भारताच्या स्वातंत्र्याला यंदा ७४ वर्षे पूर्ण होतील, हा आपला ७५वा स्वातंत्र्यदिन. ‘मार्मिक’ला याच आठवड्यात ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. दर वर्षी स्वातंत्र्यदिन आणि ‘मार्मिक’चा वर्धापनदिन यांची सांगड घालून बाळासाहेबांच्या कुंचल्यातून वर्तमानाचं कोणतं चित्र साकारतं याची उत्सुकता ‘मार्मिक’च्या वाचकांना असायची. हे विषण्ण करणारं प्रत्ययकारी चित्र कोणत्या वर्षातलं आहे, हे फारसं महत्त्वाचं नाही; ते आजच्या परिस्थितीलाही लागू पडणारं असेल, तर आपण इतक्या वर्षांत काय केलं, असा प्रश्न उद्भवतो. स्वातंत्र्याच्या वृक्षाला सुराज्याची फळं लगडण्याऐवजी वेगवेगळ्या प्रश्नांची वटवाघळंच लटकलेली आहेत, त्यांची नावं फक्त बदलली. अशावेळी हातात कुंचला आणि लेखणी घेतलेल्या एका व्यंगचित्र साप्ताहिकाने काय करायचं? जे ‘मार्मिक’ने तेव्हा केलं, तेच करायचं; होता होईल तेवढी वटवाघळं पळवून लावायची, जळमटं झाडून टाकायची आणि निश्चेष्ट पडलेल्या मनांमध्ये उभारी भरण्याचा, अंगार फुलवण्याचा प्रयत्न करायचा!