• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कविता असते अशीच धूसर

- श्रीकांत आंब्रे (टमाट्याची चाळ)

श्रीकांत आंब्रे by श्रीकांत आंब्रे
August 5, 2021
in टमाट्याची चाळ
0
कविता असते अशीच धूसर

कविता करून बाळूचे डोक्यावरचे केस विरळ झाल्यामुळे सर्वप्रथम अध्यक्षांनी त्याच्या डोक्यात हॅट घालून आणि शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला. तेव्हा कमिटीतर्फे एक हजार एक फटाक्यांची माळ गच्चीत लांबवर लावण्यात आली. तिच्या धुराने कोंदट झालेल्या वातावरणाला पुन्हा एकदा बाळूच्या कवितेने पुन्हा एकदा निरभ्र केले.
—-

बाळू साटमाच्या अभिनंदनासाठी चाळीच्या गच्चीवर लागलेली त्याच्या कवितांच्या चाहत्यांची रांग हटत नव्हती. रंगीबेरंगी फुलांच्या गुच्छांमध्ये बाळू न्हाऊन निघाला होता. एवढ्यात चाळीचे पदाधिकारी फुलांचा मोठा गुच्छ आणि मिठाईचा पाच किलोचा बॉक्स घेऊन आले. रांगेत उभे न राहता त्यांनी व्हीआयपीप्रमाणे पुढे जाऊन बाळूचे अभिनंदन केले व त्याला फुलांचा गुच्छ दिला. मिठाईच्या बॉक्सची फीत बाळूच्या हस्ते कापण्यात आली आणि सेक्रेटरींनी मिठाईचा मोठा चौकोनी तुकडा बाळूला भरवला… भरवला कसला, त्याच्या तोंडात कोंबला. त्यामुळे ती बर्फी खाताना त्यांचे तोंडी आभार मानणेही बाळूला शक्य झाले नाही. तरीही बाळूने नम्रपणे सर्वांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि कवितेतच त्यांचे आभार मानले.
तुम्हीच दिली मला प्रेरणा
कवितेचा मग हले पाळणा
विषयांना कधी नव्हता तोटा
म्हणून लागल्या कविता-वेणा
कणाकणामध्ये असते कविता
हवे हवेमध्ये दिसते कविता
सुक्ष्म-लघु अदृश्य क्षणातही
कधी मनाला डसते कविता
बाळूच्या या कवितेला प्रचंड दाद मिळाला. टाळ्यांच्या कडकडाटात बाळू हरवून गेला. चाळ कमिटीचे अध्यक्ष म्हणाले, कविवर्य बाळू साटम याने केलेल्या कवितांच्या विक्रमाची नोंद जगाने घेतली, यात बाळूबरोबर आपल्या टमाट्याच्या चाळीचाही गौरव आहे. आजपर्यंत त्याला कसले आणि किती पुरस्कार मिळाले याची तर गणतीच करता येणार नाही.
ऑलिम्पिकमध्येही भारताला कधी इतकी पदकं मिळाली नसतील.
त्यांना थांबवत बाळू म्हणाला, थांबा, पदकावरून मला बदकाची कविता सुचते आहे. जरा धीर धरा. मग बाळूने आकाशात इकडे तिकडे नजर फिरवून पाहिले आणि पुढच्याच क्षणाला त्याने कविता प्रसवली.
बदकांची माळ दिसे
अजून दलदलित
पकडण्या गेला तिला
बबन थुलथुलीत
घसरताच पाय फसे
अंग बुळबुळीत
पडला तो फसला ना
देह डळमळीत
ही तर तळ्यातल्या बदकांपेक्षा भारीय, चाळ कमिटीच्या उपसेक्रेटरींनी दाद दिल्याबरोबर टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला.
तेवढ्यात टीव्ही चॅनेलचे कॅमेरामन माइकच्या दांडक्यासह आले. बहुतेक त्यांना बाळूची मुलाखत घ्यायची होती. त्यांच्यासोबत एक देखणी फटाकडीही होती. आणखी तीन-चार चॅनेलचे कॅमेरामनही आले होते. पाऊस थांबल्यामुळे चाळ कमिटीच्या अध्यक्षांनी हिशोब तपासनीसांना ऑर्डर दिली की आताच्या आता चाळीत सर्व मजल्यावर फिरून हाळी दे की आताच्या आता बाळूच्या चाळ कमिटीतर्फे होणार्‍या सत्काराला सर्वांनी उपस्थित राहावे आणि कोपर्याळवरच्या डेकोरेटरला एका राजसिंहासनाची आणि शंभर दीडशे खुर्च्यांची ऑर्डर देऊन ये. अर्जंट आहे म्हणून सांग आणि साऊंड सिस्टीमही हवी म्हणावं. धावत जा आणि पळत ये.
भराभर गच्चीवर चाळकर्‍यांची रीघ लागली. आजूबाजूच्या चाळीतही बातमी पोचल्यामुळे गर्दी वाढत चालली. दहा मिनिटांत डेकोरेटरने सर्व व्यवस्था केली आणि बाळूला टेबलाच्या मागे राजसिंहासनावर बसवले. बाजूच्या खुर्च्यांवर चाळ कमिटीचे पदाधिकारी बसले. कविता करून बाळूचे डोक्यावरचे केस विरळ झाल्यामुळे सर्वप्रथम अध्यक्षांनी त्याच्या डोक्यात हॅट घालून आणि शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला. तेव्हा कमिटीतर्फे एक हजार एक फटाक्यांची माळ गच्चीत लांबवर लावण्यात आली. तिच्या धुराने कोंदट झालेल्या वातावरणाला पुन्हा एकदा बाळूच्या कवितेने पुन्हा एकदा निरभ्र केले. डोळे चोळीत बाळू उद्गारला.
जेव्हा असा धूर होतो
आणि डोळे चुरचुरतात
तेव्हा कविता करण्या माझे
शब्द शब्द फुरफुरतात
कविता असते अशीच धूसर
सिगारेटच्या वलयांसारखी
तिची कंकणे विरत जातात
विझलेल्या राखेसारखी
पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला. तेव्हा अध्यक्ष माइकवर येऊन म्हणाले, आता कविता राहू देत. आपण बाळू साटम या महान कवीच्या सत्काराला सुरुवात करूया. त्याला चाळ कमिटीतर्फे कर्तृत्वाचा गौरव करणारे मानपत्र देण्यात येत आहे. बाळूने त्याच्यावर आता कविता न करता ते आनंदाने स्वीकारावे हे म्हटल्यावर बाळूचा चेहरा पडला. ते ओळखून अध्यक्ष म्हणाले, बाळू उठता बसता चालता बोलता समोर जे दिसेल वा न दिसेल त्याच्यावर कविता करू शकतो याची जाणीव मला आहे. म्हणून तर शीघ्रकवी म्हणून त्याचे नाव जगभर गाजते आहे. जसा जलाविना मासा तसा बाळूविना कवितेचा ससा उड्या मारू शकत नाही… अध्यक्षांनाही बाळूच्या कवितेची लागण झाल्याची दाट शंका गोपीनाथ परबांना आली आणि त्यांनी खुर्चीतून आवाज दिला. अध्यक्षानु, तुम्ही पण कवितेत भाषण करा. परबांना बाकीच्यांनी गप्प केले. अध्यक्ष म्हणाले, आता मी काही फार बोलत नाही. पण एक गोष्ट खात्रीने सांगतो की बाळूच्या कवितांचे देशीच नव्हे तर विदेशी भाषांमध्येही अनुवाद होऊन त्या कविता मॉण्टेसरीच्या पुस्तकांपासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत समाविष्ट होतील. त्यांच्या कवितांचे सर्व भाषांमध्ये संग्रह निघतील आणि जगात या टमाट्याच्या चाळीतील कवीचे नाव होईल…
त्यावर लटपटत उभे राहिलेले येसूमामा हातातली क्वार्टर उंचावत म्हणाले, चिअर्स बाळू चिअर्स, आम्हाला देशी पण चालेल आणि विदेशीबी. पण कडक पायजे. तुज्या कवितेसारखी. चकना खाल्ल्यावर नशा भिनायला पायजे डोसक्यात… ते ऐकून बाळू सिंहासनावरून उठला. त्याचे ओठ फुरफुरू लागले. बहुतेक त्याला येसूमामाचे उद्गार ऐकून शीघ्र कविता होत असल्याची चिन्हे दिसू लागली. त्याबरोबर त्याच्या बाजूला बसलेल्या चाळ कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी त्याचे तोंड दाबून धरले आणि त्याला बसवून पाणी प्यायला दिले. अध्यक्ष म्हणाले, मला जे काही बोलायचे आहे ते बोलून झाले आहे. आता हे टीव्हीवाले त्याची मुलाखत घेतील, ती मात्र आपण ऐकायची आणि उद्या रविवारी टीव्हीवर खास कार्यक्रमात पाहायची आहे.
त्यानंतर बाळू सोडून सर्व पदाधिकारी समोर खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसले. फक्त बाळू सिंहासनावर होता आणि त्याची मुलाखत घेणारी सुंदरी बाजूच्या गुबगुबीत आसनावर होती. कॅमेरा… लाईट… स्टार्ट म्हटल्यावर ऐतिहासिक मुलाखतीला सुरुवात झाली.
– कविराज बाळू साटमसाहेब, कविता करण्यास आपण केव्हापासून सुरुवात केलीत?
– माझी आई सांगते, मी जन्माला आलो तोच रडत नव्हे तर कविता म्हणत. ती कविता आईवर होती असे आई सांगते. आईशप्पथ. आई म्हणते, तुझे बोबडे बोल म्हणजे कविताच असायच्या. माझ्या पाळण्यातल्या कविता आईने वहीत लिहून ठेवल्या आहेत. त्यातली दीर्घ धारेची कविता तर अप्रतिम आहे.
– नका. नका. म्हणू नका. ओंगळवाणं वाटेल. मला सांगा, त्यानंतर शाळेत गेल्यावर कशाकशावर कविता केल्यात?
– आमच्या बाईंवर, बाजूच्या वर्गातल्या बाईंवर, अख्ख्या शाळेतील सर्व बाईंवर. कारण प्रत्येकीचे दिसणे, शिकवणे, बोलणे, चालणे, हसणे वेगळे. मी तर सर्व शाळा फिरून सूक्ष्म, अतिसूक्ष्म नजरेने सारे काही टिपायचो.
– आणि कविता करायचा उद्योग करायचो असेच ना?
– हो. अगदी खरं.
– शाळेत मुली नव्हत्या वाटतं तुमच्या!
– होत्या ना. पण मी त्यांना भगिनी मानायचो. माझ्या कवितेच्या छंदामुळे त्या माझ्या आजूबाजूलाही फिरत नसत, हे मला नंतर कळलं. रक्षाबंधनालाही सगळ्याजणी माझ्यासाठी राख्या पाठवत त्याही बाईंमार्फत. प्रत्यक्षात हातात राखी बांधायला कोणीच येत नसे.
– केवढी दहशत होती तुमच्या कवितांची तर. तरीही प्रेमकविता लिहिल्यात की नाही?
– भरपूर. माझ्यावर कोणी प्रेम केले नाही म्हणून मी कुणावर केले नाही, असे नाही. त्याला एकतर्फी प्रेम म्हणतात. तशा शेकडो काय, हजारो कविता केल्यात मी. किती नमुनेदार कवितला आहेत त्या. त्यातील एकच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. ऐका –
तुला डोळा मारला
केवढा महागात पडला
तू सँडल उगारलीस
मी नंबर विचारला
माझा दुर्दैवी गाल
नाही झाला लाल
तिने फक्त दिली हूल
बचावलो बालंबाल
मग मी पुन्हा कधी प्रेमप्रकरणात पडलो नाही. ते आंधळे असते तसेच मारकुटेही असते हे मला कळले. ‘नसलेल्या प्रेयसीवर असलेल्या कविता’ या माझ्या काव्यसंग्रहापासून मी हजारो प्रेमकवितांचा रतीब घातला.
– कविराज बाळू साटम, तुम्हाला कविता स्फुरतात कशा? कठीण शब्दात तुमच्या काव्यनिर्मिती प्रक्रियेविषयी थोडक्यात सांगा.
– फूल कसे फुलते हे जसे सांगता येत नाही. वारा कसा वाहतो, सुगंध कसा येतो, आपण श्वास कसा घेतो हे जसे सांगता येत नाही तसेच कविता कशी जन्म घेते हे कोणत्याही कवीला सांगता येणार नाही. उत्स्फूर्त उद्गार, काव्यप्रतिभा हे सारं झूठ आहे. कविता कशावरही करता येते, अगदी झुरळावर आणि ढेकणावरसुद्धा. कविता करायची नसते, ती होते. आपोआप होते. तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हालाही होईल. फक्त हातात पेन आणि कागद पाहिजे. जिच्यावर कविता करायची ती वस्तू समोर असली काय आणि नसली काय.
एवढ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. तुफान वार्‍याने आणि जोरदार पावसाच्या मार्‍याने एकच हलकल्लोळ माजला. बाळूसकट जो तो जीवाच्या आकांताने खाली पळू लागला. धारा कोसळत होत्या. दिवसा अंधार दाटला होता. खाली पळताना बाळूचे शब्द मात्र मोठ्याने ऐकू येत होते… कविता असते अशीच धूसर…

– श्रीकांत आंब्रे

(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)

Previous Post

अत्यंत चुरशीची आणि गाजलेली निवडणूक

Next Post

चित्रांगदा

Next Post
चित्रांगदा

चित्रांगदा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.