`तुमचं करिअर धोक्यात आहे, मामा!’ ती व्यक्ती म्हणाली, तसे बालगुडे अस्वस्थ झाले. त्यांच्या विरोधातल्या फाइल्स कशा कोण जाणे, पोलिसांपर्यंत गेल्या असल्याची खबर त्या व्यक्तीने बालगुडेंना दिली होती. तेवढ्यात मागे काही हालचाल जाणवली म्हणून बालगुडेंनी पाहिलं, तर इस्पेक्टर सूर्यवंशीच तिथे हजर होते.
—-
केशवनगर परिसरात चोरांचा धुमाकूळ वाढला होता. गेल्या चार महिन्यांत जवळपास सात ठिकाणी मोठ्या घरफोड्या झाल्या होत्या. माणसं घरी असताना चोर खिडकी उचकटून घरात शिरत, घरच्यांना मारहाण करून असेल नसेल तेवढा सगळा ऐवज घेऊन पळून जात. चोरीची `मोडस ऑपरंडी’ एकाच प्रकारची होती, त्यामुळे कुठल्या तरी मोठ्या टोळीचं हे काम असल्याचं उघड झालं होतं. मात्र, या टोळीची पोलिसांच्या लेखी कुठलीही नोंद नव्हती. म्हणूनच त्यांची डोकेदुखी थोडी वाढली होती. राजकीय आणि सामाजिक दबावही वाढत होताच.
`घरफोड्यांच्या केसमध्ये काय प्रगती, शर्मा?’ असं वरिष्ठांनी एसीपी शर्मांना विचारल्यावर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली. तातडीने सगळ्या पोलिस स्टेशन्सच्या प्रमुखांची त्यांनी मीटिंग बोलावली.
`आनेवाले पंदरह दिनों में मुझे वो गँग हाथ में चाहिये. आप सब समझ रहे हैं ना?’ त्यांनी सगळ्यांना एक प्रकारे इशाराच दिला. आता सगळेच पोलिस जास्त अलर्ट झाले आणि जोमाने कामाला लागले.
केशवनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच जास्तीत जास्त चोर्या झाल्या होत्या. गेल्या तीन आठवड्यांत मोठी कुठली घटना घडली नव्हती, पण तरीही चोरांचा शोध लावणं अत्यंत आवश्यक होतं.
`आपल्या भागात सगळीकडे गस्त वाढवा. थोडे दिवस जादा ड्युटी करायची तयारी ठेवा. कान आणि डोळे कायम उघडे ठेवा. जरा कुणावर संशय आला, तरी त्याला आत घेऊन चौकशी करा. नागरिकांमधला विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. चोरांनाही लवकरात लवकर पकडण्याची गरज आहे.’ इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी सगळ्यांना सूचना केली. त्यांनी स्वतःसुद्धा सगळ्या जुन्या फाइल्स काढून अभ्यासाला सुरुवात केली होती.
आणखी दोन चार दिवस गेले. चोरांचा माग तर काही लागला नव्हताच, पण एके दिवशी अशी बातमी येऊन थडकली की पोलिस यंत्रणाच खडबडून जागी झाली. त्या भागातले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नाना भोपटकर यांच्या घरी चोरी झाली होती. चोरांची पद्धत तीच होती… खिडकी उचकटून आत प्रवेश, घरातल्या माणसांना मारहाण आणि मौल्यवान ऐवज लंपास.
सूर्यवंशींनी भोपटकरांच्या घरी तातडीने भेट दिली. बाहेर अपेक्षेप्रमाणेच भोपटकरांच्या ओळखीचे आणि परिसरातले अनेक लोक जमले होते. पोलिसांवर खवळले होते. स्वतः भोपटकरांना, त्यांच्या पत्नीला, सून आणि मुलगा या चौघांनाही चोरट्यांनी मारहाण केली होती. इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी सगळ्यांची भेट घेऊन माहिती घेतली.
`साहेब, चोरीचं हे लोण आमच्या घरापर्यंत येईल, असं वाटलं नव्हतं. आमच्या घराची कुठलीही खिडकी तकलादू नाही. पण चोरटे जास्तच पोचलेले आणि सराईत आहेत. त्यांनी एक मजबूत खिडकी उचकटून आत प्रवेश केलाय.’ भोपटकरांनी माहिती दिली. सूर्यवंशींनी ज्या खिडकीतून चोरटे आत आले, त्या खोलीत जाऊन पाहणी केली. त्या खोलीत कुणीही झोपत नव्हतं. चोरट्यांनी बरोबर पाळत ठेवून, सगळी माहिती काढूनच चोरी केली होती.
`चोरट्यांचं धाडस वाढलंय शिंदे. सगळीकडे नाकाबंदी असताना, आपण सगळी यंत्रणा कामाला लावलेली असताना त्यांनी चोरी केलेय. तीसुद्धा एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या घरात!’ इन्स्पेक्टर सूर्यवंशी त्यांच्या सहकारी हवालदाराला म्हणाले.
`साहेब, ह्या मोठ्या लोकांच्या भानगडी पण मोठ्या. ह्यांचंच आपापसातलं काहीतरी वैर असेल,’ शिंदेंनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं पिंक टाकली.
`नाही शिंदे, ही मोडस ऑपरंडी त्या गँगच्या चोरीच्या पद्धतीसारखीच आहे. ह्यात काही संशय घ्यायला जागा नाहीये.’ सूर्यवंशी मात्र ठाम होते.
`भोपटकर साहेब, तुमचे दागिने, पैसे याशिवाय आणखी काही चोरीला गेलंय का? किंवा कपाट सोडून बाकी काही उचकटलंय का चोरांनी?’ सूर्यवंशींनी तपासाचा एक भाग म्हणून विचारलं.
“हो साहेब, मी आत्ता कपाट नीट बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, की माझ्या दोन महत्त्वाच्या फाइल्स गायब आहेत. बिझनेसमन महेंद्र बालगुडेंच्या विरोधातले सगळे पुरावे होते त्यात.’ भोपटकरांनी ही माहिती दिल्यावर मात्र सूर्यवंशींना थोडा धक्का बसला.
आधीच्या चोरीच्या सगळ्या घटनांमध्ये चोरांनी घरातले दागिने, पैसे चोरले होते. इथे मात्र त्यांनी घरातल्या चीजवस्तूंबरोबरच महत्त्वाच्या दोन फाइल्स चोरून नेल्या होत्या. भोपटकर हे माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते होते. सरकारी कार्यालयांकडे पाठपुरावा करून भ्रष्टाचाराची आणि जनहिताची वेगवेगळी प्रकरणं शोधून काढणं, त्यातील दोषींना शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणं, अशी कामं ते नेहमीच करत असत. हे बिझनेसमन बालगुडे यांच्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं होतं. चार वर्षांच्या मेहनतीनंतर आत्ता कुठे त्यांना ही सगळी माहिती मिळाली होती. तिची संगती लावून बालगुडेंचा पर्दाफाश होण्याची त्यांना खात्री होती. त्याआधीच घरात चोरी होऊन त्या दोन्ही फाइल्स चोरीला गेल्या होत्या.
`शिंदे, ही चोरी त्याच टोळीने केली नसणार. टोळीतले चोर एखाद्या घरात घुसून ह्या अशा कामाच्या फाइल्स चोरून नेणार नाहीत. त्यांना काय उपयोग त्या फाइल्सचा?’ सूर्यवंशी हे शिंदेंशी चर्चा करताना म्हणाले. आपल्या जुनिअर पोलिसाला सगळी माहिती देऊन, त्यालाच शंका विचारून त्याच्याकडून नव्यानव्या शक्यतांचा शोध घ्यायचा, ही सूर्वयंशींची तपासाची पद्धत होती. त्यातून कधीकधी भन्नाट काहीतरी मिळून जायचं आणि गप्पांसाठी दिलेला वेळ, मेहनत यांचं चीज व्हायचं.
`हे माहिती अधिकार कार्यकर्ते लई बाराचे असतात साहेब!’ शिंदेंनी पिंक टाकली.
`शिंदे, भाषा जरा जपून!’ सूर्यवंशींनी झापलं, तसे शिंदे जरा नरमाईनं बोलू लागले. दोंघंही पुन्हा जुन्या चोरीच्या फाइल्स समोर घेऊन बसले. आधीच्या चोरीच्या पद्धती आणि यावेळची पद्धत सारखीच होती. फक्त यावेळी भोपटकरांची सून श्वेता हिनं चोरट्यांना विरोध करायचा प्रयत्न केला होता आणि तिला जरा जास्तच मारहाण झाली होती.
`श्वेता मॅडम, चोरटे आत आले तेव्हा नेमकं काय काय झालं, आम्हाला सगळं सांगा बघू!’ सूर्यवंशी यांनी आता तिचा ताबा घेतला.
`आमच्या बेडरूमच्या शेजारच्या रिकाम्या रूममधली खिडकी चोरट्यांनी उचकटली. आत प्रवेश केला. मला त्या आवाजाने थोडीशी जाग आली, पण नंतर आवाज आला नाही, त्यामुळे काही संशय वाटला नाही. कपाटात खुडबूड करताना पुन्हा आवाज आला तेव्हा मी उठून बसले, ह्यांना उठवलं आणि आम्ही दोघं बाहेर गेलो. त्याचवेळी चोरटे चोरी करून बाहेर जायला निघाले होते. मला बघितल्यावर ते गडबडले आणि त्यांनी हल्ला केला. मी त्यांना विरोध केला, त्यात जास्त जखमी झाले’, श्वेताने सगळी हकीकत सांगितली. भोपटकर आणि त्यांची पत्नीही या आवाजाने त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या, तेव्हा त्यांनाही चोरट्यांनी तडाखे दिले. सुदैवाने त्यांच्या पत्नीला फार मार लागला नाही. भोपटकरांच्या खांद्यावर मात्र जोरदार फटका बसल्याने खांदा दुखत होता.
`ठीकेय, काही समजलं तर लगेच कळवतो’, असं सांगून सूर्यवंशी तिथून निघाले.
`शिंदे, गावात जरा चौकशी करा. ह्या भोपटकरांचं वागणं बोलणं कसं होतं, त्यांचं कुणाशी काही वैर होतं का, गावात सगळ्यांशी संबंध कसे होते, हे सगळं शोधून काढा. आपल्याला या वेळी रिकाम्या हातांनी परतायचं नाहीये,’ सूर्यवंशींच्या आवाजात जरब होती, त्यामुळे शिंदेंनी ताबडतोब माणसं कामाला लावली.
दुसर्याच दिवशी शिंदे एक खबर घेऊन आले.
`साहेब, भोपटकरांच्या घरात सगळ्या गोष्टी काही ठीकठाक नाहीयेत!’
`म्हणजे?’
`साहेब, त्यांची सून आहे ना, ती श्वेता, तिचं लग्न भोपटकरांच्या मनाविरुद्ध झालं होतं. अधूनमधून त्यावरून त्यांची भांडणं होत, असं समजलं साहेब,’ शिंदेंनी काहीतरी जगावेगळी माहिती दिल्याच्या थाटात सांगितलं.
`भांडणं आणि कुरबुरी सगळ्याच घरांमध्ये होत असतात शिंदे, त्याचा आपल्या तपासाशी काही संबंध आहे का, ते सांगा’ असं भोपटकरांनी म्हटल्यावर मात्र शिंदेंची बोलती बंद झाली.
`न… नाही म्हणजे साहेब… तुम्ही फक्त माहिती काढायला सांगितली होती, तेवढी काढली…’ असं म्हणून ते गप्प झाले.
`ठीकेय शिंदे, गुड जॉब’ म्हणून सूर्यवंशींनी तो विषय संपवला.
श्वानपथक बोलावूनसुद्धा फार काही हाती लागलेलं नव्हतं. श्वानपथकाने खिडकीपासून बाहेरचं कंपाउंड, तिथून समोरचा रस्ता एवढाच माग काढला होता. तिथून पुढे चोरटे नेमके कुठे गेले, हे काही त्याला सांगता येत नव्हतं.
सूर्यवंशींनी सगळ्या पोलिस स्टेशन्सना खबर देऊन ठेवली होती. चोरट्यांची जी वर्णनं भोपटकरांच्या घरच्यांनी केली, त्यावरून तयार केलेली स्केचेस सगळीकडे पाठवण्यात आली होती.
सूर्यवंशींना आता त्या चोरट्यांबद्दल काहीतरी माहिती हाती यावी असं वाटत होतं, पण तसं घडत नव्हतं. चारपाच दिवस गेले आणि एका सकाळी सूर्यवंशींनी थेट भोपटकरांचं घर गाठलं.
`भोपटकर साहेब, तुमच्या घरी चोरी झाली, त्याला आज दहा दिवस झाले. एवढे दिवस आमच्या हाताला काहीच लागत नव्हतं, पण काल रात्री एक मेजर डेव्हलपमेंट झालेय. शहराच्या हद्दीबाहेर गस्त घालत असताना पोलिसांच्या पथकाला एक संशियत सापडला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्यानं चोरांच्या गँगमधलाच असल्याची कबुली दिलेय. आणि साहेब महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या त्या चोरीला गेलेल्या दोन फाइल्ससुद्धा सापडल्यायंत त्याच्याकडे.’
`काय सांगताय, सूर्यवंशी साहेब!! अहो माझं मोठं काम केलंत तुम्ही. वा वा… खूप मनापासून कौतुक तुमचं. आता त्या लबाड माणसांना धडा शिकवायला मला मदत मिळेल. थँक्यू… थँक्यू व्हेरी मच!!’ भोपटकर अतिशय आनंदित झाले होते.
खरं म्हणजे त्यांच्या घरातून दागिने आणि पैसे चोरीला गेले, ते परत मिळालेले नव्हते. फक्त फाइल्स मिळाल्या म्हणून त्यांना आनंद झाला होता. घरातले सगळेच त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
`ह्या भोपटकरांना दागिन्यांपेक्षा फाइल्स मिळाल्याचा आनंद झालाय, हे जरा विचित्र वाटत नाही का साहेब?’ शिंदेंनी मनातली शंका विचारली.
`ध्येयानं पछाडलेली काही माणसं अशीच विचित्र असतात, शिंदे, तुम्हाला नाही कळायचं,’ असं म्हणून सूर्यवंशींनी त्यांना गप्प केलं.
संध्याकाळ झाली, तशी बालगुडेंच्या बंगल्यावरचे लाइट्स उजळले. त्यांच्या घरासमोर एक गाडी येऊन थांबली. गाडीतून एक व्यक्ती उतरली आणि आतल्या दिशेने चालू लागली. बालगुडेंना भेटायची परवानगी त्या व्यक्तीने आधीच काढली होती, त्यामुळे तिला आत सहज प्रवेश मिळाला.
`तुमचं करिअर धोक्यात आहे, मामा!’ ती व्यक्ती म्हणाली, तसे बालगुडे अस्वस्थ झाले. त्यांच्या विरोधातल्या फाइल्स कशा कोण जाणे, पोलिसांपर्यंत गेल्या असल्याची खबर त्या व्यक्तीने बालगुडेंना दिली. तेवढ्यात मागे काही हालचाल जाणवली म्हणून बालगुडेंनी पाहिलं, तर इस्पेक्टर सूर्यवंशीच तिथे हजर होते.
`बालगुडे साहेब, खरंच तुमचं करिअर धोक्यात आहे. कारण भोपटकरांच्या घरात चोरीचा कट रचून त्यांच्या घरातल्या सगळ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा तुमच्यावर दाखल होणार आहे,’ सूर्यवंशी म्हणाले आणि बालगुडेंच्या चेहर्यावरचा रंगच उडाला.
`आणि हो, तुम्ही… मिसेस श्वेता भोपटकर!’ पाठमोर्या उभ्या त्या व्यक्तीला उद्देशून सूर्यवंशी म्हणाले आणि तिला आणखी ऑकवर्ड झालं.
`आपल्या भागात होत असलेल्या चोर्यांचा आधार घेऊन भोपटकरांच्या घरी खोटी चोरी घडवून आणायचा खेळ तुम्ही खेळलात. चोरट्यांना आयतीच सुपारी दिलीत, अडचणीच्या ठरणार्या ह्या फाइल्स ताब्यात घ्यायला लावल्यात. पण त्यांच्याकडून त्या स्वतःकडे घ्यायला वेळ लावलात आणि आम्हाला एक खेळ करायची संधी दिलीत.’
`कसला खेळ?’ बालगुडे आता बर्यापैकी जमिनीवर आला होता.
`भोपटकरांच्या सूनबाईंना रेड हँड पकडण्याचा खेळ. तुम्ही त्यांचे मामा आहात, हे आधीच कळलं होतं. आपल्या मामाला वाचवण्यासाठी श्वेताबाई आपल्याच घरातल्या माणसांना मार देतानाही कुठे मागे हटल्या नाहीत!!’
सूर्यवंशींनी श्वेताचा बुरखा टराटरा फाडल्यामुळे तिला आता काही बोलण्यासाठी उरलंच नव्हतं.
`साहेब, पण त्या फाइल्स आहेत कुठे?’ बंगल्यातून बाहेर पडताना शिंदेंनी सूर्यवंशींना विचारलं.
`त्या मिळायच्यात अजून. आता आरोपी मिळालेत, तर फाइल्ससुद्धा सापडतील!’ असं सांगून सूर्यवंशी गाडीत बसले आणि पोलिस स्टेशनच्या दिशेने निघाले.
– अभिजित पेंढारकर
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)