• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नर्मदाकाकूंचा शिव्यांचा धबधबा

- श्रीकांत आंब्रे (टमाट्याची चाळ)

श्रीकांत आंब्रे by श्रीकांत आंब्रे
August 18, 2021
in टमाट्याची चाळ
0
नर्मदाकाकूंचा शिव्यांचा धबधबा

शिव्या, असभ्य आणि अश्लील वाक्प्रचार असे आपण ज्यांना म्हणतो आणि नाक मुरडतो तो तर आपल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शिवी हा भांडणातील उद्रेकाच्या टोकाचा उत्स्फूर्त आविष्कार असतो. शिव्या देणे, असभ्य शब्दांचा वापर करणे केव्हाही वाईटच. पण चाळीतल्या वात्रट पोरांची भदभदाकाकू म्हणजेच नर्मदाकाकूंसारखी बाई लाखात एखादीच असते.
—-

चाळ म्हटली की तिथे नाना स्वभावाची, तर्‍हांची, सवयींची, राहणीमानाची, सुशिक्षित-अशिक्षित व्यक्तींची आणि वल्लींची कुटुंबे असतातच. टमाट्याची चाळही त्याला अपवाद नाही. चाळीत चार-पाच कुटुंबे तरी अशी असतात की शेजार्‍यांशी भांडण करण्याची खुमखुमी जणू त्यांच्यात जन्मजात असते. दारातील कचर्‍यापासून मुलांच्या क्षुल्लक बोलाचालीपर्यंत कोणतेही कारण त्यांना भांडणासाठी पुरते.
चाळीत अशा चार-पाच रणचंडिका होत्या की त्यांचे शेजारणीशी भांडण सुरू झाले की दोन्ही बाजूंनी होणारा शिव्यांचा वर्षाव ऐकण्यासारखा असे. कधी कधी त्यात मूळ मुद्दा बाजूलाच राही आणि त्यांच्या शिव्यांच्या भात्यातून नवे नवे बाण एकमेकींवर सोडले जात. प्रत्येकीची भांडण्याची आणि शिव्या देण्याची स्टाईल वेगळी. चाळीतली वात्रट पोरं गच्चीवर त्यांची नक्कल फक्कड करीत. मात्र चाळीतील भांडणात शिव्या देण्यात महामाया होती ती म्हणजे नर्मदाकाकू. वात्रट पोरांनी तिचे नाव भदभदाकाकू ठेवले होते. अंगापेरांनीही ती मजबूत होती. तोंडाळपणामुळे तिच्या थार्‍यालाही कोणी उभे राहात नसे, कारण साध्या बोलण्याची सुरूवात मध्य आणि शेवट सौम्य किंवा कडक शिवीशिवाय तिला करताच येत नसे. वंशपरंपरेपासून की काय पण तिच्याकडे इरसाल शिव्यांचा भरपूर साठा होता.
त्या शिव्यांतही तिने जी वर्गवारी केली होती त्यावरून कुणीही तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले असते. घरात नवर्‍याशी झालेल्या भांडणातील शिव्या वेगळ्या, घरात मुलांवर, सुनांवर शिव्यांचा दांडपट्टा चालवताना बाहेर पडणार्‍या शिव्या वेगळ्या, शेजार्‍यांशी कोणत्याही गोष्टींवरून भांडताना आग ओतणार्‍या शिव्या वेगळ्या, बाजारातील भाजीवालीशी, खरेदी करताना दुकानदाराशी होणार्‍या भांडणात देण्यात येणार्‍या शिव्या वेगळ्या. अगदी सहज बोलताना किंवा अति परिचयाच्या कुणालाही हाक मारताना ती शिवी देऊनच नव्हे तर अपशब्द वापरूनच बोलायला सुरुवात करायची. तिच्या माहेरी किंवा अख्ख्या खानदानात शिव्यांची परंपरा नव्हती अशी खास माहिती तिच्या एका सुनेने त्यांच्या शेजारच्या खोलीतील सुलभाताईंना दिली होती. ती व्हायरल झाल्यावर सगळीकडेच पसरली. मग नर्मदाकाकूंच्या तोंडून या शिव्या धबधब्यासारख्या बदाबदा कशा बाहेर पडतात याचे कोडे कुणालाच सुटत नव्हते.
‘देवमाणूस’ या खुनी डॉक्टरच्या सिरियलमधील ‘शिव्यारड्या’ सरू आजीपेक्षाही नर्मदाकाकूंच्या शिव्या भयानक होत्या. सरू आजी मुडद्यापासून सुरूवात करून ‘त्येचं मढं गेलं मसणात’, ‘त्येच्या तिरडीचा ढासळला बांबू’ अशा माणसाच्या अंतिम क्रियेपर्यंत सर्व शिवीभंडार रिते करते. तसेच ग्रामीण म्हणी, ‘आपल्याच मोरी’सारख्या वाक्प्रचारांचा प्रभावी आणि सेन्सॉर्ड वापर चपखलपणे करून स्वतःची शिवराळ व्यक्तिरेखा इतक्या खंबीरपणे उभी करते की शिव्या ऐकण्याची सवय झालेल्या तिच्या कुटुंबातील कुणालाही त्यात वावगे काही वाटत नाही. तो तिच्या स्वभावाचा भाग असल्याचे प्रेक्षकही मानतात पण नर्मदाकाकू या बाबतीत सरू आजीला पुरून उरतील अशा होत्या. त्या नेहमी घासून गुळगुळीत झालेल्या शिव्या द्यायच्याच, पण स्वतः तयार केलेल्या तिच्या ठेवणीतल्या शिव्या ऐकून ऐकणार्‍यांच्या ज्ञानातही भर पडायची. हे नवीन शब्द यापूर्वी कोणीही, कधीही, कुठेही ऐकलेले नसतील याची खात्री पटायची.
शिव्यांवर संशोधन करून डॉक्टरेट मिळवणार्‍या एका मराठी संशोधकापर्यंत नर्मदा काकूंच्या वेगळ्या शिव्यांची बातमी कानावर जाताच त्यांनी आपले संदर्भ पुन्हा तपासून पाहिले. महाराष्ट्रातील पहिल्या शिलालेखातील शिवीपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्हा, तालुक्यातील ग्रामीण भागात आणि शहरात दिल्या जाणार्‍या शिव्यांची यादी तपासून पाहिली. त्यातही नर्मदाकाकूंच्या ठेवणीतल्या शिव्यांची नोंद सापडली नाही. एक तर चाळीत तिच्या तोंडाला कोणी लागत नसे आणि चुकून एखादी सापडली, तर त्यांच्या शंभर पिढ्यांचा साग्रसंगीत उद्धार केल्याशिवाय काकू शांत होत नसे. तिच्या घरातही नवर्‍यापासून मुले आणि सुनांपर्यंत सारे जीव मुठीत धरून असत. कारण कधी, कोणत्या कारणावरून तिची शिव्यांची भट्टी तापेल आणि त्यातून अपशब्दांच्या ज्वाळा बाहेर पडतील याचा नेम नसे. तिच्या शिव्यांचा मारा सुरू झाला की तो चुकवणार्‍यांची तारांबळ उडायची.
गेल्या वर्षी होळीतील धुलीवंदनाच्या उत्सवात चाळकमिटीतील काही अतिउत्साही पदाधिकार्‍यांनी चाळीतील महिलांची वैयक्तिक आणि सांघिक शिव्यांची स्पर्धा आयोजित केली होती. दोन्ही स्पर्धांना चाळीतील सर्वच महिलांनी नकार दिला. मात्र नर्मदाकाकूंची जीभ शिवशिवत होती. तिने आवाज दिलाच, असेल कोणी हिंमतवाली तर तिने यावे समोर. यापूर्वी नर्मदाकाकूंच्या भरपूर शिव्या खाऊन मनात खुन्नस बाळगलेल्या ताराबाईंनी हे आव्हान स्वीकारले. स्पर्धा प्रचंड गर्दीत सुरू झाली. दोघीही आखाड्यात उतरल्या.
सुरुवातीला दोघींची शाब्दिक खडाखडी पुढे धारदार बनत गेली आणि ताराबाईंनीही कोल्हापुरी हिसका दाखवत नर्मदाकाकूंना जेरीला आणले. दोन्हीकडून शिव्यांच्या अस्त्राचा तोडीस तोड मारा होऊ लागला. एक तास झाला तरी हे शिव्यांचे युद्ध संपेना. शेवटी हे शिवीयुद्ध बरोबरीत सुटल्याचा निर्णय पंच देणार एवढ्यात ताराबाई कडाडल्या, थांबा! या दुनियेतील जेवढं असंल नसंल ते सगळं म्हणजे ही सारी दुनियाच तुझ्यासकट तुझ्या आयेच्या डोस्क्यात कोंबली. आता बोल? सगळं पब्लिक नर्मदाकाकूंची आवाजी बंद झाल्यामुळे खूष झाली. नर्मदाकाकू हरली असे समजून सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. क्षणभर नर्मदाकाकूंनाही काय बोलावे हे समजेना. ताराबाई तर फड जिंकल्यासारख्या नाचू लागल्या. एवढ्यात नर्मदाकाकूंनी एक सणसणीत शिवी देऊन आवेशात आवाज दिला. नर्मदाकाकू म्हणाली, तशीच माझ्या आयेला उचलली आणि तुझ्या आयेच्या डोस्क्यात कोंबली… तिच्या या उत्तराने ताराबाईंची दातखिळी बसली. पंचांनीही नर्मदाकाकू जिंकल्याचे जाहीर केले आणि सर्व चाळकर्‍यांनी नर्मदाकाकूंच्या नावाचा जयजयकार केला.
हा सारा प्रकार चाळीतल्या काही अतिसभ्य लोकांना आवडला नाही. त्यावर चाळकमिटीच्या पदाधिकार्‍यांनी होळीच्या सणात धुळवडीला असे प्रकार माफ असतात, असा खुलासा केल्यावर वातावरण शांत झाले. हा सगळा प्रकार झाल्यावर चाळकमिटीच्या अध्यक्षांच्या वतीने नर्मदाकाकूंना चांदीची ट्रॉफी देण्यात आली.
बहुतेक चाळकर्‍यांनी ही असली दळभद्री स्पर्धा ठेवल्याबद्दल आणि अशा घाणेरड्या प्रकाराला उत्तेजन दिल्याबद्दल चाळकमिटीचा यथाशक्ती उद्धार केला. दुसर्‍या मजल्यावरच्या चोरगे वहिनी सुलूवहिनींना हळू आवाजात म्हणाल्या, अगं ही पीडा आमच्या मजल्यावर आमच्या बाजूला चार खोल्या सोडून राहते. चाळीतल्या शाळेत जाणार्‍या मुलांवर कसले संस्कार होणार आहेत कोण जाणे! नर्मदाबाईंची शिव्यांची मशीन सुरू झाली की आम्ही घरातील सर्वजण कानात कापसाचे बोळे घालून राहतो. बोंबल काय बोंबलायचे ते. त्या दोघींचे बोलणे चोरून ऐकणार्‍या सुलभाताईंनी मात्र नर्मदाकाकूंची बाजू घेतली.
त्या म्हणाल्या, मी कॉलेजात शिकवते आणि लोकसंस्कृतीतील चांगल्या आणि वाईट गोष्टींचाही विचार मी केला आहे. शिव्या, असभ्य आणि अश्लील वाक्प्रचार असे आपण ज्यांना म्हणतो आणि नाक मुरडतो तो तर आपल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या शिव्या जरी लिंगवाचक, स्त्री-पुरुषसंबंधाचा, लैंगिक अवयवांचा खुल्लमखुल्ला उल्लेख करणार्‍या असल्या तरी त्यातील काही शब्द ग्रामीण भागात काय आणि शहरात काय, सर्रास वापरले जातात. ग्रामीण भागातील काही पाणवठ्यांवरच नव्हे, तर शहरातील दोन गटांच्या भांडणातही शिव्यांचा वर्षाव होतो. आपल्यासारख्या सभ्यतेचे मुखवटे लावून जगणार्‍यांच्या काळाला हा प्रकार ओंगळवाणा, अश्लील, असभ्य वाटतो, परंतु या शिव्या, असभ्य म्हणी आणि अश्लील वाक्प्रचारांचा खोलवर अभ्यास केला तर त्यातून एक संशोधनात्मक प्रबंध तयार होऊ शकतो, नव्हे झालाही आहे. त्या प्राध्यापकांना या विषयाची डॉक्टरेटही मिळाली आहे. लोकजीवनाचे नैसर्गिक प्रकटीकरण करणार्‍या अशा ‘असभ्य’ वाक्प्रचारांचा आणि म्हणींचा कोशही प्रसिद्ध झाला आहे. तोही एका प्रतिष्ठित प्रकाशनातर्फे. शिवी हा भांडणातील उद्रेकाच्या टोकाचा उत्स्फूर्त आविष्कार असतो. शिव्या देणे, असभ्य शब्दांचा वापर करणे केव्हाही वाईटच. पण नर्मदाकाकूंसारखी बाई लाखात एखादीच असते.
योगायोगाची गोष्ट म्हणजे ट्रॉफी जिंकल्यावर दोनच दिवसांनी नर्मदाकाकू हार्ट अटॅकने गेल्या. टमाट्याच्या चाळीतील भांडणाचा सच्चा आवाज गेला. अफाट गर्दीने त्यांना अखेरचा निरोप दिला. चाळीतल्या वात्रट पोरांची भदभदाकाकू गेली आणि चाळीतील शिव्यांचा धबधबा एकदाचा संपला! आता तिची आठवण येत नाही, असा चाळकर्‍यांचा एक दिवस जात नाही.

(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)

Previous Post

संपलो एकदाचो लॉकडावन

Next Post

नशेने केला घात

Next Post

नशेने केला घात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.