दादांनी व्यवसायातील नवीन व्यावसायिक हे देखील स्वत:चे कुटुंबच मानले. क्लायन्ट हा केवळ व्यवहारापुरता न ठेवता त्याच्याशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले. पैशाची वसुली ‘पठाणी’ तत्वावर न करता ‘मित्रत्वा’च्या नात्याने केली. त्यामुळेच एका इवल्याशा रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. अगदी आधी टेकडी, मग डोंगर, आणि आता सह्याद्री..
—-
‘अरे पाध्ये, त्या आपल्या क्लायंटची जाहिरात आपल्या पेपरमधे नाय येता, लोकसत्तामदे कशी आला? तू दिला काय?’ ‘प्रजामंत्र’ वृत्तपत्राचे संपादक चिमणभाई शहा यांनी प्रश्न विचारला.
‘हो… त्यांना ‘लोकसत्ता’मध्ये जाहिरात हवी होती. मी म्हटले, मी व्यवस्था करतो.’ त्यांच्या वर्तमानपत्रात प्रूफरीडिंग आणि जाहिरातविषयक काम करणार्या पाध्येंनी प्रामाणिक उत्तर दिले. त्यात कसलीही पळवाट किंवा भीती नव्हती.
‘अरे वा, तू हे केला तर मग तू सोताचा जाहिरातचा धंदा पण चांगला करेल. तू एक काम कर, माज्याकडचा नोकरी सोड अने सोताचा धंदा सुरू कर. मी तुला लागेल ती मदद करेल. तुज्यामदे पोटेन्सल हाय.’
चिमणलाल शहा हे एका गुजराती वर्तमानपत्राचे संपादक होते. त्यांच्याच मराठी वृत्तपत्रासाठी बाळकृष्ण यज्ञेश्वर पाध्ये, अर्थात बी. वाय. पाध्ये हे जाहिरात विभागात नोकरी करीत होते. केवळ क्लायंटला मदत म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. पण त्यांच्यावर संशय न घेता चिमणभाईंनी त्यांना एक व्यावसायिक प्रोत्साहनच दिले.
इवलेसे रोप, लावियले दारी…
‘मी नोकरी सोडतोय…’ दादांनी म्हणजे बी. वाय. पाध्यांनी घरी पत्नीला सांगितले. तेव्हा समोर त्यांची मुलंही होती. मोठा विजय, दुसरा दिलीप, तिसरा श्रीराम आणि पाळण्यात अनिता. विजय सोडून कोणाला काही कळण्याचं वय नव्हतं. एक मध्यमवर्गीय सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबप्रमुख नोकरी सोडतोय, ही त्या काळात धक्कादायक बातमी होती. त्याआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजे १९५७ साली दादा ‘लोकमान्य’ नावाच्या एका मराठी वृत्तपत्रात प्रूफरीडर म्हणून काम करीत होते. शांतीलाल शहा या काँग्रेस नेत्याचे ते वर्तमानपत्र होते. त्यांनी आपली गुजराती सोडून सर्व भाषेतली वर्तमानपत्रे, युनियनच्या मागण्यांना कंटाळून बंद केली आणि शंभर दीडशे लोक अचानक बेकारीच्या खाईत लोटले गेले. त्यात दादा पाध्येही होते. त्यातून दोन वर्षांनी सावरतात न सावरतात तोच दादांनी पत्नीसमोर हा धक्कादायक विचार मांडला. पण दादांवरच्या प्रचंड विश्वासामुळे त्यांनी तो उचलून धरला.
स्वत:ची जाहिरात एजन्सी काढायची म्हणजे ऑफिस हवे, तेही फोर्टसारख्या विभागात. पण दादांनी सावधपणे पावले टाकायचं ठरवलं. आधी टेकडी, मग डोंगर आणि शेवटी पर्वत चढायचा… हा त्यांच्या महत्वाकांक्षेचा खडतर पण सावध मार्ग होता. त्यांनी दादरच्या राहत्या घरात, म्हणजे जुन्या पोपटलाल चाळीतच, मागे घर आणि पुढे ऑफिस, असा उद्योग सुरू केला.
जाहिराती मिळवून वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून छापून आणणे हे तसे जिकिरीचे काम होते. पण दादांना कामं मिळत गेली ती एकमेकांच्या सांगण्यावरून, त्यांच्यावर खूश झालेल्या दादर विभागातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांकडून. दादा स्वत: दादरमधल्या व्यापार्याला भेटत, स्वत:ची ओळख करून देत, तुमच्या जाहिराती मी वर्तमानपत्रात छापून आणीन, तुमच्या उद्योगाला प्रसिद्धी मिळून तो वृद्धिंगत होईल, असं सांगत. ‘मामा काणे यांचे उपहारगृह’, ‘आदर्श दुग्धालय’, मनोहर जोशींचे ‘कोहिनूर टेक्निकल क्लासेस’, या दादरमधल्या प्रमुख उद्योजकांच्या जाहिरातींची कामे दादांना मिळू लागली. तोंडी प्रसिद्धीने ती आणखी वाढली. दादांची पायपीट आणि विनम्र मोकळेपणा कामी येऊ लागला. त्याकाळी खरं तर जाहिरात व्यवसाय फोर्ट, कुलाबा या विभागात होता. मोठमोठ्या वर्तमानपत्रांची मुख्यालये आणि जाहिरात संस्थांचे जाळे याच विभागात होते. बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी सर्विस १९५९ साली दादरमध्ये सुरू झाली आणि दादांना आता धावपळीला वेळ पुरेनासा झाला. दादरच्या व्यावसायिकांना अगदी दारातच एक जाहिरात संस्था मिळाली. दादांनी मात्र व्यवसायातील नवीन व्यावसायिक हे देखील स्वत:चे कुटुंबच मानले. क्लायन्ट हा केवळ व्यवहारापुरता न ठेवता त्याच्याशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले. पैशाची वसुली ‘पठाणी’ तत्वावर न करता ‘मित्रत्वा’च्या नात्याने केली. त्यामुळे व्यावसायिकांशी दादांचे संबंध गहिरे होत गेले.
त्याचवेळी दादांची मेहुणी ‘सौ. जयंती’ ही कौटुंबिक कारणामुळे कायमची माहेरी आली. तिला मोठी बहीण, म्हणजे दादांची पत्नी शैला ताई हिने आधार दिला आणि ‘मावशी’ म्हणून केवळ ताईची मुले सांभाळत न बसता तिने दादांची धावपळ बघून स्वत: दादांना व्यवसायात सहाय्य करायची इच्छा व्यक्त केली. दादांचा होकार मिळताच मावशीने सर्व हिशेब व्यवस्थित ठेवण्याचे काम सुरू केले आणि आधीच शिस्तबद्ध असलेल्या दादांच्या जाहिरात व्यवसायात हिशेबांचीही शिस्त आली. इतकी, की पुढे दोन तीन वर्षांनी व्यवसाय वाढल्यामुळे चार्टर्ड अकाउंटंटकडे जायची पाळी आली, तेव्हा मावशीने ठेवलेले हिशेब बघून दादा आणि चार्टर्ड अकाउंटंट दोघेही चाट पडले. त्यामुळे बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीच्या रूंदावणार्या कक्षा आर्थिक सक्षमतेसह रूंदावल्या. दादांची ही जाहिरात संस्था घरातून स्वतंत्र कार्यालयात गेली. हळुहळू दादरमधले व्यावसायिक वाढलेच, पण मराठी नाट्यसृष्टीतील तत्कालीन मोठमोठे निर्मातेही नाटकांच्या जाहिराती दादांच्या बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीमार्फतच वर्तमानपत्रात करू लागले आणि दादा मराठी नाट्यव्यवसायाचा ‘कणा’ ठरू लागले. याचे कारणही तितकेच महत्वाचे. पुन्हा इथे तेच तत्त्व, वसुली ही पठाणाच्या तत्त्वाप्रमाणे न करता मित्रत्वाच्या नात्याने करीत असत. त्यामुळे नंतर जाहिरातीसाठी आलेल्या छोट्या-मोठ्या निर्मात्यांनाही दादांच्या या तत्त्वांचा आधार वाटू लागला आणि नाटकाच्या ९० टक्के जाहिराती बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीमधून होऊ लागल्या. चांगल्या व्यवहारी आणि यशस्वी निर्मात्यांचा प्रश्नच नव्हता, पण अपयशी आणि संकटात सापडलेल्या निर्मात्यांना दादांचा आधार वाटू लागला. कारण दादा धीर द्यायचे, ‘मी क्रेडिट देईन, पैसे उशिरा द्या, पण बुडवू नका’. एवढाही आधार निर्मात्याला पुरत असे. मराठीवर दादांचे प्रभुत्व होते, त्यामुळे त्याचा प्रभाव त्यांच्या जाहिरातीत दिसायचा. पाध्ये व्यवहारात सांभाळून घेतात म्हटल्यावर निर्मात्यांमध्ये पण विश्वास दुणावला. ‘बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी’ ही लकी एजन्सी आहे’ असा शिक्का बसला, निर्मात्यांचा ओघ आणखी वाढला.
मराठी व्यावसायिक नाटकाला चांगले लेखक, दिग्दर्शक, नामवंत अभिनेते आणि अभिनेत्री जितके हवे असतात तितकेच महत्वाचे असते ते थिएटर. शिवाजी मंदिर हे दादरमधील ऐन मध्यवर्ती ठिकाणी असलेले थिएटर. एकेकाळी हे थिएटर आशियातले एकमेव असे थिएटर होते जिथे रोज सकाळ, संध्याकाळ आणि रात्री असे तीन तीन प्रयोग व्हायचे; तेही आठवडाभर आणि महिनाभर व तसेच वर्षभर. सुपरहिट नाटकांचे हाऊसफुल्ल प्रयोग शिवाजी मंदिरात व्हायचे. नाटकासाठी या सर्व गोष्टी जितक्या महत्वाच्या तितक्याच महत्वाची गोष्ट म्हणजे नाटकाच्या जाहिराती. त्याही वर्तमानपत्रातल्या. मराठी नाट्यरसिकांना वर्तमानपत्रात जाहिरात पाहून नाटकाला जायची ‘अमर्याद’ सवय. दुसरी कुठचीच माध्यमे उपयोगी पडत नसत आणि निर्मात्याला झेपतही नसत. शिवाय वृत्तपत्रांनी मनोरंजनाचे एक पान केवळ नाटकांच्या जाहिरातींसाठी राखून ठेवलेले असते, तेही नाटकाच्या जाहिराती सवलतीच्या दरात छापायला देत असत. यात वर्तमानपत्रांचाही फायदा होता. कारण नाट्यवेडा वाचक नाटकांच्या जाहिरातींसाठी, कुठे कधी नाटक आहे ते पाहण्यासाठी वर्तमानपत्रे घेतोच हे त्यानं ठाऊक होते. तर अशा पद्धतीने वर्तमानपत्रे आणि नाटकाच्या जाहिराती या नाट्यव्यवसायाचा अविभाज्य घटक ठरले. आणि त्यामुळे जाहिरात प्रसारित करणार्या एजन्सींना महत्व प्राप्त झाले. त्यात क्रेडिटची सोय असलेल्या एजन्सींना प्राधान्य असे. त्यामुळे त्याकाळी बी. वाय. पाध्ये, पल्लवी, रॅडिकल अशा संस्थाना खूप महत्व होते. निर्मात्यांना क्रेडिट मिळत असे. पण जबाबदारी त्या एजन्सीची असे. त्यात दादा पाध्ये यांचा संपर्क दांडगा असल्यामुळे अनेक महत्वाच्या नाट्यसंस्था बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीकडेच असत. त्यात नाट्यमंदार, नाट्यसंपदा, चंद्रलेखा, धी गोवा हिंदू असोसिएशनसारख्या प्रमुख संस्थाही असत.
पुढच्या पंधरा सोळा वर्षांत ‘बीवायपी’ मोठी होत गेली. त्याचबरोबर दादांची मुलंही मोठी होत होती. १९७१ साली मोठा विजय सायन्सच्या बीएससीच्या पहिल्या वर्षाला नापास झाला. खरं तर मोठ्या मुलाचा असा निकाल लागलेला पाहून कोणतेही वडील अस्वस्थ झाले असते. पण दादांनी सकाळी हातात पडणार्या कोर्या करकरीत, घडीही न मोडलेल्या वर्तमानपत्राप्रमाणे स्वच्छ आणि स्थितप्रज्ञ चेहरा ठेवून विजयला विचारले, ‘मग? आता काय करणार?’ त्यावर विजयने आज्ञाधारक आणि सोज्वळ उत्तर दिले, ‘पुन्हा परीक्षेला बसून बीएससीची डिग्री घेईन.’ त्यावर दादांनी म्हटले, ‘म्हणजे मग त्यानंतर नोकरीच करणार ना?’ दादानी बरोब्बर ओळखले या आनंदात विजयला फार काळ राहता आले नाही; कारण दादांनी लगेच म्हटले, ‘उगाच नोकरी वगैरे करण्यापेक्षा तू याच धंद्यात का येत नाहीस? कारण यापुढे तो वाढला तर तुझा, आणि संपला तरी पण तुझाच.’ असा निवृत्तीपूर्व ‘सल्ला-कम-विचार’ दादांनी विजयसमोर ठेवला. लहानपणापासून दादांचा हा कौटुंबिक धंदा मुलांवर चांगलेच संस्कार करून होता. त्यामुळे विजयने या व्यवसायात उडी मारली आणि पहिल्या दोन-तीन वर्षांतच तो या व्यवसायाचा महासागर सहजपणे पोहून- अगदी मुंबई ते धरमतर अशी खाडी पोहून पार करण्याइतका तयार झाला. अर्थात त्यात दादांच्या विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा विजयलाही फायदा झाला. दादांप्रमाणे मावशी, धामणसकर (एक कर्मचारी) यांचाही मोठा आधार झाला. कारण विजय हा व्यवसाय नुसता ‘आडवा’ वाढवत नव्हता, तर त्याला तो ‘उभा’ वाढवून वेगळी उंची गाठायची होती. त्यासाठी त्याला कुटुंबाची साथ हवी होती.
पहिला ब्रेक
दादांच्या हातातली मशाल आता विजयच्या हातात आली होती. त्याला व्यवसायात नवनव्या गोष्टी हाक मारीत होत्या. वर्तमानपत्रातल्या जाहिराती तर होत्याच, पण ‘शकुंतला हेअर ऑइल’ या क्लायंटला रेडिओवर जाहिरात करायची होती. त्यांनी सहज विजयला ऑफर दिली. विजयला रेडिओ जाहिरातीतलं काही माहिती नव्हतं, तरीही त्याने ‘हो करतो’ म्हणून जबाबदारी घेतली. दादांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याला बाळ कुडतरकर यांचा नंबर दिला. ते त्यांचे जाहिरातदार होते. त्यांची नाट्यसंस्था होती आणि दादांचे नेहमीप्रमाणे त्यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवाय मुंबई आकाशवाणीवर ते मोठे अधिकारीही होते आणि त्यांची अनेक नभोनाट्ये गाजतही होती. शिवाय त्यांच्या आवाजात जाहिराती येतही होत्या. त्यामुळे विजय बाळासाहेब कुडतरकरांना भेटला आणि त्याचे काम एकदम सोप्पे झाले. बाळासाहेबांनी त्याच्या जाहिरातीला आवाज तर दिलाच, पण रेकॉर्डिंगपासून ते रेडिओ जाहिरातीचे तंत्र कसे असते याचे महिन्याभरात विनामूल्य शिक्षणही दिले आणि विजयकडे रेडिओ जाहिरातींचा ओघ सुरू झाला तो आजही सुरू आहे, आजच्या काळातली निवेदक अजित भुरेपासून ते अशोक पत्कींसारखे संगीतकार बीवायपीला सहभाग देताहेत.
त्यानंतर दूरचित्रवाणीचा काळ सुरू झाला. आणि ‘अंजली किचनवेअर’ या मोठ्या क्लायंटने दूरचित्रवाणीवर, म्हणजे टीव्हीवरही जाहिरात करायचे आव्हान दिले. हा आता नवा प्रकार होता आणि विशेष म्हणजे त्याना ‘आवाज की दुनिया’चे प्रख्यात ‘शहेनशहा’ अमीन सायानी यांचाच आवाज हवा होता. ही मोठीच पंचाईत होती. ते बिनाका गीतमालाचे सुपरहिरो होते. त्यांना कसे गाठणार? इथे पुन्हा बाळासाहेब धावून आले. बाळासाहेब कुडतरकरांनी विजयला अमीन सायानी यांच्याकडे पाठवले आणि स्वत: आधी फोन करून त्यांच्याशी बोलले. कुलाब्याला रिगल टॉकीजच्या बाजूला सेसिल कोर्टमध्ये अमीन सायानी यांचे ऑफिस आणि स्टुडिओ होता. रेडिओ सिलोनचा त्यांचा कारभार तिथूनच चालायचा.
‘त्यांची तुझी प्रत्यक्ष भेट झाली?’ मी विजयला विचारले.
‘पुरू, यू विल नॉट बिलिव्ह, मी त्यांना भेटायला गेलो, आत निरोप पाठवला तर ते स्वत: मला भेटायला बाहेर आले आणि अत्यंत नम्रपणे मला जे हवे ते ऐकून घेतले. नुसता आवाजच नाही तर ही सर्व प्रोसेस काय असते, ते समजावून सांगितले. जाहिरातीच्या चित्रापासून ते दूरदर्शनवर (तेव्हा एकच चॅनल, फक्त दूरदर्शनच होते. बाकीच्या चॅनल्सचा जन्मही झाला नव्हता) ती कशी रिलीज होईल हे समजावून सांगितले. दूरदर्शनच्या स्टाफला स्वत:चा रेफरन्स दिला आणि ‘चित्रहार’ या दूरदर्शनच्या अत्यंत पॉप्युलर कार्यक्रमात ती जाहिरात प्रसारित कशी होईल तेही पाहिले.
दुसरा ब्रेक
जाहिरात तर दूरदर्शनवर पोचली, दर रविवारी सकाळी ‘चित्रहार’ असायचा. पण ती जाहिरात बघायची कुठे? हा मोठा प्रश्न होता. कारण बर्याच लोकांकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, फार थोड्या लोकांकडे रंगीत टीव्ही होते. शिवाय त्या काळात रंगीत टीव्ही बुक करावा लागत असे. तो महिना-दोन महिन्यांनी मिळे. शनिवारपर्यंत कोणाकडे बघायचे ते ठरत नव्हते, ना विजयच्या घरी टीव्ही, ना अंजली किचनच्या मालकांकडे; अखेर मालाडला एकाच्या घरी तिसर्या मजल्यावर रंगीत टीव्ही असल्याचे कळले. त्याला विनंती करून विजय आणि अंजली किचनचे दोन पार्टनर तिकडे पोचले. चित्रहार सुरू होण्यापूर्वी १० सेकंदांची जाहिरात अमीन सायानी यांच्या आवाजात चित्रासहित झळकली आणि तिघांनीही क्रिकेटमध्ये प्रतिपक्षाची विकेट पडल्यावर ओरडावे तसे ओरडून ते दहा सेकंद साजरे केले. त्यानंतर बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीच्या कक्षा आणखी रूंदावल्या. रेडिओप्रमाणे टी व्ही माध्यमांमध्ये जाहिराती करण्याचे काम वाढू लागले.
१९८३मध्ये मी ‘टुरटूर’ नाटकाची निर्मिती केली आणि जाहिरातींसाठी दिलीप जाधव मला बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीत घेऊन गेला. तोपर्यंत दिलीप आणि श्रीराम हे विजयचे भाऊही व्यवसायात सहभागी झाले होते आणि अतिशय मेहनतीने एजन्सी चालवीत होते. माझे त्यावेळी अनेक जाहिरात संस्थांशी संबंध होते. शिवाय मी स्वत: त्यावेळी सुधीर कोसके आणि रघुवीर कुल यांच्याबरोबर बेसिक पब्लिसिटी ही जाहिरात संस्था चालवीत होतो. तरीही आम्ही बीवायपीकडेच गेलो.
ब्रेक के बाद
तोपर्यंत बी. वाय. पाध्ये ही एजन्सी चांगलीच नावारूपाला आली. दादांचा शब्द अंतिम तर होताच, पण विजय, दिलीप आणि श्रीराम हे ‘अमर अकबर अँथनी’ असल्यासारखे एकत्र राहून संस्था चालवीत होते आणि आहेत. क्लायंटला कुटुंबासारखे ट्रीट करावे, हे दादांचे सूत्र होते, तीच परंपरा या तिघांनी सुरू ठेवली. या तीनही बंधूंचे काही स्वभाव विशेष आहेत. ‘अमर’ सारखाच शांत, विचारी आणि सावध ‘विजय’. तर ‘अकबर’सारखा हरहुन्नरी, संगीत, साहित्याची आणि नाटक सिनेमाची जाण असलेला दिलीप, आणि अँथनीसारखा बोलण्यात हुशार आणि अॅक्शनमध्ये माहिर असलेला श्रीराम. अनिता पाध्ये या त्यांच्या बहिणीने पत्रकारिता स्वीकारली. लेखनात प्रगती करून शाहीर दादा कोंडके व विजय आनंद यांच्या जीवनावर पुस्तके लिहिली. ती प्रचंड लोकप्रिय झाली. अशी ही दादांची पुढची पिढी खर्या अर्थाने व्यवसायात उतरून क्लायंटला कुटुंब म्हणून सांभाळते. दादांच्या काळात त्यांचा जेवढा जनसंपर्क होता तेवढाच या तिघांचाही आहे. नाट्यनिर्माते जाहिराती द्यायला येण्याच्या निमित्ताने अर्धापाऊण तास बसून कुठे काय चाललंय याचा आढावा घ्यायलाही इथे जमत असत. लिटिल थिएटरच्या सुधाताई करमरकर, बालनाट्यचे रत्नाकर मतकरी, शिवाय एकपात्री नाटक करणारे सदानंद जोशी, रंगनाथ कुलकर्णी ते वि. र. गोडे, असे पट्टीचे जवळजवळ पन्नासेक कलावंत त्यांच्याकडे जाहिराती करायचे- त्यात जादूगार रघुवीरपासून मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रापर्यंतचे अनेक लोक स्वत: जाहिराती द्यायला येऊन चहा आणि गरमागरम बटाटेवड्याचा पाहुणचार झोडून जायचे. नंतरच्या पिढीतले, माझ्यापासून विनय आपटेपर्यंत अनेक रंगकर्मी आणि त्यांच्या संस्था आजही जाहिराती बीवायपीमधूनच प्रकाशित करतात.
‘टुरटूर’ नाटकाच्या जाहिरातींनी १९८३ ते १९९५ या १२ वर्षांत धमाल उडवून दिली होती. त्या काळात माझे जवळजवळ रोज जाणे व्हायचे. त्यानंतर ‘मुंबई मुंबई’पासून ते २००० सालच्या ‘जाऊबाई जोरात’पर्यंत सर्व जाहिराती तिथूनच झाल्या. प्रचंड प्रेम आणि सहकार्य मिळाले बीवायपीमधून. त्यांच्या दादरच्या अद्ययावत ऑफिसमध्ये गेलं की पहिला ‘टोल’ भरावा लागे तो मावशीकडे. त्या सगळ्यांचीच ‘मावशी’ होत्या. अकाउंटन्ट असल्याने बोलण्यात हिशेबाची झाक असे, ‘मलई मारके लस्सी’ असते तशी. एक बारीकशी हिंट असे हिशेबाची. पण तत्त्व तेच, वसुली पठाणी नाही. सगळ्यात कहर होता तो धामणसकर आणि वाचकर हा स्टाफ. दोन टोकाचे दोन. धामणसकर म्हणजे सात मजली हास्य. विनोदाची पातळी उंचच हवी असे काही नाही. साध्या जोकला पण प्रचंड रिस्पॉन्स. विनोदी नाटकाला बसले तर स्टेजवरून कलाकारही ओळखायचे की आज धामणसकर नाटकाला बसलेत, एवढ्या मोठ्याने हसायचे… एखाद्या सामान्य प्रतीच्या विनोदी नाटकाला धामणसकर बसले तर त्यांचे हसणे पाहून त्या लेखकाला आपण अत्रे किंवा पुलंच्या तोडीचे लेखक आहोत की काय, असा भ्रम होई.
ऑफिसात कामाची वेळ असो वा नसो, त्यांचं हसणं कधी दादांनी पण थांबवले नाही, तर मुलांची काय टाप? पन्नास वर्षे सर्विस करून रिटायर झाले धामणसकर. त्याच्या उलट वाचकर. पन्नास वर्षांच्या सर्विसमध्ये कधी तोंडातून शब्द नाही काढला वाचकरांनी, आपलं काम बरं की आपण बरं. पण ही सर्व मंडळी कामात चोख, त्यामुळे बीवायपीचे कुटुंब शेवटपर्यंत अभंग राहिले.
आज इतक्या वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली, मोठ्या एजन्सीज आल्या आणि गेल्या. कारण जाहिरातविश्व हे बडेजाव करण्याचं, शो ऑफ करण्याचं, पार्ट्या देण्याघेण्याचं, लाखो करोडोमध्ये खेळण्याचं जग. पण दादा तथा बी. वाय. पाध्ये यांची शिकवणच अशी की गरजा वाढवायच्या नाहीत. गाडी हवी, पण मर्सिडिजच पाहिजे हा अट्टहास नको. जे जे नवीन आहे ते घ्या, पण त्यातही गरजेपेक्षा जास्त इन्वेस्ट करू नका, विश्वासार्हता जपा. भांडवल कोणतं आणि फायदा कोणता, हे ओळखून व्यवसाय करा. क्लायंटचा सन्मान ठेवा, रस्त्यात भेटला म्हणून पैसे कधी देणार विचारू नका. त्याला सवड द्या. विनंती करा, बाबा रे, उशिरा दे, पण बुडवू नकोस. तो उशिरा का होईना, देईलच. याच तत्वातून दादांची बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी शेकड्यातून हजारात, हजारातून लाखात, आणि लाखातून करोडात टर्नओवर करती झाली. अगदी आधी टेकडी, मग डोंगर, आणि मग सह्याद्री..
दादांच्या हातातली ती जिवंत मशाल आता विजय, दिलीप आणि श्रीरामकडून त्यांच्या तिसर्या पिढीकडे आली आहे. एका इवल्याशा रोपाचा वटवृक्ष झाला आहे. तोही एखाद्या ‘कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मराठी नाटकासारखा’.
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)