कोल्हापूर या शहराशी प्रबोधनकारांचा आयुष्यभर जिव्हाळ्याचा संबंध होता. त्याला छत्रपती शाहू महाराजांचा स्नेह कारणीभूत होताच. पण श्रीपतराव शिंदे, भाई माधवराव बागल, दासराम जाधव, ग. गो. जाधव असे कोल्हापुरातले अनेक महान सत्यशोधक त्यांच्या अगदी जवळच्या मित्रांपैकी होते.
—-
ग्रामोफोनचे खेळ करत जळगावात सहा सात महिने राहिल्यानंतर प्रबोधनकार मुंबईत आले होते. त्या काळात आणि आधीच्या मुक्कामांत प्रबोधनकारांनी मुंबईत अनुभवलेल्या आठवणींमध्ये रमल्यानंतर आता आपण ओरिजिनल ट्रॅकवर म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीवर यायला हरकत नाही. मुंबईत आल्यानंतर प्रबोधनकारांनी जळगावात सुरू केलेलं `सारथी’ मासिक पुढचे काही महिने, कदाचित वर्षभर सुरू ठेवलं. स्वदेशी चळवळीमुळे चवताळलेल्या ब्रिटिश सरकारने नियतकालिकं आणि छापखान्यांवर कारवाया सुरू केल्या होत्या. त्यामुळे छापखाने आक्रमक भाषेतली नियतकालिकं छापण्याची हिंमत दाखवत नसत आणि प्रबोधनकार प्रयत्न करूनही मुळमुळीत लिहू शकले नसणार. त्यामुळे `सारथी’ बंद पडलं. कितीही चळवळी केल्या तरी त्यांना पनवेलला कुटुंबाच्या खर्चासाठी पैसे पाठवावे लागत होतेच. त्यासाठी त्यांच्याकडे एक कामधेनु होती. कामधेनु हा शब्द त्यांचाच. त्यांची कामधेनु म्हणजे ग्रामोफोन. ग्रामोफोनचे दौरे करून त्यांनी दोन तीन महिने पैसे कमावले. ते कुटुंबाच्या खर्चासाठी पनवेलला पाठवले आणि ते स्वतः पुण्यात `महाराष्ट्र नाटक कंपनी’त रूजू झाले.
हा काळ १९०६-०७चाच होता. त्र्यंबकराव कारखानीस यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र नाटक कंपनी’ने मराठी रंगभूमीची बरीच वर्षं सेवा केली. पण प्रबोधनकार या नाटक कंपनीत फार तर दोन तीन महिने राहिले असतील. कंपनीचा मुक्काम पुण्यात होता. फुटका बुरूज परिसरात राजा परांजपेंच्या इमारतीत केशवराव दाते आणि मामा भट यांच्यासोबत एका खोलीत राहत. नटश्रेष्ठ केशवराव दाते पुढे याच कंपनीत अनेक वर्षं राहिले. कंपनीचे भागीदारही बनले. त्याच्याही नंतर `कुंकू’, `शेजारी’सारख्या सिनेमातले अभिनेते आणि `भक्तीचा मळा’सारख्या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून गाजले. पण प्रबोधनकारांना ते भेटले तेव्हा नुकतेच या नाटक कंपनीत आले होते. तेव्हा ते नाट्याचार्य खाडिलकरांच्या `कीचकवध’मध्ये रत्नप्रभेची भूमिका करत असावेत. प्रबोधनकारही `सवाई माधवरावाचा मृत्यू’ या खाडिलकरांच्याच नाटकात शाहिराची भूमिका करत. तसंच रिकाम्या वेळात ते ग्रामोफोनवर गाणी ऐकवण्याची निमंत्रणं स्वीकारत. शिवाय फोटो एन्लार्जिंगचा जुना व्यवसायही ते करत.
ते लवकरच नव्या नाटक कंपनीत गेले. त्याचं कारण ते सांगतात, `उद्योगाची, रोजगाराची समोर येईल ती संधी गमवायची नाही. मग तो व्यवसाय कोणता का असेना, आपल्या मगदुरीच्या मर्यादेत आहे तो आपण कसोशीने नि इभ्रतीने पार पाडू, इतक्या आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकायचे. ही माझी प्रवृत्ती.’ एकदा त्यांना `ललितकलादर्श नाटक मंडळी’चे गणपतराव वीरकर अचानक रस्त्यात भेटले. त्यांनी आग्रह केला की नव्या कंपनीत या. संगीतसूर्य केशवराव भोसलेंच्या नेतृत्वात ही कंपनी तेव्हा हुबळी इथे सुरू झाली होती. ही स्थापना आहे एक जानेवारी १९०८ची. हुबळीच्या दौर्यानंतर `ललितकलादर्श’चा दुसरा मुक्काम कोल्हापूरला होता. तिथेच प्रबोधनकार त्यात सामील झाले. ती त्यांची कोल्हापूरची पहिलीच भेट. त्यानंतर प्रबोधनकारांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिला.
पण प्रबोधनकार `ललितकलादर्श’मध्येही फार रमले नाहीत. ते कोल्हापूरनंतर अथणी, सांगली, मिरज आणि निपाणी अशा पुढच्या मुक्कामांत कंपनीबरोबरच होते. जो पगार घेणार नाही तो मालक, या सहकारी तत्त्वावर ही कंपनी कलाकारांनीच मिळून सुरू केली होती. त्यामुळे त्यात भांडणं वाढू लागली होती. प्रबोधनकार त्याचा अनुभव सांगतात, `राजकारणाप्रमाणे नाटक व्यवसायातही पक्षबाजी नि पॉलिटिक्स असतेच. त्या पॉलिटिक्समुळेच नाटक मंडळ्यांतल्या फाटाफुटी नि नवीन मंडळ्यांची पैदास होत असे. केशवराव भोसल्यांना स्वदेशहितचिंतकातल्या पॉलिटिक्समुळेच ती कंपनी सोडावी लागली होती. निपाणीच्या मुक्कामात हे तमाशे बरेच आच धरू लागत असल्यामुळे मी तेथून निसटण्याचा विचार करत होतो.’
निपाणीला मुक्काम असताना कोल्हापूरजवळच्या बोरगावचे दादासाहेब चिटणीस नावाचे एक वृद्ध प्रबोधनकारांना भेटायला आले. कोल्हापूरच्या खाटिक गल्लीत त्यांचा एक छापखाना होता. पण त्यांना इतर कामांमुळे छापखान्यात लक्ष देण्याइतकी सवड मिळत नव्हती. त्यामुळे तो छापखाना प्रबोधनकारांनी चालवायला घ्यावा, असा त्यांचा आग्रह होता. छापखान्याची शाई हाताला लागली की माणूस कायमचा त्या शाईला चिकटतो म्हणतात. प्रबोधनकारांच्या हाताला छापखान्याची शाई आधीच अनेकदा लागलेली होती. त्यामुळे प्रबोधनकारांनी चिटणीसांची ऑफर लगेच स्वीकारली आणि लागलीच कोल्हापुराच्या दिशेने निघालेही.
कोल्हापूरला जाताना त्यांच्यासोबत काका तारदाळकर होते. बेडेकर नावाचे एक नट कंपनीत काम करत. ते या काकांचे भाचे होते. काका त्यांना भेटायला निपाणीला आले होते. टांग्यात काही तास एकत्र, याशिवाय दोघांचा परिचय असण्याचं कारण नव्हतंच. कागल सोडल्यानंतर काकांनी प्रबोधनकारांना विचारलं की कोल्हापुरात कुठे उतरणार? प्रबोधनकारांसमोर तीच अडचण होती, कारण या शहरात त्यांच्या ओळखीचं कुणीच नव्हतं. कोल्हापूरला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. टांगा कोल्हापुरात शिरताच काकांनी टांगेवाल्याला उपाध्ये बोळात नेण्याचा हुकूम सोडला. काकांबरोबर उतरल्यानंतर छापखान्याचा पत्ता शोधत जाण्याचा विचार प्रबोधनकार करत होते. पण काकांच्या घराजवळ टांगा थांबताच त्यांनी त्यांच्या पुतण्यांना प्रबोधनकारांचंही सामान घरात घेऊन जायला सांगितलं. प्रबोधनकार निमूट काकांसोबत घरात गेले.
काकांनी घराच्या माडीवर प्रबोधनकारांच्या राहण्याची व्यवस्था केली. प्रबोधनकार कपडे बदलून, हातपाय धुऊन घराच्या ओटीवर बैठकीत आले. चहा आला. चहा घेता घेता काका म्हणाले, हे घर आता तुमचं. तुम्ही इथेच राहायचं. प्रबोधनकारांना आश्चर्य वाटलं. ते लिहितात, `बोलणे चालणे कसलेच काही नसताना, हा ब्राह्मण गृहस्थ अचानक माझी अशी बडदास्त का ठेवतो, काही उमजेना.’ तासाभराने जेवणाची वेळ झाली. माजघरात ताटं वाढली होती. कोपर्यावरच्या पाटावर काका बसले होते. त्यांनी प्रबोधनकारांना पंगतीतल्या पाटावरच बसायला सांगितलं. प्रबोधनकार थबकलेच. कारण एक ब्राह्मण दुसर्या जातीच्या माणसाला स्वतःच्या पंगतीत जेवायला बसवतो, हे त्या काळात वेगळंच होतं. प्रबोधनकारांची जात ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून ब्राह्मणांकडून पंक्तिभेद अनुभवला होता. प्रबोधनकारांना वाटलं, काकांना त्यांची जात माहीत आहे की नाही? तोच काका ठामपणाने म्हणाले, `आमच्या इथे जातपात नाही. मला तुमची जात माहीत आहे. चला मुकाट्याने बसा पाटावर.’ प्रबोधनकारांची भीती अजून संपली नव्हती. त्यांना खात्री होती की वेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यांना स्वत:ची उष्टी खरकटी काढावी लागणारच. पण काकांच्या तेही लक्षात होतं. जेवण होताच त्यांनी आदेश देत प्रबोधनकारांना स्वत:सोबत माडीवर नेलं. मुखशुद्धीसाठी मक्याची भाजलेली कणसं दिली. सोबत खाणं सुरू असताना त्यांनी सांगितलं, `आता हेच तुमचं बिर्हाड. इथेच राहायचं. संकोच बाळगायचा नाही. घर तुमचं आहे. काय लागेल ते मागून घ्या.’
दुसर्या दिवशी सकाळी खाटिक गल्लीतल्या छापखान्याचा चार्ज घेण्यासाठी काका प्रबोधनकारांच्या सोबत गेले. कमीत कमी दोन महिने प्रबोधनकार काका तारदाळकरांच्या घरी घरच्यासारखेच राहिले. ते जेवणाचा खर्चही घेत नसल्यामुळे प्रबोधनकारांना संकोच वाटू लागला होता. त्यावर काकांनीच उपायही काढला. त्यांचा एका पुतण्याला शिक्षणात रस नव्हता. त्याला पेटी शिकवायची काकांची इच्छा होती. पण तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे काकांनी नवीन पेटी आणली आणि प्रबोधनकारांना त्याला पेटी शिकवायला सांगितलं. प्रबोधनकारांकडे ग्रामोफोन होताच. त्यातल्या रागांचा सराव करून ते काकांच्या पुतण्याला रोज तास दोन तास शिकवत. हळूहळू त्यालाही गोडी लागली. तो पेटी वाजवण्यात तरबेज झाला आणि पुढे `ललितकलादर्श नाटक कंपनी’त मुख्य पेटीवाला म्हणून प्रसिद्ध झाला.
दोन महिन्यांनंतर प्रबोधनकारांनी गंगावेशीजवळ पाटलांच्या माडीवर स्वतंत्र बिर्हाड मांडलं. खानावळीत जेवण सुरू केलं. घर सोडलं तरी काका प्रबोधनकारांची चौकशी करण्यासाठी रोज आवर्जून येत. प्रबोधनकार त्यांच्याविषयी सांगतात, `अशी जिव्हाळ्याची आणि मोकळ्या मनाची माणसे चालू जमान्यात बेपत्ता. उलट प्रसंगोपात पंगतीला बसण्याचा षटीसामासी योग आला. तर उपकाराच्या सबबीवर त्या जेवणाचे उष्टे दिमाखाने चव्हाट्यावर चघळणारे कुत्रेच अलिकडे फार.’
या काळात छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी सुरू केली होती. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव पडून काका तारदाळकर इतकं समानतेने वागले असतील, याची शक्यता कमीच. हे पुरोगामित्व कोल्हापूरच्या मातीतच आहे. स्वभावातच आहे. काका त्याचं उदाहरण होतं. ही माती सुपीक होती म्हणूनच छत्रपती शाहू त्यात विचारांची मशागत करून क्रांतीचं पीक काढू शकले. प्रबोधनकारांना या सुपीक मातीची ओळख काकांनी करून दिली होती.
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)