्हणाले, ‘सावं…त… अहो चारशे चारशे प्रयोगानंतर सुद्धा आम्ही कधी कधी स्टेजवर ब्लँक होतो… तुमचा तर पहिलाच प्रयोग… विसरा सगळं… म्हणजे कालचा प्रयोग विसरा… आज पुन्हा धीराने उभे राहा… आम्ही आहोत… घाबरू नका बरं का सावं…त… चला… तुम्हाला इंदौरचे फस्क्लास ‘गोलगप्पे’ खिलवतो… असं म्हणून चक्क आम्ही दोघे गोलगप्पे खायला गेलो… ग्रेट माणसं… माझ्यावर कसा कुणास ठाऊक पण चांगलाच जीव लावला होता त्यांनी… ‘बुवा’ त्या नाटकात नसते तर मी नट कधीच झालो नसतो, द्या… त्या प्रयोगानंतर पळून जावसं वाटत होतं, पण बुवांनी थोपवलं… धीर दिला आणि त्या रात्रीचा प्रयोग बघून बाळ धुरी अक्षरश: आश्चर्यचकित झाले. मग मी त्यांचाही आवडता कलाकार झालो…’
एकेक फोटो समोर येत होता आणि दयाला प्रश्न पडत होता, आजच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रत्येक फोटोत साहेब होते, वेगळ्याच मूडमध्ये जात होते… त्यातला एक फोटो बघून दया थबकला… एकदम हँडसम, सुटाबुटातले साहेब दिसत होते, आणि तो फोटो नाना पाटेकर यांच्याबरोबर होता…
‘महासागर’… शिवाजीने दयाला फोटोची ओळख करून दिली… ‘महासागर’ नाटकातला फोटो आहे हा… मी यात मोहन भन्डारी या हिंदी नटाची रिप्लेसमेंट केली होती… या कलावैभवच्या ‘महासागर’ नाटकात मला निर्माते मोहन तोंडवळकरांनी काम करायला बोलावले. या नाटकाचे मी बरेच प्रयोग केले… त्यानंतर माझी गाठ मोहन कोठीवान या एका ग्रेट नटाशी पडली. त्यांच्याशी दोस्ती झाली, ते मला घेऊन गोवा हिंदू असोसिएशनमध्ये गेले… भिकू पै आंगले यांच्याशी ओळख करून दिली… तिथे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकात माझी ‘हंबीरराव’ या पात्रासाठी निवड झाली… अर्थात रिप्लेसमेंट म्हणूनच… मास्टर दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर अशी जबरदस्त कास्टिंग… बरेच प्रयोग केले मी त्याचे…’
दया सगळं ऐकत होता पण शिवाजीला कळत होते की दया ‘रिप्लेसमेंट’ या गोष्टीमुळे गोंधळात पडत होता… ‘अरे हे बघ, रिप्लेसमेंट म्हणजे… बदली कलाकार… मूळ नाटकातला कलाकार अचानक सोडून गेला की त्याच्या बदली ज्याला घेतात तो.’
दयाला हे सर्व नवीन होते, त्याच्या लेखी ‘रिप्लेसमेंट’ म्हणजे, आउटडोअर शूटिंगला ‘जिम’ नसेल तर ‘हॉटेल’च्या रूमवरच व्यायाम करावा लागतो, ‘ती’… तोही केवळ जोरबैठका मारून… इथे चक्क अभिनयाची ‘रिप्लेसमेंट’?… हळूहळू दयाला नाटक कशाशी खातात, हे कळू लागले होते. त्याला गंमत वाटू लागली…
पहिला ब्रेक
समोरच एक जाडजूड फाइल दिसत होती… ती हातात घेऊन दयाने साहेबासमोर ठेवली… इंडियन नॅशनल थिएटरची फाइल होती…
‘येस… दया… ही आयएनटी… इथलं माझं पाहिलं नाटक… ज्याच्यात मी प्रथमच प्रमुख भूमिकेसाठी निवडला गेलो होतो… ‘खंडोबाचं लगीन’ हे ते नाटक…’ त्यातल्या एकेका फोटोकडे शिवाजी कौतुकाने पाहात होता… बोलत होता… ‘ह्या फोटोत ही कोण आहे ओळख दया…’
तिला ओळखण्यापेक्षा एखादा दरवाजा तोडायला सांगितला असता तर दया खूष झाला असता… पण बुद्धीला चालना द्यायची वेळ आली की दया घामाघूम व्हायचा… त्यामुळे शिवाजीने त्याला जास्त ताण न देता सांगून टाकले… ‘दया… तू गांधी सिनेमा बघितला होतास ना? रिचर्ड अटेन्बरोचा?… त्यातली ‘बा’ म्हणजे रोहिणी हत्तंगडी, ती हीच…’
आता मात्र दयाने पुन्हा निरखून पहिले… अत्यंत सुंदर रूप असलेली, डोक्यावरून पदर घेतलेली, नाकात नथ आणि टिपिकल मराठमोळी… एखाद्या राजाची राणी वाटावी अशी ती अभिनेत्री रोहिणी हत्तंगडी होती, यावर दयाचा विश्वास बसेना… ‘गांधी’मधली म्हातारी गुजराती बाई ती हीच कशी असेल? अशी त्याला शंका आली… हा फोटो ‘फोरेन्सिक लॅब’मध्ये पाठवावा की काय, असे वाटत असतानाच शिवाजी म्हणाला… ‘काय मस्त काम केलं होतं रोहिणीने या नाटकात… आणि हा शेजारी अवखळ चेहर्याचा दिसतोय ना? तो विजय कदम… धमाल भूमिका केली होती त्याने या नाटकात. तुला सांगतो दया… या नाटकाच्या आधी मी बर्याच नाटकांत कामं केली, पण सगळी रिप्लेसमेंटची… हे माझं एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताखाली प्रत्यक्ष रिहर्सल करायचं पाहिलं नाटक… आणि दिग्दर्शक होता पुरू बेर्डे… म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे…’
‘ओह अच्छा…! वा वा… काय मस्त काम केलं त्यांनी मैंने प्यार किया मध्ये…’ दयाचं कन्फ्युजन शिवाजीच्या लक्षात आले…
‘अरे नाही नाही… तो लक्ष्या बेर्डे… हा पुरू बेर्डे… माझा पहिला ओरिजनल दिग्दर्शक… खरंच… बुवा, म्हणजे वसंतराव देशपांडे यांच्यानंतर मला माझ्यातल्या नटाची ओळख करून देणारा पहिला दिग्दर्शक… पुरूने माझ्यातला एक कलाकार शोधून काढला, त्याच्या दिग्दर्शनामुळे मी ‘खंडोबा’ या व्यक्तिरेखेच्या अनेक छटा उभ्या करू शकलो. हे नाटक ‘जागरण’ या लोककला प्रकारावर आधारित होते त्यामुळे त्यात गाणी होती, नृत्ये होती, लग्नसोहळा, लढाया, जादूटोणा, घोड्यावर बसण्याचे मायमिंग होते… गावरान भाषा होती, पुरूने माझ्यातला नट शोधून हे सर्व करायला लावले… ग्रेट… मजा आली… भरपूर प्रयोग केले आम्ही या नाटकाचे. अगदी दिल्लीपर्यंत… खरं बघायला गेलं तर, या नाटकामुळे ओरिजनल नाटक आणि दिग्दर्शनाखाली काम करण्याचा ‘पहिला ब्रेक’ मला मिळाला… त्याआधी मी मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या नाटकात कामं केली, पण त्याची रिहर्सल प्रोसेस अनुभवली नव्हती… ती मला या नाटकात अनुभवायला मिळाली… पुरूच्या दिग्दर्शनाची शिदोरी मला आयुष्यभर पुरली… कारण त्यानंतर मी विजया मेहता (सावित्री), आत्माराम भेंडे (धूपछाँव) सतीश दुभाषी (स्वप्न एका वाल्याचे) चंद्रकांत कुलकर्णी (ध्यानीमनी) अशा ग्रेट दिग्दर्शकांकडे ओरिजिनल भूमिका केल्या. अरे… सतीश दुभाषी हे एक ग्रेट ‘अॅक्टर’ होते, त्यांच्याबरोबर त्यांच्या धाकट्या भावाची भूमिका मला करायला मिळाली, ‘स्वप्न एका वाल्याचे’ या नाटकात… आणि गंमत माहितीय का?… ‘दीवार’ हा गाजलेला हिंदी सिनेमा त्या नाटकावरून केला होता… त्यातल्या इन्स्पेक्टर भावाची भूमिका मी केली होती…’
दयाचा चेहरा उजळला… एक तरी ओळखीची गोष्ट सापडली म्हणून… ‘दीवार’ त्याने दहा पंधरा वेळा पहिला होता… काहीतरी बोलायचं म्हणून दया बोलला, ‘वा सलीम-जावेद… द ग्रेट रायटर्स… त्यांनी लिहिलेलं मराठी नाटक?’…
हसून शिवाजीने म्हटले, ‘नाही रे दया… दिलीप परदेशी होते लेखक… पण गोष्ट तीच… मोठा भाऊ चोर आणि धाकटा इन्स्पेक्टर…
इतक्यात लाइट्स गेले… काळोख झाला… दयाने टॉर्च काढली… काळोख आणि टॉर्च या नेहमीच्या सवयीच्या गोष्टींमुळे दया खूष झाला… एक अल्बम हाताला लागला… त्यात काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते… शिवाजीने दुसरा टॉर्च काढून स्वत:वर मारला आणि बोलू लागला…
दुसरा ब्रेक
‘ज्ञानदीप’… दूरदर्शनवर ही मालिका यायची… आकाशानंद निर्माते आणि दिग्दर्शक होते… कॅमेर्यासमोर पहिल्यांदा उभा राहिलो मी, दया… जयंत ओक या लेखक-अभिनेता मित्राने त्यावेळी भरपूर मदत केली. अर्ध्या तासाचे एपिसोड असायचे… रिहर्सल आणि पाठांतर चोख असायचं… एकदा शूटिंग सुरू झालं की मध्ये थांबता यायचं नाही… चुकला तर दयामाया नव्हती… सॉलिड ओरडा पडायचा… आणि सगळं मग पहिल्यापासून… मस्त दिवस होते ते… मी ‘सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया’त होतो. नोकरी करून नाटकाची आणि दूरदर्शनमध्ये शूटिंगची हौस भागवत होतो. तिथेच बबन दळवीची ओळख झाली… तो मला बी. पी. सिंघकडे घेऊन गेला… बीपी त्यावेळी १०० (एक शून्य शून्य) या मालिकेच्या तयारीत होता… त्यात त्याने मला इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी कास्ट केले, त्यात महेश मांजरेकर आणि आशुतोष गोवारीकर माझे सहकारी होते तर दीपक शिर्के हवालदार होता… रेस्ट इज हिस्ट्री…’
आता सगळी नावं दयाला ओळखीची वाटत होती… या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दयाला एकापाठोपाठ एक धक्के बसत होते. रॅकवरच्या फायली, भिंतींवरचे फोटो… तेवढ्यात लाइट आली आणि शिवाजी साटम साहेबांची कारकीर्द दयाला लख्खपणे दिसू लागली… आजपर्यंत फक्त एसीपी प्रद्युम्नच माहिती असलेल्या दयाला शिवाजीचं एवढं सगळं काही येऊन गेलंय, हे कळल्यावर त्यांच्याबद्दल वेगळाच आदर निर्माण झाला… तो आणखी खुशीत येऊन फोटो बघू लागला… शिवाजी आणि त्याची पत्नी अरुणा चव्हाण यांचा फोटो बघून तो सद्गदित झाला. अरुणा चव्हाण म्हणजे शिवाजीची फक्त पत्नी नव्हती, तर ती महाराष्ट्राची एक सुप्रसिद्ध कबड्डी प्लेयर होती. कर्णधार होती… शिवाय छत्रपती पुरस्कार विजेती होती… कबड्डीचा खेळ तसा तासाभराचाच असतो… तसाच जणू संसाराच्या सारीपाटाचा खेळ आटपून ती लवकर हे जग सोडून गेली… त्या फोटोशेजारी असलेल्या एका चाळीचा फोटो… भायखळ्यातल्या ताराबाई चाळीत तिसर्या मजल्यावरच्या खोली नंबर ४०मध्ये बालपण गेलेले शिवाजी प्रत्यक्षात एकदम प्रसन्न आणि हसतमुख कसे, हे दयाला कळेना. पण त्या काळात चाळ, म्हणजे एक संस्कारकेंद्रच होते, खोल्या दहा बाय दहाच्या असल्या, तरी वास्तव्य संपूर्ण चाळभर असायचं आणि शेजारपाजारची घरंही आपलीच समजून लोक गुण्यागोविंदाने नांदायचे. मात्र शिवाजीच्या वडिलांनी स्वत:ची इंग्रजी माध्यमात शिकण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा शिवाजीला इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवून पूर्ण केली. त्याचा पुढील आयुष्यात शिवाजीला खूप फायदा झाला.
मोठा ब्रेक
आणि अचानक पुढच्या फोटो जवळ दया थांबला… त्या फोटोत चक्क दया आणि एसीपी प्रद्युम्न होते… शिवाजी आणि दया शेट्टी दोघेही एकमेकांकडे बघून हसले. ‘सीआयडी’ या गाजलेल्या मालिकेतला फोटो होता तो. १९९७च्या आसपास सुरू झालेली मालिका आज तब्बल २२ वर्षे झाली तरी तेवढ्याच लोकप्रियतेने सुरू आहे. ती सुरू झाली तेव्हा एवढे मोठे यश त्यांना मिळेल याची कल्पना नव्हती… त्यातले ‘कुछ तो गडबड है’ हे शिवाजीचे वाक्य गब्बरच्या ‘कितने आदमी थे’इतकंच गाजलंय… या दोघांना घेऊन अनेक जाहिराती आल्या…
कॉमिक स्टोर्या निघाल्या, पुस्तकं निघाली… शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव आणि निर्माता दिग्दर्शक बी. पी. सिंघ यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या सर्व अभिनेत्यांवर दिग्दर्शक बी. पी. सिंघने प्रचंड विश्वास टाकला. अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग केले. १११ मिनिटांचा एक सलग एपिसोड साताठ दिवस रिहर्सल करून एका शॉटमध्ये शूट केला आणि खूप मोठा विक्रम नोंदवला.
ब्रेक के बाद
शिवाजी साटम… ‘खंडोबाचं लगीन’च्या रिहर्सलला यायचा तेव्हाच त्याच्यातल्या एका अत्यंत निर्मळ, विनयशील आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नटाशी ओळख झाली. कौटुंबिक एवढ्याचसाठी की दोन महिन्यांच्या तालमींमध्ये शिवाजीची सुट्टी मागण्याची वेळ केवळ कौटुंबिक कारणांसाठीच असायची. कधी बायकोचे डोहाळजेवण तर कधी मुलाचं बारसं… त्याच्या मुलाच्या, अभिजितच्या जन्माच्या वेळची सगळी टेन्शन्स रिहर्सलमध्ये, त्याच्या चेहर्यावर दिसायची आणि अखेर मुलाच्या जन्माचे पेढे वाटून त्याने ती संपवली.
अनेक नट संघर्षाच्या काळापासूनच मोठमोठी स्वप्ने पाहतात… पण शिवाजीने कसलीच स्वप्ने पहिली नाहीत, फार मोठी महत्वाकांक्षा ठेवली नाही, जीव कंठाशी येईपर्यंत धावाधाव करून, कामं मिळवण्यासाठी याला त्याला भेटण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. आधीचे काम बघूनच त्याच्या प्रकृतीला साजेशा भूमिका त्याला मिळत गेल्या आणि विशेष म्हणजे बँकेत नोकरी करून त्याने त्या केल्या. प्रत्येक वेळी त्या त्या कामाचा आनंद घेतला. त्यामुळे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या तत्वाप्रमाणे तो द्विगुणितच होत गेला. आणि ‘सीआयडी’वर येऊन ठेपला.
दयाला या सर्व गोष्टींचे कौतुक वाटू लागले… आपल्याबरोबर शूटिंग करता करता शिवाजी, नाटके, सिनेमा करीत होता, हे त्या भिंतीवरच्या ‘दे धक्का’, ‘उत्तरायण’ आणि नुकत्याच शूट करून आलेल्या ‘दे धक्का-२’च्या फोटोंवरून कळत होते.
सीआयडीने महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारत काबीज केला आणि शिवाजी साटम हे नाव घराघरात पोचले. ‘कुछ तो गडबड है’ म्हणण्याची वेळ अनेक वेळा घराघरात अनेक प्रसंगातून येते, त्यावेळी हमखास आठवतो तो एसीपी प्रद्युम्न आणि त्याचा करारी आणि निग्रही चेहरा…
हे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच अचानक फोन वाजला… आदित्य श्रीवास्तव पलीकडून बोलत होता… ‘हलो सर… इमर्जन्सी है… आप कहाँ हो…?
या प्रश्नाने पुन्हा त्याच्यातला प्रद्युम्न जागा झाला आणि त्याने दयाकडे पाहिले… दयाला त्याच्या नजरेतला बदल जाणवला… दोघेही दरवाजाच्या दिशेने वळले… दरवाजा चुकून बाहेरून लॉक झाला होता. अर्थात उघडायचा कसा हा प्रश्नच नव्हता… एसीपी प्रद्युम्नने फक्त दयाकडे पहिले आणि…
धाडऽऽऽऽ असा आवाज झाला…
पुढच्या पाचव्या मिनिटाला एसीपी प्रद्युम्न आणि दया, जीपमध्ये होते आणि जीप मरीन ड्राइव्हच्या दिशेने सुसाट निघाली होती… नव्या केसच्या आनंदात…
दयाच्या मनात मात्र आता एसीपीपेक्षा नव्याने पाहिलेला ‘शिवाजी साटम’ घर करून राहिला होता… आणि पुढ्यात होत्या अनेक नाटक सिनेमांच्या उरलेल्या फायली…
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)