पाह्यटं अंधारात बायकाले बसा लागते न मंग ऊनं निंघू लागल्यावर मानसं बसतेत दुतर्फ टमरेल घेवून. सोनखत करत बसलेले मान्सच दिसते सकायी. गाव गोदरीमुक्त करा, असं आता सांगा लागत हाय. भारत हा खेड्यायचा देश हाय न आता म्हने जगतगुरू व्हाले निंघाला हाय. असं असतानी गाव गोदरीमुक्त करन्यासाटी सरकारले मोहीम आखा लागते. गाडगेबाबाच्या नावानं स्वच्छ गावाची स्पर्धा घ्या लागते.
—-
आता गावाचा इचार लय झनायनं करून ठिवला हाय. अगदी तुकाराम बाबापासून त अगदी आपल्या तुकडोजी महाराज अन् गाडगेबाबावरी सार्यासयनंच गावाचा इचार केला हाय. तुकडोजी महाराजनं त ग्रामगीताच लेहली. त्यायले आम्ही राष्ट्रसंत अशी उपाधी देल्ली. त्यायचा लय गौरव केला. मंग गावोगावी त्यायचे ज्याले फालोअर म्हनतेत थे पैदा झाले, मातर गावं त्यायनं सांगलेल्या गीतेवानी काई झाले नाई. गाडगेबाबानं गावन स्वच्छ केले. सोताच्या हातात झाडू धरला अन् गाव झाडून कहाडले. तसा त्यायच्या झाडूनं गावं स्वच्छ केले तसेच त्यायच्या वानीनं ढोंगी लोकायचा ढोंगधतुरा धुवून काढला. गावातली अन् गावच्या लोकायच्या मनातली घान त्यायनं साफ केली. थे गेले न त्यायचा झाडू अनाथ झाला. त्यायच्यासारखी परखड वानीबी कोनी घेतली नाही. राजकारन अन् नेत्यायकून काहीबाही पाह्यजेच असलेले लोक गाडगेबाबावानी नाही बोलू शकत. गाडगेबाबानं तर महात्मा गांधीलेबी नाही म्हून सांगलं होतं… एकदा का झालं का महात्मा गांधी सेवाग्रामले होते. तवा गाडगेबाबा सारं सेवाग्राम झाडून स्वच्छ करत होते. बाबूजीचं गाव कसं लख्खचक्क असाले पाह्यजेन म्हून गाडगेबाबा झाडत होते. बापूजे हे पाह्यत होते का ह्या एकटा येड्यावानी दिसेल चिंध्या पांघरेल मानूस गाव झाडन्याचा शहानपना कामून करते, असं बापूजीले वाटलं. त्यायनं मंग त्यातच्या वर्धेतल्या लोकायले इचारलं. त त्यायनं मंग गाडगेबाबाबद्दल सारं काही सांगलं. बापूजीले वाटलं का इतला सोन्यावानी मानूस अन् आपल्याले मालूम नोता? मंग त्यायनं गाडगेबाबाले बलावनं पाठुलं. बाबानं सांगलं का, माहं काम झालं का येतो म्हून सांगा त्यायले. थे त्यायचं काम करतेत न मी माहं काम काहून थाबवू? मंग सारा सेवाग्राम झाडून झाल्यावर सांजेले बाबा गेले बापूजीली भेट्याले. त बापूजी बसेल होते त्यायच्या गादीवर. गाडगेबाबा बसले आपले आपले खालतं सारवलेल्या जमिनीवर. बापू म्हने, ‘आव इधर हमारे पास बैठो बैठकपर.’ त बाबा म्हने, ‘नको, तुमची गाडी तुमाले, मी आपला जमिनीवरच बरा. गादीची चटक नोका लावू मले…’ तरीही बापूजी म्हनले का, ‘अरे आव हमारे पास बैठो…’ त बाबा म्हनले, ‘नाई… असया ठिकानी बसाव का कोनी उघ म्हनू नये अन् हे जमीन काही कोनी माह्या बुडाखालून हिसकून नाही घेवू सकत.’ बापूजीले लय चांगलं वाटलं. ते म्हने का, ‘क्या चाहीये आपको?’ त बाबा म्हने मले काहीच नोको. बापूजीनं मंग त्यायले माह्या संग चाला, असं म्हनलं. बाबा म्हने, तुमचं काम तुमी करा, माहं काम मले करू द्या. तुमचं काम लय मोठं हाय, माहं काम तसं लहान हाय, तुमी देसाचं पाहा, मी गावाचं पाह्यतो…
गाडगेबाबा असे गावासाटी कुठीच गेले नाही. तरीबी गाव मातर त्यायच्या मांग गेला नाही. थे गेले न गावं पुन्हा कचर्यावनं भरले. गावाच्या गोदर्यो झाल्या. आता त गाव लागला हे तवाच समजते का घान वास याले लागते. गावाकडं जाची डांबरी सडक असली त असली नाहीत मंग गावाकडे जे काय जाते त्याले रस्ता म्हना लागते. त्याच्या दोन्ही बाजूनं लोक पाह्यटं मोकये झालेले रायते. पाह्यटं अंधारात बायकाले बसा लागते न मंग ऊनं निंघू लागल्यावर मानसं बसतेत दुतर्फ टमरेल घेवून. सोनखत करत बसलेले मान्सच दिसते सकायी. गाव गोदरीमुक्त करा, असं आता सांगा लागत हाय. भारत हा खेड्यायचा देश हाय न आता म्हने जगतगुरू व्हाले निंघाला हाय. असं असतानी गावात गावात उघड्यावर घान करू नोका हे सांगा लागते. गाव गोदरीमुक्त करन्यासाटी सरकारले मोहीम आखा लागते. गाडगेबाबाच्या नावानं स्वच्छ गावाची स्पर्धा घ्या लागते. गाडगेबाबानं बेईमानाच्या पाठीत काठी आनली होती. जिंदगीभर थे तेच करत आले. एकदा त्यायनं आपल्या एका कार्यकर्त्याले (त्यायचे भक्त नोते न नाहीत) पत्र लेहून घेतलं न धाडलं होतं का, मांग आलतो तवा तुह्या हतात मले सोन्याची आंगठी दिसली. लोकायचे काम करनाऱ्याला मानसाच्या हातात सोन्याच्या आंगठ्या येतेत कुठून? सारंकाही सामाजाचं हाय, सामाजासाटी फकिरी पांघरून तुमच्या मांग आलो, असं सांगनार्या मानसाच्या हातात घालाले सोनं घ्याले पयसा येत कुठून? असा सवाल बाबानं त्याले इचारला न पुना ठोकला धरून का, पुढच्या टायमाले आलो त तुमच्या हातात सोनं दिसाले नोको, घालाची असीन अंगठी न जमवाचं असीन सोनं त मंग माह्या मांग येऊ नोका. माह्या मांग याचं असीन त हातात झाडू पाह्यजेन… असं असतानी मान्स त्यायच्या नावानं करेल अभियानात गडबड करतेत. स्वच्छ गाव अभियानाची पाहानी कराले अदिकारी येनार हाय, हे आधी सांगन्या येते न मंग गाववाले ‘तयारी’ करून ठेवतेत सर्वीच. म्हंजे मंग गाव स्वच्छ करतेत. अधिकारी कुठी फिरनार म्हंजे त्यायले का दाखवाचं दे ठरलेलं रायते. तसं तसं गाव स्वच्छ करून ठिवतेत. शाळा रंगवतेत अन् त्याच्यासाटी मास्तरकडून पैसे घेतेत. गावात रांगोळ्या कहाडून ठेवतेत. पहानी कराले येनार अधिकार्याचा ब्रँड कोंचा, हे मालूम करू घेतेत. त्यायच्यासाटी कोंबडं कापतेत… आता गाडगेबाबा कोंबडे-बकरे कापू नोका हे सांगत आले न हे मातर कोंबडे कापतेत अधिकार्यासाटी. हे नवी अंधश्रद्धा हाय. आता देवीसाटी कोंबडं कापलं त अंधश्रद्धा न तपासनी अधिकार्यासाटी कापलं त शिष्टाचार, पाहूनचार हे कसं म्हनावं?
त हे असं रायते. त्याच्यात मंग हे गाव आमादार भाऊ, दादाच्या मतदारसंघातलं मलईदार (जादा मतदान होनारं) गाव असीन, नाहीत सरपंच भाऊचा खास मानूस असीन त मंग त्या गावाले हमखास पुरस्कार भेटते. पुरस्कार ममईत देतेत. गावात जावून देल्ला त ध्यानात येऊन का गाव कसं भिकारी हाय थे. मेकअप करून त भिकारीबी राजा दिसू सकते, मातर नाटक संपल्यावर रंग पुसकले का मंग पुन्हा हातात कटोराच रायते का नाही? गावं असे घान हायत. गावं दिसले का प्लास्टिकच्या पन्न्या उडतानी दिसतेत. उजाड-वैरान प्लास्टीकच दिसते सर्वीकडं… जगाचा नेता व्हाले निघेल देशात गावाले गोदरीमुक्त करन्याची शिक्षन द्याय लागते. उघड्यावर बसू नोका म्हनून शिक्षा करा लागते. गुड मॉर्निंग पथकं सोडा लागते. तरीबी गावात संडास बांधत नाही. संडाससाठी सरकार पैसा देते. जिल्हा परिषदकडून अनुदान भेटते. त्याचे लाभार्थी ठरतेत बराबर. आमादारकून न अस्याच भाऊ, दादा, ताई, आक्का अशा नेत्यायकून यादी येते असीच लाभार्थ्यायची. संडास काही बांधत नाही. गायी कोनी घेत नाही. त्याच गाई अन् थ्याच बकर्यात दाखवाले देल्ल्या जातेत. लोकायले गाई पोसा, मंग दूध कहाडा, थे विका न त्याचा पैसा करा… इतका लाँगकट नाही पुरवत. तितला टायमच नाही त्याच्यापेक्षा सरकारकून भेटलेल्या गाई हे लाभार्थी तिथल्या तिथं इकतेत न त्याचा पैसा करतेत. लोकायले देन्यासाटी या गाई कोनाकडून घ्याच्या हे भाऊनं ठरवलेलं रायते. त्यालेच हे लोक गाई वापस इकडून टाकतेत. म्हंजे दहा हजाराची गाय. त्याच्यावर पाच हजाराची सबसिडी. बाजारात तिची किंमत असते सात हजार. सरकारले इकते दहा हजारात. त्याच्यात पाच हजाराची सबसिडी. शेतकर्याले देल्ली. मंत्री, आमदारानं फटू कहाडले? बातमी झाली का मंग तिथंच थे गाय पाच हजाराले थोच इकत घेते. रोख रक्कम शेतकऱ्याच्या हाती पडते. असतेत दहाच गाई न दहा ठिकानी फिरवून दाखवतेत १०० गायी. मंग आमदार साहेब त्यायच्या मतदारसंघात कसी दुग्धक्रांती येनार हे दाखवतेत. १०० गाई, त्यायचं १५ लिटर एका गाईचं रोजचं दूध म्हंजे दीडशे लिटर दूध असं गनित मांडलं जाते. खेडे कसे स्वयंपूर्न केले हे दाखविलं जाते. खेड्यायचा अस इकास सुरू हाय. बाबू म्हनतेत, पैसे खाल्यानंबी देशाचा विकास होते… हेच असंच बाकी सार्याच योजनायचं होते. विहरी बांधल्या जाते. तळे खोदले जाते… जितकी मोठी योजना तितकी लाभार्थीची यादी खास वाड्यातून तयार होवून येते. ५० एकर ओलिताची शेती असलेला दारिद्र्यरेशेखाली दाखवला जाते. गावात म्हने रस्ते बांधले गेले पक्के… कसे? रस्ता असते एकच, दाखवते दोन. कसा? त चौधरीचं घर ते मारोतीचं मंदिर ह्या एक रस्ता. मंग मारोतीचं मंदिर ते चौधरीचं घर ह्या दुसरा रस्ता!
गावायचा असा इकास सुरू हाय. गाववाल्यायले त्याचं काहीच नाही. गावात राजकारन घुसलं हाय. नेते एक होतेत मतलबाले, तसं नाहीच त्यायचे भांडनं लोकायले चिवत्या बनविन्यासाटी रायतेत. लोक भांडत रायतेत न हे मलई खातेत. तुमीच खाल्लं दूध न तुमीच खाल्ली साय, समाजाचं काय रे बाबू समाजाचं काय, हे त्यायले कोनीच इचारत नाही. गाडगेबाबा आला न गेला. त्याच्या बाद जनतेच्या नावानं नेत्यायवर, सरकारवर दबाव आनून पदरात पाह्यजेन थे पाडून घेनार्याचीच चलती आली हाय. गाव सोडून शहरात गेलेले शहाने हे इसरतेत का त्यायची नळ गावातच गाडून ठिवली हाय. त्यायले वाटते का गावाचं आभाळ आपलं हाय. गावाचं आभाळ जितलं आपलं असते तितलीच जमीन न तेच्यावर राह्यनारे न जगनारे मानसंबी आपलेच असतेत. गावाकडची जमीन जितली आपली असते तितलं गावाचं स्मशानबी आपलं असते.
गाव नसावे थिल्लर
गावाने जमवून ठेवू नये चिल्लर
गावाने पोसू नये विद्वानांचा लाचार ताफा
गावात बेकारांची घाण नसावी
गावात तलवारींना वाण नसावी
गावाने जमवून ठेवावी सुकी लाकडे
ऐन पावसाळ्यात कुणी मेलेच तर!
आता त असं झालं हाय का गावाकडंबी बाटलीबंद पानी इकत घ्या लागू लागलं हाय. गावाची नदी कारखान्याच्या पान्यानं खराब झाली हाय. शहारातली घान तेच्यात सोडन्यात येते. कत्तलखान्यातलं रक्त नदीत सोडलं जाते… आपन का पेतो, याचा इचार गाववाले करत नाही. इचार करू शकनारे गाव सोडून कवाच शह्यरात गेले हायत. गावायचे वृद्धाश्रम झालेले हायत. गावातलं पानी शुद्ध नाही राहीलं. गावं थिल्लर अन् चिल्लर झाले हायत. तेच्यात मंग एखांद्या पोपटराव पवारचं गाव गावकीले जागते. त्याचं का कौतुक होते. अरे, गावकी अन् ग्रामसंस्कृती अशाच गावायची हाय.
हे जरा आपून जादा सिरीयस मोडवर चाललो हावोत. गावाकडं भुतंबी नाही राहीले, आता असं माहा मैतर म्हने मले. त म्होरल्या टायमाले गावाडचे भुतं सांगतो…
भेटू मंग पुना पंधरा दिवसानं ततवरीक राम राम!
– श्याम पेठकर
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)