आमिर खान व किरण राव यांच्या घटस्फोटाच्या बातमीला एबीपी माझाने आज दुपारच्या दोनच्या बातम्यांत अगदी पहिल्या क्रमांकाचे स्थान देऊन या ‘अतिशय महत्त्वाच्या’ घडामोडीचे तब्बल आठ ते दहा मिनिटे सविस्तर वृत्तांकन केले. ‘मिस्टर अॅन्ड मिसेस परफेक्शनिस्ट’ यांच्या ‘विभक्त’ होण्याबाबत समाजात कोणतेही गैरसमज पसरू नयेत यासाठी तेवढ्याच परफेक्शनिस्ट असलेल्या या वाहिनीने घेतलेली दक्षता कमालीची वाखाणण्याजोगी होती.
या दाम्पत्याविषयी बोलताना वृत्तनिवेदिका ज्ञानदाचा कमालीचा हळवा झालेला स्वर ऐकून, बिचार्याा आमिर-किरणचे काही बरेवाईट तर झाले नाही ना, या शंकेने अनेकांच्या पोटात धस्स झाले. पण त्यांच्या सुदैवाने तसे काही घडले नव्हते. यापूर्वी बॉलीवूडमध्ये कोणकोणते घटस्फोट गाजले याविषयीही प्रेक्षकांच्या ज्ञानात ज्ञानदाने मोलाची भर घातली. (इतरांचे ते ‘घटस्फोट’ आणि यांचा मात्र परस्परसहमतीने घेतलेला विभक्त होण्याचा निर्णय, ही या वाहिनीची विभागणी तर छानच होती.) राज्यातले व देशातले अन्य सर्व ‘प्रश्ण’ (हा उच्चार खास ज्ञानदाचा!) तितकेच महत्त्वाचे असल्याची जाणीव झाल्यानंतर आधीच जड झालेल्या अंत:करणाने ज्ञानदा आषाढी आंदोलन, लोकल प्रवासबंदी, अनिल देशमुखांना समन्स या किरकोळ घडामोडींकडे वळली. मी वामकुक्षीसाठी शयनकक्षाकडे वळलो.