निवडणुकीच्या वेळी संपता संपता न संपणार्यो विविध पक्षांच्यो रॅल्यो जशो एकदाच्यो संपतंत आणि मगे जशी कोणाकडूनच न पाळली जाणारी आचारसंहिता लागू होता, तसाच आमच्या केळुरीतलो संपता न संपणारो लॉकडावन एकदाचो संपलो आणि तेव्हापासूनच कोणाकडूनंच न पाळली जाणारी सोशल डिस्टंसिंगाची आचारसंहिता आमच्या केळुरीत अगदी कडकपणे सरपंचांकडसून लागू करण्यात इली. केळुरीतल्या लोकांनी हळूहळू वाढत चललेलो आणि संपूचा चिन्ह दिसत नसलेलो लॉकडावन संपवूचो अशो मागण्यो जेव्हा सरपंचांविरुद्ध घराघरातून आन्दोलनां पुकारून केल्यो, तेव्हा सरपंचांच्या मनात नसतानासुद्धा एका महिन्याचो लॉकडावन तेका पंचवीस दिवसांवरती आटोपतो घेऊक लागलो. तेना केळुरीवासीयांच्या आन्दोलनापुढे हात टेकले आणि रागारागातंच ‘फिरा उद्यापासून मोकाट. पण तेवढा सोशल डिस्टंसींगाची मात्र काळजी घ्या आणि मास्क पण वापरा, नायतर हेच्याविरूद्ध पण आन्दोलना करशात!’ असो मेसेज आमच्या ‘द रावडी केळुरीकर्स’ या वॉटसॅप ग्रुपावर टाकलो.
‘काय तरी काय हो सरपंच आ? अहो आम्ही काय एवढे हे आसंत की काय? खंयच्याही गोष्टीवरती आन्दोलन करूक?’ लगेच धर्मा धाकणकरान आपली प्रतिक्रिया सरपंचांच्या बोलण्यावर देवन टाकली. पण त्या दिवसापासून केळुरीतले सगळे वीर आणि वीरांगनो केळुरीतल्या रस्त्यांवरती अगदी मोकळेपणान, थोडांथोडा सोशल डिस्टंसींग पाळत फिरूक लागले.
लॉकडावन संपल्यानंतर दोन दिवसांनी पंचवीस दिवसांच्या लॉकडावनमधे वाढलेले केस कापूक आणि वाढलेली दाढी करूक केळुरीतल्या बर्याच पुरुषमंडळींनी सकाळी सकाळीच गजा न्हाव्याच्या ‘द केळुरी हेअरपोर्ट’ या केशकर्तनालयात ठाण मांडलो. वास्तवीक या गजा न्हाव्याच्या काकाचा म्हणजे दादू न्हाव्याचा दुकान ह्या गावच्या पिंपळाच्या पारावरती होता. मगे जेव्हा दादू न्हावी स्वर्गवासी झालो तेव्हा या गजान अक्कलहुशारीन धाकट्या चुलतभावाक म्हणजे दादूच्या झिलाक मुंबईत महिनो पाच दहा हजाराच्या नोकरीक लावल्यान आणि गावातला घर आणि तां पिंपळाच्या पारावरचा दुकान स्वत: चालवूक घेतल्यान. कालान्तरान जेव्हा पारावरचो तो पिंपळही स्वर्गवासी झालो तेव्हा याच गजान हळू हळू तो पार पोखरत पोखरत त्या पाराच्या आरपार आपल्यो सीमा रेखाटल्यो आणि थंयसर तेना एक टुमदार सलुन बांधून काढल्यानी होता. त्या सलूनमधे आत शिरताच थंयसर भिंतीवर ‘यू विल फील लाईक यू सीट इन अ क्रूझर, व्हॅन यू विल ट्राय अवर गजास सिझर’ ह्या दाजीकाका फडणीसांचा पहिला इंग्रजी काव्य लिहिलेला होता.
असो, तर बर्याच दिवसांनी गजाच्या सलूनात केळुरीतल्या महारथ्यांचे पाय लागलेले होते. त्यामुळे गजा न्हाव्यान सगळ्यांचा गुलाबपाण्याची फवारणी करून आणि अत्तर वैगेरे लावून अगदी यथासांग स्वागत केला. झिलू गावकारावर गुलाबपाणी शिंपडल्यावर ‘ह्या काय?’ असं म्हणून तेना तोंड वाकडा केला. लगेच पंढरी कामत ‘अरे झिल्या, आरे गुलाब पाणी आसंय तां. ह्या काय ह्या काय म्हणून तोंड काय वाकडा करतंस?’ ‘नाय तेका आपली गोमुत्राची सवय आसा ना म्हणान तोंड वाकडा झाला आसात. काय रे झिल्या?’ जनू नाडकर्णी काहीही कारण नसताना बोलूक लागलो.
‘मग तेच्यात वाईट काय झाला?’ लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व लहान असताना चार चौघांमधून पुढे येत ‘अरे हा तर बालगंधर्व’ असा ज्याप्रमाणे म्हटल्यानी आसात, त्याचप्रमाणे आमच्या केळुरीतले संस्कृतीरक्षक निरंजनपंत वालवलकर दोन वर्षांपूर्वी झलेल्या आंतर केळुरी वक्तृत्व स्पर्धेमधलां गोमूत्र आणि संस्कृती या विषयावरचां पाठ केलेला भाषण अगदी फाड फाड करून चार चौघांमधून पुढे येत जशाच्या तस्सा बोलूक लागले, ‘पूर्वजांच्या संस्कृतीचो अभिमान आपल्याक आसूकंच व्हयो. गोमूत्राची सवय आसाप म्हणजे काय चूकीची गोष्ट नाय! तुमची ती शिरपां आणि त्यो डॉक्टराच्या गुळ्यो घेण्यापेक्षा आमचा गोमूत्र कधीही चांगला. अरे म्या तर म्हणतंय गोमूत्र फक्त शिंपडूचाच कित्याक? ता सर्वांनी रोज पिवूक व्हया आणि या कोरोनाच्या काळात तर तुमका सांगतंय गोमूत्रासारखा दुसरा औषध नाय.’
तेवढ्यात थंयसर त्या गजाक काय झाला काय माहिती तो म्हणजे अचानक गुलाबपाण्याची फवारणी खाली ठेवत निरंजनपंतांच्या भाषणावरती एकटोच टाळ्यो वाजवूक लागलो. सगळे तेच्याकडे एकदम बघूक लागले. तेवढ्यात ‘अरे देवा वाजवायच्यो नव्हत्यो काय!’ असा म्हणत पुन्हा निरंजनपंत पुढे काय तरी बोलतले असा समजून हातातली गुलाबपाण्याची फवारणी सांभाळत गप खुर्चीवरती बसलो.
पण तेवढ्यात सदा गावड्यान उपदेश सुरू केले, ‘काय तरी काय हो वालावलकर? गोमुत्र काय प्या गोमुत्र? आं? त्यापेक्षा झकास म्हणजे बकरीचा दूध! अहो एकदा पिऊन तर बघा. गोमुत्र विसरतले.’
‘बरोबर, हेचा बकरीचा दूध खपत नाय ना म्हणून गिर्हाईक घालता तुमका वालावलकर,’ आण्णा अडसूळ पानाची पिचकारी पचकता तशे मधेच पचकले.
‘अरे कोणीही म्हाका कसलीही भूल घातली म्हणून मी भुलूक नको? अरे गोमुत्र ही आणि हीच आपली संस्कृती आसा. बकरीचा दूध वाईट हा असा आम्ही कधी म्हटल्यानी नाय आणि म्हणूचोय नाय, कारण आमचे बापूसुद्धा बकरीचा दूधंच प्यायचे.’
‘ऐकून घेता म्हणान काहीही काय बोलतंत हो वालावलकर? अहो तुमच्या बापूंनी बकरीचा दूध कधी पाहिल्यान पण नसेल कधी जन्मात! कारण ते पीत होते ता म्हणजे तळीरामाच्या गोठ्यातला दूध,’ आप्पा नार्वेकर लगेच भाषण बोलल्यासारखा बोलले.
‘अरे बापू म्हणजे काय आमचे वडिल नाय. बापू म्हणजे परमपूज्य गांधीजी,’ वालावलकरांनी आपला स्पष्टीकरण दिला, ‘आणि ता जाऊदे पण गोमूत्राचा संवर्धन ह्या होऊकंच व्हया. काय लोक गोमूत्राची टिंगल करतंत, मस्करी करतंत, ता अजिबात खपवून घेतला जावूचा नाय.’ वालावलकर आप्पा नार्वेकर आणि सदा गावड्याकडे डुशणी दिल्यासारखा बघूक लागले.
‘ओ माज्याकडे काय बघतास? म्या काय म्हटल्यान? आता बकरीचा दूध प्या म्हटल्यान तर काय वाईट बोललो काय हो? आ? तुम्हीच सांगा हो कामत!’ सदा गावडे बोलूक लागलो.
‘तर तर, अरे सरळ गोमूत्र विसरतले म्हणजे काय? हो गोमूत्राचो अपमान आसा. अरे एकवेळ स्वत:क विसरेन पण गोमूत्राक अजिबात विसरूचो नाय. आणि एकवेळ पाणी पिल्याशिवाय रावतलो पण गोमूत्र पिल्याशिवाय रवूचो नाय,’ वालावलकरांचो आवाज म्हणजे करता करता चढूच लागलो.
‘ओ गप बसा हो काय तरी काय बोलताय? हंयसर इलो कशासाठी आणि बोलताय काय? ए गजा, आरे बघतंस काय? घे ती कात्री आणि सुरू कर एकेकाची हजामत!’ पंढरी कामतान तेवढ्यात समझोतो केलो.
मग गजान सर्वप्रथम सदा गावड्याक कात्रीत घेतल्यान. तेवढ्यात शांतू भट गुड्डी नावाच्या कुत्र्याक घेऊन थंयसर इलो. ‘ए गजा केस कापूचे हा,’ असा म्हणंत तो थंयसर बाकावरती बसलो आणि थंयच अगदी तेच्या पायाजवळ तेचो तो कुत्रो गुड्डीसुद्धा लोळण घेत आळस वैगरे दिल्यासारखा करूक लागलो.
‘यू यू यू यू गुड्डी घे बिस्कीट खा,’ असा म्हणत झिलू गावकारान हातातलो बिस्कीटांचो पुडो फोडत तेच्यातली दोन बिस्कीटा गुड्डीच्या पुढ्यात ठेवली. गुड्डीनं ती बिस्कीटा नीट न्याहाळली आणि जागच्या जागी गप पडून रवलो.
‘काय रे शांतू? अरे बिस्कीट पण खात नाय मरे तुजो कुत्रो!’ झिलू उदास होत म्हणालो. तेवढ्यात कारण नसताना जनू नाडकर्णी मधेच ‘शांतू भटाचो कुत्रो आसा ना तो, आंघोळ केल्याशिवाय चाय पण नसात घेत. काय रे शांतू बरोबर ना?’
शांतू भट कायतरी बोलूक जाई होतो तेवढ्यात आप्पा नार्वेकरांनी म्हणजे आरोळीच फोडली, ‘अरे देवा केळुरेश्वरा, आता ह्या आणि काय झालां?’
त्या आरोळीमुळे गजा न्हाव्याच्या हातातल्या ट्रीम मशीनान दिशा बदलली आणि चुकून सदा गावड्याची अर्धी मिशी पूर्णपणे छाटली गेली. सगळेजण तेवढ्यात आप्पा नार्वेकरांका ‘काय झाला, काय झाला’ म्हणून विचारूक लागले.
‘अरे ही मेसेज वाचा वाट्शेपावर आलेली. हरि पेडणेकराक कारोना झालो हा. ह्या बगा तेच्या झिलान मेसेज टाकलो हा ग्रुपावर,’ नार्वेकर म्हणजे अगदी उद्विग्न की काय म्हणता तशे झाले होते.
‘अरे देवा झाला मग कल्याण,’ झिलू गावकर.
‘नाय त काय पयलीच तेका डायबिटीज् आणि आता तेच्यात ह्या!’ धर्मा धाकणकरान भाष्य सुरू केल्यान.
‘मग काय आता परत लॉकडावन की काय?’ गजा अगदी घाबरत घाबरतंच विचारूक लागलो.
तेवढ्यात पंढरी कामतान कोणीही न विचारता सगळ्यांचा नेतृत्व स्वीकारल्यान आणि ‘ह्या बघा, आधी म्हणजे शांत व्हा. आता एक काम करूक व्हया. सगळेजाण मिळून आत्ताच्या आत्ता सरपंचाकडे जावया आणि तेकाच हेच्यावर काय तोडगो काडूचो ता विचारूया.’ पंढरी कामताक आपण केळुरीतल्या जनतेचो लोकप्रतिनिधी आसंय वैगरे असा मनातल्या मनात वाटूक लागला आणि केळुरीतल्या सगळ्या पुरूष मंडळींनीही पंढरी कामताचा स्वयंघोषित नेतृत्व मान्य केला आणि जशे आमदाराच्या मागे तेचे कार्यकर्ते भैय्या तुम लढो हम तुम्हारे साथ हैच्या तालावरती जातात, तशेच सगळेजण पंढरी कामताच्या मागे जाऊक लागले. सदा गावडे तर अर्धी मिशी घेऊन आणि गजा न्हाव्याने दाढी करतेवेळी तेच्या अंगावर गुंडाळलेल्या पांढऱ्या कपड्यासकट तेंच्यामागून जाऊक लागलो. खराच नेत्यांच्या मागून घोषणा देत जाणार्या कार्यकर्त्यांचो काय उत्साह आसात ह्या त्या दिवशी लक्षात इला. अशा प्रकारे सगळेजण केस न कापता गजाच्या सलूनमधून चालते झाले आणि बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा चालू झालेलो धंदा परत बंद पडता की काय अशी चिंता करत गजा सलूनच्या दारावर सगळ्यांका पाठमोरां जाताना बघत उभो रवलो.
– शिवप्रणव आळवणी
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)