काही पर्यटक तर छळवाद असतात. प्रत्येक गोष्टीचे फोटो काढत सुटतात. बरं ते घरी गेल्यावर निवांतपणे फोटो बघून परत सगळं एन्जॉय करतील, आठवणी बिठवणी काढतील असंही नाही. ते फोटो भराभर दहा-पंधरा ग्रुपवर शेणी थापाव्यात, तसे थापून ठेवतात. म्हणजे आपल्या मोबाईलमधला कचरा दुसर्याच्या मोबाईलवर टाकून मोकळे.
—-
मोबाईलने जसा माणूस स्वस्त केलाय, तशी अजून एक गोष्ट स्वस्त करून ठेवलीय… ती म्हणजे फोटो.
आजकाल कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाणं ही वेळ- म्हणजे अमूल्य वेळ आणि चार पैसे खर्च करून जायची साधी गोष्ट राहिली नाहीये. तर अघोषित मुख्य अट म्हणजे, फोटो बरे यायला हवेत ही झालीय. शिरा मार… त्या ठिकाणी फिरतानाचे, हसतानाचे, आऽऽऽ करून खातानाचे ज्यूस किंवा चहा पितानाचे फोटो चांगले यायला पाहिजेत, हा एक अदृश्य नियमच झालाय. आपण तिथे नुस्ते भटकतोय, आपलं मन शांत होत चाललंय, रोजच्या व्यवहार आणि कटकटींचा आपल्याला विसर पडलाय, किडुक मिडुक वैरं खाचपटीत जावून पडलीयत, आपल्याला नवीन काहीतरी भन्नाट सुचतंय, मन ९९ टक्के निरोगी होत चाललंय, मनाची पिवळट पांढरट पडलेली किडलेली पानं आपण चालता चालता कातरून टाकलीयत.. कातरीला धार नसल्यास नुस्ती हाताने मेथी खुडतात तशी खुडून टाकलीयत आणि आपण हलकेफुल्ल झालोय- एवढे की खांद्याच्या वरच्या भागातून दोन मखमली पंख फुटतील असा भास व्हायला लागलाय… ही आताच्या काळात आपली ट्रिप छान झाल्याची चिन्हं नाहीयेत, तर मुख्य अट फोटो चांगले हवेत हीच आहे.
तुम्ही जर ढोपरभर लिहून जोडीला दोन फोटो टाकलेत, तर अत्यंत बिझी लोक फक्त फोटो बघून सगळी ट्रिप जज करतात. एखादा छानसा लाइक किंवा दोन मोजके अनमोल शब्द अशा कमेंटी टाकून पुढे जातात. कारण त्यांना खूप पोर्षन कमीत कमी वेळात कव्हर करायचा असतो. काही वेळा रिव्हिजन पण करायची असते. अशा महत्त्वाच्या वेळी सारांश काढायला फोटो बरा पडतोय. म्हणजे मिशन सक्सेसफुल झालंय हे सिद्ध करायचं असेल, तर फोटो छान यायलाच हवेत. (इज दॅट क्लियर?)
म्हणजे काय, तर पुढच्या शर्ती पाहा.
बाहेर पडता पडता झालेल्या कडाक्याच्या भांडणाचा मागमूसही दिसता नये.
फोटो हसरे यायला हवेत (बॅग भरून ठेवल्यावर काही कारणास्तव कपडे परत कपाटात भरून ठेवले होते, हे पब्लिकला अजाबात कळता कामा नये).
जोडीदार पण हसरा हवा (ही आणखी एक मुख्य अट असते… इथे पष्टीकरण करत नाही).
कपडे नवीन हवेत. किमान मागच्या चार ट्रिपमधले नकोत (आपलं शॉपिंग कळायला हवं). फॅशनेबल हवेत (आपला मॉडर्नपणा कळायला हवा).
फोटोत ताजगी हवी (तिथे गेल्या गेल्या चप्पल तुटली होती हे कळता कामा नये. खराब रूम मिळालेले, खराब जेवणाने पोट बिघडलेले, त्रस्त वैतागलेले, झक मारून तुझं ऐकलं आणि बाहेर पडलो, ही आता आपली शेवटची ट्रिप अशा चेहर्यांचे कोणीही यात दिसता कामा नयेत.)
ही आणि अशी अनेक अवधानं जपत राहावी लागतात.
पूर्वीच्या काळी एखादाच फोटो निघायचा. त्यात बर्याच वेळा ठिपकेच निघायचे. आपला फोटो ओळखण्यात अनोखी गंमत असायची. कशा रिलॅक्स असायच्या पूर्वीच्या ट्रिपा! दिवसेंदिवस हे मानसिकदृष्ट्या झेपवणं कठीण होत चाललंय.
परवाच सुप्रसिद्ध मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला एक डबा जोडला म्हणून बातमी दाखवत होते. बघते तर प्रत्येक जण खिडकीतून बाहेर बघत शूटिंग करतोय. साध्या डोळ्यांनी एकानेही तो नजारा बघितला नाही. हे मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं. लहान पोरंसुद्धा मोबाईलमधे शूटिंग करत होती. आता हे सगळं बघितलेलं मोबाईलमधे अडकून पडणार… डोळ्यातून अंतःकरणात झिरपणार नाही, या विचाराने मला नुस्तं कळवळायला झालं. अरे, हिरवा रंग बघून डोळे चांगले होतात. डोळे थंडावतात. आता मोबाईलची लेन्स हेल्दी होईल.
पिकनिकला किंवा कुठे फिरायला गेल्यावर तिथे मोबाईल वापराला बंदी घातली तर लोकांना काय करावं समजणार नाही. लोक वेडसष्ट होतील. सगळा निसर्ग फुकट वाहून चाललाय असं वाटेल. लाखो फुलं-पानं-पक्षी-दगड आयुष्यात फोटो न काढताच मरून गेले, असा एक विचित्र फील येईल.
कारण बरासा झरा दिसला, डोंगर दिसला, बेडुक दिसला की लगेच काढ फोटो! अरे, त्या बेडकाला जरा पोज तरी घेवू दे. काय एवढी घाई?
काही पर्यटक तर छळवाद असतात. प्रत्येक गोष्टीचे फोटो काढत सुटतात. बरं ते घरी गेल्यावर निवांतपणे फोटो बघून परत सगळं एन्जॉय करतील, आठवणी बिठवणी काढतील असंही नाही. ते फोटो भराभर दहा-पंधरा ग्रुपवर शेणी थापाव्यात, तसे थापून ठेवतात. म्हणजे आपल्या मोबाईलमधला कचरा दुसर्या मोबाईलवर टाकून मोकळे. स्वत:चे फोटो कदाचित डिलीट पण मारत असतील. म्हणजे यांच्या आवडीपायी आपण आपल्या मोबाईलची सकाळ संध्याकाळ झाडलोट करून सडा सारवण करायचं… अरे, किती राबवाल दुसर्याला?
गेल्या वर्षी आम्ही अजिंठा-वेरूळला फिरायला गेलो होतो. तिथे काही लोकांनी सगळ्या लेण्यांना हैराण करून सोडलं. लेणी बोलायला लागली असती तर त्यांनी फक्त शिवीगाळ केली असती. किती अँगलने एखाद्या शिल्पाचे फोटो काढावेत याला काही सुमार! परत ते काढताना आपण वाकडे तिकडे कोकडे होणार! लेणी सोडून आपणाला झक मारत यांना बघत राहावं लागतं! पटकन पुढे सरकणार नाहीत. जिथे तिथे वेटोळं घालून पडून राहणार. काहीजणी त्यातल्या नर्तिकेसारखी पोज घेत होत्या… भलतंच विनोदी दृश्य! फोटोत ते मूळ शिल्प किंवा लेणी येत होती की नाही कोण जाणे!
अजिंठ्याला निद्रिस्त बुद्धाचं अप्रतिम शिल्प आहे. तिथे एक बाई विविध पोझ घेत, फोटो घेत सुटली होती. बुद्धाला नुस्तं त्रस्त करून टाकलं होतं. त्याला जाग आली असती तर फक्त लालभडक डोळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं असतं. अजूनही बुद्धाची ध्यानावस्थेत मग्न असलेली शिल्पं आहेत. जिथे आपण नकळत शांत किंवा अंतर्मुख होतो. तिथे सगळीकडे ही बया (हां तीच) नवरा आणि मुलाला वेठीला धरून फोटो काढून घेत होती. (हे कारण घटस्फोटाला पुरेसं आहे का?) बुद्ध जर जिवंत झाला असता तर ही वेळेची हिंसा आहे असं परखडपणे बोलला असता.
सगळी लेणी पाहून झाल्यावर ती कृतकृत्य होवून एक मोठा प्रोजेक्ट संपवल्याचं समाधान चेहर्यावर बाळगत निघाली. तेव्हा मला असा संताप अनावर झाला की मी रागाने एकदम चुपचाप होवून गेले… माझी राग व्यक्त करण्याची हीच पारंपारिक पद्धत आहे.
सुंदर झाडं आहेत. फुलं नुस्ती फुलली नाहीत तर उमलली आहेत. रंगीबेरंगी फुलपाखरं बागडताहेत. पिकलेल्या फळांवर पक्षी चोच मारत आहेत. खारुताया आस्वाद घेताहेत, हे वैभव मनसोक्त बघून मग वाटलं तर टिपा एखादा फोटो! पण खायच्या आधी ओकायची घाई!
हल्ली तर डोळ्यांना फेसबुकीय किंवा व्हॉट्सपीय नजर पुढे डोंगळ्यासारखी चिकटलीय असं वाटतं. शेतकरी जसा एक चार टोपल्या भाजीपाला झाला की यावर शंभर दोनशे रुपये सुटतील असा अंदाज घेतो, तसं कुठलंही सुंदर दृश्य बघताना याचा फोटो काढला तर साधारण किती लाईक पडतील किंवा किती कॉमेंटी पडतील याचा अंदाज घेतला जातो. एखादी छानशी ओळही लगेचच सुचते आणि चेहरा यकायक उजळून जातो. अगदी मस्त वातावरण सभोवती असूनही एखाद्या माणसाचा चेहरा किमान एक पाच फूट (जास्त कितीही असू शकतो) पडलेला असेल तर समजून घ्या की त्याला छानशी पोस्ट सुचत नाहीये किंवा डीपीला ठेवायला छानसा फोटो भेटत नाहीये.
मागे एकदा आम्ही चारपाच जणी शाळेतल्या मैत्रिणी फिरायला गेलो होतो त्यावेळी सगळ्यांनी एवढे फोटो धडाधड काढले की मोबाईल दुथडी भरून वाहायला लागले.. परत तिथे सेल्फी पॉईंट असतात… त्यांचं ऋण फेडायचं असतं! मग दहावीस शब्द बोललो आणि घरी आलो. दोन तीन दिवस लागले सगळी झाडलोट करायला. गंमत म्हणजे मी प्रत्येक फोटोत झळकत होते. स्वत:ला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली बघवेना मला!
फिरायला गेल्यावर दुसर्या माणसांना फोटो काढताना बघणे हेच आता पर्यटन होईल अशी भीती वाटायला लागलीय. (भी मग… जगाला घाबरत राहा… दुसरं काय करणार तू?)
– सई लळित
(लेखक खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)