सध्या देशात सगळ्यात गोंधळलेली जमात कोणती असेल तर ती आहे मोदीविरोधकांची जमात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याच्या नादात आपण आपल्याच मतांच्या विरोधी मतं मांडत आहोत, स्वत:चंच बोलणं खोडत आहोत, हे त्या बिचार्यांच्या लक्षातच येत नाही.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचंच उदाहरण पाहा. एकेकाळी ते म्हणत होते, मोदीजी कोणाचंच ऐकत नाहीत. स्वत:च्या मनानेच सगळे निर्णय घेताहेत. विरोधकांशी सोडा, स्वपक्षीयांशीही सल्लामसलत न केल्यामुळे त्यांचे अनेक एकांगी निर्णय देशाच्या अंगलट आले. त्यात नोटबंदी, जीएसटीपासून कोरोनास्थितीच्या हाताळणीपर्यंत अनेक विषयांचा समावेश होतो. आता तेच राहुल गांधी म्हणतायत, मोदीजी सगळ्यांचं सगळंच ऐकतायत, चोरून ऐकतायत.
आता यावर बोलायचं काय?
मुळात आपण किंवा आपलं सरकार असं काही करतंय, अशी कबुली ना मोदीजींनी दिली आहे ना गृहमंत्री अमित शाह यांनी. पण, समजा, ते खरं आहे, असं गृहीत धरलं तरी त्यात गैर काय आहे? आमचा राहुलजींना आणि मोदीजींच्या सगळ्या विरोधकांना सवाल आहे की तुम्हाला नेमकं काय हवं आहे? मोदीजी कुणाचं ऐकत नव्हते तेव्हा म्हणत होतात, की ते कुणाचंच ऐकत नाहीत, हे वाईट आहे. आता ते सगळ्यांचं ऐकतायत तर म्हणताय की मोदीजी सगळ्यांचं ऐकतायत… आखिर मोदीजी करें तो क्या करें?
मोदीजींच्या विरोधकांचा आक्षेप त्या पेगॅसस नावाच्या सॉफ्टवेअरच्या वापराला आहे. हे सगळे आधुनिकतेच्या, विकासाच्या आणि तंत्रज्ञानाच्या विरोधातले लोक आहेत. गटारातून गॅसनिर्मिती करण्याची आणि ढगांआडून रडारला चकवून लढाऊ विमानं शत्रूदेशावर धाडण्याची वैज्ञानिक बुद्धी त्यांच्यापाशी नाही. मोदीजींनी लोकांचं ऐकावं असंच तुमचं म्हणणं आहे ना? मग ते काम ते कोणत्या माध्यमातून करताहेत, याने काय फरक पडतो?
विरोधकांचे फोन टॅप करून त्यांचं म्हणणं काय आहे, हे ऐकण्यावर आक्षेप घेणं म्हणजे तर लोकशाही विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेल्या एका नेत्याच्या चांगुलपणावर शंका घेण्यासारखं आहे. आज देशात मोदीजी खाकरले तरी ‘वाह मोदीजी वाह’ असं म्हणून दाद देणारे चाहते प्रचंड संख्येने आहेत. मोदीजींनी ठरवलं असतं तर दर फोनमागे एक कोटी रुपये मोजून ते या सगळ्यांकडून स्वत:ची स्तुती ऐकत बसू शकले असते. पण ते तुकोबारायांच्या उक्तीनुसार चालतात. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे त्यांचं ब्रीद आहे. आपल्या विरोधकांना काय म्हणायचं आहे, त्यांच्या मनात काय विचार चालले आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, हे मोदीजी जाणून घेऊ इच्छितात. त्यासाठी त्यांनी एक फुटकळ सॉफ्टवेअर वापरलं असेल, तर त्यांच्या टेक्नोसॅव्ही असण्याची तारीफ करायची की त्यांच्यावर टीका करायची?
मोदीजी किंवा त्यांच्या सरकारने किंवा अमितभाईंनी पेगॅसस वापरलं असेलच तर त्यामागे केवढी दूरदृष्टी आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. एकतर कोरोनाचा काळ आहे. राज्यांच्या निवडणुकांसारख्या लोकशाही कर्तव्याचं पालन करण्यासाठी जिवावर उदार होऊन मोदीजी सभा घेतात, तेव्हाही कोरोनानियमांचा भंग म्हणून विरोधक टीका करतात. आता कोरोनाकाळात फिजिकल डिस्टन्स राखून विरोधकांचं अंतरंग जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावंच लागणार. ते वापरलं तर एवढा हल्लागुल्ला कशाला?
शिवाय मोदीजींचं व्यक्तिमत्त्व असं आहे की त्यांच्यासमोर आल्यावर विरोधकांची बोबडी वळते. ते त..त.. प..प.. करू लागतात. मोदीजींसमोर खरोखरची ‘मन की बात’ सांगण्याचं डेअरिंग होईल का विरोधकांचं? ती गोष्ट मोदीजी विरोधकांच्या नकळत जाणून घेत आहेत, इतका त्यांच्या मनात परमताचा आदर आहे, हे समजल्यावर कोणाही सहृदय माणसाचे डोळे भरून येतील. हृदय गदगदून येईल. मुलं मोठी झाली की ती फोनवरून कोणाशी बोलतात, कोणाबरोबर जास्त काळ घालवतात, सोशल मीडियावरून कोणा गैर व्यक्तींच्या संपर्कात तर नाहीत ना, त्यांना राज कुंद्राछाप मनोरंजनाचा चस्का तर लागत नाहीये ना, याकडे आईवडिलांचं बारकाईने लक्ष असतं. त्याला कोणी पालकांची पाळत म्हणतं का? आईच्या वात्सल्याने आणि ममतेने मोदीजी विरोधकांवर लक्ष ठेवून आहेत, कर्तबगारीच्या गगनात उत्तुंग झेपा घेत असतानाही त्यांचं चित्त पिलांपाशी आहे, याचं कौतुक करायचं की त्यावर टीका करायची?
मुळात विरोधकांच्या हे लक्षात यायला पाहिजे की त्यांचं आपापसात काय बोलणं चाललेलं आहे, ते कोणती कटकारस्थानं रचत आहेत, कोणत्या वर्तमानपत्रामध्ये काय छापून येत आहे, हे जाणून घेण्याची आणि त्याकडे लक्ष देण्याची मोदीजींना काहीच गरज नाही. त्यांना ज्यांनी निवडून दिलं आहे, त्या या देशातल्या जनतेशी मोदीजींचा ‘हृदयीचा संवादु’ आहे. त्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही. ते जनतेला ‘मन की बात’ सांगतात आणि जनतेच्या मनातली गोष्ट त्यांना आपोआप कळते. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ आपोआप जाते.
जनतेलाच अर्थव्यवस्थेचा सत्यानाश करणारी नोटबंदी हवी होती, जीएसटीचा गोंधळ हवा होता, आज इंधन दरवाढ सुरू आहे, पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपार गेले आहेत; असं व्हावं, हीसुद्धा जनतेचीच इच्छा आहे. तीच मोदीजी पूर्ण करताहेत.
तसं नसतं तर जनतेने मोदीजींना प्रखर विरोध केला नसता का? जनता चिडिचुप्प बसली आहे आणि विरोधकांनी हा फुकटचा कलकलाट का चालवला आहे?
विरोधकांनो, जनतेच्या ‘मौनाची भाषांतरे’ समजून घ्या आणि तुम्हीही गप्प बसा जरा.