□ खाण्याची चंगळ आणि सुरक्षिततेमुळे ५३ कैद्यांनी पॅरोल नाकारला
■ इंधन दरवाढ आणि कोरोनाची स्थिती अशीच राहिली, तर बाहेरचे लोकही आम्हाला तुरुंगात ठेवा, असा आग्रह धरायला लागतील.
□ मी काश्मिरींचा ब्रँड अँबॅसेडर, रा. स्व. संघाच्या विचारसरणीचा हिंदुस्तानला सर्वाधिक धोका : इम्रान खान
■ आमच्या धोक्यांचा नायनाट कसा करायचा ते आम्ही पाहून घेऊ. आधी आपल्या देशाचा बँड वाजलाय, त्याचं काय करायचं ते पाहा आणि मग बिनबुलाये ब्रँड अँबेसेडर बनायला या.
□ चीनमध्ये लस न घेणार्यावर रूग्णालयात उपचार होणार नाहीत
■ आपल्याकडे केंद्राच्या कृपेने लसही नाही, उपचारही नाहीत, ऑक्सिजनही नाही आणि हे अपयश मान्य करण्याची हिंमतही नाही.
□ कुत्रे सोडल्यासारख्या अंगावर तपास यंत्रणा का सोडता? दोषी ठरल्यावर कारवाई करा ना? : पृथ्वीराज चव्हाण
■ दोषी सिद्ध होण्याची खात्री असती तर हा मार्ग पत्करला गेला असता का बाबा?
□ ब्राह्मण समाज आता भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना विश्वास
■ नेमका कोणता समाज त्यांना मतदान करण्याचा अविचार करील, हाच आता प्रश्न आहे.
□ भाजपमध्ये डाकूसुद्धा साधू बनू शकतो : नवाब मलिक
■ कार्यालयाबाहेरचा बोर्ड वाचला नाहीत का? ‘येथे वाल्याचे वाल्मिकी करून मिळतील!’ असं लिहिलंच आहे त्यावर.
□ ईडीला लोक घाबरलेत असा गैरसमज करून घेऊ नका : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
■ कर नाही, त्याला डर कशाला असेल?
□ कोरोनाविरोधी लढा मोदींमुळे यशस्वी : मुख्तार अब्बास नक्वी
■ तो यशस्वी झाला, हा जावईशोध कुणी लावला? लढतंय कोण, तो तर वेगळाच प्रश्न आहे…
□ मोदींच्या मंत्रिमंडळात ‘बांगलादेशी’ राज्यमंत्री
■ सोयीचे असतील तर पाकिस्तानीही पावन करून घेतील ते. कोई शक?
□ कोरोनाच्या तिसर्या लाटेबद्दल परस्परविरोधी दावे; आयसीएमआर म्हणते, रोज एक लाख रूग्ण सापडणार, आयआयटी कानपूरचा मात्र न घाबरण्याचा सल्ला
■ उपचार नको, पण हे दावे आवरा! आता घाबरण्यासारखं शिल्लक काय राहिलंय सामान्य माणसाकडे?
□ राज्यघटनेमुळेच देशातल्या सर्वसामान्य माणसांना हक्क मिळाले आहेत; व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा अधिकारच : न्या. धनंजय चंद्रचूड
■ ती राज्यघटनाच खुपते आहे सत्ताधीशांच्या डोळ्यांत. ती एकदा गुंडाळली की रान मोकळं.
□ मचमच टोळीच्या हस्तकाला अटक
■ पण पिरपिर टोळी आणि किरकिर टोळी मोकाटच आहे आणि पचपच टोळी कधी जेरबंद होणार?
□ महिला, दलित, आदिवासी मंत्री होणे विरोधकांना पचत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ पचेल इतकंच खोटं बोला; याआधी यांच्यातले कोणी मंत्री झालेच नाहीत की काय साठ वर्षांत?
□ भेंडी, वांगी, पनीरची भाजी, बटर चिकन- भारतीय खेळाडूंसाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खास बेत
■ हे सगळं चापल्यावर सुस्ती नाही का चढायची? खेळाडू खेळायचे कसे?
□ उत्तर प्रदेश सरकारच्या पाठबळाने जाहीर झालेली कावड यात्रा सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्यांनंतर रद्द
■ राज्यकर्ते इतके मतांधळे झालेले आहेत की या कटु गोष्टी सर्वोच्च न्यायालयाला कराव्या लागतात हे देशाचं दुर्भाग्य.